अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार; मुख्यमंत्री फडणवीस बिश्नोई गँगबद्दल काय म्हणाले?

फोटो स्रोत, UGC
अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबारप्रकरणी बिश्नोई गँगने जबाबदारी घेतल्याची चर्चा होत आहे. याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "अशा कोणत्याही गँगला घाबरण्याचं कारण नाही. हे घाबरट लोकांचं काम आहे. हे स्वतः कुठंतरी लपून बसतात आणि तिथून धमक्या देत असतात."
"असं असलं तरी ही प्रत्येक धमकी आम्ही गांभीर्याने घेतो आणि त्यावर कारवाई करतो. मुंबई पोलिसांनी हे दाखवून दिलंय की अशा गुन्हेगारांना जेरबंद केल्याशिवाय सोडत नाही," असं मत त्यांनी व्यक्त केलं.
मुंबई पोलीस लॉरेन्स बिश्नोईला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल का? या प्रश्नाचं उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, "पोलिसांनी याआधीच ताब्यात घेण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यावर कार्यवाही सुरू आहे. म्हणूनच मी म्हटलं की, यांचे आका कुठेही बसलेले असले तरी कारवाई करू."
'गाडीवरून 2 मुलं उतरली आणि...'; अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर प्रत्यक्षदर्शीने काय सांगितलं?
अभिनेता टायगर श्रॉफवरील हल्ल्याबाबत एका प्रत्यक्षदर्शीने प्रतिक्रिया दिली आहे. या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीचे नाव शाहरुख शेख असं आहे. त्यांनी सांगितले की, ड्रायव्हरला गोळी लागल्यानंतर स्वतः टायगरने गाडी चालवली.
शाहरुख शेख यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले, "गाडीवरून 2 मुले उतरली आणि त्यांनी गोळीबार केला. गोळीबारानंतर ते त्याच गाडीवर बसून नेहरू नगरच्या दिशेने पळून गेले. या हल्ल्यात एक गोळी टायगरच्या ड्रायव्हरला लागली, तर दुसरी गोळी गाडीच्या बाजूने चालत असलेल्या एका चाहत्याला लागली."
"ड्रायव्हर जखमी झाल्यानंतर टायगरने स्वतः गाडी चालवली. तो गाडीच्या आतून ड्रायव्हरच्या सीटवर आला," असं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
दरम्यान, या प्रकरणात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'जशास तसे' प्रत्युत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे बिश्नोई गँगबद्दल काय म्हणाले?
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टायगर श्रॉफच्या घरी जाऊन त्याच्या तब्येतीची चौकशी केली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, "टायगर श्रॉफ त्यांच्यावर झालेला गोळीबारात सुदैवाने देवाच्या कृपेने वाचले आहेत. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मी त्यांच्याशी आणि त्यांच्या कुटुंबाशी फोनवर चर्चा केली होती."

"आता प्रत्यक्ष त्यांच्या घरी भेटल्यानंतर त्यांची आई आणि कुटुंब दहशतीत आणि चिंतेत आहेत. कुणाशी वाद, भांडण, शत्रुत्व नसताना असा हल्ला होत आहे, अशी भावना टायगर श्रॉफ यांच्या आईने व्यक्त केली", असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
"आमच्या मुलाबाबत असं कसं घडलं असं म्हणत त्यांनी टायगर श्रॉफच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही चिंता व्यक्त केली. ते संपूर्ण कुटुंब घाबरलेल्या अवस्थेत आहे. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे ते दहशतीत आहेत. मी त्यांना धीर दिलेला आहे. सरकार आणि मुंबई पोलीस तुमच्या पाठीशी आहे. चिंता करण्याचं कारण नाही," असं त्यांनी नमूद केलं.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, "मुंबई पोलिसांनी टीम तयार केली आहे. तसेच गुन्हेगारांना तात्काळ पकडण्यात येईल. त्यांच्यावर ठोस, कठोर आणि जसासतशी कारवाई केली जाईल, असं आश्वासन मी दिलं आहे."
"टायगर श्रॉफसह सगळ्याच फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत. त्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली आहे आणि लवकरच गुन्हेगारांना अटक करू असं म्हटलं," अशी माहिती त्यांनी दिली.
बिश्नोई गँगवर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
बिश्नोई गँगने जबाबदारी घेतल्याचा मुद्दा उपस्थित करत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, "मुंबईत बिश्नोई असो किंवा इतर कोणत्याही गँगची दादागिरी, दहशतवाद, सेलिब्रेटींना धमकावण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. मुंबईत आणि महाराष्ट्रात सेलिब्रेटी असो किंवा सामान्य नागरिक असो त्याच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची आणि सरकारची आहे. कुठल्याही परिस्थितीत या गँग्जचा खात्मा झाला पाहिजे. त्यासाठी सरकार आणि पोलीस सक्षम आहेत."
"90 च्या दशकात अशाच प्रकारचं गँगवॉर फोफावलं होतं. कुणीही कुणाला धमकावत होतं. गोळीबार करत होतं. तेव्हा अशा अनेक घटना आपण पाहिल्या. त्यानंतर पोलिसांनी जेव्हा जशासतसं उत्तर द्यायला सुरुवात केली. गोळीला गोळीनं उत्तर दिलं तेव्हा हे सगळे गँगवॉर संपले. पोलिसांनी ते संपवले. कायदा सुव्यवस्था आबाधित राखली. काही लोक कोर्टात गेले, गायब झाले, पण दादागिरी-गँगवॉर संपलं. आता जे कुणी त्याची पुनरावृत्ती करू इच्छित आहेत त्यांचेही हाल हेच होणार आहेत. त्यांना सोडणार नाही," असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
आतापर्यंत काय माहिती समोर आली?
दरम्यान, रविवारी (18 ऑक्टोबर) टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार झाल्याची घटना घडली. मुंबईतील विलेपार्ले पश्चिमेकडील जुहू पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आल्याचा व्हीडिओ समोर आला.
मुंबईच्या पश्चिम परिमंडळ-2 चे पोलीस उप-आयुक्त (DCP) मोहित गर्द यांनी टायगर श्रॉफ याच्या गाडीवरील गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिला आहे.
डीसीपी मोहित गर्ग यांच्या माहितीनुसार, "टायगर श्रॉफ सुरक्षित आहेत. त्यांना गोळी लागलेली नाही किंवा कोणतीही दुखापत झालेली नाही."
गोळीबाराच्या या घटनेचा पुढील तपास सुरू असल्याची माहितीही मोहित गर्ग यांनी दिली.
ते म्हणाले की, "सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ते एका खासगी कामासाठी आले होते. काम झाल्यावर निघताना ही घटना घडली आहे."

