लैंगिक संबंधांनंतर HPV लस काम करणं थांबवते का? पेनिस कॅन्सर टाळण्यासाठी पुरुष ही लस घेऊ शकतात?

    • Author, डॉक्टर हिमानी,
    • Role, बीबीसीसाठी
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे नेमके काय? सोप्या भाषेत सांगायचे तर हा गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग आहे.

आज जगभरातील महिलांमध्ये सर्वात जास्त आढळणाऱ्या कर्करोगांपैकी हा एक गंभीर प्रकार मानला जातो.

धक्कादायक बाब म्हणजे भारतात विशेषतः ग्रामीण भागातील महिलांमध्ये या कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.

या आजाराचं वेळेवर निदान आणि लस या संकटावर मात कशी करू शकते? जाणून घेऊया.

सर्व्हायकल कॅन्सरच्या एकूण प्रकरणांपैकी तब्बल 95 % प्रकरणांमागे ह्युमन पॅपिलोमा (HPV) हा व्हायरस असतो. यातही HPV 6, 11, 16 आणि 18 हे प्रकार सर्वात घातक मानले जातात.

हा व्हायरस प्रामुख्याने लैंगिक संबंधांतून पसरतो. मात्र कधीकधी केवळ त्वचेच्या स्पर्शानेही याचा संसर्ग होऊ शकतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एचपीव्हीचा संसर्ग झालेल्या प्रत्येक महिलेला कॅन्सर होत नाही.

ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे किंवा ज्यांना हा संसर्ग दीर्घकाळ राहतो. त्यांच्यामध्येच कॅन्सरचा धोका अधिक असतो.

सर्व्हायकल कॅन्सरची लक्षणे आणि निदान

लक्षणे

  • सामान्य रक्तस्राव
  • अंगावरून पांढरे पाणी जाणे
  • ओटीपोटात वेदना
  • कंबर दुखणे
  • लघवी करताना जळजळ होणे

निदान कसे केले जाते?

आजाराची व्याप्ती तपासण्यासाठी सीटी स्कॅन, एमआरआय किंवा पीईटी सीटी स्कॅन यांसारख्या आधुनिक चाचण्यांचा वापर केला जातो.

मात्र, सर्व्हायकल कॅन्सरचे अचूक निदान करण्यासाठी बायोप्सी अत्यंत महत्त्वाची ठरते. या तपासणीमुळे कर्करोग कोणत्या स्टेजला (टप्प्यावर) आहे हे स्पष्ट होते.

एचपीव्ही लस घेतल्यामुळे सर्व्हायकल कॅन्सरपासून बचाव करणे शक्य आहे. भारतात याच्या लशीचे सध्या 4 प्रकार उपलब्ध आहेत- गार्डसिल 4, गार्डसिल 9, सर्व्हारिक्स (Cervarix), सर्व्हावॅक (Cervavac)

यापैकी गार्डसिल आणि सर्व्हावॅक या लस एचपीव्हीच्या जास्त घातक प्रकारांपासून संरक्षण देतात.

लसीकरणाचे डोस

  • 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुले - 2 डोस
  • 15 ते 26 वर्षे वयोगटातील तरुणी - 3 डोस
  • 26 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती

एचपीव्ही लस ही लैंगिक संबंध येण्यापूर्वी घेणे सर्वात जास्त फायदेशीर मानले जाते. मात्र, लग्नानंतर किंवा शारीरिक संबंधांनंतरही ही लस घेता येऊ शकते.

अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रथम शरीरात एचपीव्ही व्हायरसचा संसर्गाबद्दल खात्री करणे आवश्यक असते. जर संसर्ग नसेल तर ही लस अधिक प्रभावी ठरते.

ही लस पूर्णपणे सुरक्षित असून याचे कोणतेही गंभीर दुष्परिणाम नाहीत. संशोधनानुसार, या लशीमुळे गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून (Cervical Cancer) 90 टक्क्यांहून जास्त प्रमाणात संरक्षण मिळू शकते.

विशेष म्हणजे केवळ महिलाच नाही तर पुरुष देखील स्वतःच्या आरोग्यासाठी ही लस घेऊ शकतात.

एचपीव्ही लसीकरणाबाबत समाजात अनेक गैरसमज पसरलेले आहेत. महिला आणि पुरुषांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या या लशीबद्दलचे वास्तव जाणून घेणे गरजेचे आहे.

लशीबाबतचे गैरसमज आणि सत्य

गैरसमज- ही लस फक्त महिलांसाठीच आहे.

सत्य- मुले आणि पुरुष देखील ही लस घेऊ शकतात. यामुळे त्यांना एचपीव्ही व्हायरसमुळे होणाऱ्या विविध कर्करोगांपासून संरक्षण मिळते.

गैरसमज- या लशीचा लैंगिक क्षमतेवर परिणाम होतो.

सत्य- हे पूर्णपणे चुकीचे आहे. या लसीचा लैंगिक क्षमतेवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही हा केवळ एक आधारहीन गैरसमज आहे.

गैरसमज- ही लस फक्त सर्व्हायकल कॅन्सरपासूनच वाचवते.

सत्य- ही लस महिलांमधील गर्भाशय मुख, योनी आणि वल्व्हर कॅन्सरपासून संरक्षण देतेच पण त्यासोबतच पुरुषांमधील जननेंद्रियाचा कॅन्सर आणि घशाच्या कॅन्सरपासूनही बचाव करते.

गैरसमज- शारीरिक संबंधांनंतर ही लस काम करत नाही.

सत्य- एकदा शारीरिक संबंध आल्यानंतर लस कुचकामी ठरते हे म्हणणे चुकीचे आहे. जोपर्यंत शरीराला एचपीव्ही संसर्ग झालेला नाही तोपर्यंत ही लस कधीही घेता येते आणि ती प्रभावी ठरते.

गैरसमज- या लसीचे गंभीर दुष्परिणाम होतात.

सत्य- एचपीव्ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे. फक्त इंजेक्शन दिलेल्या जागी थोडी सूज येऊ शकते किंवा काही मोजक्या व्यक्तींमध्ये सौम्य ताप येऊ शकतो जे अगदी सामान्य आहे.

30 ते 65 वर्षे वयोगटातील महिलांनी अगदी त्यांनी लस घेतली असली तरीही ही तपासणी नक्की करून घेतली पाहिजे. यामध्ये पॅप स्मिअर (Pap smear) चाचणी दर 3 वर्षांनी एकदा आणि एचपीव्ही डीएनए (HPV DNA) चाचणी दर 5 वर्षांनी एकदा करणे आवश्यक आहे.

एचपीव्ही लस घेतल्यास आपण सर्व्हायकल कॅन्सर रोखू शकतो. तसेच नियमित तपासणीमुळे सुरुवातीच्या काळातच आजार ओळखून त्यावर उपचार केल्यास तो पूर्णपणे बरा होऊ शकतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)