पिता-पुत्रांना कोठडीत निर्दयीपणे मारहाण झाल्याचे प्रकरण, 9 पोलिसांना दुहेरी फाशीची शिक्षा

वाचन वेळ: 5 मिनिटे

मदुराईतील सातानुकुलम पोलीस स्टेशनमध्ये 2020 साली कोरोना काळात वडील आणि मुलाचा पोलीस स्टेशनमध्ये मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्यायालयाने 9 पोलिसांना दुहेरी फाशीची शिक्षा सुनावली आहे. याचबरोबर सर्व दोषींना दंड देखील ठोठावला आहे.

तुतीकोरन जिल्ह्यातील सातानुकुलम येथील व्यापारी जयराज आणि त्यांचा मुलगा बेनिक्स या दोघांना पोलिसांनी 19 जून 2020 रोजी कोरोनाकाळात ताब्यात घेतले. आणि अतिशय निर्दयपणे मारहाण केली.

त्यानंतर त्यांना 21 जून रोजी कोविलपट्टी तुरुंगात ठेवण्यात आले. 22 जून रोजी बेनिक्सचा मृत्यू झाला तर जयराज यांचा दुसऱ्या दिवशी सकाळी मृत्यू झाला.

या प्रकरणानंतर देशात मोठ्या प्रमाणात गदारोळ निर्माण झाला. त्यानंतर मद्रास हायकोर्टाने या प्रकरणाचे स्वतःहून दखल घेत पोलिसांकडून अहवाल मागवला. मग हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्त करण्यात आले.

या प्रकरणातील मुख्य आरोपी सातानुकुलम जे स्टेशन इंचार्ज श्रीधर हे होते. त्यांच्या व्यतिरिक्त अन्य पोलिसांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणातील सर्व 10 आरोपींना निलंबित करण्यात आले आणि त्यांना अटक करुन मदुराईतील सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आले. या आरोपींपैकी एक जण पालदुरई याचा मृत्यू ऑगस्ट 2020 मध्ये कोव्हिडमुळे झाला. इतर 9 आरोपींना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी दोन भागात 2427 पानांचे चार्जशीट दाखल केले. प्रकरणाची सुनावणी मदुराईचे पहिले अतिरिक्त न्यायाधीश यांच्या सत्र न्यायालयात झाली. त्यांनी सर्व आरोपींचा जामीन फेटाळला होता.

23 मार्चला न्यायालयाने सभी आरोपींनी दोषी ठरवले आणि 6 एप्रिल रोजी शिक्षा सुनावली.

या प्रकरणाचा निकाल देताना न्या. मुथुकुमारन यांनी कठोर शब्दांत टीका केली आहे. ते म्हणाले, की त्यांनी दोघांना मारण्याच्या उद्देशानेच हे कृत्य केले आहे. जेव्हा आम्ही विचारलं की या प्रकरणाची शिक्षा कशी असावी तेव्हा केंद्र सरकारने म्हटले की कठोरात कठोर शिक्षा व्हावी. याच बरोबर तामिळनाडू सरकारने देखील म्हटले की दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी.

न्या. मुथुकुमारन यांनी म्हटले की ही मानवी प्रतिष्ठेची पायमल्ली आहे.

ते पुढे म्हणाले की कोर्ट या प्रकरणाकडे असाच कानाडोळा करू शकत नाही. सुधारण्याची संधी देऊन देखील ते सुधरले नाहीत. त्या दोघांवर हल्ला फक्त याच कारणासाठी करण्यात आला की त्या दोघांनी कोरोनाकाळात मोबाईल दुकान उघडले.

जर मद्रास हायकोर्टाने स्वतः जर या प्रकरणाची दखल नसती घेतली तर त्या दोघांचे मृतदेह दफन होण्याआधी या प्रकरणालाच पुरुन टाकण्यात आले असते.

पुढे न्यायाधीश म्हणाले, त्यांनी निशस्त्र लोकांवर हल्ला केला. त्यांना माफ करण्यात येऊ नये. वय किंवा कौटुंबिक पार्श्वभूमीवर त्यांची शिक्षा कमी केली नाही पाहिजे. हे सर्व जण शिक्षित आहेत. एक कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्यांच्यासाठी जन्मठेप पुरेशी नाही.

प्रत्येक दोषीच्या शिक्षेचा तपशील ऐकवताना न्यायाधीश म्हणाले की दोषी असा विचार करू शकतात की हे गुन्हेगारी कृत्य करून ते 14 वर्षांनी तुरुंगातून सुटून जातील पण न्यायालय असं होऊ देणार नाही.

कुणाला किती शिक्षा आणि किती दंड

या प्रकरणातील मुख्य दोषी श्रीधरसह सर्व 9 आरोपींना दुहेरी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याच वेळी वेगवेगळ्या कलमांतर्गत सात वर्षांची शिक्षा आणि एकूण 76.38 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

न्यायालयाने इंस्पेक्टर श्रीधरला 24.10 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

दुसरा दोषी बालकृष्णन याला विविध कलमांतर्गत 1 वर्ष ते सात वर्ष कारावासाची शिक्षा, दुहेरी मृत्यूदंड आणि 16.80 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

तिसरा दोषी रघुगणेशला विविध कलमांतर्गत एक वर्ष ते सात वर्षांचा कारावास, दुहेरी मृत्यूदंड आणि 5.20 लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

