You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डोनाल्ड ट्रम्प आणि पोप लिओ यांच्यातील वाद: नेमके कोणते 3 मुद्दे केंद्रस्थानी आहेत?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पोप लिओ चौदावे यांच्यात इराण युद्धाच्या मुद्द्यावर उघडपणे वाद सुरू झाला आहे. पोप लिओ यांनी पहिल्यांदाच थेट ट्रम्प यांचं नाव घेऊन टीका केल्यामुळे हा वाद आणखी चिघळला आहे.
मे 2025 मध्ये अमेरिकेत जन्मलेले पहिले पोप म्हणून निवड झालेले पोप लिओ XIV (चौदावे) हे पूर्वीचे कार्डिनल रॉबर्ट प्रीव्होस्ट. ते सुरुवातीला खूप संयमाने आणि कमी बोलणाऱ्या शैलीत वागत होते. त्यांच्या आधीचे पोप फ्रान्सिस मात्र ट्रम्प प्रशासनावर वारंवार आणि उघडपणे टीका करत असत.
मात्र, व्हॅटिकन आणि व्हाईट हाऊस यांच्यातील तणाव गेल्या काही महिन्यांपासून वाढत होता. या नवीन वादामुळे हा मतभेद आता उघडपणे समोर आला आहे.
परराष्ट्र धोरण
रविवारी हा वाद आणखी वाढला. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर मोठी पोस्ट करून पोप यांच्यावर टीका केली. त्यांना 'गुन्हेगारीविरोधात कमकुवत आणि परराष्ट्र धोरणासाठी भयंकर' असं म्हटलं.
"इराणकडे अण्वस्त्रं असणे ठीक आहे, असं मानणारा पोप मला नकोय," असं ट्रम्प यांनी लिहिलं.
ते पुढे म्हणाले की, "अमेरिकेनं व्हेनेझुएलावर हल्ला केला हे चुकीचं आहे, असं मानणारा पोप मला नकोय. कारण व्हेनेझुएलातून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज अमेरिकेत येतात, तसेच तिथल्या तुरुंगातील गुन्हेगार, खुनी आणि ड्रग तस्कर लोकांना सोडून अमेरिकेत पाठवलं जातं," असं त्यांनी म्हटलं.
नंतर त्यांनी एक एआयने तयार केलेला फोटो पोस्ट केला. त्यात ते स्वतः येशूसारखे दिसत होते आणि एका व्यक्तीला 'बरं करत' असल्यासारखं दाखवलं होतं. हा फोटो धार्मिक नेते आणि अनेक टीकाकारांना आवडला नाही. त्यामुळे तो फोटो नंतर हटवण्यात आला.
पोप लिओ चौदावे यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या त्या इशाऱ्याचा निषेध केला होता. ट्रम्प म्हणाले होते इराणने अण्वस्त्राबाबतच्या वाटाघाटी आणि स्ट्रेट ऑफ होर्मुझसंबंधी अटी मान्य केल्या नाही तर संपूर्ण इराणी संस्कृती नष्ट केली जाऊ शकते.
पोप यांनी या धमकीचं वर्णन 'अत्यंत अस्वीकार्य' आहे अशा शब्दांत केलं. आणि त्यांनी कॅथोलिकांना राजकीय नेत्यांवर दबाव आणून 'शांततेसाठी काम करण्याचं' आवाहनही केलं.
काही दिवसांपूर्वीच पोप लिओ यांनी ट्रम्प यांचं थेट नाव घेऊन त्यांच्यावर टीका केली होती.
"मला सांगण्यात आलं आहे की, ट्रम्प यांनी नुकतंच युद्ध थांबवायची इच्छा व्यक्त केली आहे. आशा आहे की, ते यातून बाहेर पडण्याचा (ऑफ रॅम्प) मार्ग शोधत आहेत," असं त्यांनी 31 मार्च रोजी पत्रकारांना म्हटलं होतं.
रविवारी 70 वर्षीय पोप यांनी पुन्हा एकदा नेत्यांना रक्तपात थांबवण्याचं आवाहन केलं. त्यांनी युद्धामागे 'सर्वशक्तिमान असल्याचा भ्रम' कारणीभूत असल्याचे म्हटलं होतं.
