श्रीधर टिळक : लोकमान्य टिळकांच्या मुलानं मुंबई-पुणे एक्स्प्रेसखाली आत्महत्या का केली होती?

  • वाचन वेळ: 10 मिनिटे

25 मे 1928 चा दिवस. वेळ संध्याकाळची. पुण्यातील भांबुर्डा म्हणजे आताच्या शिवाजीनगर रेल्वेस्थानकाजवळ मुंबई-पुणे एक्स्प्रेसखाली झोकून देत तिशीतल्या एका तरुणानं आत्महत्या केली.

या तरुणाच्या आत्महत्येनं केवळ पुणे किंवा महाराष्ट्र नव्हे, तर संबंध भारत देश हादरला.

कारण ही आत्महत्या कुणा साध्या-सुध्या तरुणाची नव्हती, तर हा तरुण होता भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ज्यांना 'असंतोषाचे जनक' म्हटलं गेलं, त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे धाकटे पुत्र - श्रीधरपंत बळवंत टिळक.

आत्महत्येवेळी श्रीधरपंत अवघ्या 32 वर्षांचे होते. पण या 32 वर्षांत त्यांनी आपल्या स्वतंत्र विचारांची चुणूक दाखवली होती. या काळात प्रसंगी वडिलांच्या म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या भूमिकांपासून फारकत घेण्यासही त्यांनी मागे-पुढे पाहिलं नाही.

अशा या धाडसी तरुणाच्या आत्महत्येनं भारताचं राजकीय-सामाजिक विश्व हळहळलं.

आत्महत्येच्या दिवशी म्हणजे 25 मे रोजीच सकाळी श्रीधरपंतांनी तीन पत्र लिहिली. यातलं एक पत्र होतं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना, दुसरं पत्र होतं 'विविधवृत्त' मासिकाला आणि तिसरं पत्र होतं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना.

यात बाबासाहेबांना शेवटचं पत्र लिहिल्याचं ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. पण हे खरंय. किंबहुना, लोकमान्य टिळकांवर सातत्यानं टीका करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्या मुलाशी म्हणजे श्रीधरपंत टिळकांशी मात्र विलक्षण आत्मियतेचं नातं होतं. याबद्दल आपण पुढे जाणून घेऊच.

तर या तीन पत्रातल्या एका पत्रात श्रीधरपतांनी आत्महत्येचं कारण अगदी स्पष्टपणे नमूद केलं होतं. त्या कारणाची पार्श्वभूमीही आपण जाणून घेऊ.

तत्पूर्वी आत्महत्येच्या दिवशी नेमकं काय झालं आणि 'त्या' पत्रात काय लिहिलं होतं, हे पाहूया.

आत्महत्येच्या दिवशी काय काय घडलं?

25 मे 1928 हा दिवस श्रीधरपंतांसाठी नेहमीसारखाच उजाडला. फरक इतकाच होता की, हा दिवस मावळला तो श्रीधरपंतांचा जीव घेऊन.

पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज किंवा भांबुर्ड्याकडे (आताचं शिवाजीनगर) श्रीधरपंत नेहमी फिरायला जात. तसेच ते 25 मे रोजीच्या संध्याकाळीही फिरायला गेले. त्यामुळे त्यात कुणाला काही वावगं वाटलं नाही.

पण त्या दिवशी फिरायला जाताना त्यांनी पैशांचं पाकीट किंवा इतर कुठल्याही गोष्टी सोबत नेल्या नव्हत्या.

भांबुर्डा रेल्वेस्थानकाच्या दिशेनं निघण्याआधी त्यांनी तीन पत्र लिहिली, जिल्हाधिकारी, विविधवृत्तचे संपादक आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना. आणि ती पत्रं टपालपेटीत टाकली.

घरातून बाहेर पडण्याआधी श्रीधरपंतांनी मुलं आणि पत्नीला डोळेभरून पाहिलं.

ते घरातून निघाले आणि थेट भांबुर्डा रेल्वेस्थानकाजवळील रूळापाशी जाऊन मुंबई-पुणे एक्स्प्रेसची वाट पाहू लागले. रेल्वेच्या हॉर्नचा आवाज येताच ते सावध झाले. गाडी जवळ आल्यावर श्रीधरपंतांनी रेल्वेसमोर स्वत:ला झोकून दिलं. क्षणार्धात सर्व संपलं!

