You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लग्न, हुंड्यात संपत्ती खर्च होईल म्हणून बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, नेमकं काय घडलं?
- Author, प्रवीण शुभम
- Role, बीबीसीसाठी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
(इशाराः या बातमीतील काही तपशील तुम्हाला विचलित करू शकतात)
तेलंगणामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. आपली सर्व संपत्ती आपल्या दोन मुलींच्या लग्नाचा खर्च आणि हुंडा देण्यासाठीच खर्च होईल, या भीतीने एका व्यक्तीने पाच वर्षांपेक्षाही कमी वयाच्या जुळ्या मुलींची हत्या केली आहे.
या जुळी मुलींना त्याने विहिरीत ढकलून दिलं होतं. याप्रकरणी या मृत जुळ्या मुलींच्या पित्याला आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत, अशी माहिती करीमनगर पोलिसांनी दिली.
"जर सर्व संपत्ती मुलींकडे गेली, तर एवढी संपत्ती (सुमारे 2 कोटी रुपये) पुन्हा कमावणं कठीण होईल, या विचाराने जुळ्या मुलींच्या हत्याकांडाचा कट रचण्यात आला होता," अशी माहिती पोलीस आयुक्त गौस आलम यांनी दिली.
नेमकं काय झालं?
सोमवारी (6 एप्रिल) तेलंगणाच्या करीमनगर पोलीस ठाण्यात पोलिसांनी याप्रकरणाची माहिती दिली.
करीमनगर ग्रामीण विभागातील ज्युबिली नगरचा रहिवासी असलेला कच्छू श्रीशैलम, हा त्या परिसरातील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करतो.
मानकोंडूर विभागातील लक्ष्मीपूर गावातील सुक्का मोनिका हिच्याशी त्याचे 2020 मध्ये लग्न झाले. 2022 मध्ये या दाम्पत्याला जुळ्या मुली झाल्या. गीतांशी आणि गीतानविका अशी त्यांची नावं होती.
पोलीस आयुक्त गौस आलम म्हणाले की, "पत्नी गरोदर असून तिला जुळे होणार याची माहिती श्रीशैलमला होती. तरीही त्याने पत्नीवर गर्भपात करण्यासाठी दबाव आणला. त्याच्या या निर्णयाला त्याचे आई, वडील आणि भावाने पाठिंबा दिला होता."
"परंतु, मोनिकाने गर्भपात केला नाही. जुळ्या मुलींचा जन्म झाल्यावर श्रीशैलम निराश झाला. त्याने कधीही मुलींवर प्रेम केलं नाही. हळूहळू त्याला मुलींप्रती द्वेष निर्माण झाला होता."
"श्रीशैलमला मुलगाच हवा होता," असं या प्रकरणाची चौकशी करणारे करीमनगर ग्रामीण पोलीसचे तपास अधिकारी निरंजन रेड्डी यांनी बीबीसीला सांगितलं.
'पूर्वनियोजित हत्या'
श्रीशैलम आणि मोनिका यांचे संबंध फारसे चांगले नव्हते, असं निरंजन रेड्डी यांनी सांगितलं.
मोनिकाचे वडील सुक्का राजमल्लू यांनी बीबीसीला सांगितलं की, प्रसूती झाल्यापासून मोनिका त्यांच्या घरीच होती. सासरी जाण्यासाठी वडीलधाऱ्यांच्या उपस्थितीत तिची अनेकवेळा समजूत काढण्यात आली होती. अखेर ती सासरी गेली होती.
राजमल्लू म्हणाले की, "गर्भधारणेच्या सहाव्या महिन्यात स्कॅन रिपोर्टमध्ये तिला जुळ्या मुली होणार असल्याचे समजले. त्यावेळी तिला गर्भपात करायचा होता. परंतु, तिच्या जीवाला धोका असल्यामुळे आम्ही परवानगी दिली नाही."
"आईचे दूध पुरेशा प्रमाणात न मिळाल्यास नातवांना दुधाची कमतरता भासू नये यासाठी गाय खरेदी करण्याबाबतही चर्चा केली. जावयाच्या नावावर अतिरिक्त 20 एकर जमीन भेट म्हणून नोंदवली. शेवटी असं काही घडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं," असंही राजमल्लू म्हणाले.
तरीही, जुळी मुले जन्माला येणार असल्याची माहिती कुटुंबाला आधीच कशी समजली? नियम मोडून गर्भातील लिंग तपासले गेले का?
सामान्य गर्भधारणेतील तपासाचा भाग असलेले स्कॅनिंग करताना, जन्म घेणाऱ्या बाळाचे लिंग म्हणजे ते बाळ मुलगा आहे की मुलगी? हे पालकांना सांगू नये, असे नियम आहेत. या प्रकरणात असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या प्रकरणाबाबत बीबीसीने पोलीस आयुक्त गौस आलम यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी, "आमचा तपास त्या दिशेनेच सुरू आहे, " असं सांगितलं.
