पाकिस्तानात 500 किलो गर्भनाळ जप्त; तस्करी करून गर्भनाळेचा वापर कशासाठी केला जातो?

वार किंवा गर्भनाळ (प्लॅसेंटा) हा गर्भधारणेदरम्यान आईच्या गर्भाशयात तयार होणारा एक अवयव आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वार किंवा गर्भनाळ (प्लॅसेंटा) हा गर्भधारणेदरम्यान आईच्या गर्भाशयात तयार होणारा एक अवयव आहे.
    • Author, असद सोहेब आणि शहजाद मलिक
    • Role, बीबीसी
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

इस्लामाबादमध्ये केलेल्या कारवाईत 500 किलो मानवी प्लॅसेंटा म्हणजेच गर्भनाळ जप्त करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानच्या फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (FIA) केला आहे.

अशा प्रकारची ही पहिलीच कारवाई असून, या कारवाईत मानवी अवयवांच्या अवैध तस्करीप्रकरणी चीनच्या तीन नागरिकांसह एकूण 5 जणांना अटक करण्यात आली आहे.

वार किंवा गर्भनाळ (प्लॅसेंटा) हा गर्भधारणेदरम्यान आईच्या गर्भाशयात तयार होणारा एक अवयव आहे. तो नाळेद्वारे (अम्बलिकल कॉर्ड) बाळाशी जोडलेला असतो. या अवयवातून बाळाला ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक घटक किंवा तत्वे मिळतात, तसेच बाळाच्या रक्तातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचं कामही तो करतो.

FIAने दाखल केलेल्या FIR नुसार, आरोपी संगनमत करून मानवी प्लॅसेंटाला (वार) 'मेंढीचा प्लॅसेंटा' असल्याचे भासवून व्यावसायिक कारणांसाठी परदेशात पाठवत होते, असं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

FIR नुसार, जप्त केलेले नमुने पुढील तपासासाठी PIMS रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

FIAच्या माहितीनुसार, अटक केलेल्या पाचही आरोपींना स्थानिक न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, सध्या त्यांची चौकशी केली जात आहे.

ह्यूमन ऑर्गन ट्रान्सप्लांट ऑथॉरिटीच्या (HOTA) मॉनिटरिंग अधिकारी हिना कंवल यांनी बीबीसी उर्दूला सांगितलं की, PIMSने हे नमुने गोळा करून ते लाहोरमधील पंजाब फॉरेन्सिक सायन्स एजन्सीकडे पाठवले आहेत. आता त्यांच्या अंतिम अहवालाची प्रतीक्षा आहे.

जप्त केलेले मानवी प्लॅसेंटा तेच आहेत, जे आरोपींनी पैसे देऊन विविध रुग्णालयांतून जमा केले होते, असा दावा तपासासाठी FIAने नेमलेल्या आणि HOTAच्या अधिकारी हिना कंवल यांनी केला आहे

FIAने इस्लामाबादमधील दोन सेक्टर्समध्ये HOTAसोबत मिळून ही कारवाई केली. HOTA अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून तीन चिनी आणि दोन पाकिस्तानी नागरिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात अटक केलेल्या एका चिनी नागरिकासह आणखी तीन लोकांची भूमिका काय होती, याचा सध्या तपास सुरू आहे.

या प्रकरणात अटक केलेल्या एका चिनी नागरिकासह आणखी तीन लोकांची भूमिका काय होती, याचा सध्या तपास सुरू आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या प्रकरणात अटक केलेल्या एका चिनी नागरिकासह आणखी तीन लोकांची भूमिका काय होती, याचा सध्या तपास सुरू आहे.

तपास करणाऱ्या FIA अधिकाऱ्याने सांगितले की, "यापूर्वी FIAने बेकायदेशीर अवयव प्रत्यारोपणाविरुद्ध अनेक कारवाया केल्या आहेत. परंतु, मानवी प्लॅसेंटाच्या विक्रीत आणि आंतरराष्ट्रीय गटाच्या सहभागाचं देशातील हे पहिलंच प्रकरण समोर आलं आहे."