घटनास्थळी लोक जमले, श्रीधरपंतांच्या मृतदेहाची ओळख पटण्यास वेळ लागला नाही. 'लोकमान्यांच्या लहान्या मुलाची आत्महत्या' ही बातमी वाऱ्याच्या वेगानं पुण्यात पसरली.

श्रीधरपंतांनीच स्थापन केलेल्या समता संघाचे कार्यकर्ते घटनास्थळाकडे धावले. पोलीस पोहोचले आणि पंचनामा झाला. पार्थिव टिळक कुटुंबीयांच्या गायकवाड वाड्यात आणलं गेलं.

श्रीधरपंतांच्या पत्नी शांताबाई आणि तिन्ही लेकरं टाहो फोडत होती. थोरला मुलगा जयंत सात वर्षांचा होता. त्यापाठची दोन्ही मुलं अगदी लहान होती. चौथ्या बाळासाठी शांताबाईंना दिवसही गेले होते.

टिळक कुटुंबीयांनं आपला तिशीतला मुलगा आणि समता संघासह समाजसुधारकांच्या वर्तुळानं आपला सच्चा साथी गमावला होता. महाराष्ट्राच्या आभाळात दु:खाचं सावट पसरलं होतं.

श्रीधरपंत टिळकांच्या आत्महत्येबाबत त्यांचे बालमित्र नानासाहेब चापेकरांनी नमूद करून ठेवलंय की, "पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधले माझे वर्गबंधू श्रीधरपंत ऊर्फ बापूराव टिळक यांनी पुण्याच्या मुळामुठेच्या संगमावरल्या, पूर्वी सेशन्स कोर्ट असलेल्या बेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या मागच्या बाजूच्या रेल्वेलाईनवर आगगाडीखाली पडून आत्महत्या केल्याची दु:खद वार्ता समजली."

श्रीधरपंतांनी आत्महत्या का केली?

श्रीधरपंतांनी आत्महत्या का केली, याचं उत्तर त्यांनी लिहिलेल्या त्या तीनपैकी एका पत्रात आहे.

आधी नमूद केल्याप्रमाणे विविधवृत्त मासिकाचे संपादक श्री. प्रधान, पुण्याचे जिल्हाधिकारी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा तिघांना हे पत्र श्रीधरपंतांनी लिहिले. यातील एका पत्रात श्रीधरपंतांच्या आत्महत्येचं कारण दडलेलं असल्यानं या पत्रांना त्यांच्यानंतर अत्यंत महत्त्व आलं.

या तिन्ही पत्रांमध्ये नेमकं काय होतं, हे आपण एक एक पत्रांमधील सविस्तर मजकुराद्वारे जाणून घेऊ.

यातील पहिलं पत्र होतं विविधवृत्त मासिकाच्या संपादकांना. या पत्रात लिहिलं होतं :

"कृ. सा. न. वि. वि.

शिवराळ प्रकाशनाची प्रतिक्रिया ही गोष्ट येत्या विविधवृत्तच्या अंकात छापून येईलच. तथापि ती पुन्हा विविध ज्ञान विस्तारातही प्रसिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे. तरी ही माझी अखेरची इच्छा आपण पूर्ण करालच. कारण आपला मजवर फारच लोभ होता. इतका की, त्यातून उतराई होणे या जन्मी तरी मला शक्य नाही. या प्रसंगी अधिक काही लिहवत नाही. मित्रमंडळींस नमस्कार कळवावा. कळावे, हे विनंती.

आपला,

श्री. ब. टिळक"

हे पत्र 26 मे 1928 रोजी सकाळी म्हणजे श्रीधरपंतांनी आत्महत्या केल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विविधवृत्तच्या संपादकांच्या हाती पडलं. तोवर श्रीधरपंतांचं निधन झालं होतं. मग हे पत्र जसंच्या तसं विविधवृत्त मासिकानं पुढील अंकात म्हणजे 3 जून 1928 च्या अंकात प्रकाशितही केलं होतं.

यातील दुसरं पत्र होतं, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना.