पोप लिओ यांची इराणबाबतची भूमिका त्यांनी इतर अनेक मुद्द्यांवर घेतलेल्या शांतता आणि संवादाच्या भूमिकेचाच पुढचा भाग आहे.
गेल्या वर्षी निवड झाल्यानंतर काही दिवसांतच पोप यांनी गाझामध्ये तत्काळ युद्धबंदी करावी, ओलिसांना सोडावं आणि गरजू लोकांसाठीची मदत निर्बंधांशिवाय पोहोचू द्यावी, अशी मागणी केली होती.
ऑगस्ट 2025 मध्ये पोप लिओ यांनी गाझामधील परिस्थितीवर टीका केली होती. त्यांनी पॅलेस्टिनी लोकांना 'सामूहिक शिक्षा देणे' आणि जबरदस्तीने स्थलांतर करणं चुकीचं असल्याचं म्हटलं, तसेच गाझामधील परिस्थिती 'अस्वीकार्य' असल्याचं वर्णन केलं होतं.
ख्रिसमसच्या प्रवचनात, जगातील 1.4 अब्ज कॅथलिकांचे नेते असलेल्या पोप यांनी गाझातील शिबिरांचा उल्लेख केला. ते म्हणाले होते की, "पाऊस, वारा आणि थंडीसाठीपासून लोकांचं संरक्षण करण्यासाठी शिबिरातील तंबू अपुरे आहेत."
त्या वेळी ट्रम्प आणि पोप यांच्यात गाझाबाबत उघडपणे वाद झाला नाही. परंतु, व्हॅटिकनमधील अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितलं की, पोप यांनी नैतिक आणि कायदेशीर पद्धतीने केलेली टीका त्यांना अस्वस्थ करणारी वाटली, कारण ती अमेरिका आणि इस्रायलच्या धोरणांवर अप्रत्यक्ष टीका म्हणून पाहिली गेली.
यावर्षी जानेवारीमध्ये अमेरिकन सैन्याने व्हेनेझुएलाचे तत्कालीन अध्यक्ष निकोलस मादुरो यांना कॅराकसमध्ये अटक केली. त्यांना न्यूयॉर्कला न्यायालयीन खटल्यासाठी आणलं, यानंतर पोप यांनी चिंता व्यक्त केली होती.
"व्हेनेझुएलाच्या लोकांचे हित सर्व गोष्टींपेक्षा महत्त्वाचे आहे. त्यामुळे हिंसाचारावर मात करण्यासाठी न्याय आणि शांततेचा मार्ग स्वीकारायला हवा," असं त्यांनी म्हटलं.
पोप यांनी व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाचा आदर करणे, संविधानात नमूद केलेल्या कायद्याचे पालन करण्याचे आणि मानवी तसेच नागरी हक्कांचे पूर्ण संरक्षण करण्याचे आवाहन केले.
स्थलांतर
स्थलांतर (इमिग्रेशन) हेही वादाचे आणखी एक मोठं कारण ठरलं आहे.
पोप लिओ यांनी ट्रम्प यांच्या कठोर स्थलांतर धोरणांवर (इमिग्रेशन पॉलिसी) वारंवार टीका केली आहे. त्यांनी हे प्रकरण म्हणजे गॉस्पेलच्या धार्मिक शिकवणींनुसार दया आणि मानवी प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याचे म्हटलं आहे.
नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांनी सांगितलं की, अमेरिकेत परदेशी नागरिकांना 'खूपच अनादराने वागवलं' जात आहे. अमेरिकन कॅथलिक बिशपांनीही मोठ्या प्रमाणावर केलेल्या हकालपट्टी (डिपोर्टेशन) आणि इमिग्रेशन कारवायांमुळे लोकांमध्ये भीती आणि चिंता वाढत असल्याचा इशारा दिला होता.
