आर्टेमिस 2 मिशन 13 फोटोंमध्ये; लाँच, चंद्राकडे झेप ते स्प्लॅशडाउनपर्यंतचा रोमांचक प्रवास

आर्टेमिस 2 चा चंद्रप्रवास

फोटो स्रोत, NASA

    • Author, व्हिज्युअल जर्नालिझम टीमकडून
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

आर्टेमिस 2 मधील अंतराळवीर (क्रू) यशस्वीरित्या समुद्रात उतरल्यावर (स्प्लॅशडाऊन) सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले. त्यांनी चंद्राभोवती ऐतिहासिक फेरी पूर्ण करत इतिहास घडवला.

हा प्रवास इतका लांबचा होता की, यापूर्वी कोणताही मनुष्य पृथ्वीपासून इतक्या दूर गेला नव्हता.

ओरियन कॅप्सूलने पृथ्वीच्या वातावरणात सुमारे 4 लाख फूट उंचीवर प्रवेश करताना, नियोजनानुसार सुमारे 6 मिनिटे पूर्णपणे संपर्क तुटला- हा टप्पा थोडासा तणावपूर्ण होता.

एकूणच, ओरायनला पॅसिफिक महासागरात पोहोचायला साधारण 13 मिनिटे लागली.

उतरण्याच्या वेळी कॅप्सूलने सुरक्षित लँडिंग व्हावं म्हणून गती कमी करण्यासाठी पॅराशूट उघडले.

आर्टेमिस 2 चे कमांडर रीड वाइसमन यांनी मिशन कंट्रोलला संदेश देताना म्हटलं, "काय जबरदस्त प्रवास होता! आम्ही स्थिर आहोत, आमचे चारही सदस्य सुरक्षित आणि ठणठणीत आहेत."

त्यांनी मॉड्यूल सरळ असून संपूर्ण टीम सुरक्षित असल्याची खात्री दिली.

आर्टेमिस 2 चा चंद्रप्रवास

रेस्क्यू टीमने अंतराळवीरांना हेलिकॉप्टरने यूएसएस जॉन पी. मुर्था या अमेरिकन नौदलाच्या जहाजावर नेलं. तिथे त्यांची सुरुवातीची वैद्यकीय तपासणी झाली. त्यानंतर त्यांना पुढील तपासणीसाठी ह्यूस्टनमधील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटर येथे नेण्यात आले.

अमेरिकेतील विविध अंतराळ केंद्रांवर लोक मोठ्या संख्येने जमले आणि त्यांनी स्प्लॅशडाउन पाहिला. सॅन दिएगो एअर अँड स्पेस म्युझियम येथेही अनेक लोक हा क्षण पाहण्यासाठी आले होते.

नासाने या मोहिमेदरम्यान चंद्राच्या दूरच्या बाजूवरून घेतलेले अप्रतिम असे फोटो प्रसिद्ध केले.

आर्टेमिस 2 चा चंद्रप्रवास

सर्वात नेत्रदीपक फोटोपैकी हा एक आहे. याला नासाने अर्थसेट असं नाव दिले आहे. या फोटोमध्ये पृथ्वी हळूहळू चंद्राच्या क्षितिजाच्या मागे जाताना दिसते. हा फोटो अपोलो 8 मोहिमेदरम्यान काढलेल्या प्रसिद्ध अर्थराइज फोटोच्या अगदी उलट (मिरर इमेज) आहे.

आणखी एका फोटोमध्ये चंद्राने सूर्याला पूर्णपणे झाकलेलं दिसतं. अंतराळवीर चंद्राच्या मागून जात असताना त्यांना हा पूर्ण सूर्यग्रहणाचा देखावा सुमारे 54 मिनिटे पाहायला मिळाला-जो खूपच आश्चर्यकारक होता.

आर्टेमिस 2 चा चंद्रप्रवास
फोटो कॅप्शन, नासाने या फोटोला अर्थसेट असं नाव दिले आहे.

