चार-पाच दिवसांत एवढी झाडं का पडली? पाऊस हे एकमेव कारण आहे का?

मुंबई महापालिकेच्या 6 जुलै आकडेवारीनुसार या पावसात शहरात 826 झाडं पडली आहेत.
म्हणजे दिवसाला 59, किंवा तासाला दोन, या दरानं. त्याशिवाय झाडाच्या फांद्या तुटून पडण्याच्या 1223 घटना घडल्या आहेत.
राज्यात इतर काही ठिकाणीही सोसाट्याच्या वाऱ्यात आणि मुसळधार पावसात झाडं कोसळली आहेत, पण मुंबईतले आकडे थक्क करणारे आहेत.
कारण 22 जूनला मुंबईत मान्सूनची सुरुवात झाल्यापासून पहिल्या पंधरवड्यातल्या कोसळलेल्या झाडांची ही आकडेवारी आहे.
त्यातली 559 झाडं 1 जुलै ते 5 जुलैदरम्यान पडली आहेत. त्यातली बहुतांश झाडं 5 तारखेला 24 तासांच्या काळात पडली आहेत.
किमान तिघांचा जीव गेला, घरं आणि गाड्यांचं नुकसान झालं.
सोसाट्याच्या वाऱ्यानं झाडं पडली?
चार-पाच दिवसांत एवढी झाडं का पडली? महापालिकेच्या मते सोसाट्याच्या वाऱ्यामुळे असं झालंय.
मुंबईत रविवारी (5 जुलै) आणि सोमवारी (6 जुलै) वाऱ्याच्या काही झोतांचा वेग ताशी 70 ते 80 किलोमीटर एवढा होता. म्हणजे चक्रीवादळात वारे जेवढ्या गतीनं वाहतात, तेवढा.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
पण चार-पाच वर्षांपूर्वी निसर्ग आणि तौक्ते चक्रीवादळं मुंबईजवळून गेली, तेव्हा याहीपेक्षा जास्त वेगानं वारे वाहात होते.
2020 साली रायगडच्या अलिबागमध्ये धडकलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस मुंबईत वाऱ्याचा वेग ताशी 110 किमी पर्यंत पोहोचला होता. तर 2021 मध्ये तौक्ते चक्रीवादळच्या अगदी मुंबईजवळून गेलं, तेव्हा शहरात ताशी 114 किमी असे आजवरचे सर्वात वेगवान वारे नोंदवले गेले.
निसर्ग चक्रीवादळाच्या वेळेस शहरात 323 तर तौक्तेच्या वेळेस 812 झाडं पडल्याचं महापालिकेच्या नोंदींवरून दिसतं.
या वादळांपेक्षा तुलनेनं कमी वेगानं वारा वाहात असतानाही यंदा जास्त झाडं का पडली, यामागची कारणं आम्ही वृक्षतज्ज्ञांना विचारली. त्यांनी चार मुद्दे मांडले आहेत.
1. झाडांच्या प्रजाती
पहिलं कारण आहे, झाडांच्या प्रजाती. किनारी भागातील वारे सोसण्याची, त्यात तग धरण्याची क्षमता सगळ्याच झाडांमध्ये नसते.
गुलमोहर, रेन ट्री अशी विदेशी प्रजातींची झाडं त्यामुळेच मान्सूनच्या दिवसांत लवकर कोसळतात.
पण यावेळीही मोठ्या प्रमाणात विदेशी झाडं कोसळली आहेत पण वड पिंपळही पडताना दिसले आहेत. त्यामुळे इतर कारणंच इथे जास्त घातक ठरली आहेत, असं तज्ज्ञांना वाटतं.

2. काँक्रिटीकरण
रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची सर्वाधिक चर्चा होते आहे. कारण झाड पडून मृत्यूच्या ज्या तीन घटना घडल्या, त्यातल्या दोन अशा रस्त्यालगत आहे, जिथे अलीकडेच सिमेंटचा मार्ग तयार केला आहे.
झाडांची मुळं मातीला घट्ट धरून ठेवतात. जेव्हा झाडांच्या मुळाजवळ काँक्रिट ओतलं जातं, तेव्हा मुळं कमकुवत होतात. मातीतून मुळांपर्यंत पोहोचू शकणारी हवा बंद होते, त्यानं तिथल्या सूक्ष्मजीवांमध्ये बदल होतात.