श्रीधरपंतांच्या निधनानंतर 'विविधवृत्त' आणि 'दुनिया' या मासिकांनी विशेषांक काढले. यातील विविधवृत्तमध्ये '(कै) श्रीधर बळवंत टिळक' मथळ्याचा लेख डॉ. आंबेडकरांनी लिहिला. हा अंक 2 जून 1928 रोजी प्रकाशित झाला.

या लेखात बाबासाहेबांनी सांगितलंय की, 26 मे 1928 रोजी ते जळगावात बहिष्कृत वर्गाच्या सभेसाठी उपस्थित होते. तिथं त्यांना श्रीधरपंतांच्या निधनाची बातमी कळली. बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर कुठलीतरी मोठी दु:खद घटना घडल्याच्या भावना स्पष्ट दिसत होत्या. त्यांनी उपस्थितांना ही बातमी सांगितली आणि आदरांजली वाहण्यासाठी उपस्थितांना उभे राहण्यास सांगितलं.

नंतर बाबासाहेब सभा सोडून मुंबईत दाखल झाले. दादरला कार्यालयात पोहोचले. कार्यालयात पोहोचल्यावर समोर टेबलावर 'टाईम्स'चा अंक होता. तो हाती घेताना त्यांना बाजूला एक पत्र दिसलं. ते पत्र होतं श्रीधरपंतांनी पाठवलेलं. बाबासाहेबांनी टाईम्सचा अंक तिथेच टाकला आणि श्रीधरपंतांचं पत्र हाती घेतलं. त्या पत्रात लिहिलं होतं :

"स. न. वि. वि.

हे पत्र आपले हाती पडण्यापूर्वीच बहुदा मी इहलोकास रामराम ठोकल्याची वार्ता आपले कानी पडेल! आपल्या समाज समता संघाचे अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज सुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे. आपण या कामी अहर्निश झटता याबद्दल मला फार संतोष वाटतो व आपल्या प्रयत्नास परमेश्वर यश देईल अशी खात्री वाटते. महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अवघ्या पाच वर्षात सुटेल. माझ्या बहिष्कृत बांधवांची गाऱ्हाणी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचे चरणाविंद सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे. तरी मित्रमंडळीस माझा सप्रेम नमस्कार सांगावा.

कळावे, लोभ असावा ही विनंती.

आपला नम्र,

श्रीधर बळवंत टिळक"

श्रीधरपंतांनी तिसरं पत्र लिहिलं ते, पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना.

हे पत्र श्रीधरपंतांच्या आत्महत्येचं कारण सांगणारं आहे. त्यामुळे या पत्राला त्यांच्या निधनानंतर अत्यंत महत्त्व प्राप्त झालं.

या पत्रात श्रीधरपंतांनी लिहिलं होतं :

"मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची, माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरिता आहे. माझ्या माता पितरांचीही याहून भिन्न कल्पना नव्हती. माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता. एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझे जीवितकार्य पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म होवो, अशी मी आशा बाळगतो."

या तिसऱ्या पत्रातील 'माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता.' हे वाक्य अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण या वाक्याचा संबंध 'केसरी' वृत्तपत्राच्या मालकीचा वाद आणि इतर मालकी हक्कांच्या वादाशी संबंध आहे आणि या गोष्टींमुळे श्रीधरपंतांना कोर्टाचे उंबरठे झिजवावे लागले होते. परिणामी त्यांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला होता.

श्रीधरपंत वारसाहक्कासाठी का लढावं लागलं?

वारसाहक्काचा वाद 1924 नंतर सुरू झाल्याचे दिसून येते. टिळक गेल्याच्या चार वर्षांनंतर.

लोकमान्य टिळकांच्या मृत्यूपत्राबाबत जावई केतकर वकिलांनी माहिती दिली की, मृत्यूपत्रानुसार टिळकपुत्रांना केसरी आणि मराठाच्या ट्रस्टवर राहता येणार नाही. टिळकपुत्रांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढील कारवाई केली.

मात्र, पुढे दोन्ही टिळकपुत्र आणि त्यातही श्रीधरपंत हे पुरोगामी वर्तुळात वावरू लागल्यानं नवे साथीदार लाभले. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, 'केसरी' आणि 'मराठा' ट्रस्टबाबत विद्वांस आणि अन्य मंडळींनी आपल्याला फसवले आहे.

