नाशिकमधील टीसीएस कंपनीत लैंगिक छळ आणि धार्मिक अपमानाचे आरोप; पोलीस आयुक्तांनी काय सांगितलं?

बहुराष्ट्रीय कंपनीवरील लैंगिक शोषण प्रकरण
वाचन वेळ: 9 मिनिटे

नाशिकमधील टीसीएस (टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस) कंपनीत महिला कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांचं लैंगिक शोषण आणि मानसिक छळ केल्याचे आरोप याच कंपनीतील आठ महिलांनी केले आहेत.

या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत. पीडित महिलांनी या एफआयआरमध्ये अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

या कंपनीत काम करणारे कर्मचारी, एचआर विभागातील कर्मचारी आणि डिलिव्हरी पार्टनर अशा आरोपींच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बळजबरी, लैंगिक शोषण, लग्नाचे आमीष दाखवून फसवणूक, धार्मिक भावना दुखावणे अशा प्रकारचे अनेक आरोप पीडित महिलांनी केले आहेत.

या प्रकरणात एका महिलेसह एकूण सात जणांना अटक करण्यात आली आहे, तर एक महिला आरोपी फरार आहे.

कंपनीतील ज्या कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे, त्यांचं कंपनीनं निलंबन केलं गेलंय. तसंच, एका निवेदनाद्वारे कंपनीनं स्पष्टीकरण देत तपासात सहकार्य करत असल्याचं सांगितलंय.

तर डिलिव्हरी पार्टनर असलेल्या आरोपी महिलेच्या वकिलांनीही आरोप फेटाळून लावले आहेत.

या प्रकरणातील काही आरोपींचे न्यायालयात प्रतिनिधित्व करणाऱ्या वकीलांनी (15 एप्रिल रोजी) आरोपींची बाजू बीबीसी मराठीला मांडली आहे. त्यात त्यांनी धर्माच्या बाबतीत संबंध असल्याचा मुद्दा फेटाळून लावला आहे. त्यांची सविस्तर मुलाखत याच बातमीत तुम्हाला वाचता येईल.

या प्रकरणी सर्वात पहिला गुन्हा दाखल झाला, त्यावेळी एफआयआरमध्ये पीडित महिलेनं अनेक गंभीर आरोप केले आहेत.

नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक काय म्हणाले?

नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक म्हणाले, "नाशिक शहर पोलिसांकडे 9 गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणं, कार्यालयाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार यासदराखाली गुन्हे दाखल आहेत. यामध्ये एका पुरुष तक्रारदारानं धार्मिक भावना दुखावणं आणि धर्मांतरणाचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल केलेला आहे."

नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक काय म्हणाले?
फोटो कॅप्शन, नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

"एका महिला पीडितेनं नोकरी लावून देतो आणि लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार, तसंच धर्मांतराचा प्रयत्न आणि धार्मिक भावना दुखावणं तसंच ॲट्रोसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. इतर गुन्ह्यांमध्ये 4 महिलांनी सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस या सदराखाली गुन्हे दाखल केलेले आहेत. तर 3 महिलांनी रिलीजियस हॅरेसमेंट म्हणजे धार्मिक भावना दुखावणे आणि लैंगिक अत्याचार म्हणजे सेक्शुअल हॅरेमेंट ॲट वर्कप्लेस या सदराखाली गुन्हे दाखल केलेले आहेत."

"या प्रकरणांमध्ये 9 आरोपी आहेत. या 9 आरोपींमध्ये 2 महिला आरोपी आणि 7 पुरुष आरोपी आहेत. जे 7 पुरुष आरोपी आहेत, ते सर्वच गुन्ह्यांमध्ये एकमेकांबरोबर सह-आरोपी आहेत. त्यामुळे या कार्यालयामध्ये यांचा एक संघटित ग्रुप झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर ज्या 2 महिला आरोपी आहेत. त्यापैकी एका महिलेवर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे."