चौथा दोषी हेड काँस्टेबल मुरुगन याला दुहेरी मृत्यूदंडासहित विविध कलमांतर्गत एक ते सात वर्षांचा कारावास, तसेच 10.10 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

पाचवा दोषी सामदुरई याला दुहेरी मृत्यूदंड, एक ते सात वर्षापर्यंतचा कारावास 5.60 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सहावा दोषी मुथुराजाला दुहेरी मृत्यूदंड, एक ते सात वर्षापर्यंतचा कारावास, 3.20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

सातवा दोषी सेल्लादुरईला दुहेरी मृत्यूदंड, एक ते सात वर्षांचा कारावास आणि 14.40 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

आठवा दोषी थॉमस फ्रान्सिसला दुहेरी मृत्यूदंड, एक ते सात वर्षांचा कारावास, 10.54 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

नववा दोषी वेलुमुथुला दुहेरी मृत्युदंड, एक ते सात वर्षांचा कारावास आणि 10.54 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

बेनिक्स यांच्या बहिणीने काय म्हटले?

बेनिक्स यांच्या बहिणीने पत्रकारांना सांगितले की "2020 मध्ये चौकशीच्या नावाखाली माझे वडील आणि माझ्या भावाची अतिशय निर्दयपणे हत्या करण्यात आली होती. 6 वर्षांनंतर आम्हाला न्यायाची अपेक्षा होती तो आज मिळाला."

त्या म्हणाल्या केवळ आमच्याच नाही तर सर्व सामान्यांसाठी न्याय आहे. त्या पुढे म्हणाल्या, आम्हाला वाटतं असं कधीच कुणा कुटुंबासोबत होऊ नये. जर दोषींनी पुढे अपील केले तर आम्ही देखील पुढील न्यायालयात जाऊ आणि शेवटच्या श्वासापर्यंत लढू.

'अशी प्रकरणं पुन्हा घडणार नाहीत अशी आम्ही आशा करतो,' असे न्यायाधीशांनी या प्रकरणाचा निकाल देताना म्हटले.

नेमकं काय घडलं होतं?

जेव्हा दोघांचा मृत्यू झाला होता तेव्हा बीबीसी तामिळने ही बातमी केली होती. त्यानुसार, जयराज हे तुतिकोरीन म्हणजेच थुतुकुडी जिल्ह्यातल्या सथांकुलममध्ये राहतात. इथेच त्यांचा मुलगा फेनिक्स APJ मोबाईल्स नावाचं एक दुकान चालवत होते.

कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी तामिळनाडूमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. तेव्हा पी. जयराज (58) आणि त्यांचा मुलगा फेनिक्स (38) यांच्यावर लॉकडाऊनच्या काळात दुकान उघडं ठेवल्याचा आरोप होता. 19 जूनला बेनिक्स यांचा दुकान बंद करण्यावरून स्थानिक पोलिसांशी वाद झाला.

यामुळे मग सथांकुलम पोलिसांनी बेनिक्स आणि त्यांच्या वडिलांविरोधात FIR दाखल केली. यानंतर जयराज यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. त्यानंतर आपल्या वडिलांपाठोपाठ फेनिक्स हेसुद्धा पोलीस स्टेशनला गेले. तेव्हा त्यांनाही कोठडीत डांबण्यात आलं. 21 जून रोजी त्यांना कोविळपट्टीच्या कारागृहात पाठवण्यात आलं.

या दोघांनाही संपूर्ण रात्र पोलीस कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. या दोघांनाही पोलिसांनी कोठडीत अत्यंत क्रूरपणे मारहाण केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाइकांनी केला होता.

या दोघांनी पोलिसांना शिवीगाळ केली, त्यानंतर ते रस्त्यावर पडले. यामुळे मग त्यांना अंतर्गत दुखापत झाली, असं FIRमध्ये म्हटलं होतं.

बेनिक्स यांचा 21 जूनच्या रात्री तर जयराज यांचा 22 जूनच्या सकाळी कोविळपट्टीच्या सरकारी दवाखान्यात मृत्यू झाला.

बीबीसी तामिळनं जिल्ह्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधला. नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी सांगितलं होतं, "बेनिक्स यांच्या छातीत दुखू लागल्यानं 22 जून रोजी ते खाली कोसळले. यानंतर त्यांना कोविळपट्टीच्या सरकारी दवाखान्यात भरती करण्यात आलं. पण 9 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

"त्यानंतर काही तासातच जयराज यांना बरं न वाटल्यानं दवाखान्यात भरती करण्यात आलं. त्यांचा मंगळवारी सकाळी 5 वाजता मृत्यू झाला."

या घटनेनंतर बेनिक्स आणि जयराज यांच्या नातेवाईकांनी संथाकुलममध्ये निदर्शन केलं होती. या भागातील दुकानंही बंद ठेवण्यात आली होती.

"बेनिक्स आणि जयराज यांना जमिनीवर पडल्यामुळे जखमी झाल्याचं नोंदवण्यात आलं आहे. अशाप्रकारे एखादा व्यक्ती स्वत: ला जखमी करू शकतो का? तसंच सथांकुलमजवळ अनेक कारागृह असतानाही त्या दोघांना 100 किमी अंतरावरील कोविळपट्टी कारागृहात का पाठवण्यात आलं? " असा प्रश्न नातेवाईक चार्ल्स यांनी त्यावेळी विचारला होता.

त्यानंतर राज्यातून तसेच देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या आणि आरोपींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी निदर्शनं देखील झाली होती.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.