You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आर्टेमिस 2 चंद्राच्या मागे पोहोचताच 40 मिनिटं संपर्क तुटला, काय म्हणाले अंतराळवीर? कॅप्सूल परतीच्या मार्गावर
आर्टेमिस-2 मधील अंतराळवीर चंद्राच्या अत्यंत जवळ पोहोचण्यात यशस्वी ठरले आहेत. हे यान आता पृथ्वीकडे परतीच्या मार्गावर निघालं आहे. तिथून त्यांनी आपल्या स्पेसक्राफ्टमधून पूर्णाकृती सूर्यग्रहण पाहिलं.
या मून मिशनमध्ये सहभागी असलेले अंतराळवीर पृथ्वीवर शनिवारी सकाळी साधारणत: साडेपाच वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार) परततील.
मोहिमेतील अंतराळवीर कमांडर रीड वाईसमन म्हणाले की, या मोहिमेत सहभागी झालेल्या ओरियन अंतराळयानाच्या चमूने "अशी दृश्ये पाहिली जी कोणत्याही मानवाने यापूर्वी कधीही पाहिली नव्हती."
दुसरे एक अंतराळवीर, पायलट व्हिक्टर ग्लोव्हर यांनी म्हटलंय की, त्यांनी जे पाहिलंय, त्याचं वर्णन करायला त्यांच्याकडे 'शब्द नाहीत'.
आपल्या प्रवासादरम्यान, हे अंतराळयान पृथ्वीपासून 2,52,756 मैल (4,06,771 किलोमीटर) अंतरावर पोहोचलं.
हे अंतराळात मानवानं आतापर्यंत पार केलेलं सर्वाधिक अंतर आहे. चंद्राच्या मागे पोहोचल्यानंतर अंतराळवीरांचा 'नासा'शी असलेला संपर्क तुटला होता.
या शक्यतेचा आधीच अंदाज वर्तवण्यात आला होता. तरीही, अंतराळवीरांचा सुमारे 40 मिनिटे संपर्क तुटलेला होता.
जेव्हा त्यांच्याशी तुटलेला संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला, तेव्हा मिशन विशेषज्ज्ञ क्रिस्टीना कोच यांनी अंतराळवीरांमधील शांतता तोडत म्हटलं की, "पृथ्वीवरून पुन्हा एकदा आवाज ऐकणं शानदार आहे."
ट्रम्प यांचा अंतराळवीरांसोबत संवाद
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील अंतराळवीरांसोबत संवाद साधला.
त्यांनी म्हटलं की, "तुम्ही सर्वांनी इतिहास रचला आहे. संपूर्ण अमेरिकेला तुमच्याबद्दल अभिमान वाटेल, असं कार्य तुम्ही केलंय."
त्यांनी अंतराळवीरांना व्हाईट हाऊसमध्ये येण्याचंही निमंत्रण दिलंय.
अंतराळवीर शुक्रवारी इस्टर्न अमेरिकन वेळेनुसार, रात्री 8.07 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार, शनिवारी पहाटे 5 वाजून 37 मिनिटांनी) पृथ्वीवर परततील.
ते अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर पॅसिफिक महासागरामध्ये स्प्लॅशडाऊन (पाण्यात उतरण्याची) होण्याची अपेक्षा आहे.
अंतराळवीर किती सुरक्षित आहेत?
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचे कमांडर राहिलेले नासाचे निवृत्त अंतराळवीर टेरी विर्ट्स म्हणतात की, शटलच्या क्रूला चंद्राभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी त्याच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करावा लागला.
"ते अंतराळात फारच दूरवर आहेत. जर त्यांच्या आयुष्याला धोका निर्माण झाला तर त्यांना वाचवण्यासाठी कोणताच मार्ग उपलब्ध नाही. तिथे त्यांना प्रचंड अशा रेडिएशन्सचा (विकिरण) सामना करावा लागतोय. असे रेडिएशन्स पृथ्वीवर नसतात.
त्या पातळ एल्यूमिनियमच्या थराच्या काही मिलीमीटरवर बाहेरच त्यांच्यासाठी मृत्यूची तलवार टांगती आहे," असंही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, "संपूर्ण 10 दिवसांचं मिशन सुरक्षित आहे, असं तर म्हटलं जाऊ शकत नाही. पण आज काही खास झालेलं नाही. आज फक्त एवढंच घडलंय की, हे कॅप्सूल चंद्राच्या जवळून गेलंय."
टेरी वर्ट्स यांच्या मतानुसार, त्यांनी चंद्राच्या गुरूत्वाकर्षणाच्या माध्यमातून आपल्या उड्डाणाची दिशा जवळपास 180 डिग्रीमध्ये वळवली. जेणेकरून, त्यांचं स्पेसक्राफ्ट त्यांना पुन्हा पृथ्वीवर घेऊन येईल.
त्यांनी गंमतीमध्ये असंही म्हटलं की, "सर आयझॅक न्यूटन यांनीच इथं जबाबदारी उचलली आहे. आता गुरूत्वाकर्षणच कॅप्सूलला दिशा देत आहे."