"त्याचबरोबर त्यांची ऑपरेशन्स आणि एचआर पाहणारी जी मॅनेजर आहे, अश्विनी चेनानी हिच्यावरदेखील एका गुन्ह्यात आरोप आहेत की ज्यावेळेस या पीडित महिला तिच्याकडे गेल्या होत्या, त्यावेळेस तिनं पीडित महिलेला न्याय न देता या आरोपींना पाठीशी घातलं."

कर्णिक पुढे म्हणाले "यांना बाहेरच्या किंवा कुठल्या कट्टरतावादी संघटना पाठिंबा देत होत्या का किंवा प्रवृत्त करत होत्या का, यासंदर्भात नाशिक पोलीस तपास करत आहेत. त्याचबरोबर यांना बाहेरून कुठून फंडिंग आलेलं होतं. किंवा जसं मीडियामध्ये काही ठिकाणी बोललं गेलेलं आहे की यांचे काही इंटरनॅशनल लिंक्स आहेत का, या सर्व बाबतीत पोलीस यंत्रणा तपास करते आहे."

"एसआयडी, एटीएस आणि एनआयए या एजन्सींना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. ज्यावेळेस तपास यंत्रणांसमोर काही ठोस पुरावे येतील, त्यावेळेस त्यासंदर्भात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल."

"या 9 प्रकरणांसंदर्भात जी पहिली तक्रार एका पीडितेकडून आली होती, तेव्हा ती पीडिता खूप घाबरलेली होती. ती तक्रार देण्याच्या मन:स्थितीत नव्हती. पोलिसांनी तिचं कौन्सलिंग केलेलं आहे. तिला धीर दिला. त्यानंतर तिनं तक्रार दाखल केली. मग तिनं आणि तिच्या ऑफिसमधील काहीजणांनी सांगितलं की, असे आणखीही काही तक्रार मिळू शकतात."

"विशेषकरून बऱ्याच महिलांना यासंदर्भात त्रास झालेला आहे. त्यावेळेस आमचे नाशिक पोलीसच्या ज्या महिला अधिकारी प्लेन क्लोथमध्ये त्या कार्यालयात गेल्या होत्या. त्यांनी तिथल्या सर्व महिलांना भेटून धीर देणं, कौन्सलिंग करणं आणि त्यांची काही तक्रार असेल तर पोलीस कारवाई करतील, काळजी करू नका, अशाप्रकारे त्यांना धीर दिला. त्यांचं मनोबल वाढवलं. त्यानंतर या तक्रारी दाखल झाल्या आहेत."

"या पहिल्या तक्रारीमध्ये जी पीडिता आहे, तिला जो आरोपी आहे तो तिला एका रिसॉर्टमध्ये घेऊन गेल्याचं सांगितलं होतं. तर त्यासंदर्भातील पुरावे जप्त करण्यात आले आहेत. त्या रिसॉर्टचं एन्ट्री रजिस्टर किंवा त्यांनी दिलेली कागदपत्रं, त्याचबरोबर त्यांनी जे ऑनलाईन पेमेंट्स केले आहेत, यासंदर्भातील पुरावे जप्त करण्यात आले आहेत. तपास यंत्रणा याबाबतीत पुढील तपास करत आहेत," असं कर्णिक यांनी सांगितलं.

पीडितेने FIR मध्ये काय सांगितलं होतं?

तक्रार दाखल केलेली महिला 2023 पासून नाशिकमधील टीसीएस कंपनीत असोसिएट या पदावर कार्यरत आहे.

एफआयआरनुसार, 2022 मध्ये त्यांची एका आरोपीशी भेट झाली होती. आरोपी त्यांचा मित्रच होता. ते एकाच महाविद्यालयात शिकलेले होते. मैत्री असल्यानं ते भेटू लागले. आरोपीनं महिलेला तो काम करत असलेल्या कंपनीत नोकरी लावून द्यायचं आश्वासन दिलं होतं.

