गुरू विवेकी भला : महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर कधीच एकमेकांना न भेटलेले गुरू-शिष्य कसे ठरले? ब्लॉग

    • Author, केशव वाघमारे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या गुलामगिरीविरुद्ध चळवळ उभा करणारा पहिला तत्त्वचिंतक नेता म्हणजे महात्मा जोतिबा फुले.

हा संघर्ष उभा करताना त्यांच्या कथनी आणि करणीमध्ये कधीच विसंगती निर्माण झाली नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता आणि मानवता या मूल्यांच्या आधारे त्यांना भारतीय समाजाची पुनर्रचना करायची होती.

डॉ. आंबेडकरांनी जोतिबांना बुद्ध आणि कबीर यांच्या पंक्तीत आपले गुरू बनवले. ते दोघे एकमेकांना भेटणे शक्यच नव्हते. कारण 1890 साली फुले निर्वाण पावले आणि 1891 झाली डॉ. आंबेडकर जन्माला आले.

जोतिबा आणि आंबेडकर या एकमेकांना कधीच न भेटलेल्या गुरू-शिष्यात पराकोटीची वैचारिक समानता होती.

डॉ. आंबेडकरांनी सार्वजनिक पाणवठ्यावर आपले नागरी अधिकार प्रस्थापित करण्यासाठी 1920च्या दशकात जो महाडचा रणसंग्राम सुरू केला त्याची पूर्वपिटिका जोतिबा फुले यांनीच तयार करून ठेवली.

1850 साली ब्रिटिश कालीन कायद्यात नागरी वस्त्यांसाठी नगरपालिका स्थापन झाली आणि नागरिकांसाठी सार्वजनिक पाणवठ्याची व्यवस्था निर्माण करण्यात आली.

या सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यावरून तत्कालीन अहमदनगर शहरात प्रथमच पाण्याचा तंटा उपस्थित झाला. एका अस्पृश्य स्त्रीने हौदाचे पाणी बाटवले अशी तक्रार करण्यात आली.

काही वेळा पाण्याच्या हक्कासाठी न्यायालयातही दावे दाखल झाले होते .अशाच एका न्यायालयीन दाव्यात नगरच्या गायकवाड प्रकरणात न्यायमूर्ती रानडे यांनी अस्पृश्यांना सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी भरण्यास प्रतिबंध करणारा निकाल दिला होता.

सार्वजनिक पाणवठ्यांची हीच अवस्था पुण्यात होती. पुण्यात जागोजागी पेशव्यांनी हौद बांधले होते, परंतु तिथे महार, मांगांना पाणी मिळण्याची सोय नव्हती.

पुणे नगरपालिकाही त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती. एप्रिल, मे महिन्यात पाण्याचे दुर्भिक्ष पडे, तेव्हा अनेक किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या दलितांना करुणा भाकूनही हौदावरील पाणी भरू दिले जात नसे. अनेकदा तडफडत मरून जावे लागे.

उपदेशापेक्षा प्रत्यक्ष उदाहरणाने लोकांना गोष्टी लवकर पटतात या वचनावर जोतिरावांचा विश्वास अधिक होता. त्यांनी 1868 साली सनातन्यांच्या शिव्या शापाला न भिता आपल्या घराजवळील पाण्याचा हौद महार मांगासाठी खुला केला. त्यामुळे सनातनी लोकांची माथी भडकली. शहरात पुन्हा एकदा जोतिबा विरोधाची लाट उसळली, पण त्यांनी त्याला धैर्याने तोंड दिले.

जोतिबा पूर्वी परावलंबन, असहायता आणि आश्रित भावना यांनी ग्रासलेल्या दलितांच्या मनामध्ये प्रथमच फुलेंनी आत्मऊन्नतीचा उजेड निर्माण केला होता.

डॉ. आंबेडकरांच्या आधी दलितांची चळवळ उभे करणारे दापोलीचे गोपाळ बाबावलंकर यांनाही फुलेंनीच मार्गदर्शन केले होते. याचा डॉ.आंबेडकरांना अभिमान होता. परंतु जोतिबा फुले आणि त्यांच्या सत्यशोधक समाजाचा प्रत्यक्ष वारसा सांगणारे काही सत्यशोधक नेतेच जोतिबा फुले यांच्या प्रेरणेच्या विपरीत तत्त्वज्ञान सांगून वर्तन करू लागले.

