सामुद्रधुनी, कालवा, खाडी, आखात यातला फरक काय? नेमकं कशाला काय म्हणतात?

    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

होर्मुझची सामुद्रधुनी, बंगालचा उपसागर, सुएझ कालवा, पर्शियाचं आखात, इंग्लिश चॅनल असे अनेक शब्द तुम्ही ऐकले असतील.

याशिवाय नद्या, सागर आणि महासागर आहेत ते वेगळेच. पृथ्वीवर 71 टक्के पाणी आहे, हे आपल्याला माहिती आहे.

पण, सामुद्रधुनी, उपसागर, कालवा, आखात आणि चॅनल यामध्ये नेमका फरक काय आहे?

पृथ्वीवर असलेल्या एकूण पाण्यापैकी 96.5 टक्के खारं पाणी आहे. आणि फक्त 3.5 टक्के गोडं पाणी आहे.

हा जलसाठा नेमका किती मोठा आहे, कुठे वसलेला आहे, त्याच्याभोवती जमीन किती आहे, तो समुद्राला जाऊन मिळतो का? यावरून त्याचे भौगोलिक प्रकार ठरतात.

खाडी म्हणजे काय?

खाडी म्हणजे समुद्रकिनाऱ्यापासून जमिनीमध्ये आत शिरलेला चिंचोळा भाग होय.

किनाऱ्यावरचा सखल भाग खचल्याने वा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्याने खाडी तयार होते. मासेमारी करण्यासाठी, बंदरं उभारण्यासाठी खाडीचा वापर केला जातो.

समुद्राच्या भरतीचं पाणी नदीच्या मुखापाशी जिथपर्यंत आत जाऊ शकतं, त्या नदीच्या मुखाकडच्या भागालाही खाडी म्हणतात.

उदाहरणार्थ, वशिष्टी नदी जिथे समुद्राला मिळते, ती आहे दाभोळची खाडी.

चॅनल म्हणजे काय?

चॅनल म्हणजे असा एक नैसर्गिक वा मानवनिर्मित जलप्रवाह जिथून जहाजांची वाहतूक होऊ शकते.

हा मार्ग देखील चिंचोळा असतो. कधी तो दोन समुद्रांना जोडतो. किंवा जहाजं जाऊ शकतील अशा नदीच्या वा समुद्राच्या खोल भागालाही चॅनल म्हटलं जातं.

दोन बेटांमधल्या पाण्यालाही चॅनल म्हटलं जातं.

म्हणजे ब्रिटन आणि युरोप यांच्या मध्ये इंग्लिश चॅनल आहे. आणि या इंग्लिश चॅनलद्वारे नॉर्थ सी आणि अटलांटिक महासागर जोडला जातो.

इंग्लिशमधल्या चॅनललाही मराठीत खाडी हीच संज्ञा वापरली जाते.

कालवा म्हणजे काय?

कालवा म्हणजे समुद्रांना जोडणारा मानवनिर्मित मार्ग होय. फर्डिनांड लेसेप्सने बांधलेला सुएझ कालवा लाल समुद्र आणि भूमध्य समुद्राला जोडतो.

त्यामुळे युरोप आणि आशियादरम्यानचा जहाजांचा प्रवासाचा वेळ वाचतो.

तर मध्य अमेरिकेतला पनामा कालवा अटलांटिक आणि पॅसिफिक महासागराला जोडतो.

उपसागर म्हणजे काय?

ज्यावेळी पाण्याच्या तीन बाजूंना जमीन असते आणि चौथ्या बाजूला समुद्र असतो, त्याला उपसागर म्हणतात.

म्हणजे भारताच्या पूर्वेला असणारा बंगालचा उपसागर हा हिंदी महासागराचा भाग आहे.

भारत, बांगलादेश आणि म्यानमार या उपसागराच्या तीन बाजूंना आहेत.

भारतातल्या गोदावरी आणि कृष्णा या नद्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात.

आखात म्हणजे काय?

आखात म्हणजे इंग्लिशमध्ये 'गल्फ' होय. समुद्राच्या किंवा महासागराच्या जमिनीकडे आत घुसलेल्या जलभागाला आखात म्हणतात.

आखात उपसागरापेक्षा लहान असतं, त्याचं तोंड अरुंद असतं. पण तेदेखील तीन बाजूंनी जमिनीने वेढलेलं असतं.

'गल्फ' आणि 'बे' यांच्यात निश्चित असा फरक नाही. त्यामुळे तिन्ही बाजूंनी जमिनीने वेढलेल्या जलभागाला आखात किंवा उपसागर कधी म्हणायचं, याचं निश्चित मोजमाप नाही.

भारताच्या पश्चिमेला कच्छ आणि सौराष्ट्र यांच्यामध्ये कच्छचं आखात आहे. इथेच कांडला बंदर आहे.

तर मुंबईच्या उत्तरेला गुजरात आणि दीवदरम्यान खंबातचं आखात आहे, जिथे मुंबई हाय हे भारतातलं सर्वात मोठं तेलक्षेत्र आहे.

तर पर्शियाच्या आखाताच्या शेजारी वसलेल्या तेलसाठे असणाऱ्या देशांना आखाती देश म्हटलं जातं.

सामुद्रधुनी म्हणजे काय?

सामुद्रधुनी म्हणजे दोन समुद्र वा दोन जलाशयांना जोडणारा पाण्याचा अरुंद प्रवाह होय.

हा प्रवाह दोन भूभागांना वेगळा करतो. सामुद्रधुनी अतिशय चिंचोळी असते. समुद्र ओलांडून जाणाऱ्या मालवाहू जहाजांसाठी सामुद्रधुनी अनेकदा शॉर्टकट ठरतो म्हणूनच हा महत्त्वाचा जलमार्ग असतो.

म्हणूनच होर्मुझची सामुद्रधुनी सध्या चर्चेत आहे. कारण, पर्शियाच्या आखातात शिरण्याचा हा मुख्य मार्ग आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी ही पर्शियाच्या आखाताला ओमानच्या आखाताशी जोडते आणि हिंद महासागराला अरबी समुद्रात जोडते.

जवळचं उदाहरण घ्यायचं तर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये पाल्कची सामुद्रधुनी आहे.

आता राहिले सागर आणि महासागर. यांच्यातला मुख्य फरक त्यांचं आकारमान आणि खोली. महासागर हे समुद्रापेक्षा मोठे आणि खोल आहेत.

या सगळ्या संज्ञा आणि संकल्पना वेगवेगळ्या असल्या, तरी यांचं एकमेकांशी जवळचं नातं असतं. म्हणजे आखातांच्या मुखापाशी सामुद्रधुनी वा चॅनल्स म्हणजेच खाडी असते.

ही आखातं अनेकदा उपसागरांना लागून असतात. आणि उपसागर जमिनीत घुसल्याने खाडी तयार होते.

कालवे हे आखात वा दोन समुद्रांना जोडतात. लाल समुद्राच्या तोंडाशी बाब अल्-मंदेब (Bab Al-Mandab) ची सामुद्रधुनी आहे.

32 किमी लांबीची सामुद्रधुनी हा Gulf of Aden म्हणजे एडनच्या आखातातून हिंद महासागरातून लाल समुद्रात शिरण्याचा एकमेव मार्ग आहे.

हाच सागरीमार्ग पुढे जाऊन सुएझ कालव्यामार्गे भूमध्य समुद्राला जोडतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)