मुलांमधील कॅन्सरची लक्षणं ओळखणं कठीण का असतं? 'ही' लक्षणं दुर्लक्षित करू नयेत

गेल्या वर्षी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी अमेलिया कॅरोलमध्ये कॅन्सरचे निदान झाले.
फोटो कॅप्शन, गेल्या वर्षी वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी अमेलिया कॅरोलमध्ये कॅन्सरचे निदान झाले.
    • Author, कॅमिला हॉरॉक्स
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

मुलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण दुर्मीळ असले तरी यूकेमध्ये 15 वर्षांखालील मुलांच्या आजारपणामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये हे प्रमुख कारण आहे. मात्र, या आजाराची लक्षणे ओळखू शकू असा आत्मविश्वास फक्त 30% पेक्षा कमी पालकांमध्ये दिसून येतो.

'कॅन्सर रिसर्च यूके'च्या माहितीनुसार, दरवर्षी 0 ते 14 या वयोगटातील जवळपास 1,900 मुलांमध्ये कॅन्सरचे निदान होते.

13 वर्षांची अमेलिया कॅरोल जिचा कॅन्सर आता पूर्णपणे नियंत्रणात आहे पण गेल्या वर्षी तिला 'ॲक्यूट मायलॉइड ल्युकेमिया' (AML) हा रक्ताचा कॅन्सर झाल्याचे समोर आले होते.

तिची आई जेम्मा आठवण सांगताना म्हणते की, सुरुवातीची लक्षणे नजरेतून सुटणे खूप सोपे होते.

ती सांगते, अमेलियाला सतत थकवा जाणवायचा आणि थोडा जरी व्यायाम केला तरी तिचा श्वास फुलायचा. पण तिला स्टॅमिना कमी असणे आणि शाळेतून आल्यावर येणारा नेहमीचा थकवा समजून दुर्लक्षित केले गेले.

अमेलियाच्या शरीरावर जेव्हा अचानक जखमांचे निळे-काळे व्रण दिसू लागले तेव्हाच काहीतरी गंभीर असल्याचे जेम्माच्या लक्षात आले. त्यानंतर अवघ्या 10 दिवसांत तिला ल्युकेमिया असल्याचे स्पष्ट झाले.

पालकांनी नेमकी कोणती लक्षणे तपासली पाहिजेत?

मुलांच्या कॅन्सरचे तज्ज्ञ प्रोफेसर बॉब फिलिप्स यांच्या मते, पालकांनी लक्षणांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे आहे. जी लक्षणे अनेक दिवस राहतात, सतत वाढत जातात किंवा दिवसेंदिवस अधिक तीव्र होतात.

खालील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांना नक्की संपर्क साधावा:

  • खूप जास्त थकवा जाणवणे
  • चेहरा किंवा शरीर खूप फिकट / पांढरे पडणे
  • कोणतीही दुखापत नसताना शरीरावर अचानक व्रण किंवा काळे-निळे डाग उठणे
  • गाठी किंवा सूज जी कमी होत नाही त्याउलट दिवसेंदिवस वाढत चालली आहे
  • मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांमध्ये कॅन्सरची वाढ खूप वेगाने होते. याचे मुख्य कारण म्हणजे त्यांची सतत होणारी शारीरिक वाढ.

'CCLG: द चिल्ड्रन्स अँड यंग पीपल्स कॅन्सर असोसिएशन'चे प्रोफेसर फिलिप्स आणि इतर तज्ज्ञ लोकांना एका देशव्यापी जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करत आहेत. कॅन्सरबद्दलची जागरूकता वाढवणे आणि या आजाराचे निदान लवकरात लवकर व्हावे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे.

यामध्ये आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी 'तीनचा नियम' (Rule-of-three) देण्यात आला आहे: जर मुलामध्ये 3 लक्षणे सतत दिसत असतील किंवा त्याला 3 वेळा डॉक्टरांकडे नेले असेल किंवा 3 आठवड्यांपासून अशी लक्षणे दिसत असतील ज्यांचे कारण समजत नाही तर त्याला पुढील तपासणीसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे पाठवले पाहिजे.