जोतिबा फुले यांनी मनुस्मृती ही शूद्राच्या बोकांडी गुलामगिरी बसवते म्हणून तिला अपवित्र ठरवत तिचा धिक्कार केला. तीच मनुस्मृती डॉ. आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रहात जाळली.

तेव्हा मनुस्मृतीचे समर्थन सत्यशोधक समाजाचे नेते भास्करराव जाधव करू लागले याचा संताप व्यक्त करत डॉ. आंबेडकर म्हणाले "जोतिबांचा अनुयायी म्हणून घेण्यात मला यापूर्वी कधीच लाज वाटली नाही. मी आज आत्मविश्वासाने असे म्हणू शकतो की, मीच तेवढा खरा आज जोतिबांना एकनिष्ठ राहिलो आहे."

"मला अशी खात्री आहे की, या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला तरी, त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी, त्यांना जोतिबांचे धोरण, त्यांचे तत्त्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे जावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे. महाडच्या संघर्षापासून सुरू केलेला मानवमुक्ती संग्राम पुढे जोतिबा यांच्या तत्वज्ञान, धोरण यानुसारच पुढे जात राहील."

जोतिबांच्या धर्मचिकित्सा, शूद्र अतिशूद्र आणि स्त्रियांची उन्नती आणि त्यांचे नागरी अधिकार व लोकशाहीच्या व्यापक विस्तारासाठी डॉ. आंबेडकर संघर्षरत राहिले.

या संघर्षात कोणत्याही चिकित्सेची सुरुवात ही धर्म चिकित्सेपासून होते. ही धर्माची चिकित्सा करण्याची आंतरदृष्टी त्यांना जोतिबा फुले यांच्याकडून प्राप्त झाली.

भारतीय इतिहासाचा व गुलामगिरीचा उलगडा करण्यासाठी जोतिबा फुले यांनी गुलामगिरी, अस्पृशांची कैफियत या सारखे ग्रंथ लिहिले.

महात्मा फुलेंची हीच अंतर्दृष्टी डॉ. आंबेडकर यांनी लिहिलेल्या शूद्र पूर्वी कोण होते? या पुस्तकात दिसते. शूद्र मूळचे क्षत्रिय होते. या जोतिबांनी मांडलेल्या आंतरदृष्टीचा हे पुस्तक सैद्धांतिक विकास होता.

हे पुस्तक जोतिबा फुले यांना अर्पण करुन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. आंबेडकर म्हणतात "आधुनिक भारतातील महान शूद्र यांनी हिंदूंमधील पद दलितांना उच्च वर्गाकडून होणाऱ्या गुलामगिरीची जाणीव करून दिली आणि उपद्देश केला की, भारतातील सामाजिक लोकशाही परकीयांपासून मिळणाऱ्या स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्वाची आहे."

सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा आधी या वैचारिक द्वंदात न अडकता हे या पूर्वीच जोतिबा यांनी तयार केलेल्या वैचारिक भूमिकेबरोबर राहिले.

परंतू जोतिबांप्रमाणे आंबेडकर ही सामाजिक भूमिका घेताना महार, मांग, शेतकरी, स्त्रिया आणि कामगार लोक यांच्याकडे इंग्रज दुर्लक्ष करतात हे वास्तवही विसरले नाहीत.

राष्ट्रीय सभा ही (तत्कालीन काँग्रेस) कनिष्ठ वर्गाच्या हिताकडे दुर्लक्ष करत आहे अशी जोतिबांची तक्रार होती. हीच भूमिका पुढील काळात डॉ. आंबेडकरांच्या संघर्षात आली.

प्रत्यक्ष सामाजिक संघर्ष टाळून भूतदयेच्या दृष्टीने शूद्र अतिशूद्र स्त्रियांचे प्रश्न सोडवण्यास दोघांचाही विरोध होता. म्हणूनच 'हिंदू समाजाच्या पुनर्रचनेसाठी जातीचे उच्चाटन केले पाहिजे' हे आंबेडकरांपूर्वी सांगणारे जोतिबा फुले होते.

स्वतंत्र मजूर पक्षाच्या कार्यक्रमात महात्मा फुले की जय! शेतकऱ्यांचा विजय असो! कामगारांचा विजय असो! भांडवलशाही नष्ट करा! भिक्षुकशाही नष्ट करा! अशा त्यांच्या कार्यक्रमात घोषणा घुमू लागल्या.