बीबीसीच्या सायन्स एडिटर रेबेका मोरेल यांनी या मिशनबाबत नासाच्या विज्ञान प्रमुख डॉ. निकोला फॉक्सशी चर्चा केली.
त्यांनी म्हटलं की, मिशन कंट्रोलमध्ये सायन्स टीमसाठी हा दिवस जबरदस्त तर होताच मात्र, तो प्रचंड व्यग्र देखील होता.
अंतराळवीरांनी या मिशनमधील या भागासाठीची तयारी करण्यासाठी अनेक वर्ष काम केलंय. त्यांनी नासाच्या टीमसोबत एकत्र येत लूनार सायन्सचा अधिक खोलात जाऊन अभ्यास केला.
फॉक्सने म्हटलंय की, क्रूने या दरम्यान प्रचंड चांगलं काम केलंय. त्यांनी चंद्राशी निगडीत फारच महत्त्वाचे इनपुट्स दिले आहेत.
एक सौर शास्त्रज्ञ असल्याने, त्या ग्रहणाबद्दल विशेषतः उत्सुक होत्या.
त्यांनी म्हटलं की, त्यांनी असे अनेक खगोलीय घटनाक्रम पाहिलेले आहेत. मात्र, यावेळी पाहिलेला हा नजारा पृथ्वीवरून पाहिलेल्या कोणत्याही ग्रहणापेक्षा फारच वेगळा होता.
मिशनबाबत काही खास गोष्टी
आर्टेमिस-2 मिशनमधील रॉकेटने फ्लोरिडाच्या केप कॅनावेरलमधील केनेडी स्पेस सेंटरमधून 1 एप्रिल 2026 रोजी उड्डाण घेतलं होतं.
या मोहिमेत तीन अमेरिकन अंतराळवीर, रीड वाईझमन, क्रिस्टीना कोच, व्हिक्टर ग्लोव्हर आणि कॅनेडियन अंतराळवीर जेरेमी हॅन्सेन यांचा समावेश आहे.
नासाच्या आर्टेमिस कार्यक्रमामागे अनेक वर्षांची मेहनत आहे. हजारो लोक या मोहिमेशी निगडीत आहेत आणि आतापर्यंत या मोहिमेवर जवळपास 93 अब्ज डॉलर खर्च झालेले आहेत.
50 वर्षांच्याही आधी, अमेरिकेच्या अपोलो मिशन्सनी इतिहास रचलेला होता. तेव्हा पहिल्यांदा माणसानं चंद्राच्या पृष्ठभागावर पाऊल ठेवलेलं होतं.
चंद्राचा पृष्ठभाग भलेही दिसताना रूक्ष, धुळीनं भरलेला आणि ओसाड वाटत असला तरी वास्तविकता फारच वेगळी आहे.
नॅचरल हिस्ट्री म्यूझियमच्या प्लॅनेट सायन्टिस्ट प्रोफेसर सारा रसेल सांगतात की, "चंद्रावर तीच तत्त्वं आहेत, जी आपल्याला आपल्या पृथ्वीवर सापडतात."
"उदाहरणार्थ, पृथ्वीवर दुर्मिळ असलेली रेअर अर्थ इलेमेंट्स, चंद्राच्या काही भागांमधून उत्खनन करून काढण्याइतपत पुरेशा प्रमाणात असू शकतात.
त्यामध्ये लोह आणि टायटॅनियमसारख्या धातूंचाही समावेश आहे. तसेच, हेलियमदेखील आहे. हेलियमचा वापर सुपरकंडक्टरपासून ते मेडिकल उपकरणांपर्यंत अनेक गोष्टींमध्ये केला जातो.
मात्र, ज्या साधनसंपत्तीनं सर्वाधिक लक्ष खेचून घेतलंय आणि एकप्रकारे हैराण केलंय, ते म्हणजे पाणी.
रसेल सांगतात की, "चंद्रावरील काही खनिजांमध्ये पाणी अडकलेलं आहे. आणि ध्रुवांवरही पाणी फार चांगल्या प्रमाणावर उपलब्ध आहे."
त्या सांगतात की, तिथे असे खड्डे आहेत जे नेहमीच सावलीत असतात. त्यामुळे, तिथे बर्फ जमा झालेला असू शकतो.
जर तुम्हाला चंद्रावर राहायचं असेल, तर पाण्याची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. ते केवळ पिण्यासाठीच उपयुक्त नाहीये, तर त्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विघटन करून अंतराळवीरांसाठी श्वास घेण्यायोग्य हवा आणि अंतराळयानासाठी इंधनसुद्धा तयार करता येते.
नासाचं लक्ष आता मंगळ ग्रहावर आहे. तिथे 2030 पर्यंत मानवाला पाठवायचं ध्येय नासानं ठेवलंय. मात्र, ज्या तांत्रिक आव्हानांवर मात करायची आहे ते पाहता, ही अंतिम मुदत बरीच महत्त्वाकांक्षी आहे, असं नक्कीच म्हणता येईल.
मात्र, कुठे ना कुठे सुरुवात तर करावीच लागते. आणि सुरुवात चंद्रापासून करायची हे अमेरिकनं ठरवलेलंच आहे. या सगळ्यामध्येच आर्टेमिस-2 मिशनदेखील महत्त्वाचं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)