गावात राहून आभाळावर नजर रोखणाऱ्या मुली; 'या' आहेत लडाखच्या अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर

डुलकरला चंद्रावरची विवरं पहायला, चंद्राचे फोटो काढायला फार आवडतं.
फोटो कॅप्शन, डुलकरला चंद्रावरची विवरं पहायला, चंद्राचे फोटो काढायला फार आवडतं.
    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

वेळ रात्रीचे 10...

गोठवणारी थंडी, भणाणता वारा...

गावकऱ्यांची, गावात आलेल्या पाहुण्यांची जेवणं झालेली आहेत. पण झोपायची तयारी करण्याऐवजी गावात एक वेगळीच लगबग आहे.

या लहानशा गावातल्या घरांच्या अंगणांमध्ये रोज रात्री एक खेळ रंगतो. चांदण्यांचा. आणि तो दाखवण्यासाठी टेलिक्सोप्स घेऊन सज्ज असतात इथले अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर.

हे लडाखमधलं 'हानले' गाव.

लेहपासून 253 किलोमीटरवर असणारं हानले गाव खगोल पर्यटन, आकाशदर्शनासाठी लोकप्रिय होतंय. ही जागा भारतातलं पहिलं डार्क स्काय रिझर्व्ह (Dark Sky Reserve) म्हणून घोषित करण्यात आलीय.

हानले गाव आणि तिथून दिसणारं भन्नाट आकाश पाहण्यासाठी आम्ही लेहवरून प्रवास करत तिथे पोहोचलो.

इथेच आमची ओळख झाली पालजेस आंगमो, त्स्रिंग डुलकर, त्स्रिंग यांगडोल आणि पद्मासोबत.

हानले आणि आजुबाजूच्या गावांत राहणाऱ्या लडाखी तरुणी. पदवीधर, हसऱ्या आणि थोड्याशा लाजऱ्याबुजऱ्या.

या चौघी 'अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर' आहेत.

हानले डार्क स्काय रिझर्व्ह

डार्क स्काय रिझर्व्ह म्हणजे अशी जागा जिथे अंधार राखून ठेवला जातोय. जसं वन्य प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी क्षेत्र राखून ठेवलं जातं, तसंच इथे खगोल अभ्यासासाठी अंधार जपण्यासाठी विशिष्ट परिसरातला अंधार कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय.

Hanley IAO
फोटो कॅप्शन, हानलेमध्ये असणारी इंडियन अ‍ॅस्ट्रोनॉमिक ऑब्झर्व्हेटरी
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हानले गाव चांगथांग वनक्षेत्रात येतं. हानलेच्या भोवतीचा 22 किलोमीटरचा परिसर म्हणजे सहा गावं या डार्क स्काय रिझर्व्हचा भाग आहेत. पण हे सगळं इथेच का केलं जातंय?

यामागचं कारण आहे हानलेचं भौगोलिक स्थान आणि त्यामुळे निर्माण होणारी वैशिष्ट्यं. हे गाव समुद्रसपाटीपासून 14 हजार 764 फुटांच्या उंचीवर आहे. मुळात लडाख हिमालयाच्या पर्वतरांगा आणि काराकोरम पर्वतरांगांच्या मधोमध वसलेलं आहे. भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास करणारा मान्सून हिमालयाच्या पर्वतरांगांमुळे अडतो, परिणामी लडाखमध्ये फार कमी पाऊस पडतो.

हानले आणि आजूबाजूचा परिसर 'शीत वाळवंट' (Cold Desert) आहे. परिणामी इथल्या हवेत बाष्प कमी आहे. वर्षातल्या जवळपास 260 रात्री इथलं आकाश निरभ्र असतं. या सगळ्यामुळे इथल्या आकाशात नुसत्या डोळ्यांनीही हजारो चांदण्या चमचमताना दिसतात. आकाश निरीक्षण, खगोल अभ्यासासाठी ही जागा जगातल्या सर्वोत्तम स्थळांपैकी एक आहे.

म्हणूनच इथे स्थापन करण्यात आली इंडियन अ‍ॅस्ट्रोनॉमिकल ऑब्झर्व्हेटरी आणि त्यात आहे हिमालयन चंद्रा टेलिस्कोप. बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्सद्वारे गेली 25 वर्षं लडाखच्या या दुर्गम भागामधून खगोल अभ्यासाचं महत्त्वाचं काम सुरू आहे.