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, "अभिनेता टायगर श्रॉफ संबंधित गोळीबाराच्या घटनेच्या ठिकाणी फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले आहेत. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ सुरक्षित असून त्याला गोळी लागलेली नाही."
मुंबई पोलिसांनी या घटनेचा तपास करण्यासाठी एकूण 15 पथके तयार केली आहेत. या गोळीबारात दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत, ज्यामध्ये टायगर श्रॉफचा चालक फिरदोश याचाही समावेश आहे. त्याच्या डाव्या हाताला गोळी लागली आहे. दुसऱ्या व्यक्तीचं नाव चौहान असं आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
'कुठं नेऊन ठेवली राज्याची कायदा व सुव्यवस्था?'
या घटनेबाबत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी 'एक्स'वर म्हटलंय की, "मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे! आधी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, त्यानंतर बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि आता अभिनेता टायगर श्रॉफवर गोळीबार झाल्याची बातमी!"
"मुंबईसारख्या देशाच्या आर्थिक राजधानीत एकापाठोपाठ एक अशा घटना घडत असतील, तर मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? टायगर श्रॉफवरील गोळीबारात आणखी एका व्यक्तीला दुखापत झाल्याचे वृत्त आहे. गोळीबारामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरला आहे की नाही? मुंबईकरांच्या सुरक्षिततेबाबत सरकार आणि गृह विभागाने उत्तर द्यावे!"

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते रोहित पवार यांनी आपल्या फेसबुकवर म्हटलंय की, "शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदिप पुर्णेकर यांचा ठाण्यात गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याचं वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. सुदैवाने टायगर श्रॉफ हे सुखरुप आहेत."
"पण राज्यात नेते आणि अभिनेतेच जर सुरक्षित नसतील सामान्य माणसाच्या सुरक्षेचं काय, असा प्रश्न यामुळं निर्माण होतो. कुठं नेऊन ठेवली राज्याची कायदा व सुव्यवस्था? असं म्हणण्याची वेळ आता आलीय. राज्याच्या आर्थिक राजधानीत गुंडांचा भररस्त्यात असा हैदोस सुरू असेल तर कोणता उद्योजक राज्यात गुंवतवूक करणार? सरकारने आधी राज्य नीट चालवावं आणि जमत नसेल तर एखाद्या सक्षम मंत्र्याकडं गृहखातं सोपवावं."

फोटो स्रोत, Getty Images
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी 'एक्स'वर लिहिलंय की, "अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार झाल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. मुंबईत नेमकं चाललंय तरी काय?
"बाबा सिद्दीकी यांची हत्या, सलमान खानच्या घरावर गोळीबार, अनेक अभिनेते आणि निर्मात्यांना धमक्या… मुंबईत कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. कायदा-सुव्यवस्था नाही, तर जणू निर्व्यवस्थाच निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री पूर्णपणे अपयशी ठरले आहेत!"
सचिन सावंत पुढे म्हणाले की, "महाराष्ट्राचा बिहार झाला, असं म्हणण्याची वेळ आली होती; पण आता तर बिहार बरा, असं म्हणण्याची वेळ आली आहे. मुंबईला गुन्हेगारांच्या दहशतीत ढकलणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध!"
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























