You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आर्टेमिस-2 ने चंद्राच्या दिशेने जाताना काढले पृथ्वीचे सुंदर फोटो, अंतराळवीरांनी कसे केले वर्णन?
- Author, सोफिया फरेरा सँटोस
- Role, बीबीसी न्यूज
- वाचन वेळ: 4 मिनिटे
आर्टेमिस-2 या चांद्रमोहिमेतील अंतराळवीरांच्या टीमनं घेतलेले पृथ्वीचे हाय-रेझोल्युशन फोटो नासानं प्रसिद्ध केले आहेत.
पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील मध्यबिंदू म्हणजे अर्धे अंतर पार करत असताना हे फोटो घेण्यात आले आहेत.
या मोहिमेचे कमांडर, रीड वाईजमन यांनी हे 'जबरदस्त' फोटो घेतले आहेत. अंतराळातील आपल्या सर्वात जवळच्या शेजाऱ्याच्या म्हणजे चंद्राच्या दिशेनं मार्गक्रमण करण्यासाठी यानाला गती देणारी इंजिनमधील शेवटची क्रिया (फायनल इंजिन बर्न) पूर्ण केल्यानंतर हे फोटो घेण्यात आल्याचं नासानं म्हटलं आहे.
साधारण 07:00 बीएसटी वाजता, नासाच्या ऑनलाइन डॅशबोर्डवर दिसलं की ओरायन हे अंतराळयान पृथ्वीपासून आता 1,42,000 मैल (2,28,500 किमी) अंतरावर आणि चंद्रापासून हे यान 1,32,000 मैल अंतरावर आहे.
अंतराळवीर क्रिस्तिना कोच म्हणाल्या की यानातील टीमला हा टप्पा गाठल्याचं सांगण्यात आल्यानंतर त्यांनी एकत्रितपणे 'आनंद व्यक्त' केला.
यानाचं उड्डाण झाल्यानंतर साधारण 2 दिवस, 5 तास आणि 24 मिनिटांनी यानानं हे अंतर गाठलं.
'हॅलो वर्ल्ड' फोटोमध्ये काय दिसतंय?
यानातून घेतलेल्या 'हॅलो, वर्ल्ड' नावाच्या या फोटोमध्ये, पृथ्वी सुर्याला झाकोळून टाकत असताना वातावरणाच्या तेजानं वेढलेल्या पृथ्वीवरील अटलांटिक महासागराचा अथांग निळा विस्तार आणि दोन्ही ध्रुवांवरील हिरवे ध्रुवीय प्रकाश (ऑरोरा) दिसतात.
यात पृथ्वी उलटी दिसत असून, डावीकडे पश्चिम सहारा आणि आयबेरियन द्वीपकल्प दिसतो आहे. तर दक्षिण अमेरिकेचा पूर्वेकडील भाग उजवीकडे दिसतो आहे.
यात उजव्या कोपऱ्यात खालच्या बाजूला असलेला तेजस्वी ग्रह म्हणजे शुक्र असल्याचं नासानं सांगितलं आहे.
यानातील अंतराळवीरांनी शुक्रवारी पहाटे पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेनं यानाचं मार्गक्रमण करण्यासाठी इंजिनचा वापर (ट्रान्स-लुनार इंजेक्शन बर्न) यशस्वीरित्या केल्यानंतर हे फोटो घेण्यात आले.
इंजिनच्या शक्तीचा वापर केल्यानं ओरायन अंतराळयान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर झेपावलं. या यानातील 4 अंतराळवीर चंद्रापर्यंतचा 2,00,000 मैलांहून अधिक प्रवास करणार आहेत.
1972 नंतर मानव पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेबाहेर
आर्टेमिस-2 मोहीम आता एका वर्तुळाकार मार्गावर आहे. या मार्गानं यान अंतराळवीरांना चंद्राभोवती दूरवरून फिरवून पुन्हा परत पृथ्वीवर आणणार आहे. मानव 1972 नंतर पहिल्यांदाच पृथ्वीच्या कक्षेबाहेर प्रवास करतो आहे.
अमेरिकेतील फ्लोरिडा इथं असणाऱ्या केनेडी स्पेस सेंटरमधून या अंतराळयानाचं प्रक्षेपण झालं. हे अंतराळवीर 6 एप्रिलला चंद्राभोवती दूरवरून प्रवास करून 10 एप्रिलला पृथ्वीवर परताना पॅसिफिक महासागरात उतरतील.
इंजिनमधील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, अंतराळवीर यानाच्या 'खिडक्यां'मधून फोटो काढत होते, असं मिशन स्पेशॅलिस्ट जेरेमी हॅन्सेन यांनी अमेरिकेतील ह्यूस्टनमधील मिशन कंट्रोलला सांगितलं.
"आम्हाला चंद्राच्या प्रकाशामुळे उजळलेल्या पृथ्वीच्या अंधाऱ्या बाजूचं सुंदर दृश्य दिसतं आहे," असं ते म्हणाले.
'घरामागे जाऊन चंद्राचे फोटो काढण्यासारखंच'
वाईजमन यांनी नंतर मिशन कंट्रोलला पुन्हा कॉल केला. अंतराळवीरांच्या अंतराळात पाहण्याच्या उत्साहामुळे यानाच्या खिडक्या खराब झाल्या होत्या. त्यामुळे खिडक्या स्वच्छ कशा करायच्या हे विचारण्यासाठी त्यांनी हा कॉल केला होता.
कमांडरला सुरुवातीला यानातून पृथ्वीचे फोटो घेणं कठीण गेलं. त्यांनी सांगितलं की इतक्या प्रचंड अंतरावरून फोटो घेताना एक्स्पोजरच्या सेटिंग्सची म्हणजे कॅमेऱ्याच्या सेन्सरपर्यंत पोहोचणाऱ्या प्रकाशाची जुळवाजुळव करणं कठीण जात आहे.
"आपल्या घराच्या मागच्या बाजूस जाऊन चंद्राचा फोटो काढण्याचा प्रयत्न करण्यासारखं हे आहे. या क्षणी मला तसंच वाटतं आहे," असं ते मिशन कंट्रोलला म्हणाले.
मात्र, आता ही समस्या राहिलेली नाही.
वाईजमन यांनी टिपलेल्या आणखी एका दृश्यात पृथ्वी दिवस आणि रात्र यामध्ये विभागलेली दिसते आहे. प्रकाश आणि अंधार यामधील त्या सीमारेषेला 'टर्मिनेटर' असं म्हणतात.
अपोलो 17 आणि आर्टेमिस-2 च्या फोटोंची तुलना
नंतर, नासानं आणखी एक फोटो प्रसिद्ध केला. यात पृथ्वी जवळपास पूर्णपणे अंधारात दिसते आहे. रात्रीच्या वेळी मानवजातीनं लावलेले विजेचे दिवे लुकलुकत होते.
या फोटोंमुळे 2026 मधील पृथ्वीचं दृश्य आणि 1972 मध्ये अपोलो 17 च्या टीमनं काढलेला असाच एक फोटो, यांची तुलना सादर केली. मानवानं 1972 मध्येच चंद्रावर शेवटचं पाऊल ठेवलं होतं.
"गेल्या 54 वर्षांमध्ये आपण खूप मोठी प्रगती केली आहे. एक गोष्ट मात्र बदललेली नाही. ती म्हणजे, आपलं घर (पृथ्वी) अंतराळातून अत्यंत सुंदर दिसतं!" असं त्यांनी लिहिलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.