Hanley Village
फोटो कॅप्शन, डोंगरांनी वेढलेलं हानले गाव. एकेकाळी तिबेटसाठीच्या व्यापाराचा मार्ग या गावातून जात असे. हानले गावात 17व्या शतकातली मॉनेस्ट्री आहे.

पण जसजशी लडाखमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढायला लागली, वाहनं वाढू लागली, तशी या वेधशाळेच्या कामावर परिणाम होण्याची भीती वाढू लागली.

रस्त्यांवरचे दिवे, गाड्यांचे दिवे, घर, हॉटेलांमधला प्रकाश वाढला तर निरीक्षणं तितक्या प्रभावीपणे करणं कठीण होणार होतं. म्हणून मग या परिसराला डार्क स्काय रिझर्व्ह घोषित करण्यात आलं.

एरवी गावा-शहरातून आपल्याला मोजकीच नक्षत्रं, ग्रह-तारे दिसतात. पण इथे हानलेमध्ये नुसत्या डोळ्यांनीही आकाशगंगेचा पट्टा ओळखू येतो. आकाशातून पडणाऱ्या उल्का ठसठशीत दिसतात आणि पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालणारे कृत्रिम उपग्रह नुसत्या डोळ्यांनीही इथून तिथे जाताना दिसतात.

हानलेचे 'अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर्स'

हानलेमध्ये वेधशाळा असली, तरी ती संशोधकांनाच वापरता येते. पण इथे आकाश निरीक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत होती. म्हणून मग अ‍ॅस्ट्रो-टूरिझमला चालना देण्यासाठी आणि अंधार जपण्याच्या उद्देश्यात स्थानिकांनाही सहभागी करून घेण्यासाठी एक उपक्रम सुरू करण्यात आला. तो म्हणजे, अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर्स.

Astro Ambassadors
फोटो कॅप्शन, पर्यटकांना आकाशदर्शन घडवणाऱ्या हानलेच्या अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर

लडाख प्रशासन आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅस्ट्रोफिजिक्स यांनी मिळून 2022 साली हानले आणि आसपासच्या गावांतल्या 24 तरूण-तरुणींना खगोलशास्त्राची तोंडओळख करून दिली. त्यांना 15 दिवसांचं प्रशिक्षण देण्यात आलं.

खगोल संकल्पना, आकाशातले ग्रह, तारे, नक्षत्रं ओळखणं याचे धडे देण्यात आले. सोबतच त्यांना टेलिस्कोप देण्यात आला आणि तो कसा वापरायचा हे देखील शिकवण्यात आलं. मोबाईलने आकाशगंगेचे फोटो काढायला शिकवलं गेलं.

आणि या प्रशिक्षणातून तयार झाले 24 अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर्स. यापैकी 18 मुली आहेत. पालजेस आंगमो, त्स्रिंग डुलकर, त्स्रिंग यांगडोल आणि पद्मा त्याच बॅचमधल्या.

Palzes Angmo, Tsering Dolkar, Tsering Yangdol, and Padma
फोटो कॅप्शन, पद्मा, यांगडोल,डुलकर आणि आंगमो. अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर्सच्या 24 जणांच्या बॅचमध्ये 18 मुली होत्या.

पँगाँगची आंगमो या गावात लग्न करून आली तर इतर तिघी याच परिसरात लहानाच्या मोठ्या झाल्या. "इथलं आकाश कायमच असं चमचमत आलंय. पण 2022 आधी आम्ही आकाश निरखून पाहिलंच नव्हतं. पण 2022 पासून आमचा यातला रस वाढला. आता तर रोजच आम्ही आकाश न्याहाळतो." डुलकर सांगू लागते.

"ट्रेनिंगनंतर टेलिस्कोप हाती आला आणि बिचकतच तो वापरायला सुरुवात केली. काही चुकलं तर, मोडलं तर याची भीती वाटायची. मग हळुहळू शिकलो. आता सवय झाली. सेटअप व्यवस्थित करता येतो. थोड्याफार गोष्टी समजल्या. पण टेलिस्कोप दुरुस्त करायचा असेल तर वेधशाळेत घेऊन जातो," चौघी मिळून एकमेकींची वाक्य पूर्ण करत सांगतात.

