महाराष्ट्रात कामगारांना दुपारी 12 ते 4 या वेळेत सक्तीची विश्रांती, उन्हामुळे शासनाने काय नियम सांगितले?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
महाराष्ट्रात वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने आणि हवामान विभागाने अलर्ट जारी केल्यानुसार राज्य उष्णता कृती आराखडा जाहीर करण्यात आला आहे. यात असंघटित कामगारांना तीव्र उष्णतेपासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नियमावली (SOP) जाहीर केली आहे.
या नियमांनुसार हवामान खात्याच्या अलर्टनुसार दुपारी 12 ते 4 या वेळेत कामगारांना विश्रांती देणे बंधनकारक असेल. तसेच कामाची वेळ सकाळी 6 ते 11 आणि सायंकाळी 4 ते 8 करण्याबाबत सुचवण्यात आले आहे.
देशातील उष्णतेसाठी सर्वाधिक संवेदनशील राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. उष्माघात आणि आपत्ती या प्रकारामध्ये देशातील पहिल्या 10 राज्यांमध्ये महाराष्ट्राचा नंबर येतो.
यासंदर्भात बोलताना आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं की, "देशातील दहा प्रमुख उष्ण राज्यांमध्ये महाराष्ट्र राज्याचाही समावेश आहे. वातावरणातील बदलांमुळे तापमान सातत्याने वाढत असून अनेक भागात तापमान 47 ते 49 अंश सेल्सियसपर्यंत पोहोचत आहे. राज्यात वाढत्या उष्णतेमुळे दक्षता घेण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांना देण्यात आल्या आहेत."
राज्यात उष्णतेसाठी उच्च जोखमीचे 15 जिल्हे कोणते?
महाराष्ट्र हे भारतातील उष्णतेच्या दृष्टीने सर्वाधिक संवेदनशील असलेल्या पहिल्या 10 राज्ये किंवा केंद्रशासित प्रदेशांपैकी एक आहे.
राज्य उष्णता कृती आराखड्यानुसार (State Heat Action Plan), विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश या प्रदेशांतील 15 जिल्हे अत्यंत उष्णतेसाठी उच्च जोखमीचे म्हणून ओळखले गेले आहेत.
यात लातूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नांदेड या जिल्ह्यांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ही मार्गदर्शक सूचना वरील उच्च जोखीम असलेल्या जिल्ह्यांतील शहरी भागांमध्ये लागू आहे.
विशेषतः अंतर्गत (inland) आणि अर्ध-शुष्क (semi-arid) प्रदेशांमध्ये. तसेच, उष्णतेचा मोठा ताण अनुभवणाऱ्या इतर किनारपट्टीबाहेरील (non-coastal) शहरी भागांमध्येही ही सूचना अवलंबली जाऊ शकते.

फोटो स्रोत, Getty Images
ही मानक कार्यपद्धती (SOP) महाराष्ट्रातील उच्च उष्णता-जोखीम असलेल्या शहरी भागांमध्ये कार्यरत सर्व महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना लागू असेल. तसंच उष्णतेच्या संपर्कात काम करणाऱ्या अनौपचारिक बाह्य (outdoor) कामगारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचीही सूचना करण्यात आली आहे.
यामध्ये प्रामुख्याने रस्त्यावरचे विक्रेते, बांधकाम कामगार व दैनिक वेतनधारक, वाहतूक पोलीस, स्वच्छता कर्मचारी, गिग व डिलिव्हरी कामगार, रिक्षा चालक आणि हमाल यांचा समावेश आहे. तसंच या सूचना अनौपचारिक कामगार, चंद्रपूरमधील कोळसा खाण कामगार तसेच उष्णता-प्रतिरोधक गृहनिर्माण आणि वसाहतींसाठी आहेत.
कामगारांसाठी कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत?
- उष्णतेच्या इशाऱ्यांच्या काळात बाहेरील कामाचे तास थंड कालावधीत (उदा. सकाळी 6 ते 11, सायंकाळी 4 ते 8) पुनर्नियोजित करा.
- ऑरेंज आणि रेड इशाऱ्यांच्या काळात दुपारी 12 ते 4 या वेळेत अनिवार्य विश्रांती लागू करा.
- विशेषतः बांधकाम, औद्योगिक आणि विक्री क्षेत्रांसाठी वेळापत्रक बदल अनिवार्य करण्यासाठी अधिकृत जिल्हा स्तरावर परिपत्रके जारी करा.
- जिल्हा आणि शहरांच्या उष्णता कृती आराखड्यांमध्ये (Heat Action Plans) बाहेरील असंघटित कामगारांना प्राधान्याने असुरक्षित गट म्हणून ओळखून त्यांची यादी तयार करा आणि त्यांच्यासाठी स्वतंत्र प्रतिसाद विभाग आणि अर्थसंकल्पीय तरतूद करा.
- कामगार विभाग, संघटना आणि रस्त्यावरचे विक्रेते, रिक्षाचालक, स्वच्छता कर्मचारी, बांधकाम कामगार, घरगुती कामगार इत्यादी गटांच्या समन्वयाने कामगारांची यादी अद्ययावत करा.
- सरकारने जारी केलेल्या एसओपी आणि उष्णता कृती आराखड्यात म्हटल्यानुसार, उष्णतेच्या लाटांमुळे असुरक्षित असलेल्या बाहेरील असंघटित कामगारांमध्ये घराधारीत कामगारांचाही समावेश होऊ शकतो. इतर जोखमीतील गटांमध्ये कचरा वेचणारे, सुरक्षा रक्षक, काळजीवाहू, अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या, हमाल, हातगाडी ओढणारे, कारखाना व कार्यशाळा कामगार तसेच वाहतूक, दुरुस्ती आणि अन्न क्षेत्रातील कामगार यांचा समावेश होतो. उपनगरीय शेतकरी, पशुपालक आणि धुणीधोबी कामगार देखील प्रभावित होतात.