कोकणातील शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध पुकारलेले खोती आंदोलन, हिंदू धर्माची कठोर चिकित्सा, अस्पृश्यांसाठी सुरू केलेली शैक्षणिक चळवळ, स्त्रियांचे प्रश्न, तत्वज्ञान, धोरण व कार्यक्रम या पातळीवर स्वीकारलेल्या जोतिबाची जयंती, पुण्यतिथी मोठ्या प्रमाणात नंतरच्या काळात आंबेडकरांच्या चळवळीत साजरी होऊ लागली.

आंबेडकर म्हणतात, "जोतिबा हेच ब्राह्मणेतरांचे खरे गुरू आहेत. शिंपी, कुंभार, न्हावी, कोळी, महार, मांग, चांभार यांना माणुसकीचे धडे फुल्यांनीच दिले आणि शिकवले. पूर्वीच्या राजकारणात आम्ही जोतिबाच्या मार्गाने जात होतो. पुढे मराठे हे आमच्यातून फुटले. कोणी काँग्रेसमध्ये उष्टे खाण्यासाठी गेले."

"त्यांच्याच पैकी आमचे रा. बोले हिंदू महासभेत गेले. कोणी कुठेही जाऊ, पण आम्ही मात्र जोतिबांच्या मार्गाने जाऊ. जोडीला कार्ल मार्क्स घेऊ किंवा इतर कोणी घेऊ. पण जोतिबाचा मार्ग सोडणार नाही. त्याच्या शिकवणीनेच माझे आयुष्य बनले आहे."

जोतिरावांची कामगिरी समजावून घेण्यात या पुस्तकाची मदत होईल या डॉ. आंबेडकर यांच्या अभिप्रायसह पंढरीनाथ पाटील यांनी लिहिलेल्या ज्योतिबाच्या प्रथम चरित्राची व प्रधान यांनी फुलेच्या शतक उत्सवानिमित्त प्रसिद्ध केलेल्या इंग्रजी चरित्राचे भाषांतराबाबत जनता या वर्तमानपत्रात मोठ्या प्रमाणात जाहिरात होऊ लागली.

त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्यावर स्फुटलेखन व देशात फुले यांच्या विचाराला घेऊन जे कार्यक्रम होत त्याचे वार्तांकन 'जनता' या मासिकात होऊ लागले.

1924 साली पुणे महानगरपालिकेने टिळकांचा व विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचा पुतळा पुणे शहरात बसवला. परंतु फुलेंचा पुतळा बसवण्याला पुण्यातील 'सनातनी ब्राह्मणांचा' विरोध होता.

याशिवाय सत्यशोधक की ख्रिस्तसेवक? या शीर्षकाची पुस्तिका लिहून जोतिबांनी आपल्या घरी वाढवलेले अनाथ मुल हे त्यांच्यापासून एका विधवेला झालेले मूल होते, असल्या बेछूट आरोपानी जोतिरावांची बदनामी करण्याचा निंध प्रयत्न टिळक पक्षियांनी राजरोस चालवला होता. याला प्रत्युत्तर म्हणून दिनकर जवळकर यांनी 'देशाचे दुश्मन' हे पुस्तक लिहिले.

या पुस्तकाच्या विरोधात चिपळूणकर यांच्या नातवाने जेधे, जवळकर यांच्या विरोधात कोर्टात खटला दाखल केला. तेव्हा जेधे, जवळकर यांच्या बाजूने खटला लढण्यासाठी कोणताच वकील तयार नव्हता. तेव्हा आंबेडकर यांनी जेधे जवळकर यांचे वकीलपत्र घेवून या खटल्यातून जेधे, जवळकर यांची निर्दोष मुक्तता केली.

फुले यांचा पुणे शहरात पुतळा बसवण्यावरून जे पुणे नगरपालिकेत रणकंदन झाले होते त्या रणकंदनात जेधे, जवळकर या सत्यशोधक पुढारी यांच्या बरोबरीने आंबेडकरांचे अनुयायी पा.ना. राजभोज हे ही लढत होते.

त्यांनी आंबेडकरांच्या सांगण्यावरून जोतिबा फुले पुतळा बसवण्याबद्दलचा केशवराव जेधे यांच्या व्यतिरिक्त दुसरा ठराव नगरपालिकेत आणला होता.