हानलेमधलं आकाश निरीक्षण

हानलेमध्ये येणाऱ्या पर्यटकांना लोकांना हे सगळे अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर्स आकाश दाखवतात. त्यांच्या टेलिस्कोपमधून अंतराळातल्या या अद्भुत नजाऱ्याचं दर्शन घडवतात.

Milkyway
फोटो कॅप्शन, हानलेच्या आकाशात नुसत्या डोळ्यांनाही आकाशगंगा दिसते.

रात्री 9 वाजल्यापासूनच गावात लगबग सुरू होते. त्या रात्रीचं आकाश कसं आहे त्यानुसार टेलिस्कोप सेटअप केले जातात. होम-स्टेजमध्ये थांबलेले पाहुणे गरम कपडे, जॅकेट, कानटोपी असे गुरफटून घराबाहेर पडतात आणि लखलखतं आकाश पाहून थक्क होतात. टेलिस्कोप्सच्या भोवती गराडा पडतो. बुध, शुक्र, शनि, चंद्रावरची विवरं भुरळ पाडतात.

दररोज रात्री 11 वाजता सगळ्या गावांमध्ये दिवे बंद केले जातात आणि गुडुप्प अंधार होतो. इतकावेळ चमचमणारं आकाश अधिक लखलखायला लागतं.

अंधारामध्ये स्वतःचा आकाशगंगेच्या पुढ्यातला फोटो काढण्यासाठी धडपड सुरू होते. मग या अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर्स पुढे सरसावतात आणि लोकांना मोबाईलची सेटिंग्स काय ठेवायची ते सांगतात.

Hanle night skygazing
फोटो कॅप्शन, गारठवणारी थंडी आणि थक्क करणारं आकाश, हानलेमधलं आकाशनिरीक्षण

"टेलिस्कोपमधून पाहून झाल्यानंतर आकाशगंगेसोबत फोटो काढला की लोकांना खूप आनंद होतो. एकाचा फोटो काढला की फोटो काढून घ्यायला रांग लागते. आम्ही ही त्यांना मोबाईलमध्ये काय सेटिंग्स करायची ते सांगतो. आम्ही स्वतःही आकाशगंगेसोबतचे फोटोज काढतो, चंद्राचे फोटो काढतो. स्टेटसला ठेवतो, एकमेकींना पाठवतो," पद्मा हळूच सांगते.

टेलिस्कोपमुळे बदललेलं आयुष्य

हानले गाव लहानसं आहे. डोंगरांनी वेढलेलं. गावापासून पुढे एका डोंगरावर हानले मॉनेस्ट्री आहे. लडाखमधल्या अनेक गावांजवळ असतो, तसा इथेही लष्करी तळ आहे.

रात्री 11 वाजता गावांतला वीज पुरवठा खंडित होतो. तो सकाळी पुन्हा सुरू होतो. हानलेमध्ये असणाऱ्या वेधशाळेमधला हिमालयन चंद्रा टेलिस्कोप वापरत निरीक्षणं नोंदवण्यासाठी हा अंधार गरजेचा आहे. पण त्यामुळे गावामध्ये रात्रीच्या थंडीचा मुकाबला करण्यासाठी रूममध्ये हीटरचा पर्याय नाही.

इथल्या इंडियन अ‍ॅस्ट्रोनॉमिकल ऑब्झर्व्हेटरीला 25 वर्षं पूर्ण झालीयत. पण पर्यटनाला चालना मिळाली कोव्हिडनंतर. हानलेमधून दिसणाऱ्या आकाशगंगेचे व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि इथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली. शिवाय उमलिंग-ला या समुद्रसपाटीपासूनचा सर्वाधिक उंचीवरच्या खिंडीतून जाण्याचा मार्गही हानलेवरूनच जातो. म्हणून इथे येणाऱ्या बाईकर्सची संख्याही वाढलीय.

