'या' माणसानं चक्क चंद्रावरची जमीन विकून कमावला कोटींमध्ये पैसा

    • Author, ॲलिसिया हर्नांडेझ
    • Role, बीबीसी न्यूज मुंडो
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

जरा कल्पना करून बघा. तुमचा नुकताच घटस्फोट झाला आहे आणि तुमच्याकडे अजिबात पैसे नाहीत. तुम्ही कफल्लकच झाला आहात.

त्यानंतर मग तुमच्या डोक्यात कल्पना येते की, जर तुमच्या मालकीची एखादी मालमत्ता वा जमीन असती तर ती भाड्यानं देऊन तुम्हाला थोडे पैसे तरी कमावता आले असते! असा विचार डोक्यात येणं काही चुकीचं नाही.

पण मग हाच विचार करत असताना तुम्ही खिडकीतून बाहेर पाहता आणि तुमच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात, "युरेका! मी चंद्रच विकेन."

हे सर्व ऐकायला विचित्र, थोडंसं अविश्वसनीयच वाटतंय. नाही का?

मात्र हे प्रत्यक्षात घडलं आहे. डेनिस होप नावाच्या एका अमेरिकन व्यक्तीच्या मनात 1980 मध्ये हा विचार आला होता.

हा विचार मनात आल्यावर या कल्पनेनं प्रेरित होऊन या व्यक्तीनं चक्क चंद्रावरील जमिनीचे प्लॉट म्हणजे भूखंड विकले आणि त्यातून त्यानं चक्क कोट्यवधी रुपये कमावले.

मात्र हे सर्व त्यानं नेमकं कसं केलं? आंतरराष्ट्रीय करारांमधील 'कायदेशीर अस्पष्टता किंवा संदिग्धते'चा (लीगल ग्रे एरिया) फायदा उचलत डेनिस होप यानं ही संपत्ती कमावली.

अर्थातच, त्यानं हे सर्व अतिशय कौशल्यानं केलं, यात शंकाच नाही.

ग्रंथालयात पोहोचला डेनिस!

ही भन्नाट कल्पना डोक्यात आल्यानंतर, डेनिसनं याविषयी अधिक माहिती गोळा करायचं ठरवलं.

डेनिसनं अनेक वर्षांपूर्वी 'व्हाईस' या माध्यमसंस्थेला एक मुलाखत दिली होती. त्यात त्यानं सांगितलं होतं की तो ग्रंथालयात गेला आणि त्यानं 1967 चा बाह्य अंतराळ करार (1967 आऊटर स्पेस ट्रीटी) शोधला.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या या कागदपत्रात काय म्हटलं आहे? त्यात म्हटलं आहे की बाह्य अंतराळ (पृथ्वीच्या वातावरणाबाहेरचं विश्व) ही एक आंतरराष्ट्रीय सामायिक संपत्ती किंवा वस्तू आहे. "ती संपूर्ण मानव जातीची मालमत्ता आहे." त्यामुळे कोणत्याही देशाला या प्रदेशावर म्हणजे बाह्य अंतराळावर प्रादेशिक सार्वभौमत्वाचा दावा करता येणार नाही.

विशेषकरून या करारातील दुसऱ्या कलमात म्हटलं आहे की, "चंद्र आणि अंतराळातील इतर गोष्टी, सार्वभौमत्वाचा दावा करून, वापर करून किंवा ताब्यात घेऊन किंवा इतर कोणत्याही मार्गानं एखाद्या देशाला संपत्ती म्हणून त्यावर दावा करता येणार नाही."

म्हणजेच चंद्रासारख्या अंतराळातील गोष्टींवर कोणत्याही एका देशाची मालकी नसेल. तर ते सर्वांच्याच मालकीचे आहेत.

डेनिस होप यानं या कलम किंवा मुद्द्याचा अर्थ पुढीलप्रमाणे लावला. जर या गोष्टी सर्वांच्याच आहेत आणि कोणाही एकाच्या नाहीत आणि जर एखादा देश त्यावर दावा करू शकत नसेल, तर एखादी व्यक्ती त्यावर दावा का करू शकत नाही?

बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, "ती कुणीही मालक नसलेली जमीन होती."

त्यामुळे त्यानं त्यावर दावा किंवा हक्क सांगितला. ज्याप्रमाणे "आपले (अमेरिकन लोकांचे) पूर्वज युरोपमधून नव्या जगात आल्यावर त्यांनी केलं होतं, अगदी तसंच हे होतं."