या कारवाईत 500 किलो मानवी प्लॅसेंटा जप्त करण्यात आल्याच्या वृत्ताला FIAच्या एका अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.

मानवी प्लॅसेंटा म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत किती आहे आणि तो कशासाठी वापरला जातो, हे समजून घेण्यापूर्वी या प्रकरणातील FIRमध्ये काय म्हटले आहे ते पाहूया.

इस्लामाबादमध्ये दोन ठिकाणी छापे

या प्रकरणातील FIRनुसार, HOTAला इस्लामाबादच्या एफ-7 सेक्टरमध्ये मानवी अवयव आणि ऊतींची (टिश्यूज) विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर 24 जून रोजी एका खासगी घरावर संयुक्त छापा टाकला.

FIRनुसार, छाप्यादरम्यान ते घर मानवी प्लॅसेंटा साठवण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठीच्या केंद्रात रूपांतरित करण्यात आलं होतं, असं आढळून आलं आहे.

या कारवाईदरम्यान या व्यवसायात सहभाग असल्याच्या आरोपावरून तीन चिनी आणि दोन पाकिस्तानी नागरिकांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

 गर्भधारणा होताच आईच्या गर्भाशयात प्लॅसेंटा (वार) तयार होण्यास सुरुवात होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, गर्भधारणा होताच आईच्या गर्भाशयात प्लॅसेंटा (वार) तयार होण्यास सुरुवात होते.

अटक केलेल्या चिनी नागरिकांच्या चौकशीत समोर आलं की, ई-11 सेक्टरमध्ये आणखी एका ठिकाणीही असाच बेकायदेशीर प्रकार सुरू होता. त्यानंतर तिथे त्वरीत छापा टाकण्यात आला आणि "अनेक कंटेनर आणि फ्रिजमध्ये ठेवलेले प्लॅसेंटा जप्त करण्यात आले", असंही FIRमध्ये पुढे म्हटलं आहे.

FIRनुसार, त्या घरातून दोन पाकिस्तानी नागरिकांनाही अटक करण्यात आली असून, या प्रकरणात त्यांचा सहभाग कशाप्रकारचा आहे याची चौकशी केली जात आहे.

FIRमध्ये उल्लेख केल्यानुसार, वरील सर्व आरोपींसोबतच आणखी एका चिनी नागरिकालाही अटक करण्यात आली असून, या संपूर्ण प्रकरणात त्याची भूमिका काय होती याचा तपास सुरू आहे.

हा FIR ह्यूमन ऑर्गन्स अँड टिश्यूज ट्रान्सप्लांटेशन ॲक्ट, 2010 च्या (व्यावसायिक उद्देशाने मानवी अवयवांचा वापर) कलम 11 आणि 12 तसेच पाकिस्तान दंड संहितेच्या कलम 109 अंन्वये दाखल करण्यात आला आहे. या कलमांनुसार दोषी ठरल्यास 10 वर्षांपर्यंत कारावास आणि 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

तपासातून काय समोर आलं?

FIAनुसार, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका विशेष टीमची स्थापना करण्यात आली आहे.

एका तपास अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं की, "FIAने यापूर्वी बेकायदेशीर मानवी अवयव प्रत्यारोपणाविरुद्ध अनेक कारवाया केल्या आहेत. परंतु, हे पहिलंच असं प्रकरण आहे ज्यात मानवी प्लॅसेंटाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करणाऱ्या एका संघटित नेटवर्कचा पर्दाफाश झाला आहे. या कारवाईत 500 किलोपेक्षा जास्त प्लॅसेंटा जप्त करण्यात आले. तपास जसा-जसा पुढे जाईल, तशी अधिक माहिती दिली जाईल."

या संदर्भात FIAने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, "आरोपींकडून प्रक्रिया करणारी उपकरणं आणि तयार केलेला माल जप्त करण्यात आला आहे."