आपले गुरू जोतिबांचे जीवन चरित्र इंग्रजीमध्ये लिहिण्याची डॉ. आंबेडकरांची तीव्र इच्छा होती. जोतिबांच्या क्रांतिकारक व ऐतिहासिक कार्याचे मूल्यमापन करून समग्र चरित्र ग्रंथ त्यांना लिहायचा होता. त्यासाठी त्यांनी जोतिबांची सगळे ग्रंथ संग्रहित केले होते.

काही ग्रंथाच्या प्रती उपलब्ध झाल्या नाहीत, तेव्हा प्रबोधनकार ठाकरे यांच्यामार्फत ते ग्रंथ देण्याची जाहिरात त्यांनी वर्तमानपत्रात दिली. त्याकाळी फोटोकॉपी झेरॉक्सिंग अशा सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांनी मुंबईतील एशियाटिक लायब्ररी, पुण्याचे इतिहास संशोधन मंडळ येथील संदर्भ ग्रंथाचे हस्तलिखित करून घेतले होते.

याशिवाय आचार्य अत्रे यांनी महात्मा फुले चित्रपट बनवला तेव्हा भाषण करण्याची शक्ती ही अंगात नसताना ते चित्रपटाच्या उद्घाटनाला गेले. आत्रेंनी वापरलेली कागदपत्रे त्यांच्याकडून मागून घेतली.

माई आंबेडकरांच्या आठवणीनुसार हा चित्रपट पाहताना फुल्यांचे कार्य व त्याग आठवून आंबेडकरांच्या डोळ्यात पाणी येत होते.

डॉ. आंबेडकर यांनी जीवनात व्यक्तिपूजा कधीही मान्य केली नाही. व्यक्तिपूजा व्यक्तीला, समाजाला अधोगतीकडे आणि हुकूमशाहीकडे घेऊन जाते असे त्यांचे दृढ मत होते.

शिष्य केवळ आपल्या गुरूंकडून मार्गदर्शन घेतो. तो आपल्या गुरूंचे निष्कर्ष स्वीकारण्यास बांधील नसतो. शिष्याने आपल्या गुरूंची तत्त्वे किंवा निष्कर्ष स्वीकारले नाहीत, यात कृतघ्नता नसते.

कारण, जरी तो त्या गोष्टी नाकारत असला तरी, त्याने आपल्या गुरूंप्रति अत्यंत आदराने हे कबूल करणे बंधनकारक आहे: "तुम्ही मला माझे स्वतःचे अस्तित्व ओळखायला जागृत केले; त्यासाठी मी तुमचा आभारी आहे." गुरूंना या पेक्षा कमी मिळण्याचा हक्क नाही. शिष्याला अधिक देण्याचे बंधन नाही.

बुद्धाचे जीवन, कबीराची शिकवण आणि फुल्यांचे कार्य यांचा प्रभाव असला तरी डॉ. आंबेडकर म्हणतात, "शिष्याने स्वतःला आपल्या गुरूंच्या तत्त्व आणि निष्कर्षांशी बांधून घेणे, हे गुरूंच्या तसेच स्वतःच्याही दृष्टीने चुकीचे आहे.

शिष्याचे कर्तव्य आहे की. त्याने ती तत्त्वे जाणून घ्यावीत आणि जर त्याला त्यांच्या मूल्याची व योग्यतेची खात्री पटली, तर त्यांचा प्रसार करावा. हीच प्रत्येक गुरूची इच्छा असते.

शिष्याने स्वतःला आपल्या गुरूंच्या तत्त्व आणि निष्कर्षांशी बांधून घेणे, हे गुरूंच्या तसेच स्वतःच्याही दृष्टीने चुकीचे आहे. शिष्याचे कर्तव्य आहे की त्याने ती तत्त्वे जाणून घ्यावीत आणि जर त्याला त्यांच्या मूल्याची व योग्यतेची खात्री पटली, तर त्यांचा प्रसार करावा. हीच प्रत्येक गुरूची इच्छा असते. म्हणून आंबेडकर यांनी जोतिबांचा आदर म्हणून हेच केले.

संदर्भ ग्रंथ -

1) महात्मा जोतीराव फुले : - धनंजय कीर

2) डॉ. आंबेडकरांच्या सहवासात :- डॉ. सविता आंबेडकर

3) डॉ. आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18 भाग 3

4) केशवराव जेधे चरित्र - य. दि. फडके

5) सावलीचा शोध - नरेंद्र चपळगावकर

6) समता वर्तमान पाक्षिक

7) जनता

(लेखातील मते लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.