Astro Ambassadors training
फोटो कॅप्शन, अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडर्सना खगोल संकल्पना, आकाशातले ग्रह - तारे - नक्षत्रं ओळखणं याचे धडे देण्यात आले. सोबतच त्यांना टेलिस्कोप देण्यात आला आणि तो कसा वापरायचा हे देखील शिकवण्यात आलं.

सोनम जोरफेल या वेधशाळेमध्ये सीनियर इंजिनियर म्हणून काम करतात. ते इथल्या आऊटरीच प्रोग्रॅमचे प्रमुखही आहेत. ते सांगतात, "विज्ञानासाठी आणि लोकांसाठीही गडद आकाशाचं महत्त्वं किती मोठं आहे हे समजवून देण्याचं काम हे अ‍ॅम्बॅसेडर करतात. पर्यटक येण्याची संख्या प्रचंड वाढलीय. आकाश निरीक्षणासाठी त्यांना मार्गदर्शक करणारे, लाईट मॅनेजमेंटविषयी त्यांना समजवणारे, थेट सांगणारे हे लोक आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत इथली ऑब्झर्व्हेटरी आणि डार्क स्काय यांच्याविषयी सोशल मीडियात हाईप झाली. लोकांना माहिती मिळाल्याने इथे येणाऱ्यांची संख्या अचानक भरपूर वाढली."

अ‍ॅस्ट्रो टूरिझम म्हणजे खगोल पर्यटनाला प्रोत्साहन देणारा इथला उपक्रम चांगलाच रुजतोय. इथे अजून रेस्टॉरंट नाही वा एखाद-दुसरा अपवाद वगळता राहण्यासाठीची हॉटेल्स नाहीत. पण होम-स्टेची संख्या झपाट्याने वाढतेय. इथे येणाऱ्यांची संख्या वाढल्याने रस्ते तयार होतायत.

Hanley homestays
फोटो कॅप्शन, हानले आणि आसपासच्या गावांतल्या स्थानिकांनी आता घराला लागूनच खोल्या बांधत होम-स्टे सुरू केले आहेत.

हानले आणि आजूबाजूच्या सगळ्या गावांमध्ये बांधकामं सुरू आहेत. अनेकांनी आपल्या घरांच्या शेजारीच खोल्या बांधत होम-स्टे उभारायला सुरुवात केलीय. आंगमो, डुलकर, यांगडो आणि पद्मा यांची कुटुंबंही होम-स्टे चालवतात. देश-विदेशातले पर्यटक त्यांच्याकडे येऊन राहतात.

"पाहुण्यांची काळजी घेणं, त्यांचं जेवण, रूम्सची साफसफाई, घरातली कामं यात दिवस जातो. मग रात्री 9 वाजल्यापासून आम्ही आकाशदर्शनाची तयारी करायला लागतो. टेलिस्कोप सेटअप करतो," पद्मा म्हणते.

दिवसा स्वयंपाकघरात जेवण रांधणारे हात रात्री सराईतपणे टेलिस्कोप सेटअप करतात, हातातला बीम रोखत पर्यटकांना नक्षत्रं दाखवतात.

या चौघीही पदवीधर आहेत. टेलिस्कोप हाती आला आणि एक नवं करियर त्यांना सापडलं. आकाशदर्शनासाठी त्या पाहुण्यांकडून त्यांना मानधन मिळतं. सोबत होम-स्टेमुळे कुटुंबासाठीदेखील उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झालाय.

"हे काम करण्याआधी आमच्यात अजिबातच कॉन्फिडन्स नव्हता. पण आता थोडातरी वाढलाय. वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेली लोकं भेटतात. स्थानिकही येतात. शाळांमधली मुलं येतात. त्यांना आम्ही मोफत दाखवतो - त्यांच्याकडून फी घेत नाही. टेलिस्कोपमधून काही दाखवलं की मोठ्ठा wowww येतो," चौघीजणी सांगतात.

Polestar timelapse
फोटो कॅप्शन, ध्रुव ताऱ्याभोवती फिरणारं खगोलमंडळ. टाईमलॅप्स व्हीडिओमधला फोटो.

आता आईबाबांकडून पैसे घेत नसल्याचंही त्या अभिमानाने सांगतात. "आधी काहीही हवं असेल, तर घरच्यांकडून पैसे घ्यायला लागायचे. पण आता आम्ही आमचे पैसे साठवून हवं ते घेतो."