दरम्यान, जुलै 2022 मध्ये या आरोपीनं एकदा महिलेकडं शारिरीक सबंध ठेवण्याची मागणी करत तिच्यावर बळजबरीही केली होती. महिलेनं विरोध केल्यानंतर त्यानं तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेनं विचार करून सांगते असं म्हटलं.

पुढे अनेकदा आरोपी महिलेला कॉलेज संपल्यानंतर भेटायला बोलवायचा. आरोपीनं महिलेला बीसीएची पदवी पूर्ण झाल्यानंतर या कंपनीत नोकरीसाठी मुलाखतीस जाण्यास सांगितलं आणि तिची असोसिएट पदावर निवड झाली. एकाच कंपनीत असल्यानं त्यांचं तिथंही नेहमी भेटणं बोलणं व्हायचं.

बहुराष्ट्रीय कंपनीवरील लैंगिक शोषण प्रकरण

याच कंपनीत आरोपीच्या ओळखीचा आणखी एक पुरुष आणि एक महिला यांच्याशी महिलेची ओळख झाली. हे चौघं अनेकदा सोबत असायचे. कॅन्टीनमध्ये किंवा फिरायला ते सोबत जायचे. पण या दरम्यान आरोपीसह ते दोघं असे तिघे मिळून महिलेला तुझा धर्म कसा वाईट आणि आमचा कसा चांगला असं सांगत असायचे. महिलेला तिच्या धर्माबाबतही अनेक वाईट गोष्टी बोलायचे.

ऑगस्ट 2024 मध्ये एकदा आरोपी या महिलेला एका रिसॉर्टवर घेऊन गेला आणि त्याठिकाणी शारीरिक संबंधांसाठी बळजबरी केली. त्यानंतर त्याचा कंपनीतील मित्र महिलेच्या घरी गेला आणि दोघांच्या नात्याबाबत कुटुंबाला सांगण्याची धमकी देत त्यानंही महिलेकडं शारीरिक सबंधाची मागणी केली.

नंतर तो महिलेसोबत ऑफिसमध्ये अनेकदा लैंगिक चाळे करू लागला. दोन्ही मित्र मिळून महिलेला तिचा धर्म वाईट असल्यानं तिनं त्यांचा धर्म स्वीकारावा असं सांगू लागले. त्याचे फायदे सांगण्याचा प्रयत्न ते करत होते. हे सर्व सुरू असलताना महिलेशी जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असायचा.

नंतर फेब्रुवारी 2026 मध्ये एका महिलेचा पीडितेला फोन आला. ती महिला आरोपीची पत्नी असून त्यांना दोन मुलं असल्याचंही तिला समजलं. त्यावर महिलेनं आरोपीला "पहिली पत्नी असताना माझी फसवणूक का केली?" अशी विचारणा केली. त्यावर आरोपीनं उडवाउडवीची उत्तरं दिली. शिवाय "तुझ्याबरोबर लग्न करण्यात कधीच रस नव्हता", असंही म्हणाला.

अशाप्रकारे आरोपी त्याचा एक मित्र आणि आणखी एक महिला यांनी पीडितेच्या धार्मिक भावना दुखावल्या.

तसंच, आरोपीनं पहिलं लग्न झालेले असताना खोटे बोलून, लग्नाचं वचन देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. शिवाय, वारंवार लैंगिक छळही केला, अशा प्रकारची माहिती पीडितेनं पोलिसांना तक्रारीत दिली आहे.

नऊ FIR मध्ये अनेक आरोप

या महिलेनं दिलेल्या तक्रारीसह या प्रकरणात एकापाठोपाठ एक असे नऊ FIR दाखल करण्यात आले आहेत. या FIR मध्येही अनेक आरोप आहेत.

एफआयआर - 01 : जुलै 2022 ते फेब्रुवारी 2026 या काळात वडाळा रोडवरील या कंपनीत तीन आरोपींनी एका महिला कर्मचाऱ्याच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. महिलेला धमकावून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले तसंच ऑफिसच्या लॉबीमध्ये तिच्यासोबत छेडछाड केली, असेही आरोप आहेत.