अर्थात, 1970 च्या दशकानंतर या आजारावर मात करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. आता कॅन्सरचे निदान झाल्यानंतर 10 पैकी 8 मुले 5 ते 10 वर्षे किंवा त्याहून जास्त काळ उत्तम आयुष्य जगतात.

तिच्या पायांवर लालसर, सुजलेले वळ उठल्याचे पाहून तिची आई विशेष चिंतेत पडली.
फोटो कॅप्शन, तिच्या पायांवर लालसर, सुजलेले वळ उठल्याचे पाहून तिची आई विशेष चिंतेत पडली.
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

जेम्माच्या सांगण्यानुसार, अमेलियाच्या कॅन्सरची सुरुवात अचानक अंगावर आलेल्या एका लालसर व्रणाने झाली.

अवघ्या 3 दिवसांनंतर तिच्या दोन्ही पायांच्या पुढच्या भागावर व्रण उठले. ते दुखत होते आणि त्या जागी सूज येऊन ते फुगल्यासारखे झाले होते.

"आम्ही नेहमीप्रमाणे डोळे दाखवायला गेलो होतो तेव्हा डॉक्टरांना तिच्या डोळ्यांतील बारीक रक्तवाहिन्या फुटल्याचे दिसले. पण हे नेमके कशामुळे झाले याचा त्यांना अंदाज येत नव्हता," असं जेम्माने सांगितलं.

पुढच्या 10 दिवसांतच अमेलियाला नक्की कोणत्या प्रकारचा ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर झाला आहे हे स्पष्ट झाले आणि ताबडतोब उपचार सुरू करण्यासाठी तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले.

पायांवर सुजलेले लाल व्रण दिसल्यानंतर मात्र तिच्या आईची चिंता खूप वाढली.

"तिचा आजार नक्की काय आहे हे समजले त्या दिवशी मी तिला जवळ घेतले. तेव्हा तिने मला विचारले, 'आई, मला कॅन्सर झालाय का?' मी 'हो' म्हणाले. त्यावर तिने मला पुढचा प्रश्न विचारला की, 'मी आता मरणार आहे का?'"

अमेलियाचा कॅन्सर सध्या नियंत्रणात आहे. दर 3 महिन्यांनी तिच्या बोन मॅरो आणि रक्ताच्या टेस्ट केल्या जातात आणि आता तिने पुन्हा शाळेत जाणे सुरू केले आहे.

प्रोफेसर फिलिप्स यांच्या मते, यूकेमध्ये बाल कॅन्सरवर मात करण्याचे प्रमाण 80% पेक्षा जास्त आहे. पण आजाराचे निदान जितके लवकर होईल तितके जास्त त्रासदायक किंवा अतिशय तीव्र उपचार देण्याची गरज कमी भासेल.

जनजागृती निर्माण करणे हाच त्याचा वारसा

त्यांच्या मते, यूकेमध्ये कॅन्सरचे निदान झालेल्या जवळपास 50% मुलांचा आजार अवघ्या 2 आठवड्यांत समोर येतो.

"हे बरेच जलद आहे. पण उरलेल्या अर्ध्या मुलांना पहिल्यांदा लक्षणे दिसल्यापासून निदानासाठी 16, 18, 20 किंवा अगदी 25 आठवडे वाट पाहावी लागू नये, अशी आमची इच्छा आहे."

'कॅन्सर रिसर्च यूके'च्या आकडेवारीनुसार, यूकेमध्ये दरवर्षी 4 लाखाहून अधिक कॅन्सरचे नवे रुग्ण समोर येतात. मात्र 'ब्रिटिश मेडिकल जर्नल' (BMJ) नुसार, 'एनएचएस'च्या 28 दिवसांच्या मुदतीत केवळ 54% रुग्णांनाच निदानाची माहिती दिली जाते.

