बुरशी लागलेली फळं आणि अन्न खाण्याबाबत हे आहे तज्ज्ञांचं मत, जाणून घ्या सोप्या शब्दांत

बुरशी लागलेली फळं

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

आपण सर्वांनी कधी ना कधी ब्रेडवर आलेली बुरशी पाहिली असेल. त्यानंतर असे पदार्थ खावे की नाही असा विचारही मनात आला असेल.

परंतु, दरवर्षी मोठ्या घरांमधून प्रमाणात अन्न वाया जातं. यूकेतील घरांमधून तर सुमारे 6.6 दशलक्ष टन अन्न वाया जातं.

त्यामुळे कोणत्या प्रकारचं अन्न थोडं सुरक्षितपणे वाचवता येऊ शकतं आणि कोणतं अन्न लगेच कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायला हवं, हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे.

अन्नावर येणारी बुरशी म्हणजे काय?

अन्नावरील बुरशी ही सूक्ष्म बुरशीच्या (कवक) जीवाणूंनी बनलेली असते. ती अन्नामध्ये धाग्यांसारख्या जाळ्याच्या रूपात वाढते, ज्याला मायसेलियम म्हणतात.

हे जाळे अन्नाच्या आत शिरून पसरतं, जसं झाडांची मुळं मातीत पसरतात तसं.

जेव्हा या बुरशीचे सूक्ष्म कण (स्पोर्स) अन्नाच्या पृष्ठभागातून बाहेर पडतात, तेव्हा अन्नाचा रंग बदलू शकतो आणि त्यावर धुळीसारखा थर दिसू लागतो.

बुरशी धोकादायक आहे का?

आपल्याला आवडणारे काही खाद्यपदार्थ प्रत्यक्षात सुरक्षित बुरशी वापरून तयार केले जातात. उदा. पेनिसिलियम रोक्वेफोर्टी ही बुरशी निळ्या (ब्लू) चीजला त्याच्या निळसर रेघा किंवा शिरा आणि तीव्र चव देते.

तर बोट्रिटिस सिनेरिया ज्याला 'नोबल रॉट' असंही म्हणतात. ही द्राक्षांपासून वाइन करण्यासाठी वापरली जाते. ही बुरशी द्राक्षांमधील पाणी कमी करते आणि त्यांचा गोडवा वाढवते.

परंतु, याचा अर्थ असा नाही की आपण बुरशी लागलेलं कोणतंही अन्न खाऊ शकतो.

वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीचा परिणाम लोकांवर वेगवेगळा असतो. जर तुम्हाला बुरशीची अ‍ॅलर्जी असेल, तर तुम्ही विशेष काळजी घ्यायला हवी.

फूड स्टँडर्ड्स एजन्सी (एफएसए), बुरशी लागलेलं कोणतंही अन्न न खाण्याचा सल्ला देते.

विशेषतः लहान मुलं, वृद्ध व्यक्ती, गर्भवती महिला आणि ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे त्यांनी अशा अन्नापासून पूर्णपणे दूर राहायला हवं.

बुरशी धोकादायक आहे का?

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मोल्ड (बुरशी-विषयक) तज्ज्ञ डॉ. पॅट्रिक हिकी यांच्या मते, काही अन्न वाचवता येऊ शकतं, पण ते खाण्याचा निर्णय 'आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर' घ्यावा लागतो.

डॉ. हिकी यांच्या मते, "बुरशीमुळे लगेच अन्नातून विषबाधा होत नाही". पण काही बुरशी असे विषारी पदार्थ किंवा द्रव्य तयार करतात, ज्यांना 'मायकोटॉक्सिन्स' असं म्हणतात.

जर तुम्ही याचं मोठ्याप्रमाणात सेवन केलं तर "यामुळे पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतात. तसेच काही वेळा यामुळे यकृत (लिव्हर) किंवा मूत्रपिंड (किडनी) निकामी होण्यासारखे गंभीर परिणाम होऊ शकतात, आणि यामुळे जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो."