एफआयआर - 02 : मे 2023 ते 19 मार्च 2026 या काळात आणखी दोन आरोपींविरोधात त्याच महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची तिने कंपनीच्या एचआर विभागात तोंडी तक्रार केली. मात्र, एचआरमधील अधिकाऱ्यांनीही त्या दोघांच्या वर्तनाला प्रोत्साहन दिले.

एफआयआर - 03 : 2022 ते फेब्रुवारी 2026 या काळात आणखी एका आरोपीने एका मीटिंगमध्ये त्या महिलेला पाहिलं आणि तिच्या वैयक्तिक व वैवाहिक आयुष्याबद्दल, विशेषतः तिला मूल नसल्याबद्दल, अपमानास्पदरित्या कमेंट केली. तसेच, त्याने तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.

एफआयआर - 04 : मे ते डिसेंबर 2025 या काळात पुन्हा एका आरोपीने महिलेला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लाजिरवाणे प्रश्न विचारले आणि तिच्या शरीराकडे पाहून, खासगी भागांकडे इशारा केला. तसेच धर्माबद्दल बोलून इतर महिलांच्या धार्मिक भावना दुखावल्या.

बहुराष्ट्रीय कंपनीवरील लैंगिक शोषण प्रकरण

एफआयआर - 05 : 2022 ते 23 मार्च 2026 या काळात संशयित आरोपींनी तरुणाला त्याच्या धर्मातील देवाबद्दल अपशब्द वापरले आणि त्याला एका विशिष्ट धर्माचे धार्मिक विधी जबरदस्तीने करण्यास भाग पाडले. त्याला बळजबरी मांसाहार खाऊ घातला आणि त्याचा धर्म बदलण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांनी त्याच्या धर्मातील महिलांबद्दलही अपशब्द वापरले.

एफआयआर - 06 : फेब्रुवारी 2024 ते 2026 या काळात संशयित आरोपींनी त्या महिलेच्या शरीराबद्दल अपमानास्पद आणि अश्लील भाष्य केले. त्यांनी जाणूनबुजून तिच्या शरीराला आणि पायांना स्पर्श करून तिची छेड काढली.

एफआयआर - 07 : जून 2025 ते मार्च 2026 या काळात पाच संशयित आरोपींनी महिलेचा पाठलाग करुन तिच्याबद्दल अश्लील भाष्य केले. कामाच्या ठिकाणी त्यांनी तिच्या शरीराला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला आणि तिच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एफआयआर - 08 : जानेवारी 2025 ते एप्रिल 2026 या काळात आरोपींनी महिलेला तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारले आणि प्रेमाची मागणी केली. तसेच त्यांनी वारंवार अश्लील भाषा वापरून तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला, असेही आरोप आहेत.

एफआयआर - 09 : जानेवारी ते 1 एप्रिल 2026 या काळात दोन आरोपींनी कामाच्या ठिकाणी त्या महिलेसोबत अपशब्द वापरले आणि तिच्याशी गैरवर्तन केले. तसेच त्यांनी तिच्या शरीराबद्दल अपमानास्पद आणि अश्लील कमेंट केल्याचा आरोप आहे.

डिलिव्हरी पार्टनर आणि ईमेल

दरम्यान, या प्रकरणात कंपनीची डिलिव्हरी पार्टनर (प्रॉडक्ट ग्रोथ) असलेली महिलादेखील संशयित आहेत. या महिलेच्या पोलीस कोठडीत नाशिक न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे.

पोलीस या दिशेनं तपास करताना काही गोष्टी समोर आल्या आहेत.

कंपनीच्या सर्व्हरवरून या महिलेला 78 ईमेल पाठवले होते. त्याचा तपास करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाशी त्याचा संबंध आहे का? हे तपासलं जात आहे. डिलिव्हरी पार्टनर असलेली ही महिला सातत्यानं आरोपींच्या संपर्कात असल्याचाही आरोप आहे.