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मानवी प्लॅसेंटा साठवण्यासाठी त्या घरात खास व्यवस्था करण्यात आली होती.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मानवी प्लॅसेंटा साठवण्यासाठी त्या घरात खास व्यवस्था करण्यात आली होती.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दरम्यान, HOTAच्या मॉनिटरिंग अधिकारी हिना कंवल यांनी बीबीसीला सांगितलं की, प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की, आरोपी इस्लामाबाद आणि रावळपिंडीमधील रुग्णालयांमधून प्रति प्लॅसेंटा (वार) 800 रुपयांना खरेदी करत होते. जप्त केलेल्या प्लॅसेंटाचा हा साठा परदेशात तस्करी करण्याचा त्यांचा हेतू होता.

हिना कंवल यांच्या म्हणण्यानुसार, FIAचा दावा आहे की जप्त केलेल्या प्लॅसेंटाची किंमत लाखो रुपयांमध्ये असू शकते, परंतु याबाबत ठोसपणे काहीही सांगता येत नाही.

त्यांनी सांगितलं की, आरोपी सुरुवातीला हे सांगत होते की ते मानवी वार म्हणजे प्लॅसेंटा नाहीत, तर मेंढीचे प्लॅसेंटा आहेत आणि ते व्यावसायिक वापरासाठी परदेशात पाठवायचे होते.

परंतु, चौकशीदरम्यान त्यांनी हे मान्य केल्याचा दावा करण्यात आला की ते मानवी प्लॅसेंटा होते. महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानच्या कायद्यानुसार, "जोपर्यंत हे विधान न्यायालयात दिले जात नाही, तोपर्यंत चौकशीदरम्यान केलेल्या कबुलीला कायदेशीर मान्यता नसते."

त्यांनी पुढे सांगितलं की, या प्रकरणाचा अंतिम अहवाल मिळवण्यासाठी नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. तसेच HOTAचे प्रशासक फजल मौला आणि आरोग्यमंत्री मुस्तफा कमाल यांनीही याबाबत सूचना दिल्या आहेत.

वार (प्लॅसेंटा) म्हणजे काय?

अमेरिकेतील मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार, प्लॅसेंटा हा गर्भधारणेदरम्यान आईच्या गर्भाशयात तयार होणारा एक अवयव आहे. तो नाळेद्वारे (अम्बलिकल कॉर्ड) बाळाशी जोडलेला असतो.

"नाळेद्वारेच प्लॅसेंटा बाळाला ऑक्सिजन आणि आवश्यक पोषक तत्त्वे पुरवतो. तसेच बाळाच्या रक्तातील टाकाऊ पदार्थ बाहेर काढण्याचं कामही करतो. "

 जप्त केलेल्या प्लॅसेंटाचे म्हणजेच गर्भनाळेचे (वाराचे) नमुने पुढील तपासणीसाठी पाकिस्तानमधील PIMS रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जप्त केलेल्या प्लॅसेंटाचे म्हणजेच गर्भनाळेचे (वाराचे) नमुने पुढील तपासणीसाठी पाकिस्तानमधील PIMS रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

मेयो क्लिनिकच्या माहितीनुसार, नैसर्गिक प्रसूतीनंतर काही वेळाने प्लॅसेंटाही त्याच मार्गाने बाहेर पडतो. याला प्रसूतीचा तिसरा टप्पा म्हटलं जातं. परंतु, बाळाचा जन्म सिझेरियन शस्त्रक्रियेद्वारे म्हणजेच सी सेक्शनद्वारे झाल्यास, त्याच शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टर गर्भाशयातून प्लॅसेंटा बाहेर काढतात.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सदफ तारिक यांच्या मते, प्लॅसेंटा म्हणजे वार हा आनुवंशिकदृष्ट्या गर्भाचाच एक भाग असतो.