आर्टेमिस 2 चंद्राजवळ पोहोचण्यापूर्वीच अंतराळवीरांनी पृथ्वीचे अविश्वसनीय फोटो पाठवले होते. सुरुवातीला उंच कक्षेतून आणि नंतर त्याहूनही दूरवरून घेतलेले हे फोटो होते.

ही अशी दृश्यं होती जी 1972 मध्ये अपोलो मोहीम संपल्यानंतर तब्बल 50 वर्षांहून अधिक काळ कोणत्याही मानवाने पाहिली नव्हती.

आर्टेमिस 2 चा चंद्रप्रवास

ओरियन क्रू कॅप्सूलमधून पृथ्वीचं हे सुंदर दृश्य पाहताना अंतराळवीर उत्साहित झाले होते. त्यांच्या चेहऱ्यावरून आणि प्रतिक्रियांमधून त्यांचा हा आनंद आणि थरार स्पष्ट दिसत होता.

उत्तर आणि दक्षिण ध्रुवावर हिरव्या रंगात चमकणाऱ्या अरोरासह पृथ्वीचा हा फोटो सर्वाधिक शेअर केला गेलेल्या फोटोंपैकी एक होता.

अंतराळवीर क्रिस्टीना कोच यांचा पृथ्वीच्या दिशेने मागे वळून पाहतानाचा हा फोटोही मोठ्या प्रमाणात शेअर झाला.

आर्टेमिस 2 चा चंद्रप्रवास

ओरियनमधून अंतराळवीरांना पृथ्वी चंद्रकोरीसारखी दिसत होती आणि ते पुढे जात असताना ती हळूहळू लहान होत जाताना दिसत होती. त्यांनी सुमारे 2 लाख 50 हजार मैल (4 लाख किमी) इतका लांब प्रवास केला होता.

पृथ्वी ते चंद्रापर्यंतचा हा प्रवास करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागले होते.

प्रवासादरम्यान त्यांना स्वतःला व्यग्र ठेवण्यासाठी खूप कामे होती.

आर्टेमिस 2 चा चंद्रप्रवास

चंद्राभोवती फिरताना अंतराळवीरांनी वैज्ञानिक निरीक्षणांचा सराव केला. अंतराळवीरांनी सुरक्षिततेचे सराव, संशोधन, व्यायाम आणि प्रसारमाध्यमांशी संवादही साधला.

हे सगळं ते छोट्याशा ओरियन कॅप्सूलमधूनच करत होते.

दरम्यान, ओरियनच्या खिडकीतून पाहताना चंद्र हळूहळू मोठा होत होता.

आर्टेमिस 2 चा चंद्रप्रवास

आर्टेमिस 2 ही 10 दिवसांची मोहीम 1 एप्रिल रोजी सुरू झाली होती. त्या दिवशी नासाचे एसएलएस रॉकेट प्रचंड वेगाने आकाशात झेपावले आणि जवळपास अर्ध्या शतकानंतर पहिल्यांदाच मानवांना चंद्राकडे नेणारी मोहीम सुरू केली.

यशस्वी उड्डाणानंतर त्या शक्तिशाली रॉकेटने मागे धुराचे लोट सोडले. ते रॉकेट ताशी 10 हजार मैलांपेक्षा (16,100 किमी/ताशी) जास्त वेगाने आकाशात झेपावले.

आर्टेमिस 2 चा चंद्रप्रवास

रॉकेट पृथ्वीच्या वातावरणाच्या काठावर पोहोचताना त्याचे टि्वन बूस्टर वेगळे झाले. नंतर ते रॉकेट अंतराळात प्रवेश करून पुढे गेले.

ओरियन क्रू कॅप्सूलमधून आलेल्या लाईव्ह व्हीडिओ फीडमुळे आपल्याला अंतराळवीर काय पाहत आहेत याची पहिली झलक दिसली.

"खूप छान दृश्य आहे. आम्हाला सुंदर चंद्रोदय दिसतो आहे," असं स्पेसक्राफ्टचे कमांडर रीड वाइसमन म्हणाले.