ॲस्परजिलस सारख्या काही बुरशी ओलसर धान्य किंवा सुकामेव्यावर वाढतात. या बुरशीमुळे ॲफ्लाटॉक्सिन नावाचं विष तयार होतं. त्यांचा संबंध यकृताच्या कर्करोगाशी (लिव्हर कॅन्सर) जोडलेला आहे.

माणसांना अचानक बुरशीजन्य गंभीर विषबाधा होणं फार दुर्मीळ असतं. परंतु, डॉ. हिकी यांच्या मते, लहान प्रमाणात हे विष वारंवार खाण्यात आल्यास दीर्घकालीन काय परिणाम होतात याबाबत फारशी स्पष्ट माहिती उपलब्ध नाही.

ते सांगतात की, "जर हे विष किंवा तो पदार्थ सतत शरीरात जात राहिला, तर त्याचे हळूहळू साठणारे (क्युम्युलेटिव्ह) परिणाम होऊन आजारपण वाढू शकतं, अशी चिंता व्यक्त केली जाते."

बुरशी लागलेला ब्रेड खाऊ शकतो का?

एफएसए सांगतं की, बुरशी लागलेला ब्रेड खाऊ नये. कारण ब्रेडसारख्या छिद्र असलेल्या (पोरस) पदार्थांमध्ये बुरशी केवळ वर दिसत नाही, तर ती आतपर्यंत पसरलेलीही असू शकते.

डॉ. हिकी म्हणतात की, "साधारण नियम असा आहे की अन्नाच्या पृष्ठभागावर जर बुरशीचा 1 सेमी आकाराचा भाग दिसत असेल, तर ती बुरशी आतमध्येही साधारण तितकीच म्हणजे 1 सेमीपर्यंत शिरलेली असते."

जर तुमचा ब्रेड केवळ शिळा झाला असेल आणि त्यावर बुरशी आलेली नसेल, तर तो फेकण्याऐवजी तुम्ही त्यापासून ब्रेडक्रंब्स (ब्रेडचा चुरा) किंवा क्रूटॉन्स (ब्रेडचे कुरकुरीत तुकडे) बनवू शकता.

एफएसए सांगतं की, बुरशी लागलेला ब्रेड खाऊ नये.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एफएसए सांगतं की, बुरशी लागलेला ब्रेड खाऊ नये.

बुरशी लागलेलं चीज खाणं सुरक्षित आहे का?

चेडर आणि पार्मेझानसारख्या चीजवर बुरशी सहज वाढत नाही, कारण त्यात ओलावा किंवा मॉइश्चर कमी असतं.

डॉ. हिकी सांगतात की, "जर तुम्हाला त्या कडक चीजवर 5 मिमीपेक्षा लहान बुरशी दिसली, तर त्या भागाभोवतीचा किमान 10 मिमी थर कापून टाकून मगच उर्वरित चीज खावं."

पण चाकू बुरशी लागलेल्या भागाला स्पर्श करणार नाही याची काळजी घ्यावी, नाहीतर बुरशी इतर भागातही पसरू शकते.

मऊ चीज किंवा जे पसरवता किंवा सहज कुस्करता येतात, ते वेगळे असतात. जर त्यात बुरशी खास तयार करून टाकलेली नसेल, जसं की ब्लू चीजमध्ये बुरशी वाढवली जाते. अशाप्रकारच्या चीजवर बुरशी आली तर ते फेकून द्यावे.

कारण अशा चीजमध्ये पाणी जास्त असतं, त्यामुळे जंतू किंवा सूक्ष्मजीव लवकर वाढतात आणि त्यामुळे साल्मोनेला किंवा लिस्टेरियासारख्या जीवाणूंमुळे अन्नातून विषबाधा होऊ शकते.

फळं आणि भाज्यांवरील बुरशीचे काय?

घट्ट किंवा कडक फळे आणि भाज्यांवर जर थोडेसे बुरशीचे डाग असतील, तर ती बहुतेक वेळा वापरण्यायोग्य असतात.

