You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इराण-अमेरिका शस्त्रसंधी तर झाली, पण ट्रम्प यांना युद्ध महागात पडलं? - विश्लेषण
- Author, अँथनी झर्कर
- Role, उत्तर अमेरिका प्रतिनिधी
- वाचन वेळ: 4 मिनिटे
सरतेशेवटी, सर्वांनी शांततेचा मार्ग निवडला आहे, किमान आतापुरता तरी.
अमेरिका आणि इराण दोघेही दीर्घकालीन शांतता कराराच्या खूप जवळ पोहोचले आहेत.
पुढील चर्चेसाठी त्यांनी दोन आठवड्यांचा युद्धविराम मान्य केला आहे, असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हटलं.
वॉशिंग्टनच्या वेळेनुसार त्यावेळी सायंकाळी सहा वाजून 32 मिनिटे (18.32) झाली होती.
हा अगदी शेवटचा क्षण नव्हता. परंतु, ट्रम्प यांच्या रात्रीच्या 8.00 च्या (बुधवारी 00.00 जीएमटी) अंतिम मुदतीच्या जवळ आला होता. जर करार झाला नाही, तर अमेरिका इराणच्या ऊर्जा आणि वाहतूक पायाभूत सुविधांवर मोठे हल्ले करणार होता.
इराण युद्ध थांबवेल आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचा समुद्री मार्ग व्यापारी जहाजांसाठी पुन्हा उघडेल, यावर हे सगळं अवलंबून आहे.
सरकार म्हणतं, ते असेच करणार आहेत. पण तरीही ते या जलमार्गावरील आपलं 'वर्चस्व' कायम ठेवत असल्याचेही सांगत आहेत.
या करारामुळे ट्रम्प यांना स्वतःला एका धोकादायक परिस्थितीतून बाहेर काढता आलं. त्यांच्याकडे 'संपूर्ण संस्कृती आज रात्री नष्ट होईल' या दिलेल्या धमकीचा शब्द पाळून संघर्ष वाढवायचा किंवा मागे हटून आपली विश्वासार्हता कमी करायची, असे पर्याय होते.
मात्र, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केवळ तात्पुरती विश्रांती म्हणजेच आराम घेतला असावा.
ट्रम्प यांच्या धमक्या आणि युद्धविरामाला मान्यता?
अमेरिका आणि इराण आता पुढील दोन आठवड्यांत वाटाघाटी करतील. त्यामुळे कायमचा मार्ग काढण्यासाठी थोडा वेळ मिळेल. पण हा मार्ग सोपा नसल्याचे दिसते.
पण काही तासांच्या ट्रेडिंगमध्ये तेलाच्या किमती काही दिवसांनंतर पहिल्यांदाच 100 डॉलरच्या खाली गेले आणि अमेरिकेच्या शेअर बाजारातील भावही वधारले. आता सर्वात वाईट काळ सरला आहे, अशी आशावादाची भावना दिसून येत आहे.
हा प्रगतीचा मार्ग देखील पूर्ण खात्रीचा नव्हता. अगदी मंगळवारी (7 एप्रिल) सकाळपर्यंत. ट्रम्प यांनी इराणी संस्कृती नष्ट होईल, अशी धमकी दिली होती आणि 'पुन्हा कधीही येणार नाही', असंही त्यांनी म्हटलं होतं.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अशी धक्कादायक धमकी दिल्यामुळे इराणने आधी नाकारलेला युद्धविराम मान्य केला किंवा नाही, हे ठामपणे सांगता येणार नाही. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की, ट्रम्प यांच्या अशा थक्क करणाऱ्या प्रक्षोभक घोषणा यापूर्वीच्या आधुनिक अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी कधीही केलेल्या नव्हत्या.
या दोन आठवड्यांच्या युद्धविरामामुळे कायमची शांतता निर्माण झाली तरी, इराण युद्ध आणि ट्रम्प यांनी अलीकडे ज्यापद्धतीने शब्दांचा वापर केला, त्यामुळे जगभरातील लोकांचा अमेरिकेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललेला असू शकतो.
ज्या देशाने एकेकाळी जगभरात स्थिरतेचा पाया घालण्याचा प्रयत्न केला, आता तोच देश आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा पाया हालवत आहे. जे राष्ट्राध्यक्ष देशांतर्गत राजकारणातील नियम आणि परंपरा तोडण्याचा आनंद घेत होते, तेच राष्ट्राध्यक्ष आता जागतिक मंचावर त्याच गोष्टी करताना दिसत आहेत.
ट्रम्प यांच्या पक्षाचे नेतेही विरोधात
डेमोक्रॅट्सनी मंगळवारी लगेचच ट्रम्प यांच्या शब्दांचा निषेध केला, काहींनी तर त्यांना पदावरून हटवण्याची मागणीही केली.
"राष्ट्राध्यक्ष हळूहळू कमकुवत होत आहेत. देशाचं नेतृत्त्व करण्यासाठी ते सक्षम नाहीत, हे स्पष्ट आहे," असं काँग्रेसमन जोकिन कॅस्ट्रो यांनी एक्सवर म्हटलं आहे.
जर कोणताही रिपब्लिकन सदस्य इराण युद्ध संपवण्यासाठी विरोधात मतदान करण्यात सामील झाला नाही, तर "त्या प्रत्येकाला यापुढील परिणामांची जबाबदारी घ्यावी लागेल", असं अमेरिकन सिनेटमधील प्रमुख डेमोक्रॅट नेते चक शुमर म्हणाले.