आर्टेमिस 2 चा चंद्रप्रवास

खराब हवामानामुळे उड्डाण रद्द होण्याची शक्यता होती. परंतु, आर्टेमिस 2 सुरू होण्याआधीच ढगाळ वातावरण निवळून स्वच्छ झाले.

फ्लोरिडाच्या स्पेस कोस्टवर लोक मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यांनी हा कार्यक्रम पाहिला. त्यापैकी अनेक जण टायटसव्हिले येथे होते.

हे नासा केनेडी स्पेस सेंटरच्या लाँच कॉम्प्लेक्सपासून इंडियन रिव्हरच्या पलीकडे असलेले शहर आहे.

अंतराळवीरांना स्पेस लाँच सिस्टिम (एसएलएस) या नासाच्या सर्वात मोठ्या आणि सर्वात शक्तिशाली रॉकेटने अंतराळात नेले.

हे रॉकेट अमेरिकेच्या अंतराळ संस्थेने आतापर्यंत बनवलेले सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे.

आर्टेमिस 2 चा चंद्रप्रवास

रेबेका मोरले या बीबीसीच्या सायन्स एडिटर आहेत. त्या लाँचच्यावेळी तिथे उपस्थित होत्या. त्यांनी त्या क्षणाचं 'अत्यंत भव्य, नेत्रदीपक' असं वर्णन केलं आहे आणि ते दृश्य पाहून त्या भावूक झाल्या.

लाँचबद्दलची त्यांची प्रतिक्रिया तुम्ही खालील व्हीडिओमध्ये पाहू शकता.

या 4 अंतराळवीरांच्या टीममध्ये कॅनडाचे मिशन स्पेशालिस्ट जेरेमी हॅन्सन आणि 3 अमेरिकन अंतराळवीर- कमांडर रीड वाइसमन, पायलट व्हिक्टर ग्लोव्हर आणि मिशन स्पेशालिस्ट क्रिस्तीना कोच.

काही क्षण भावनिक होते. परंतु, केनेडी स्पेस सेंटर येथे मित्र आणि कुटुंबीयांनी त्यांना निरोप दिला, तेव्हा अंतराळवीर शांत आणि रिलॅक्स दिसत होते. त्यानंतर त्यांना लाँच साइटकडे नेण्यात आले.

आर्टेमिस 2 चा चंद्रप्रवास

आर्टेमिस 2 मधील हे अंतराळवीर 1972 मध्ये झालेल्या अपोलो 17 नंतर चंद्राभोवती फिरणारे पहिलेच लोक आहेत.

आर्टेमिस 2 ही 10 दिवसांची मोहीम फक्त एक प्रवास नाही, तर अंतराळ संशोधनासाठी खूप महत्त्वाचा टप्पा आणि निर्णायक क्षण मानला जातो.

अपोलो 16 मोहिमेदरम्यान 1972 मध्ये घेतलेला चंद्राचा फोटो.
फोटो कॅप्शन, अपोलो 16 मोहिमेदरम्यान 1972 मध्ये घेतलेला चंद्राचा फोटो.

नासाला आशा आहे की, या मोहिमेमुळे चंद्राबद्दल अधिक माहिती मिळेल आणि भविष्यात 1960 आणि 70 च्या अपोलो मोहिमेनंतर पहिल्यांदाच पुन्हा चंद्रावर मानवाला उतरवता येईल.

"सुमारे 54 वर्षांच्या छोट्याशा विश्रांतीनंतर नासा पुन्हा एकदा अंतराळवीरांना चंद्रावर पाठवण्याच्या क्षेत्रात परत आला आहे," असं नासाचे प्रशासक जेरेड इसाकमन लाँचनंतर म्हणाले.

फोटो क्रेडिट -

NASA handout/EPA/Shutterstock, Apu Gomes/AFP/Getty Images, Reuters/Sandy Huffaker, Brendan McDermid/Reuters, Jim Watson/AFP, Cristóbal Herrera/EPA/Shutterstock, Steve Nesius/Reuters, Nasa TV, Marco Bello/Reuters, Miguel J Rodriguez Carrillo/AFP, Chip Somodevilla/Getty Images, NASA/Central Press/Getty Images.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)