टायगर श्रॉफ ते राकेश रोशन: बॉलिवूडमधील 'या' कलाकारांवर करण्यात आला होता हल्ला

फोटो स्रोत, Getty Images
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर काही अज्ञातांनी गोळीबार केला. रविवारी (18 ऑक्टोबर) संध्याकाळी ही घटना घडली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोळीबारामध्ये दोन जण जखमी झाले. टायगर श्रॉफचा ड्रायव्हर फिरदौसही या हल्ल्यात जखमी झाला. त्यांच्या डाव्या हाताला गोळी लागली.
पोलिस उपायुक्त मोहित गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर श्रॉफ सुरक्षित आहे. त्याला गोळी लागली नाही, तो जखमी झाला नाही.
या घटनेनंतर विरोधकांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ने सरकारवर टीका करताना म्हटलं की, मुख्यमंत्री नागरिकांना सुरक्षा पुरविण्यात अपयशी ठरले आहेत.
एआयएमआयएमचे नेते वारिस पठाण यांनीही हे 'कायदा आणि सुव्यव्यस्थेचं अपयश' असल्याची टीका केली.
गेल्या काही वर्षांत हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर पुन्हा एकदा सिने कलाकारांच्या सुरक्षेबद्दल चिंता निर्माण झाली.
गेल्या काही वर्षांत सलमान खान, सैफ अली खान ते इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांवर हल्ले झाले किंवा ते हल्लेखोरांच्या निशाण्यावर होते.
रोहित शेट्टी
दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू इथल्या घरावर फेब्रुवारी 2026 ला गोळीबार करण्यात आला होता.
हा हल्ला शुभम लोणकर टोळीने केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. या हल्ल्याचा उद्देश खंडणी वसूल करून दहशत निर्माण करणं असल्याचंही पोलिसांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
तपासानंतर या प्रकरणात काही संशयितांना अटक करण्यात आली.
या प्रकरणी प्रदीप कुमार उर्फ गाथ याला ऑक्टोबर 2026 मध्ये आग्र्यातून अटक करण्यात आली. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स आणि मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने ही कारवाई केली.
दिशा पाटनी
सप्टेंबर 2025 मध्ये उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये अभिनेत्री दिशा पाटनीचे वडील जगदीश पाटनी यांच्या घराबाहेर अज्ञातांनी गोळीबार केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
या हल्ल्याची जबाबदारी गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा यांच्या टोळीने घेतली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी आपण हा हल्ला केल्याचं म्हटलं होतं.
दिशाची बहीण खुशबू पाटनी हिने अध्यात्मिक गुरुंबद्दल केलेल्या कथित वक्तव्यानंतर इशारा म्हणून हा गोळीबार केल्याचं या टोळीने म्हटलं होतं. या घटनेतील हल्लेखोर गाझियाबादमध्ये पोलिसांसोबतच्या चकमकीत मारले गेले.
सलमान खान
एप्रिल 2024 मध्ये अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील घराबाहेर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. या प्रकरणी पोलिसांनी जे आरोपपत्र दाखल केलं, त्यामध्ये अनेक वेळा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या नावाचा उल्लेख आहे.

फोटो स्रोत, Getty Images
जवळपास वीस वर्षांपूर्वी एका सिनेमाच्या शूटिंगदरम्यान दोन काळ्या हरिणांच्या (चिंकारा) शिकारीचा आरोप सलमान खानवर होता. बिश्नोई समुदाय चिंकारा जातीच्या हरिणांना पवित्र मानतात. त्यानुळे बिश्नोई समजाची सलमानवर नाराजी होती.
राकेश रोशन
21 जानेवारी 2000 साली चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यांना हात आणि छातीत गोळ्या लागल्या. सुदैवाने या हल्ल्यातून ते बचावले.
'कहो ना प्यार है' या सिनेमाच्या यशानंतर ही घटना घडली होती. खंडणीचे पैसे न दिल्यामुळे राकेश रोशन यांना लक्ष्य करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
करण थापर यांच्यासोबत बीबीसीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये ऋतिकने तो सगळा घटनाक्रम सांगितला होता. आपल्या पहिल्या सिनेमाची चर्चा सुरू असतानाच गोळीबाराच्या घटनेबद्दल कळल्याचं हृतिकने सांगितलं.
हृतिकने सांगितलं, "त्यांच्या छाती आणि हाताला गोळी लागली होती. त्यांनी तातडीने मला फोन केला होता. मी ठीक आहे की नाही, याची चिंता त्यांना होती."
कुटुंबातील इतर सदस्यांनाही धोका निर्माण होईल, अशी चिंता आपल्या वडिलांना असल्याचं ऋतिकने मुलाखतीत म्हटलं होतं.
राजीव राय
'गुप्त'सारख्या यशस्वी सिनेमाचे दिग्दर्शक राजीव राय यांच्यावरही 1997 साली हल्ला झाला होता. अबू सालेम टोळीशी कथितरीत्या संबंधित असलेल्या पाच हल्लेखोरांनी मध्य मुंबईत राजीव राय यांच्यावर हल्ला केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
राय आपल्या ऑफिसमधून निघाले असताना त्यांच्यावर गोळ्या चालविण्यात आल्या. राय यांना आधीही धमक्या मिळाल्या होत्या.
त्यामुळे त्यांना सुरक्षाव्यवस्था, अंगरक्षक पुरविण्यात आले होते. या अंगरक्षकांनीच हल्लेखोरांना रोखलं. चकमकीदरम्यान एक हल्लेखोर जखमी झाल्याचंही सांगण्यात येतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