त्यात हे धोंडोपंत विद्वांस हे लोकमान्य टिळकांचे भाचे होते. टिळक स्वातंत्र्य चळवळीच्या विविध कामानिमित्त आणि विशेषत: मंडालेच्या तुरुंगात असताना, घराकडे दुर्लक्ष होत असे. त्यात टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई यासुद्धा आजारी असत. म्हणून टिळकांनी धोंडोपंत विद्वांस यांच्याकडे घराची जबाबदारी दिली.

परिणामी रामभाऊ आणि श्रीधरपंत यांना लोकमान्य टिळक हयात असल्यापासूनच लहान-सहान गोष्टींसाठीही विद्वांसांवर अवलंबून राहावं लागत असे. याबाबत दोन्ही टिळकपुत्रांच्या मानत रागाची भावना होती.

त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर दुखवट्याचे दहा दिवस संपले आणि रामभाऊ (श्रीधरपंतांचे थोरले बंधू) व श्रीधरपंतांचा धोंडोपंत विद्वांसांवरील अनेक वर्षांपासून असलेला राग उफाळून आला. परिणामी रामभाऊ आणि श्रीधरपंतांनी धोंडोपंत विद्वांसांना संसार आणि कुटुंबासह वाड्याबाहेर काढले. टिळकांच्या मुलांचे हे कृत्य विद्वांसांच्या वर्मी लागले.

विद्वांसांना गायकवाड वाड्यातून बाहेर काढले असले, तरी 'केसरी' आणि 'मराठा'चे छापखाने या वाड्यातीलच एका भागात होते.

केसरी आणि मराठावर धोंडोपंत विद्वांस व्यवस्थापक, तर न. चिं. केळकर हे संपादक म्हणून होते. त्यामुळे तिथे त्यांचे येणे जाणे असे. इच्छा नसली तरीही श्रीधरपंतांना विद्वांस आणि केळकरांचा सामना करावाच लागे.

अशातच धोंडोपंत विद्वांस यांच्याजवळ टिळकांचे मृत्यूपत्र होते. टिळकांच्या या मृत्यूपत्राच्या आधारे धोंडोपंत विद्वांस आणि केसरी ट्रस्टीचे नरसिंह चिंतामण केळकर यांनी 16 ऑगस्ट 1920 रोजी 'केसरी' आणि 'मराठा'वर छापखान्यावर कायदेशीर ताबा मिळवला. टिळकांच्या एकाही मुलास या वृत्तपत्राच्या संचालक मंडळावर साधे सदस्य म्हणूनदेखील घेतले गेले नाही.

त्यासाठी या मृत्यूपत्राचा दाखला दिला गेला खरा. पण केसरी-मराठाच्या ट्रस्टवर आपल्या मुलांना घेऊ नये, असं स्पष्टपणे लोकमान्य टिळकांनी लिहिले नव्हते. तर 'लायक वाटल्यास' घ्यावे असे लिहिले होते, असं अनंत देशमुख नोंदवतात.

त्यात 'रामभाऊ आणि श्रीधरपंत पुरोगामी आणि सुधारणावादी विचारांचे होते. 'केसरी' आणि 'मराठा'च्या तत्वात हे बसणारे नव्हते,' असं यामागील कारण योगीराज बागूल त्यांच्या 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी' या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात सांगातात.

'टिळकांनी त्यांच्या मृत्यूपत्रात सिंहगडाजवळील जमीन, लातूरची मिल, मुंबईचे घर, पुण्याचा गायकवाड वाडा, केसरी आणि मराठा वृत्तपत्रासह छापखाना या सर्व मालमत्तेची विभागणी योग्य प्रकारे केली नाही आणि आपणास योग्य हिस्सा मिळाला नाही,' असं रामभाऊ आणि श्रीधरपंत या दोन्ही टिळकपुत्रांना वाटत होतं.

त्यात टिळकांचे तिन्ही जावई म्हणजे विश्वनाथ केतकर, पांडुरंग वैद्य आणि श्रीधर मोरेश्वर साने हे धोंडोपंत विद्वांस यांच्या बाजूने होते.

