You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
तब्बल 250 कुत्रे कोंडले एकाच घरात; इतके कुत्रे एकत्र कशासाठी ठेवलेले?
- Author, एमी वॉकर
- वाचन वेळ: 3 मिनिटे
ब्रिटनमध्ये एक धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. एका घरात तब्बल 250 पेक्षा जास्त कुत्रे एकत्र राहत असल्याचे आढळून आले आहे. यातील अनेक कुत्र्यांची अवस्था वाईट झाली होती.
प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संस्थेमुळे या कुत्र्यांना आता दिलासा मिळाला आहे.
प्राण्यांसाठी काम करणाऱ्या रॅडक्लिफ ॲनिमल सेंटरने (आरएसपीसीए) या कुत्र्यांची सुटका केली आहे. त्यांना एका घरात तब्बल 250 पेक्षा जास्त पुडल-क्रॉस कुत्रे एकत्र राहताना आढळून आले होते.
यूकेमधील एका अज्ञात ठिकाणी सापडलेल्या या कुत्र्यांची संख्या आणि त्यांची राहण्याची परिस्थिती, "घरातील काही अडचणींमुळे खूपच वाढली आणि ती नियंत्रणाबाहेर गेली होती", असं आरएसपीए या ॲनिमल वेल्फेअर चॅरिटी संस्थेनं सांगितलं.
सोशल मीडियावरील फोटो खरा
बचावकर्त्याने एक 'धक्कादायक' फोटो काढला होता. त्यात हॉलमध्ये डझनभर कुत्रे कोंडल्याचे दिसून येतात.
जेव्हा हा फोटो सोशल मीडियावर टाकण्यात आला. त्यावेळी अनेकांनी तो एआयने तयार केलेला बनावट फोटो असल्याचं म्हटलं होतं.
परंतु, हा फोटो बनावट नसून तो खरा असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.
आरएसपीसीएने सांगितलं की, हा फोटो त्यांनी हाताळलेल्या अशा अनेक प्राण्यांच्या घटनांचं 'धक्कादायक वास्तव' दाखवतो. 2021 पासून इंग्लंड आणि वेल्समध्ये अशा घटनांमध्ये सुमारे 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या वर्षभरात अशा 4 हजार 200 घटनांना प्रतिसाद दिला, असं या संस्थेनं सांगितलं. या प्रत्येक ठिकाणी किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त प्राणी एकाच घरात होते.
रॅडक्लिफ ॲनिमल सेंटरने सांगितलं की, त्यांच्याकडे आणलेल्या काही कुत्र्यांच्या केसांचा खूपच गुंता झाला होता, त्यांची निगा राखण्यात आलेली नव्हती आणि त्यामुळे त्यांच्या त्वचेला जखमाही झालेल्या होत्या.
"काही कुत्रे इतके घाबरलेले होते की, त्यांना केनलमधून बाहेर गवतावर नेण्यासाठी उचलून न्यावं लागलं," असंही आरएसपीसीएने म्हटलं.
याप्रकरणी संस्थेचे अधीक्षक जो हर्स्ट म्हणाले की, "हा धक्कादायक फोटो अनेक प्राण्यांच्या अशा प्रकरणांचं वास्तविक चित्र दाखवतो. आमचे अधिकारी आता वारंवार अशा घटनांना सामोरे जात आहेत, जिथे एका ठिकाणी 10, 20 आणि अगदी 100 प्राणीही सापडत आहेत, आणि अशा प्रकरणांची संख्या वाढताना दिसत आहे."
"लोकांना हे पाहून इतका धक्का बसतो की, त्यांना ते खरंच वाटत नाही. पण हा फोटो एआयने बनवलेला नाही, तो खरा फोटो आहे."
"चांगल्या हेतूने प्राणी पाळणारे मालकही कधी कधी परिस्थिती हाताबाहेर जाऊ देतात. प्राण्यांची अनियंत्रित वाढ होते आणि मग सर्व गोष्टी नियंत्रणाबाहेर जातात. हेच या घटनेतून दिसून येते."
एकाच ठिकाणी इतके प्राणी का?
ते मालकांच्या परिस्थितीबद्दल अधिक माहिती देऊ शकत नाहीत. पण ते परिस्थितीमुळे खूपच त्रस्त झाले होते आणि म्हणूनच त्यांनी मदतीसाठी संपर्क साधला, असं आरएसपीसीएने सांगितलं.
परिस्थिती आणि 'मालकांची नाजूक अवस्था' पाहता, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे योग्य ठरणार नाही, असं त्यांनी म्हटलं.
आरएसपीसीएने सांगितलं की, एका ठिकाणी खूप मोठ्या संख्येने प्राणी ठेवण्यामागे काही कारणं असू शकतात. जसं की मानसिक ताण-तणाव, वाढता खर्च किंवा चुकीच्या पद्धतीने प्राण्यांची संख्या वाढवणारे लोक.
पुडल क्रॉस डॉग्स म्हणजेच 'डुडल' प्रकारचे कुत्रे गेल्या काही वर्षांत खूप लोकप्रिय झाले आहेत. डॉग्ज ट्रस्टच्या 2025 च्या सर्वेक्षणानुसार, हे श्वान पाळीव कुत्र्यांमध्ये टॉप-3 मध्ये आहेत.
आरएसपीसीएने नोव्हेंबरमध्ये वेगळ्या घटनेत सांगितलं की, बेडफोर्डशायरमधील एका घरातून त्यांनी सुमारे 80 कुत्र्यांना वाचवलं. यामध्ये प्रामुख्याने चिहुआहुआ, पॉमेरियन आणि इतर क्रॉस-ब्रीडचे कुत्रे होते.
त्या ठिकाणाहून वाचवलेल्या 250 कुत्र्यांपैकी 87 कुत्रे आपल्या ताब्यात घेतले, तर उरलेले कुत्रे डॉग्ज ट्रस्टकडे देण्यात आल्याचे आरएसपीसीएने म्हटलं.
श्वानांना दत्तक देण्याची प्रक्रिया सुरू
त्यांनी ताब्यात घेतलेले कुत्रे नवीन घर मिळवण्यासाठी हर्टफोर्डशायर, सरे, नॉरफोक आणि नॉटिंगमशायरसह इतर काही ठिकाणच्या केंद्रांमध्ये पुनर्वसनासाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.
स्टीव्ही आणि सँडी हे दोन कुत्रे सध्या आरएसपीसीएच्या साउथरिज अॅनिमल सेंटरमध्ये दत्तक घेण्याची वाट पाहत आहेत.
स्टीव्हीला दिसतही नाही आणि ऐकूही येत नाही. त्यामुळे तिला तिचा मार्गदर्शक बनलेल्या दुसऱ्या कुत्र्यासोबतच नव्या घरात जावं लागेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)