परिणामी मुळं कुजू लागतात आणि झाडं पडण्याची शक्यता वाढते. नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल अर्थात राष्ट्रीय हरित लवादानं ही गोष्ट 2013सालीच मान्य केली होती आणि झाडांच्या भोवती चारही बाजूंनी एक-एक मीटर अंतर सोडलं जावं, त्यात सकस माती असायला हवी असं म्हटलं होतं.
तेरा वर्षांनंतरही ती सूचना नीट पाळली जात नसल्याचं, मुंबईच्या कुठल्याही रस्त्यावर फिरताना दिसून येईल, असं वाघोबा फाऊंडेशनचे संस्थापक आणि वृक्ष संवर्धनाचं काम करणारे संजीव वालसन सांगतात.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना 2022 साली मुंबईला खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशानं रस्ते सिमेंटनं बांधण्याचा प्रस्ताव आला आणि 2023च्या ऑक्टोबरपासून त्यावर मोठ्या प्रमाणात काम सुरू झालं. त्यानंतर झाडं पडण्याच्या घटना वाढल्याचं शहरातले पर्यावरणप्रेम सांगतात.
महापालिकेच्याच डेटानुसार 2023 साली झाडं पडण्याच्या 687 घटना घडल्या होत्या, 2024 मध्ये 653 आणि 2025 मध्ये 855 तर आता मान्सूनच्या पहिल्या पंधरा दिवसांतच 826 झाडं पडली आहेत.
पण फक्त पृष्ठभागावरच नाही तर जमिनीतही काँक्रिट ओतलं जातंय.
2. बांधकामं
गेल्या पाच वर्षांत मुंबईत मोठ्या प्रकल्पांपासून ते इमारतींच्या रीडेव्हलपमेंटसाठी जमीन खणली जाते आहे. त्यात खोलवर काँक्रिटचा पाया टाकला जातो. पाया भरताना माती टाकली, तरी वरती काँक्रिटच असतं.
एरवी झाडं मातीला धरून ठेवतात, पण आसपास मातीच उतर नसेल, तर झाडं पडण्याची शक्यता जास्त वाढते.
अनेकदा जमिनीखाली झाडांच्या मुळांचं नेटवर्क तयार झालेलं असतं. त्यातून ती एकमेकांना धरून राहतात, जणू एकमेकांशी संवाद साधतात, असं गेल्या दहा वर्षातल्या संशोधनातून समोर आलं आहे.
बांधकामांसाठी जमिन खोदली जाते, तेव्हा हे नेटवर्क तुटतं आणि त्यामुळे झाडं एकटी पडतात, ती पडण्याची शक्यता वाढते, असं संजीव वालसन नमूद करतात.
त्यांच्या पाहणीमध्ये आणखी एक गोष्ट समोर आली आहे. झाडं छाटण्याच्या चुकीच्या पद्धती.
3. झाडं छाटण्याच्या पद्धती
पावसाळ्यात झाडं पडू नयेत, म्हणून मान्सूनआधी मुंबई, ठाणे, नवी मुंबईतही महापालिका वृक्षांची छाटणी करतात.
पण ती अनेकदा वैज्ञानिक पद्धतीनं होत नाही आणि त्यामुळे झाडांचा बॅलन्स जातो, असं वालसन सांगतात.
"झाडांची छाटणी होत असताना अनेकदा कुणी आर्बोरिस्ट किंवा तज्ज्ञ तिथे उपस्थित नसतात. कुणाच्या खिडकीत फांदी जाते आहे, किंवा दुकानाला अडथळा होतोय, अशा गोष्टींसाठी फांद्या तोडल्या जातात, पण त्यानं झाडाचा बॅलन्स जाऊ शकतो याचा विचार केला जात नाही. एरवीही फांद्या छाटताना झाडांच्या बॅलन्सला प्राधान्य दिलं जात नाही.
"महापालिकेचे कर्मचारी स्वतः झाडं तोडत नाहीत, तर कंत्राटदारांना हे काम दिलेलं असतं. त्यातून तोडलेली लाकडं आणि फांद्या कंत्राटदार विकू शकतो. साहजिकच जास्तीत जास्त छाटणी करण्यावर कंत्राटदार भर देतात," असं निरीक्षण संजीव नोंदवतात.
फांदी छाटल्यावर तिथे बुरशी लागणार नाही, यासाठी औषध लावण्याची गरज असते पण तेही पाळलं जात नाही. त्यामुळे झाडांना कीड लागून ती लवकर पडू शकतात असंही याआधी काही वृक्षतज्ज्ञांनी मांडलं आहे.
महापालिका काय म्हणते?
मुंबईत ताजी वृक्षगणना होते आहे, पण 2018 च्या वृक्षगणनेनुसार शहरात 29 लाख 75 हजार झाडे आहेत, साधारण दोन लाख झाडे रस्त्यालगत आहेत. बाकीची झाडं बागा, खासगी जागा आणि इतर ठिकाणी आहेत, अशी माहिती महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
त्या म्हणतात, "आम्ही आधीही झाडं सुरक्षित कसं ठेवता येईल याची काळजी घ्यायचो, पण त्यावर आम्ही आणखी पद्धतशीरपणे काम करू. आम्ही तीनचार गोष्टींचा प्रयत्न करत आहोत."

"अनेक झाडं ही रस्त्याच्या बाजूला फूटपाथवर आहेत आणि फूटपाथखालूनच आमच्या वेगवेगळ्या सेवा, पाईपलाईन्स जातात, हे सगळं एकत्र सांभाळायचं आहे.
"काँक्रीटीकरण केले जाते, काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविले जातात. तिथे झाडांच्या मुळांना पाणी जाते की नाही, यासाठी काही व्यवस्था आहेत. झाडाच्या आसपासचा भाग मोकळा ठेवला जातो. पण फक्त त्यानं काम भागणार नाही.
"झाडांची मुळे दूरवर पसरतात, ती जिथवर असतील, त्याचा अंदाज घेऊन तिथेही जाळी लावून पाणी आत जाऊ देता येईल का, याविषयीही विचार सुरू आहे. असा प्रयोग मलबार हिल परिसरात केला होता."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