"प्लॅसेंटा हा मानवी शरीरातील एक तात्पुरता अवयव आहे. तो आई आणि गर्भ यांच्यातील संपर्कासाठी तयार होतो. बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची गरज संपते, त्यामुळे तो शरीरातून बाहेर काढला जातो."

प्रसूतीनंतर प्लॅसेंटाचं काय केलं जातं?

डॉ. सदफ तारिक यांच्या म्हणण्यानुसार, "बाळाच्या जन्मानंतर प्लॅसेंटा हा वैद्यकीय कचरा (पॅथॉलॉजिकल वेस्ट) मानला जातो. पंजाब हॉस्पिटल व्यवस्थापन नियम आणि राष्ट्रीय जैवसुरक्षा नियमांनुसार त्याची विल्हेवाट लावली जाते. प्लॅसेंटा संसर्गाचा धोका असलेला वैद्यकीय कचरा असल्यामुळे त्याची ठराविक नियमांनुसार सुरक्षितपणे विल्हेवाट लावणं आवश्यक असतं."

त्यांनी सांगितलं की, प्रसूती कक्षात किंवा ऑपरेशन थिएटरमध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर लगेचच प्लॅसेंटा वेगळा करून पिवळ्या बायोहॅझार्ड कचऱ्याच्या पिवळ्या पिशवीत ठेवला जातो.

त्या म्हणाल्या, "ही गळती न होणारी (लीकेज-प्रूफ) विशेष पिशवी असते. अशा प्रकारचा वैद्यकीय कचरा सुरक्षित ठेवण्यासाठी ती तयार करण्यात आलेली असते. ही पिशवी इतर वैद्यकीय कचऱ्यापासून वेगळी ठेवली जाते. त्यानंतर ती पिशवी व्यवस्थित सील करून त्यावर प्लॅसेंटा असल्याचे चिन्ह लावले जाते."

पाकिस्तानी नियमांनुसार, बाळाच्या जन्मानंतर बाहेर काढलेला प्लॅसेंटा 24 तासांच्या आत नष्ट करणे बंधनकारक आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानी नियमांनुसार, बाळाच्या जन्मानंतर बाहेर काढलेला प्लॅसेंटा 24 तासांच्या आत नष्ट करणे बंधनकारक आहे.

"त्यानंतर प्लॅसेंटा प्रसूती कक्ष किंवा ऑपरेशन थिएटरमधून रुग्णालयातील मध्यवर्ती शीतगृहात नेला जातो. त्यामुळे तो सडत नाही किंवा कुजण्यापासून आणि त्यातून दुर्गंधी येण्यापासून सुरक्षित राहतो."

त्यांनी स्पष्ट केलं की, सध्याच्या नियमांनुसार प्लॅसेंटा बाहेर काढल्यानंतर तो 24 तासांपेक्षा जास्त काळ साठवून ठेवण्यास परवानगी नाही.

"त्यानंतर प्लॅसेंटासह अशा सर्व वैद्यकीय कचऱ्याची विशेष वैद्यकीय पद्धतीने 'इन्सिनरेशन' म्हणजेच उच्च तापमानाला जाळून विल्हेवाट लावली जाते. सरकारी असो किंवा खासगी रुग्णालय, सर्व ठिकाणी अशीच प्रक्रिया पाळली जाते."

त्यांनी पुढे सांगितलं की, सरकारमान्य कचरा व्यवस्थापन कंपन्या ही प्रक्रिया करतात. रुग्णालयांकडून त्यांच्याकडे हा वैद्यकीय कचरा दिला जातो, त्याची नियमित नोंद ठेवली जाते आणि या नोंदींची संबंधित यंत्रणेकडून सातत्याने तपासणी केली जाते.

प्लॅसेंटाचा वापर कशासाठी होतो?

डॉ. सदफ तारिक यांच्या मते, प्लॅसेंटा हा मातेच्या शरीराशी संबंधित अवयव असल्यामुळे त्यात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनसारखी स्त्री संप्रेरकं (हार्मोन्स) मोठ्या प्रमाणात असतात.