दिवसेंदिवस टिळकांची मुलं आणि केसरीचे ट्रस्टी यांच्यातील वाद विकोपाला जाऊ लागला. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगातून लिहिलेल्या 'गीतारहस्य'ची जाहिरात 'केसरी'मध्ये छापली नाही म्हणून 1926 साली रामभाऊंनी छापखान्यात जाऊन संपूर्ण कंपोज संच मोडून टाकला. त्यामुळे केसरीच्या ट्रस्टींनी पुन्हा एकदा टिळकपुत्रांविरोधात तक्रारी दाखल केल्या.

आधीच मालमत्तेचा वाद, त्यात पुन्हा या तक्रारी. या साऱ्या कोर्ट-कचेऱ्यांचा श्रीधरपंतांना त्रास होई. ते अनेकदा तसं व्यक्तही होत.

एकूणच टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूपत्राने रामभाऊ आणि श्रीधरपंत यांच्या आयुष्यातील स्वास्थ्य पूर्ण बिघडवून टाकले.

अनंत देशमुख त्यांच्या 'श्रीधर बळवंत टिळक' या चरित्रात लिहितात की, 'श्रीधरपंत हे विलक्षण मनस्वी असल्याने बारीकसारीक गोष्टी ते मनाला लावून घेत असत. केसरीची मालकी आपल्याकडे यायला हवी आणि केसरी चालवण्याइतकी व समाजाला बुद्धिवाद शिकवण्याइतकी अक्कल आपल्याला सल्याचा सार्थ अभिमान त्यांना होता. त्यापुढे एक ना एक दिवस केसरी आपल्या हातात येईल या विचाराने ते कोर्टाची दारे ठोठावत राहिले.'

'पण त्याआधीच रामभाऊंच्या अतिरेकी कृत्यांमुळे ट्रस्टींनी आपल्या जिवाला धोका असल्यामुळे टिळकपुत्रांविरोधात कोर्टात खटला दाखल केला होता. त्यामुळे 1927 च्या ऑगस्टपासून श्रीधरपंतांच्या आयुष्यात कोर्टाच्या फेऱ्या मारणे आलेच. खरे तर त्यांची अशी प्रकृती नव्हती. परंतु, रामभाऊंच्या अविचारी वागण्याने ते अधिकच अडचणीत आसे. त्यांच्या संवेदनशील मनावर त्याचा विलक्षण परिणाम होत गेला,' असंही पुढे अनंत देशमुखांनी नोंदवून ठेवलंय.

या कोर्चकचेऱ्यांचा श्रीधरपंतांच्या मनावर झालेला परिणाम त्यांच्या आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचला. पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हीच मनोवस्था नमूद केली आहे.

'श्रीधरपंतच खरे लोकमान्य'

लोकमान्य टिळकांना तीन मुली आणि तीन मुलं होते. त्यातील थोरला मुलगा फार कमी वयातच वारला. त्यामुळे पाच अपत्यं राहिली. तिन्ही मुलींचे टिळकांनी हयात असतानाच लग्न लावून दिले. उरलेली दोन मुलं म्हणजे रामभाऊ आणि श्रीधरपंत हे टिळकांच्या शेवटच्या काळात शिक्षण घेत होते. ते वयाने लहान होते.

यातील श्रीधरपंत अभ्यासात सुरुवातीला फारसे हुशार नव्हते. मात्र, टिळकांच्या निधनानंतर त्यांनी पुरोगामी चळवळीत मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला. वयाच्या 32 व्य वर्षी श्रीधरपंतांची जीवनयात्रा संपली. मात्र, तोवर त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांशी मैत्री केली होती. बाबासाहेब आंबेडकर त्यांना भाऊ मानू लागले होते. इतकी ही जवळीक होती.

ज्या लोकमान्य टिळकांशी बाबासाहेबांचा वैचारिक वाद झाला, दर दोन दिवसांआड बाबासाहेबांनी 'मूकनायक'मधून लोकमान्य टिळकांवर सडेतोड टीका केली, त्याच लोकमान्य टिळकांच्या मुलाशी बाबासाहेबांची मैत्री ही त्यावेळी केवळ चर्चेचीच नव्हे, तर त्यांच्या विरोधकांमध्ये टीकेचीही लक्ष्य असे.