आता मोठा प्रश्न होता की चंद्र कसा 'मिळवायचा' किंवा चंद्र 'ताब्यात' कसा घ्यायचा?

मग पुन्हा एकदा, डेनिस होपनं कायद्यामधील पळवाटेचा किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं, तर प्रतिसादाच्या अभावाचा फायदा घेतला.

त्यानं चंद्र, इतर 8 ग्रह आणि त्या ग्रहांचे चंद्र, यावरच्या मालकी हक्काचा दावा संयुक्त राष्ट्रसंघाकडे केला.

या दाव्यात, त्यानं म्हटलं होतं की, या मालमत्तेचं विभाजन करून ज्याला हवी असेल, त्याला ही मालमत्ता विकायची, अशी त्याची कल्पना होती.

मग त्यानं त्यांना हेदेखील सांगितलं की यात जर त्यांना कोणत्याही कायदेशीर समस्या असतील, तर त्यांनी त्या त्याला कळवाव्या.

मात्र त्याला कोणीही कधीच उत्तर दिलं नाही.

चंद्रावरील भूखंडाची विक्री

तेव्हापासून, डेनिस होपनं चंद्रावरील जमिनीचे प्लॉट किंवा भूखंड हेक्टर्समध्ये विकले आहेत. त्यानं फक्त पृथ्वीच्या चंद्रावरीलच भूखंड विकले नाहीत, तर मंगळ, शुक्र आणि बुध या ग्रहांवरील जमीन म्हणजे भूखंडांची देखील विक्री केली आहे.

त्याच्याकडून भूखंड विकत घेणाऱ्यांमध्ये हॉलीवूडचे स्टार, रोनाल्ड रेगन आणि जिमी कार्टर यांच्यासारखे अमेरिकेचे माजी दिवंगत राष्ट्राध्यक्ष यांचाही समावेश आहे. तसंच हिल्टन आणि मॅरियट यासारख्या मोठ्या हॉटेल चेन म्हणजे हॉटेल व्यवसायातील बड्या कंपन्यांचाही समावेश आहे.

चंद्रावर जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या मालकीचा एक भूखंड आहे, असंही म्हटलं जातं.

डेनिस होपनं 2007 मध्ये बीबीसीला सांगितलं होतं की, त्यानं दररोज सरासरी 1,500 मालमत्तांची विक्री केली होती. हे प्लॉट किंवा भूखंड निवडण्याची पद्धतदेखील अनोखी होती.

तो म्हणाला की, डोळे बंद करून चंद्राच्या नकाशावरील एखाद्या विशिष्ट ठिकाणी आपल्या पहिल्या बोटानं म्हणजे तर्जनीनं निर्देश करणं किंवा त्या जागेवर बोट दाखवून हा भूखंड निवडला जात असे.

"ही पद्धत फारशी वैज्ञानिक नव्हती. मात्र त्यात गंमत आहे," असं तो म्हणाला.

ही गोष्ट मजेशीर होती आणि तितकीच महागडीदेखील होती, असं दिसतं. कारण डेनिसनं याप्रकारे भूखंड विकून जवळपास 1.2 कोटी डॉलर्स (अंदाजे 111 कोटी रुपये) ची कमाई केल्याचं सांगितलं जातं. तसंच त्याचा दावा आहे की 1995 पासून तो फक्त हाच व्यवसाय करतो आहे.

"आमच्याकडून तुम्हाला खरेदी करता येणारी सर्वात छोटी मालमत्ता एक एकराची आहे. तर आम्ही विकत असलेली सर्वात मोठी जमीन 53,32,740 एकरांची आहे. त्याला आम्ही 'खंडप्राय' मालमत्ता असं म्हणतो. या जागेची किंमत 1 कोटी 33 लाख 31 हजार (1,33,31,000) डॉलर्स (अंदाजे 123 कोटी 79 लाख 17 हजार रुपये) इतकी आहे," असं डेनिसनं व्हाईसला सांगितलं.