ट्रम्प यांच्या स्वतःच्या पक्षातील अनेक जण यापूर्वी त्यांच्या राष्ट्राध्यक्षांच्या बाजूने अनेकवेळा उभे राहिले. पण त्यांना नेहमी मिळणारा सार्वत्रिक पाठिंबा यावेळी इतका दिसून आला नाही.
जॉर्जियाचे रिपब्लिकन कॉंग्रेसमन आणि हाऊस आर्म्ड सर्व्हिसेस कमिटीचे वरिष्ठ सदस्य ऑस्टिन स्कॉट यांनी ट्रम्प यांच्या 'संस्कृती नष्ट होईल' या धमकीचा तीव्र शब्दांत निषेध केला.
"अध्यक्षांचे वक्तव्य उलट परिणाम करणारे आहेत आणि मी त्यांच्याशी सहमत नाही," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.
विस्कॉन्सिनचे सिनेटर रॉन जॉन्सन, हे ट्रम्प यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. परंतु, त्यांनीही आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. ट्रम्प यांनी हल्ल्याचं धोरण कायम ठेवलं तर ती 'मोठी चूक' ठरेल, असं त्यांनी म्हटलं.
"संपूर्ण संस्कृती नष्ट करण्याच्या" वक्तव्याचं समर्थन करत नाही, असं मत टेक्सासचे काँग्रेसमन नॅथॅनियल मोरन यांनी सोशल मीडियावर मांडलं.
त्यांनी पुढे लिहिलं की, "हे आपलं खरं रूप नाही."
त्याचबरोबर "हे अमेरिकेला सदैव मार्गदर्शन करणाऱ्या तत्त्वांशीही सुसंगत नाही," असंही त्यांनी म्हटलं.
अलास्काच्या सिनेटर लिसा मुर्कोव्स्की, या नेहमीच ट्रम्प यांच्यापेक्षा वेगळी भूमिका घेत असतात. अध्यक्षांची धमकी "इराणबरोबरच्या चर्चेत फायदा मिळवण्यासाठीचा प्रयत्न" म्हणून मान्य करता येऊ शकत नाही, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलं
ट्रम्प म्हणतात, 'अमेरिकेने आपलं उद्दिष्ट साध्य केलं'
परंतु हा दबाव परिणामकारक ठरला, असंही व्हाइट हाऊस म्हणू शकतं.
ट्रम्प यांनी युद्धविराम जाहीर करताना आपल्या ट्रूथ सोशल पोस्टमध्ये म्हटलं की, "अमेरिकेने आपली सर्व लष्करी उद्दिष्टे 'पूर्ण केली आणि त्यापेक्षा जास्त साध्य केलं'."
इराणचे लष्कर आता खूपच कमकुवत झाले आहे. इस्लामिक कट्टरतावादी सरकार सत्तेत असले तरी त्यांचे अनेक उच्चस्तरीय नेते हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत.
सध्या तरी अमेरिकेने सांगितलेल्या उद्दिष्टांपैकी अनेक गोष्टी अजूनही शंकास्पद आहेत. इराणकडील समृद्ध युरेनियम त्यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचा पाया आहे - त्याचं काय करणार हे कोणालाही माहीत नाही. तसेच येमेनमधील हुथी बंडखोरांसारख्या प्रादेशिक गटांवर या देशाचा अजूनही प्रभाव आहे.
कोणताही टोल किंवा पैसे न मागता इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली केली तरी आता जगाला हा महत्त्वाचा समुद्री मार्ग धोरणात्मकदृष्ट्या इराणच्या किती ताब्यात आहे, हे स्पष्टपणे दिसून आलं आहे. आणि तो नियंत्रित करण्याची त्यांची क्षमताही आधीपेक्षा जास्त आहे.
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या संदेशानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अराघची यांनीही यावर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, जर आमच्यावरील हल्ले थांबवले गेले, तर आम्ही आमची 'संरक्षणात्मक कारवाई' थांबवू. इराणच्या लष्करी समन्वयाने दोन आठवड्यांसाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची सुरक्षित वाहतूक होऊ देऊ.
त्यांनी पुढे असंही म्हटलं की, अमेरिकेने इराणच्या 10‑बिंदू (10 मुद्द्यांच्या) शांतता योजनेचा 'सामान्य आराखडा' मान्य केला आहे.
ट्रम्प यांना इराणच्या अटी मान्य आहेत का?
या योजनेत इराणने काही अटी ठेवल्या आहेत- त्यात अमेरिकेनं या प्रदेशातून आपलं सैन्य काढून घेणं, सर्व आर्थिक निर्बंध (सँक्शन्स) उठवणे, इराणला युद्धाची नुकसान भरपाई देणे, आणि इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण ठेवण्याची परवानगी देणे.
म्हणजे या अटींसाठी ट्रम्प सहमत होतील ही कल्पना करणंच कठीण आहे. त्यामुळे पुढील दोन आठवड्यांची चर्चा अनिश्चित स्वरुपाची असण्याचीच जास्त शक्यता आहे.
सध्या तरी, ट्रम्प यांच्यासाठी हा राजकीयदृष्ट्या आंशिक विजय आहे. त्यांनी प्रक्षोभक आणि नाट्यमय धमकी दिली आणि त्यांना हवा असलेला परिणाम मिळवला. पण युद्धविराम तात्पुरता आहे, तो कायमचा समझोता नाही.
राष्ट्राध्यक्षांच्या बोलण्याचा आणि कृतींचा, तसेच या युद्धाच्या दीर्घकालीन परिणामांचे अद्याप पूर्णपणे मूल्यांकन झालेले नाही.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)