त्या पुढे म्हणाल्या की, जगभरात वैद्यकीय क्षेत्रात प्लॅसेंटाचा वापर अनेक औषधं तयार करण्यासाठी केला जातो. विशेषतः प्रसूतीनंतर महिलांमध्ये येणाऱ्या नैराश्याच्या (पोस्टपार्टम डिप्रेशन) उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमध्ये त्याचा प्रामुख्याने उपयोग केला जातो.

"काही संशोधनांनुसार शरीरातील लोहाचं प्रमाण वाढवण्यासाठी आणि प्रसूतीनंतर होणाऱ्या रक्तक्षयाच्या (ॲनिमिया) उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या काही औषधांमध्येही प्लॅसेंट उपयुक्त ठरू शकतो."

त्या म्हणाल्या की, "प्लॅसेंटाच्या आतील थरात जखम भरून येण्यास मदत करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे खोल जखमा, गंभीर भाजलेल्या जखमा, अल्सर, डोळ्यांच्या दुखापती आणि काही शस्त्रक्रियांमध्येही त्याचा वापर केला जातो."

HOTAच्या मॉनिटरिंग अधिकारी हिना कंवल यांनी बीबीसीला सांगितलं की, औषधनिर्मिती उद्योगात प्लॅसेंटाचा वापर केला जातो. त्याचबरोबर चीनमध्ये काही लोक त्याचा अन्न म्हणूनही वापर करतात.

त्या म्हणाल्या की, कॉस्मेटिक शस्त्रक्रिया आणि सौंदर्य उपचारांमध्येही प्लॅसेंटाला मोठी मागणी आहे. परंतु, पाकिस्तानमध्ये त्याची खरेदी-विक्री करण्यास बंदी आहे.

त्या पुढे म्हणाल्या की, या प्रकरणाचा तपास सुरू असून, रुग्णालयाच्या प्रशासनाच्या सहभागाशिवाय प्लॅसेंटा खासगी घरापर्यंत पोहोचणं शक्य नाही.

चीनमध्ये मानवी प्लॅसेंटाच्या व्यावसायिक विक्रीवर बंदी असली तरी काळ्या बाजारात त्याची विक्री सुरूच आहे.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चीनमध्ये मानवी प्लॅसेंटाच्या व्यावसायिक विक्रीवर बंदी असली तरी काळ्या बाजारात त्याची विक्री सुरूच आहे.

विशेष म्हणजे, चीन सरकारच्या नियंत्रणाखालील ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, चीनमध्ये मानवी प्लॅसेंटाच्या व्यावसायिक विक्रीवर बंदी असली तरी काळ्या बाजारात त्याची विक्री सुरूच आहे. तसेच अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरही वेगवेगळ्या नावांनी त्याची विक्री केली जात असल्याचे सांगितलं जातं.

ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, ऑनलाइन प्लॅसेंटा विकणाऱ्या एका व्यक्तीने सांगितले की, तो एक प्लॅसेंटा 360 युआनला (चिनी चलन) (सुमारे 5045 रूपये) विकतो, तर तोच मानवी प्लॅसेंटा 2000 युआन (सुमारे 28 हजार 38 रूपये) प्रति किलो दराने खरेदी केला जातो.

या अहवालात शांघाय पीपल्स हॉस्पिटलचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. हुआंग चेंगशेंग यांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, चीनमध्ये प्रसूतीनंतर आईला तिचा प्लॅसेंटा स्वतःकडे ठेवायचा आहे की त्याची विल्हेवाट लावायची, अशी विचारणा केली जाते.

"अनेक नवीन माता प्रसूतीनंतर प्लॅसेंटा घरी घेऊन जातात आणि त्याचे सेवन करण्याचा पर्याय निवडतात," असं डॉ. हुआंग चेंगशेंग यांनी ग्लोबल टाइम्सला सांगितलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)