"आम्ही अद्याप खंडाच्या आकाराची जमीन कोणालाही विकलेली नाही. मात्र आम्ही 1,800 आणि 2,000 एकरांचे (728 ते 810 हेक्टर्स दरम्यान) अनेक भूखंड विकले आहेत. आमच्याकडून जगभरातील 1,800 मोठ्या कंपन्यांनी भूखंड विकत घेतले आहेत. यात हिल्टन आणि मॅरियट सारख्या हॉटेल क्षेत्रातील कंपन्यांचाही समावेश आहे. विशिष्ट उद्देशासाठी या सर्व कंपन्यांनी हे भूखंड खरेदी केले आहेत," असं डेनिसनं सांगितलं.

एक आंतर-दीर्घिका किंवा आंतर-आकाशगंगीय राज्यघटना

हे सर्व वाचल्यानंतर तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की, हा सर्व व्यवहार, खरेदी-विक्री, सर्व व्यवस्था कशाप्रकारे टिकवून ठेवली जाते. किंवा सार्वजनिक हितासाठी सरकारांकडून या खरेदीदारांची मालमत्ता अचानक ताब्यात घेतली जाणार नाही, याची हमी कशाप्रकारे दिली जाते?

डेनिस होप आणि या मालमत्ता विकत घेणाऱ्या इतर सर्व मालकांच्या मनातदेखील साहजिकपणे हा विचार आला असणार. अर्थातच, मग त्यांना यावर एक उपायदेखील सापडला.

डेनिस होपनं स्वत:च सांगितल्याप्रमाणे, त्यांनी एक 'गॅलॅक्टिक गव्हर्नमेंट' (दीर्घिका किंवा आकाशगंगेच्या पातळीवरील सरकार) नावाचं एक लोकशाही प्रजासत्ताक स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

"यासाठीच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी आम्हाला 3 वर्षे लागली. मार्च 2004 मध्ये आम्ही तो ऑनलाइन स्वरुपात प्रकाशित केला. त्यावेळेस आमच्याकडे या भूखडांचे 37 लाख मालक होते. तसंच या राज्यघटनेच्या मंजुरीसाठी 1,73,562 मतं मिळाली होती. त्यामुळे आता आम्ही एक सार्वभौम देश आहोत, ज्याची पूर्ण मंजूरी मिळालेली राज्यघटना आहे," असं डेनिस म्हणाला.

"सध्या आमचे जगभरातील 30 देशांबरोबर डिप्लोमॅटिक संबंध आहेत. अधिकाधिक देशांनी आम्हाला मान्यता द्यावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. कारण आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये (आयएमएफ) सहभागी होण्याचा आमचा उद्देश आहे," असं तो पुढे म्हणाला.

बीबीसीला डेनिस होपनं केलेल्या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी करणं शक्य झालेलं नाही.

चंद्रावर मालकी हक्क सांगण्याचा प्रयत्न करणारा चिलीमधील माणूस

मानवानं चंद्रावर पाऊल ठेवण्याच्या वास्तविक शक्यतेचा विचार करण्याच्या खूप आधीपासूनच, अंतराळातील वस्तूंच्या मालकी हक्काच्या मुद्द्याची चर्चा सुरू होती.

डीन लिंडसे यानं 1936 मध्ये फक्त चंद्रावरील मालकीचाच नाही तर अंतराळातील सर्व वस्तूंवरील मालकीचा दावा केला. त्यावेळेस त्याच्याकडे या वस्तू विकत घेण्यासाठीचे प्रस्तावदेखील आले होते.

जेनारो गजार्डो वेरा यानेही तसंच केलं.

चिलीमध्ये 1919 साली जन्मलेल्या या वकिलानं दावा केला होता की 25 सप्टेंबर, 1954 ला नोटरीसमोर सही केलेल्या अधिकृत कागदपत्रांमध्ये नमूद केल्याप्रमाणे, त्याला हा ताबा मिळाला आहे. या कागदपत्रात त्याचा उल्लेख 'चंद्राचा मालक' असा आहे.

या मालमत्तेचा पुरावा म्हणजे, चिलीच्या मध्य भागातील टाल्का या कृषीप्रधान शहरातील एका नोटरीनं सही केलेला एक दस्तावेज आहे. हे शहर चिलीच्या राजधानीपासून जवळपास 255 किमी अंतरावर आहे. तो दस्तावेज आता सँटिॲगोच्या न्यायालयीन आर्काइव्ह किंवा संग्रहात नोंदवलेला आहे.