पण जर ती चिकट किंवा ओलसर म्हणजेच बुळबुळीतपणा आला असेल, तर ती फेकून द्यावीत, कारण असं झालं की त्यात जिवाणू वाढलेलं असू शकतात आणि त्यामुळे अन्नातून विषबाधा किंवा पोटदुखी होऊ शकते.

घट्ट किंवा कडक फळभाज्या (जसं की मुळा, गाजर किंवा कोबी) यावर बुरशी आली असेल, तर खाण्यापूर्वी त्या बुरशीच्या भागाभोवती आणि खाली किमान 1 सेमीपर्यंतचा तो भाग कापून टाकावा.

अशा भाज्यांमध्ये ओलावा कमी आणि आम्लता (ॲसिड) जास्त असल्यामुळे बुरशीला आतपर्यंत शिरणं कठीण जातं.

बुरशी लागलेलं अन्न खाणं सुरक्षित आहे का?

फोटो स्रोत, Getty Images

सफरचंदांबाबत मात्र विशेष काळजी घ्यावी. खराब किंवा बुरशी लागलेल्या सफरचंदांमध्ये पॅट्युलिन नावाचं विष असू शकतं. त्यामुळे बुरशी लागलेला सफरचंदाचा रस (ॲपल ज्यूस) कधीही पिऊ नये.

काकडी, टोमॅटो आणि पीचसारखी मऊ फळं आणि भाज्या बुरशी लागली असतील तर ती लगेचच फेकून द्यावीत.

कारण त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असतं, त्यामुळे बुरशी आणि जंतू आतपर्यंत वेगाने पसरू शकतात.

थोडीशी सुकलेली किंवा कोमेजलेली सलाडची पानं साधारणपणे खाण्यास योग्य असतात. परंतु, जर त्यावर बुरशी आली असेल किंवा ती चिकट किंवा ओलसर झाली असतील, तर ते खाणं टाळावं.

बुरशी लागलेला जॅम खाणं सुरक्षित आहे का?

एफएसएने इशारा दिला आहे की, "बुरशीचा भाग आणि त्याच्या आजूबाजूचा मोठा भाग काढून टाकला, तर कदाचित दिसत नसलेले विषही म्हणजेच अदृश्य विषारी घटक निघून जाऊ शकतात. पण याची कोणतीही खात्री नाही."

डॉ. हिकी सुचवतात की, जर जॅमच्या वर थोडी हिरवी बुरशी दिसली, तर वरचा थर आणि त्याखालील काही सेंटीमीटरचा भाग काढून टाकला, तर उरलेला भाग लवकर खाऊ शकतो.

पण काही दिवसांनी ती बुरशी पुन्हा येण्याची शक्यता जास्त असते.

तुम्हाला शंका असेल किंवा जॅमवर बुरशीचा जाड थर साचला असेल, तर ते फेकून देणंच योग्य आहे. हीच गोष्ट करी पेस्टच्या जारलाही लागू होते.

अन्नाला बुरशी लागण्यापासून कसं रोखाल?

तुम्ही अन्नाला पूर्णपणे बुरशी लागण्यापासून रोखू शकत नाही, पण ती लागण्याच्या प्रक्रियेचा वेग नक्कीच कमी करू शकता. बुरशीला उष्ण, ओलसर वातावरण आणि खाण्यासाठी अन्न लागतं.

त्यामुळे स्वच्छ, कोरडी आणि चांगली खेळती हवा असलेली स्वयंपाकघरं ठेवली, तर बुरशीपासून काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.

तुम्ही अन्न कसं साठवता यावर बुरशी लागणं अवलंबून असतं. सलाडची पानं फ्रिजमध्ये हवाबंद (एअरटाइट) डब्यात ठेवावीत आणि त्यात तळाशी पेपर टॉवेल अंथरूण ठेवावा.

मूळ लेख एप्रिल 2021 मध्ये प्रकाशित झाला होता. मार्च 2026 मध्ये तो अपडेट करण्यात आला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)