पीडितेनं केलेल्या तक्रारीत तिला मदत करण्याऐवजी या महिलेनं तिचा आवाज दाबल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे.

बहुराष्ट्रीय कंपनीवरील लैंगिक शोषण प्रकरण

दरम्यान, याबाबत डिलिव्हरी पार्टनर असलेल्या या महिलेच्या वकिलांनी आरोप फेटाळले आहेत.

"आमची अशील एचआर नसून त्या फरारही नव्हत्या," असं वकिलांनी सांगितलं आहे.

त्या एचआर नव्हत्या. तर त्या 2026 मध्ये कंपनीत POSH च्या समितीत आल्या होत्या.

कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ होऊ नये, यासाठी ही समिती काम करत असते.

"त्यांनी 31 तारखेला नाशिकमध्ये येऊन जबाब दिला होता. त्यावेळी कंपनीत एचआर आणि नाशिक कंपनीचे व्यवस्थापकही होते. आमच्या अशील फरार नव्हत्या, तरीही त्यांना अटक करण्यात आली आहे. तपासात आम्ही सहकार्य करत असून ईमेलचा ॲक्सेस दिला असून त्याआधीच 78 ईमेल पोलिसांना भेटले आहेत," असंही त्यांच्या वकिलांनी सांगितलं.

टीसीएस कंपनीचे निवेदन

या प्रकरणानंतर टीसीएस कंपनीने निवेदन जारी केलं आहे.

या निवेदनात संबंधित कंपनीच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, "आमच्या कंपनीत कोणत्याही प्रकारच्या छळवणूक आणि जुलूमाविरुद्ध दीर्घकालीन शून्य-सहनशीलता धोरण आहे. आम्ही नेहमीच आमच्या कर्मचाऱ्यांच्या कार्यस्थळी सुरक्षितता, सन्मान आणि कल्याणाच्या सर्वोच्च मानकांची खात्री केली आहे."

बहुराष्ट्रीय कंपनीवरील लैंगिक शोषण प्रकरण

"नाशिकमधील या प्रकरणाची माहिती मिळताच आम्ही तात्काळ कारवाई केली असून अंतर्गत चौकशी प्रक्रिया सुरू केली आहे. तपासाअंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे."

तसंच, "आम्ही स्थानिक कायदा अंमलबजावणी प्राधिकरणांसोबत पूर्ण सहकार्य करत आहोत. पुढील कोणतीही कारवाई या तपासाच्या निष्कर्षांवर आधारित असेल", असंही कंपनीच्या प्रवक्त्यांनी नमूद केलं आहे.

बचाव पक्षाचे वकील ॲड. राहुल कासलीवाल यांची प्रतिक्रिया

बीबीसीचे सहयोगी पत्रकार प्रवीण ठाकरे यांनी बचाव पक्षाचे वकील ॲड. राहुल कासलीवाल यांची 15 एप्रिल रोजी मुलाखत घेतली. त्यात त्यांनी आरोपींच्या वतीने बाजू दिली आहे.

प्रश्न - नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीसंदर्भात (TCS) जे प्रकरण सध्या सुरू आहे, त्याला आता राजकीयदृष्ट्या एक वेगळंच स्वरुप दिलं जातं आहे. धर्माच्या आधारे आरोप-प्रत्यारोप होत आहेत. नेमकं हे प्रकरण काय आहे? त्यामध्ये कोणते कलम लावण्यात आलेली आहेत?

उत्तर - बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयं भारतभर किंवा परदेशात असतात. त्यामुळे त्यांचं प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असेल असं आपण गृहित धरू शकत नाही. या तरुणांनी केलेल्या वैयक्तिक स्वरुपाच्या घटना आहेत. त्यामुळे कंपन्यांबद्दल काहीच बोलता येणार नाही.

या प्रकरणात मी काही आरोपींच्या वतीनं युक्तिवाद करतो आहे. यामध्ये माझ्यासोबत माझे सहकारी ॲड. बाबा सय्यद आणि ॲड. हनिफ शेख आहेत. आम्ही तिघे हे काम पाहत आहोत.