या दस्तावेजात पुढीलप्रमाणे म्हटलं आहे,

"जेनारो गजार्डो वेरा हा वकील 1857 पूर्वीपासून त्याच्या पूर्वजांच्या मालकीसह पृथ्वीचा एकमेव उपग्रह असलेल्या चंद्राचा मालक आहे. या उपग्रहाचा म्हणजे चंद्राचा व्यास 3,475.00 किलोमीटरचा आहे. त्याच्या उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम या गोलाकार सीमा बाह्य अंतराळात आहेत. तो 1 ओरिएंट स्ट्रीट 1270 इथं राहतो. तो अविवाहित आहे. जेनारो गजार्डो वेरा, आयडी नंबर 1,487,45-के. नुनोआ. टाल्का, 25 सप्टेंबर, 1954."

अर्थात जेनारोचं प्रकरण हे काही गंभीर स्वरुपाचं नाही तर तो मुख्यत: फक्त एक विनोदच आहे.

जेनारोनं 1969 मध्ये 'द इव्हिनिंग इंडिपेंडंट' या अमेरिकेतील वृत्तपत्राला स्वत:च सांगितलं होतं की त्याला टाल्का सोशल क्लब या एका स्थानिक संस्थेशी जोडून घेण्यासाठी चंद्राची मालकी हवी होती.

त्याच्या वक्तव्यांनुसार, या क्लबच्या नियमांनुसार संस्थेच्या सदस्यांना ते कोणत्या तरी मालमत्तेचं मालक असल्याचं सिद्ध करावं लागत होतं.

जेनार्डोकडे पैशांची कमतरता होती. मात्र तो शहरातील श्रीमंत लोकांना एकत्र आणणाऱ्या या संस्थेचा सदस्य होण्यास उत्सुक होता. त्यामुळेच या वकिलानं चंद्रच विकत घेण्याचा निर्णय घेतला.

यासाठी त्याला 1 अमेरिकन डॉलरइतका खर्च आला, असं त्यानं या अमेरिकन वृत्तपत्राला सांगितलं.

एक दिव्य, अलौकिक व्यवसाय

डेनिस होपनं त्याचा आंतरदीर्घिय किंवा अंतराळातील स्थावर मालमत्ता, भूखंड विकण्याचा व्यवसाय सुरू ठेवला आहे. मात्र असं असूनही, तज्ज्ञांचं म्हणणं आहे की चंद्रावर कोणाचाही मालकी हक्क नाही. किमान कायदेशीरदृष्ट्या तरी नाही.

महत्त्वाचं म्हणजे, 1967 च्या आंतरराष्ट्रीय करारानुसार, अंतराळ मोहिमा आणि अंतराळाचा वापर सर्व देशांच्या फायद्याचा आणि हिताचा असला पाहिजे.

मग असं असताना, एखादी व्यक्ती, स्वत:ला चंद्राचा मालक म्हणू शकते का?

क्लेअर फिंकेलस्टाईन पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तज्ज्ञ आहेत.

क्लेअर फिंकेलस्टाईन यांनी 2019 मध्ये व्हाय (डब्ल्यूएचवाय) या एनपीआरशी संलग्न असलेल्या न्यूज वेबसाईटला याचं उत्तर 'नाही' असं दिलं. एनपीआर हे अमेरिकेतील सार्वजनिक रेडिओ नेटवर्क आहे.

मात्र, ज्यावेळेस अंतराळातील संसाधनांचा वापर करण्यासारख्या व्यावसायिक उपक्रमांचा प्रश्न येतो, त्यावेळेस हे उत्तर तितकंच स्पष्ट नाही.

"खासगी कंपन्यांनी अंतराळात खाणकाम प्रकल्प सुरू करण्याच्या बाबतीत, आंतरराष्ट्रीय कायदा संदिग्ध, अस्पष्ट आहे," असं इयान क्रॉफर्ड यांनी 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखामध्ये बीबीसीला सांगितलं होतं. ते लंडनमधील बर्कबेक कॉलेजमध्ये ग्रहविज्ञानाचे प्राध्यापक आहेत.

"बाह्य अंतराळ कराराचा (आऊटर स्पेस ट्रीटी) आढावा घेणं आणि त्यात सुधारणा करणं आवश्यक आहे," असं इयान म्हणाले.

मात्र तोपर्यंत, अंतराळ कायद्यानुसार, चंद्र एकाच वेळी कोणाही एकाच्या मालकीचा नाही, तर तो सर्वांच्या मालकीचा आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)