याव्यतिरिक्त, दरवर्षी 15 ते 24 वर्षे वयोगटातील आणखी 2,300 किशोरवयीन आणि तरुणांमध्ये कॅन्सर झाल्याचे समोर येते.

वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी जेक स्विन्सकोचा 'सॉफ्ट टिश्यू कॅन्सर'ने मृत्यू झाला.
फोटो कॅप्शन, वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी जेक स्विन्सकोचा 'सॉफ्ट टिश्यू कॅन्सर'ने मृत्यू झाला.

लिन्से स्विन्सको यांचा 13 वर्षांचा मुलगा जेक याने सॉफ्ट टिश्यू कॅन्सरमुळे जीव गमावला. जुलै 2023 मध्ये जेकला तिसऱ्या टप्प्यातील 'फ्युजन पॉझिटिव्ह अल्व्हिओलर रॅब्डोमायोसारकोमा' हा दुर्मिळ कॅन्सर असल्याचे समोर आले होते.

आजाराचे निदान होण्याआधी जेकचे नाक चोंदणे आणि डोळ्यांतून पाणी येणे या त्रासाकडे 'हे-फिव्हर' म्हणजे साधी ॲलर्जी समजून दुर्लक्ष केले गेले. तसेच शाळेतून आल्यावर त्याला सतत झोप यायची. परीक्षा आणि शाळा संपताना येणारा नेहमीचा थकवा असेल असे घरच्यांना वाटले होते.

लिन्से सांगतात, "जेव्हा त्याच्या नाकाच्या शेंड्यावर आणि वरच्या भागावर सूज दिसू लागली तेव्हा मात्र आम्ही त्याला लगेच डॉक्टरांकडे नेण्याचे ठरवले.

पण त्या क्षणी सतत येणारा थकवा आणि ॲलर्जीच्या त्रासाचा याच्याशी काही संबंध असू शकतो, अशी पुसटशी शंकाही आम्हाला आली नव्हती."

तपासणीनंतर जेकच्या नाकात आणि नाकाच्या आतल्या भागात एक गाठ असल्याचे स्पष्ट झाले. आणि त्याला 'सॉफ्ट टिश्यू सार्कोमा' चे निदान झाले. यानंतर त्याने केमोथेरपीचे 9 राऊंड्स आणि प्रोटॉन बीम रेडिएशनचे उपचार पूर्ण केले.

केमोथेरपीनंतर जेकला झटके येऊ लागले आणि त्याचा त्रास खूप वाढला. त्यामुळे त्याने पुढचे उपचार थांबवण्याचा निर्णय घेतला.
फोटो कॅप्शन, केमोथेरपीनंतर जेकला झटके येऊ लागले आणि त्याचा त्रास खूप वाढला. त्यामुळे त्याने पुढचे उपचार थांबवण्याचा निर्णय घेतला.

जेकने केमोथेरपीचे 9 राऊंड्स आणि प्रोटॉन बीम रेडिएशन पूर्ण केले होते.

26 एप्रिल 2024 रोजी, वयाची 14 वर्षे पूर्ण होण्याच्या अवघ्या 2 आठवड्यांआधी घरीच त्याने अखेरचा श्वास घेतला.

"जेकबद्दल सांगायचे तर, त्याला मरण्याची अजिबात भीती नव्हती. मृत्यू कसा असेल आणि मरण येताना काय वाटत असेल, यावर आम्ही खूप बोललो होतो. त्याला फक्त एकाच गोष्टीची चिंता सतावत होती, ती म्हणजे, 'मी गेल्यानंतर सगळे मला आठवणीत ठेवतील का? लोक मला विसरून तर जाणार नाहीत ना?'"

"आणि म्हणूनच मी हा लढा देत आहे. जेक कोण होता आणि तो किती अप्रतिम मुलगा होता हे सर्वांना कळावे यासाठी. या माध्यमातून लोकांमध्ये कॅन्सरबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि मला वाटते की हाच त्याचा खरा वारसा ठरेल."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)