You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
व्हाईट हाऊसने जाहीर केला विजय, इस्रायलने देखील दिला शस्त्रसंधीला पाठिंबा
दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधी झाल्यानंतर व्हाईट हाऊसने आपला विजय घोषित केला आहे. सुरुवातीला इस्रायलने या शस्त्रसंधीवर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती पण आता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाला पाठिंबा जाहीर केल्याचे त्यांनी सांगितले.
इराणकडून अण्वस्त्र कार्यक्रम, मिसाईल्स आणि दहशतवादाच्या माध्यमातून अमेरिका, इस्रायल आणि प्रदेशातील इतर देशांना धोका निर्माण होणार नाही असे अमेरिकेचे प्रयत्न आहेत, त्याला देखील इस्रायलचा पाठिंबा आहे.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेव्हिट यांनी म्हटले आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि आपल्या सेनेनी हा विजय शक्य बनवला. होर्मुझ सामुद्रधुनी देखील खुली करण्यात आली आहे, असे त्यांनी पुढे म्हटले.
'ऑपरेशन एपिक फ्युरी' ही मोहीम 4 ते 6 आठवड्यांमध्ये पूर्ण होईल असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणत होते पण आपल्याला हवी असलेली उद्दिष्टे 38 दिवसांत अमेरिकेनी साध्य केली असे कॅरोलिना यांनी आपल्या निवेदनात म्हटले.
अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ आणि जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष डॅन केन लवकरच संवाद साधण्याची शक्यता असल्याचे देखील त्यांनी म्हटले.
ट्रम्प यांनी दिलेली मुदत संपण्यापूर्वी अमेरिका-इराणची युद्धविरामासाठी सहमती, दोन्ही देशांनी मानले पाकिस्तानचे आभार
पाकिस्तानच्या मध्यस्थीने अमेरिका आणि इराणने युद्धविरामाला सहमती दर्शवली आहे. यासाठी दोन्ही देशांनी पाकिस्तानचे आभार मानले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की पाकिस्तानच्या नेतृत्वात झालेल्या मध्यस्थीमध्ये इराण आणि अमेरिकेत युद्धविराम झाला आहे.
'जर इराण होर्मुझ सामुद्रधुनी खुली करत असेल तर हा युद्धविराम लागू करण्यात येईल. जर इराण या गोष्टीसाठी तयार असेल तर अमेरिकेकडून इराणवर होणारे हल्ले दोन आठवड्यांसाठी थांबवण्यास मी तयार आहे,' असे ट्रम्प यांनी म्हटले.
ट्रम्प म्हणाले या युद्धविरामासाठी (शस्त्रसंधी) इराण आणि अमेरिका तयार आहेत. ट्रम्प यांनी इराणला बुधवारी सकाळी 5.30 ( भारतीय वेळेनुसार) पर्यंत डेडलाईन दिली होती. ही डेडलाईन संपण्याच्या दहा मिनिटे आधी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी घोषणा केली की दोन्ही देशातील शस्त्रसंधी ही तत्काळ प्रभावाने लागू होईल.
ट्रम्प पुढे म्हणाले की दोन आठवड्यांची शस्त्रसंधी ही तेव्हाच लागू होईल जेव्हा होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे आणि सुरक्षितरीत्या खुली करण्यासाठी इराण तयार असेल.
त्याच वेळी इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अरागची यांनी घोषणा केली आहे की जर इराणवर होणारे हल्ले थांबवण्यात आले तर इराण देखील शस्त्रसंधीसाठी तयार आहे.
अरागची म्हणाले की दोन आठवड्यांच्या मुदतीदरम्यान सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक सुरक्षितरीत्या होईल. ही व्यवस्था इराणच्या सशस्त्र सेनेच्या समन्वयाने लागू केली जाईल तसेच तांत्रिक सीमांवरही देखरेख ठेवली जाईल.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी दोन्ही देशांचे आभार मानलेत. त्यांनी इराण आणि अमेरिकेच्या शिष्टमंडळांना पुढील वाटाघाटींसाठी 10 एप्रिलला इस्लामाबादमध्ये आमंत्रित केलं आहे.
ट्रम्प यांनी इराणसाठी वापरले होते अपशब्द
मंगळवारपर्यंत जर होर्मुझ खुले केले नाही तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.
ट्रूथ सोशलवर लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांनी इराणला होर्मुझची सामुद्रधुनी मंगळवारपर्यंत (7 एप्रिल) खुली करावी अन्यथा इराणमधील ऊर्जा स्रोत आणि पूल उद्ध्वस्त केले जातील असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.
त्यानंतर ट्रम्प यांनी इशारा दिला होता की मंगळवारी रात्री एक संपूर्ण संस्कृतीच नष्ट केली जाईल.
इराणने आपल्याशी (तडजोडीचा) करार करावा यासाठी त्यांनी वॉशिंग्टनच्या वेळेनुसार रात्री आठ पर्यंतची मुदत दिली होती त्यानंतर इराणने अशा कराराबद्दल सहमती दर्शवली नव्हती. त्यानंतर ट्रम्प यांनी ट्रुथ सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट केली होती. 'मंगळवारी रात्री एक संस्कृती पूर्णपणे संपेल', असं ते म्हणाले होते.
ट्रुथ सोशलवर त्यांनी लिहिले होते की, "एक संस्कृती पूर्णपणे आज रात्री नामशेष होईल. ती परत कधी येणार नाही. असं व्हावं अशी माझी इच्छा नाहिये पण कदाचित असं होऊ शकेल."
या पार्श्वभूमीवर इराण आणि अमेरिकेनी शस्त्रसंधीची तयारी दर्शवली.
कशा झाल्या वाटाघाटी?
डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर लिहिले की पाकिस्तानचे पंतप्रधान आणि फील्ड मार्शल आसिम मुनीर यांच्याशी बोलणी झाली.
त्यांनी मला विनंती केली की इराणवरील हल्ले थांबवण्यात यावेत. त्यानुसार मी हल्ले थांबवण्याची तयारी दर्शवली आहे परंतु इराणने होर्मुझची सामुद्रधुनीवर पूर्णपणे आणि सुरक्षितरीत्या खुली करावी.
शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर तेलाच्या किमतीत घसरण
दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी झाल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर करताच आंतरराष्ट्रीय तेलबाजारातील तेलाच्या किमतीत घसरण दिसत आहे. या घोषणेनंतर ग्लोबल बेंचमार्क ब्रेंट क्रुड ऑइलच्या बॅरलची किंमत 13.6 टक्क्यांनी घसरली आहे (96.8 डॉलर) . अमेरिकन बाजारातील तेलाची किंमत 14.3 टक्क्यांनी घसरली.
शस्त्रसंधीच्या घोषणेनंतर व्यावसायिकांना आश्चर्याचा धक्का बसण्याची शक्यता होतीच. त्यामुळेच तेलाच्या किमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळाले, असे जपान इन्स्टिट्यूट ऑफ एनर्जी इकोनॉमिक्समधील संशोधक इचिरो कुटनी यांनी बीबीसी न्यूजला सांगितले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)