श्रीधरपंतांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी जवळचा स्नेह होता. त्यांनी आत्महत्येआधी शेवटचं पत्र आंबेडकरांना पाठवल्याचं वर नमूद केलंच आहे.

श्रीधरपंतांच्या आत्महत्येनंतर मामा वरेरकरांच्या 'दुनिया' साप्ताहिकानं 'टिळक अंक' प्रसिद्ध केला होता. त्यात बाबासाहेबांनी श्रीधरपंतांवर लेख लिहिला होता. अनंत देशमुखांनी श्रीधरपंतांवरील चरित्रात हा लेख समाविष्ट केलाय. त्यातील काही उतारे इथे देतो आहोत. बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीधरपंत टिळक यांच्यातील स्नेह या उताऱ्यातून सहज लक्षात येतो.

डॉ. आंबेडकर लिहितात, 'कोणी काहीही म्हणो, श्रीधरपंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती. तेली, तांबोळी म्हणून बहुजन समाजाचा उपहास करणाऱ्या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणे, असे आमचे मत आहे. लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकास साजली असती तर ती श्रीधरपंतासच होय. टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही. खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते. तो करण्यास ते उरले नाहीत, ही महाराष्ट्रावरील नव्हे हिंदुस्तानावरील मोठीच आपत्ती आहे, असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्या कोणत्याही लोककल्याणेच्छू माणसास कबूल करणे भाग आहे.'

याच लेखात बाबासाहेबांनी केसरीसंदर्भातील वादाचाही उल्लेख केलाय. त्या उल्लेखेत बाबासाहेब म्हणतात की, 'माझ्या मते श्रीधरपंतांना 'केसरी' त जागा मिळाली असती तर तो घोर प्रसंग आलाच नसता. 'केसरी' पत्रात आपणास जागा मिळावी ही एक त्यांची मोठी महत्त्वाकांक्षा होती. टिळकांच्या मरणानंतर त्यांच्या हाती 'केसरी' गेला त्यांनी केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधरपंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकाराची फेड या दृष्टीने 'केसरी' च्या चालकांत जागा द्यावयास पाहिजे होती. परंतु टिळकांचा मुलगा म्हणून नव्हे, तर भारदस्त लेखक या दृष्टीने 'केसरी' च्या संपादक वर्गात श्रीधरपंतांचा समावेश व्हावयास पाहिजे होता.'

'राजकीयदृष्ट्या ते काही मवाळ नव्हते. जहाल, सुताळ आणि बेताल या सर्वांच्यापेक्षा ते फारच पुढे गेलेले होते. तेव्हा त्यांच्या लिखाणाने 'केसरी' ला काही धोका नव्हता, असे असताना त्यांना 'केसरी' त जागा मिळाली नाही. यांचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. 'केसरी' त जागा मिळाली असती तरीही 'केसरी' कंपूचा भंड लागून जे व्हावयाचे ते झालेच असते असे काही लोक म्हणतील. कसेही असो एवढी गोष्ट खास की निदान पैशापायी काही भांडण झाले नसते. कारण श्रीधरपंत यांची मनोवृत्ती त्या दृष्टीने अनुदार नव्हती. तसे ते असते तर वडिलांची इच्छा पुरी पाडण्याच्या हेतूने त्यांनी ट्रस्टडीडवर बिनतक्रार सह्या केल्या नसत्या व आज 'केसरी' कंपूवर हा त्यांनी केवढा उपकार केला आहे याची आठवण 'केसरी' कंपूला असती तर बरे झाले असते.'

श्रीधरपंतांचा संबंध केवळ बाबासाहेबांशीच नव्हे, तर प्रबोधनकार ठाकरेंसह अनेक पुरोगामी व्यक्तींशी पुढे येत गेला.

पत्रकार सचिन परब लिहितात, 'पुढे श्रीधरपंतांनी टिळकांच्या गायकवाड वाड्यात अस्पृश्यांसोबत सहभोजन घडवून त्याचेही प्रायश्चित्त घेतले. समाजसुधारणेची त्यांची कळकळ फक्त बोलघेवडी नव्हती. गायकवाडवाड्यातलं सहभोजन, समतासंघाची स्थापना तसंच गणेशोत्सवात बहुजनमेळ्याचा कार्यक्रम घेणे ही पुण्यासाठी क्रांतीच होती.'