कमाईचे पैसे साठवून या मुलींनी चांगले मोबाईल फोन्स घेतले. अगदी एकीने आयफोनही घेतलाय.

या चौघी मिळून एकत्र काम करतात. घराच्या अंगणातून आपल्याला असं काही करायला मिळतंय, याचा आनंद त्यांना आहे. हानले गावातून सगळ्यात सुंदर आकाश दिसतं, त्यामुळे इतर कुठेच जाणार नाही असंही त्या खुदखुदत सांगतात. पण त्यांच्या घरच्यांचं काय?

"टेलिस्कोपमधून आम्ही घरच्यांनाही आकाश दाखवतो. त्यांनाही आता पहायला आवडतं. उलट आम्ही रोज पाहुण्यांना आकाश दाखवावं असा त्यांचा आग्रह असतो. एक दिवस सुटी घेतली, तरी आम्हाला आज टेलिस्कोप का लावला नाही विचारतात," यांगडोल म्हणते.

हानलेमध्ये असताना एका रात्री आम्ही पद्माच्या घरी गेलो. होम-स्टेच्या सगळ्या खोल्या फुल्ल होत्या. रात्रीच्या जेवणासाठी पद्मा एकीकडे रोट्या करत असताना आम्ही चहा घेत तिच्या आई-बाबांशी गप्पा मारल्या. लडाखी आणि मोडकं-तोडकं हिंदी वापरत झालेल्या या गप्पांसाठी आमचा लडाखी साथी नामका आमचा दुभाष्या झाला.

Sharad Badhe, Amruta Durve
फोटो कॅप्शन, शरद बढे आणि अमृता दुर्वे

लेक स्वावलंबी, कमावती असल्याचं या लडाखी जोडप्याला समाधान आहे.

"आमच्या बुढा-बुढीच्या काळात आकाश अजून चांगलं स्पष्ट दिसायचं. चांगला मोसम असेल तर आम्ही बाहेर मोकळ्यावरच झोपायचो. आकाशातल्या ताऱ्यांची लडाखी नावं आम्हाला माहिती आहेत. आता या मुली इंग्लिशमधली काय नावं सांगतात, ते कळत नाही. हल्ली अनेकदा मोसमही चांगला नसतो. मग पर्यटक हिरमुसून परततात, त्याचं वाईट वाटतं."

पण आपली लेक जगावेगळं काम करतेय हे त्यांना माहित्येय का?

"याबद्दल आम्हाला फारशी माहिती नाही. पण मुलींनी कोणतं ना कोणतं काम करायलाच हवं..." पद्माचे बाबा सांगतात. पण हे काम रात्रीच होतं, ते ही अंधारात. काळजी नाही वाटत.

"नाही... ती गावातच असते..आणि इथे काही जंगली प्राणीही येत नाही. मग कसली भीती?" ते म्हणतात.

इतर गावा-शहरातल्या लेकींच्या आई-बापांना असणारी भीती अजून इथल्या मनांमध्ये शिरलेली नाही. आणि खरं सांगायचं, तर हानलेमध्ये रात्री उशीरा फिरताना आमच्याही मनात ती कधी डोकावली नाही.

पुढचं पाऊल

या अ‍ॅस्ट्रो अ‍ॅम्बॅसेडरना आता अवकाशाची तोंडओळख चांगली झालीय. वेगवेगळी अ‍ॅप्स वापरून त्या आकाशातल्या ग्रह-ताऱ्यांची, त्यांच्या स्थितीची माहिती घेत असतात. पण आपण आता यापुढे जायला हवं, याची जाणीव त्यांनाही आहे.

तज्ज्ञांकडून अजून चांगलं ट्रेनिंग मिळालं तर आणखी चांगलं काम करता येईल, असं त्या म्हणतात. शिवाय अजून चांगला टेलिस्कोप, चांगला आय-पीस असेल तर येणाऱ्या पाहुण्यांनाही चांगली माहिती देता येईल असं त्यांचं म्हणणं आहे.

चार वर्षांपूर्वी या कामाला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्यासाठी सगळंच नवं होतं. पण आता मात्र यापुढे आपल्याला हेच काम करायचंय असं चौघीही आवर्जून सांगतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)