यामध्ये असं दिसतं की एका कंपनीतील काही वर्कर्स किंवा स्टाफ यांचा एक फ्रेंडली ग्रुप आहे. त्यांनी बरेच सेलिब्रेशन्स केलेले आहेत. बऱ्याच वेळा ते कंपनीच्या पिकनिकसाठी जायचे. मात्र या धर्मांतर वगैरे सारखं मला अजून तरी काही दिसलेलं नाही.

फिर्यादीमध्ये देखील धर्मांतरणांविषयीचे विशिष्ट आरोप वगैरे नाहीत. मला असं वाटतं की खरोखरंच असं घडलं असं गृहित धरलं तरी हे प्रकरण प्रिव्हेंशन ऑफ सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्क प्लेस ॲक्टच्या पलीकडे जाणार नाही. किंवा कलम 354 वगैरे, बीएनएसमध्ये आपण ज्याला कलम 75 म्हणतो त्यापेक्षा वेगळं असं काहीही या प्रकरणात नाही.

मला वाटतं की धर्मांतरणाचा पुन्हा राजकीय पातळीवर मांडला जातो आहे. या प्रकरणात तपास अजून सुरू आहे. तपासामध्ये रिमांड रिपोर्टमध्ये तसे आरोप मला अजून दिसलेले नाहीत.

प्रश्न - साधारण हे जे कलम या प्रकरणात लावण्यात आले आहेत. त्यासंदर्भात धर्मांतरणाचा मुद्दा आणि धार्मिक भावना दुखावला जाण्याचा मुद्दा यातील फरक स्पष्ट करा.

उत्तर - धार्मिक भावना दुखावणं म्हणजे मी एखाद्या व्यक्तीला त्याच्या धर्मावरून बोललो. उदाहरणार्थ, समजा मी विशिष्ट धर्मातील व्यक्ती आहे आणि मला जर कोणी म्हणालं की तुम्ही विशिष्ट धर्माचे असे असता, तसे असता. तर याला धार्मिक भावना दुखावणं असं म्हणतात.

धर्मांतर किंवा जबरदस्तीनं धर्मांतरण म्हणजे एका विशिष्ट धर्माच्या व्यक्तीला त्याचा धर्म सोडून दुसऱ्या धर्मामध्ये येण्याचा किंवा त्यानं दुसरा धर्म स्वीकारावा यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रकारे भरीला घालणं किंवा काही मोबदला देणं किंवा धमकावणं. अशाप्रकारे त्याची इच्छा नसताना त्याला असं करायला लावणं हा धर्मांतरणाचा मुद्दा असतो. मात्र या प्रकरणात असे आरोप नाहीत.

प्रश्न - या प्रकरणात नेमकी कोणकोणते कलम लावण्यात आले आहेत?

उत्तर - यात मुख्यत्वे, भारतीय न्याय संहितेचं कलम 74, 75, 79, 299, 302 आणि सह कलम 34 लावण्यात आलं आहे.

महिलेंची छेडछाड, धार्मिक भावना दुखावणं यासंदर्भातील ही कलमं आहेत.

प्रश्न - या प्रकरणातील सर्व सहा मुख्य आरोपींना न्यायालयीन कोठडी (एमसीआर) देण्यात आलेली आहे. यापैकी कोणासाठी जामिनासाठी अर्ज केला जाणार आहे का, पुढची पावलं काय असणार आहेत?

उत्तर - एकूण 8 ते 9 सीआर दाखल आहेत. त्यापैकी दोन सीआरमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. त्या दोन्ही सीआरमध्ये आम्ही जामिनासाठीचे अर्ज आम्ही आज दाखल करत आहोत. तसंच उरलेल्या गुन्ह्यांमध्येसुद्धा जर पोलीस त्यांना लवकर ताब्यात घेणार नसतील तर आम्ही त्यांच्या अटकपूर्व जामिनासाठीचे अर्ज दाखल करणार आहोत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)