'पण सामाजिक चळवळी करणाऱ्यांनी राजकीय चळवळींत अडथळे बनू नये, असा परखड सल्लाही ते सुधारणावाद्यांना देण्यास कचरत नसत. त्यांची भूमिका कायम सुधारणांसाठी आग्रही पण समन्वयवादी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर असे ब्राह्मणेतर चळवळीचे अनेक अर्ध्वयू त्यांचे जवळचे मित्र होते.'

प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्या 'माझी जीवनागाथा' या आत्मचरित्रात श्रीधरपंतांबाबत लिहिलंय. त्यांच्या आत्महत्येनं प्रबोधनकारांना मोठा धक्का बसला होता.

प्रबोधनकारांनी 'माझी जीवनगाथा'मधील लेखाचा शेवट करताना म्हटलंय की, 'असत्य, अन्याय, अप्रामाणिकपणा त्याला बिलकूल सहन होत नसे. तो एकदम उखडायचा. त्याच्या कित्येक तक्रारी गंभीर असल्या, तरी पुष्कळशा अगदी क्षुल्लक असत. त्यांचा पाढा तावातावाने त्याने माझ्यापुढे ओकला की धीराच्या नि विवेकाच्या इतर उपदेशाच्या गोष्टींची मात्रा चाटवून मी त्याला शांत करीत असे. हरएक बऱ्यावाईट घटनेचे चक्र त्याच्या डोक्यात सारखे गरगरत असायचे. मनस्वी विचार करणाऱ्या मंडळीना मनातले विचार आणि भावना मोकळ्या करण्यासाठी एखादा स्नेहीसोबती आप्त जवळपास नसला, म्हणजे ते लोक मनातल्या मनात कूढू लागतात. असल्या कुढण्याच्या अतिरेकानेच बापू टिळकाची आत्महत्या ही दुदैवी घटना घडली!'

श्रीधरपंतांचं वैवाहिक आयुष्य कसं होतं?

15 मे 1920 रोजी विनायक विष्णू बापट यांच्या भाचीशी म्हणजे शांताबाईशी श्रीधरपंतांचं लग्न झालं. पुण्यातील तुळशीबागेजवळील भाऊमहाराजांच्या वाड्यात हा सोहळा पार पडला. लग्नावेळी श्रीधरपंत बीएच्या वर्गात शिकत होते. लग्नानंतर शांताबाईंचं नाव लक्ष्मी असं ठेवण्यात आलं.

श्रीधरपंतांचे वैवाहिक जीवन सुखाचे होते. जयंत, कालिंदी, रोहिणी अशी अपत्ये श्रीधरपंत हयात असताना, तर श्रीधरपंतांच्या आत्महत्यावेळी शांताबाई गरोदर होत्या. श्रीधरपंतांच्या निधनानंतर काहीच दिवसात श्रीकांत हा मुलगा झाला. अशी एकूण चार मुलं श्रीधरपंतांना झाली.

25 मे 1928 रोजी आत्महत्येचं पाऊल उचलण्यापूर्वी घरातून निघताना तीन मुलांना आणि पत्नीला त्यांनी डोळे भरून पाहिले आणि घराबाहेर पडले, ते कायमचेच!

संदर्भ -

  • श्रीधर बळवंत टिळक (चरित्र आणि लेखसंग्रह) - अनंत देशमुख
  • मी जयंत टिळक (आत्मचरित्र) - जयंत श्रीधर टिळक
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी (भाग-2) - योगीराज बागूल
  • केशवराव जेधे (जीवनचरित्र) - य. दि. फडके
  • माझी जीवनगाथा - प्रबोधनकार ठाकरे
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र (खंड चौथा) - चांगदेव खैरमोडे
  • टिळक, माय फादर (लेख) - पत्रकार सचिन परब
  • टिळकांचे पुत्र बंडखोर? (मुलाखत) - विविधवृत्त मासिक
  • 'दुनिया' मासिकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लेख

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)