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अंतर्गत असंघटित कामगारांच्या गरजा पूर्वसूचना प्रणाली, नियोजन आणि मदत पुरवठा यामध्ये समाविष्ट करा.

फोटो स्रोत, Getty Images
आरोग्याच्यादृष्टीने कोणती पावले उचलली जाणार?
- PHCs आणि UHCs मध्ये ORS, IV फ्लुएड्स आणि उष्णताजन्य आजारांच्या उपचारासाठी आवश्यक किट्स उपलब्ध ठेवणे.
- आशा, ANM (Auxiliary Nurse Midwife) आणि प्रभाग आरोग्य कर्मचाऱ्यांना उष्णताजन्य आजार (HRI) ओळखणे आणि प्राथमिक प्रतिसाद देण्यासाठी प्रशिक्षण देणे.
- उच्च जोखीम क्षेत्रांमध्ये 108 रुग्णवाहिका पूर्वस्थितीत ठेवणे आणि जोखीम असलेल्या दिवसांमध्ये प्रतिसादाचे निरीक्षण करणे.
- तीव्र उष्णतेच्या लाटेदरम्यान जलद वैद्यकीय प्रतिसाद आणि उपचार सुनिश्चित करणे.
- उष्णतेशी संबंधित आजारांच्या उपचारांसाठी आयुष्मान भारत किंवा समतुल्य आरोग्य विमा योजनांपर्यंत प्रवेश सुलभ करणे.
- उष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्य जोखमींमुळे वेतनातील नुकसान किंवा कामावर गैरहजेरीसाठी भरपाई यंत्रणा विकसित करणे.
- कामगार कल्याण मंडळे अधिक सक्षम करून त्यामध्ये आपत्कालीन मदत, नियमित आरोग्य तपासणी,
- उष्णतेसाठी पूर्वतयारीसाठी, आर्थिक सहाय्य, अनौपचारिक कामगारांचे संरक्षण मजबूत करणे, आपत्कालीन स्तरावरील कृती, तीव्र उष्णतेच्या लाटेदरम्यान प्रभावित कामगारांसाठी तात्काळ आर्थिक मदत किंवा राहत सहाय्य उपलब्ध करून देणे.
- प्रकाशयोजना, वाहतूक आणि संरक्षणात्मक सुविधा उपलब्ध करून महिलांच्या कार्यस्थळावरील सुरक्षितता सुनिश्चित करणे.
- बाजारपेठा, चौक, वाहतूक जंक्शन, ट्रान्झिट हब आणि विक्री क्षेत्रांमध्ये पाणी बूथ उभारणे. स्वच्छ फलक (signage) लावून नियमित पाणी भरण्याची व्यवस्था करण्याबाबत सूचना करण्यात आली आहे. तसंच PHCs, प्रभाग कार्यालये आणि स्वयंसेवी संस्थांमार्फत ORS आणि इलेक्ट्रोलाइट पाउचचे वितरण करण्याचीही सूचना आहे.
जिल्हाधिकारी कार्यलय यांच्याअंतर्गत आरोग्य विभाग, प्रभाग कार्यलय, कामगार संघटना आणि स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने या उपाययोजना राबवल्या जातील असंही यात म्हटलं आहे.
दुपारच्या वेळेत उद्याने खुली ठेवण्याची सूचना
- दुपारच्या वेळेतही उद्यान आणि बागा खुल्या आणि उपलब्ध ठेवणे.
- नाका, विक्री क्षेत्रे, कामगार चौक, कामगार क्षेत्रे आणि वाहतूक जंक्शन येथे तात्पुरत्या सावलीची व्यवस्था करणे.
- सार्वजनिक इमारतींना तात्पुरत्या शीतलन निवारा केंद्रांमध्ये रूपांतरित करणे (पंखे, पाणी, चटईसह). आपत्कालीन परिस्थितीत उष्णता संरक्षण किटचे वितरण करणे.
- ORS, पाण्याच्या बाटल्या, टोपी, कूलिंग टॉवेल, सूती स्कार्फ, विश्रांती क्षेत्रांमध्ये मिस्ट फॅन किंवा कूलर सारख्या कमी खर्चिक शीतलन उपाययोजना राबवणे.
तीन क्षेत्रांसाठी मार्गदर्शक सूचना
पहिल्या एसओपीमध्ये रस्त्यावरील विक्रेते, बांधकाम मजूर, वाहतूक पोलीस, स्वच्छता कर्मचारी, डिलिव्हरी कामगार, रिक्षाचालक आदी बाहेर काम करणाऱ्या घटकांसाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
आयएमडीच्या पिवळ्या, केशरी आणि लाल सतर्कतांनुसार कामाचे वेळापत्रक बदलणे, पाण्याचे ब्रेक, पाणी बूथ, ओआरएस वितरण, सावली व्यवस्था आणि आरोग्य सुविधा मजबूत करणे यासारख्या उपाययोजना करण्यात येणार असल्याचं आपत्ती व्यवस्थापन विभागाचं म्हणणं आहे.
तर चंद्रपूर जिल्ह्यातील कोळसा खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी उष्णता ताण व्यवस्थापन केलं जाणार आहे. थंड विश्रांती केंद्रे, पाणी पुरवठा, वायुवीजन, कामाचे नियोजन, जॉब रोटेशन, उष्णता आजार ओळख प्रशिक्षण आणि महिला कामगारांसाठी विशेष सुविधा यांचा समावेश आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