घटनेच्या दिवशी नेमकं काय घडलं?
पत्रकार परिषदेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 एप्रिल रोजी जुळ्या बहिणी गीतांशी आणि गीतानविका यांचे मृतदेह त्यांचा कुटुंबाच्या मालकीच्या शेतातील विहिरीत आढळून आले.
या घटनेच्या चार दिवस आधी (30 मार्च), श्रीशैलम त्याचे वडील कच्छू अशोक, आई कच्छू लावण्य आणि भाव कच्छू राकेश यांच्यासोबत पेडापल्ली जिल्ह्यातील एलीकेडू मंडलातील मुप्पिरिथोटा येथील एक नातेवाईकाच्या घरी गेले होते.
त्या वेळी, श्रीशैलम आपल्या योजनेप्रमाणे एकटाच ज्युबिली नगरला परत आला. त्याने पत्नी मोनिकाला विकत आणलेलं मांस शिजवण्यासाठी दिले.
मुली स्वयंपाक करू देणार नाहीत. त्यामुळे त्यांना मी खेळायला शेतात घेऊन जातो. अर्ध्या तासानंतर तू शेतात ये, असं त्यानं पत्नीला सांगितलं.
तो मुलींना घेऊन शेतात गेला. आजूबाजूच्या शेतातील शेतकरी नसल्याचे लक्षात येताच श्रीशैलमने मुलींना विहिरीत ढकलून दिले.
सत्य उघड होण्याची भीती
पोलिसांनी बीबीसीला सांगितलं की, "जुळ्या मुलींपैकी गीतानविका पाण्यात बुडून लगेचच मरण पावली. दुसरी मुलगी गीतांशी जीव वाचवण्यासाठी पाय आणि हात हलवत होती, हे वरून श्रीशैलम पाहत होता."
"गीतांशी जिवंत राहिली तर आपला गुन्हा उघड होईल, अशी भीती त्याला वाटली. त्यामुळे तो लगेच विहिरीत उतरला आणि तिला पाण्यात बुडवून ठार केलं."
नंतर, कोणालाही संशय येऊ नये म्हणून, श्रीशैलम विहिरीत मोटरच्या पाइपला धरून गीतनविकाच्या मृतदेहासह ओरडत होता, मदत मागत होता. त्यावेळी आजूबाजूच्या शेतातील शेतकरी आणि त्याची पत्नी मोनिका विहिरीवर आले. गावकऱ्यांनी दोरीच्या साहाय्याने दोघांना वर आणलं.
दुसरी मुलगी कुठे आहे, असा प्रश्न विचारल्यावर श्रीशैलमने त्याला माहिती नसल्याचे उत्तर दिले. तो गवत कापायला गेला होता, तेव्हा मुली तिथे नव्हत्या. संशय आला म्हणून विहिरीत डोकावून पाहिल्यावर त्याला गीतानविका दिसली, असं त्यानं सांगितलं.
श्रीशैलमच्या वर्तणुकीची शंका आल्याने गावकऱ्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. ही माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.
घटनास्थळी राहिलो तर आपला जीव घेतला जाईल, या भीतीने श्रीशैलम तिथून मोटारसायकलवरून पळून गेला, असं पोलिसांनी सांगितलं.
श्रीशैलम आणि त्याचे कुटुंब कोणालाही न सांगता ज्युबिली नगर सोडून गेले. खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
ते जवळच्या गोपालपूर गावात लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर, 5 एप्रिल रोजी पोलिसांनी श्रीशैलम, त्याची आई, वडील आणि भाऊ यांना ताब्यात घेतले.
याबाबत बीबीसीने श्रीशैलमची पत्नी मोनिका हिच्याशी फोनवरून बोलण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या मुलींच्या मृत्यूमुळे ती मानसिकदृष्ट्या खूप खचली आहे आणि बोलण्याच्या स्थितीत नाही, असे तिचे वडील राजमल्लू यांनी सांगितले.
मात्र, गुन्ह्याच्या दिवशी (3 एप्रिल) मोनिकाने स्थानिक माध्यमांना त्या दिवशी काय घडले ते सांगितलं.
"त्या दिवशी मी मुलांसोबत शेतात जाणार होते. पण बाईकवर इतके लोक जाऊ शकत नाहीत, असे सांगून त्याने मला थोड्या वेळाने यायला सांगितलं. मी पाण्याची बाटली भरून घेतली."
"नंतर शेतात गेल्यावर मला मुली दिसल्या नाहीत. विचारल्यावर त्याने सांगितलं की, मुलगी विहिरीत पडली. माझ्या दोन्ही मुली खूप गोड होत्या, गावात सगळे त्यांना 'रामचिलकलू' (नेहमी एकत्र राहणारी) म्हणायचे," हे सांगताना तिला अश्रू अनावर झाले.
गावात तणावपूर्ण परिस्थिती असल्याने श्रीशैलमचे जवळचे नातेवाईक तिथे उपस्थित नव्हते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.