"लोकांशी माणुसकीने वागण्याचे मार्ग शोधायला हवेत, असं मला वाटतं," असं पोप लिओ यांनी म्हटलं. मात्र त्यांनी हेही मान्य केले की "प्रत्येक देशाला कोण, कसे आणि केव्हा देशात प्रवेश करेल हे ठरवण्याचा अधिकार आहे."
गेल्या ऑक्टोबरमध्ये सेंट पीटर स्क्वेअरमध्ये दिलेल्या भाषणात पोप यांनी कॅथलिकांना सांगितलं की, स्थलांतरितांशी 'उदासीनता किंवा भेदभावाच्या नजरेनी वागू नये'.
नंतर त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणांचा चर्चच्या 'प्रो-लाइफ' (विश्वास किंवा नैतिक भूमिका) शिकवणींशी मेळ बसतो का, असा प्रश्न उपस्थित केला. या वक्तव्यांवर काही पुराणमतवादी कॅथलिक नेत्यांमधून प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
धर्म आणि राजकीय अधिकार
रविवारी (12 एप्रिल) ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये केवळ परराष्ट्र धोरणावरच नव्हे, तर पोप यांच्या भूमिकेवरही टीका करण्यात आली. त्यांनी म्हटलं की, "मला असा पोप नको, जो अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर टीका करतो. मला जनतेनी ज्या कारणासाठी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलंय तेच काम मी करत आहे."
पोप अमेरिकन असल्यामुळेच त्यांची निवड झाली, असा दावा ट्रम्प यांनी केला. "मी व्हाईट हाऊसमध्ये नसतो तर लिओ व्हॅटिकनमध्ये पोप नसते," असंही त्यांनी म्हटलं.
पत्रकारांनी त्या पोस्टबद्दल विचारल्यावर ट्रम्प यांनी म्हटलं की, "माझ्या मते ते फार चांगलं काम करत नाहीत. त्यांना गुन्हेगारी आवडतात, असं मला वाटतं."
फ्लोरिडाहून वॉशिंग्टनला परतल्यानंतर विमानतळावर बोलताना ट्रम्प यांनी, "मी काही पोप लिओंचा चाहता नाही," असं म्हटलं.
मात्र सोमवारी, आफ्रिकेच्या 11 दिवसांच्या दौऱ्याला सुरुवात करताना विमानात बोलताना पोप लिओ चौदावे यांनी ट्रम्प यांच्यावर थेट भाष्य करण्यास नकार दिला.
"मी राजकारणी नाही, आणि मला त्यांच्याशी वाद घालायचा नाही," असं त्यांनी म्हटले.
"मी युद्धाविरुद्ध ठामपणे बोलत राहीन. शांतता, संवाद आणि अनेक देशांमधील सहकार्य वाढवण्याचा प्रयत्न करीन," असं ते म्हणाले.
त्यांनी पुढे म्हटलं की, त्यांना 'ट्रम्प यांच्या प्रशासनाची कोणतीही भीती नाही', आणि ते गॉस्पेलच्या (धार्मिक शिकवणी) बाजूने 'जोरदार'पणे बोलत राहतील.
एका असोसिएटेड प्रेसच्या सर्वेक्षणानुसार, 2024 च्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला 55 टक्के कॅथलिक मतदारांनी मतदान केले. अमेरिकेच्या जनगणनेनुसार, कॅथलिक लोकसंख्या सुमारे एक-पंचमांश इतकी आहे, ज्यात उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हेन्स यांचाही समावेश आहे.
ट्रम्प यांचं प्रशासन कडक भूमिका घेणाऱ्या इव्हॅन्जेलिकल प्रोटेस्टंट नेत्यांशी जवळचे संबंध ठेवतं आणि इराण युद्धाला ते काही प्रमाणात धार्मिक दृष्टिकोनातूनही मांडत आहे.
तज्ज्ञांचे मत काय आहे?
तज्ज्ञांच्या मते, पोप यांच्या भूमिकेत आणि बोलण्याच्या पद्धतीत झालेला बदल दर्शवतो की, ते जागतिक स्तरावर ट्रम्प आणि त्यांच्या परराष्ट्र धोरणांना नैतिक विरोध म्हणून काम करू इच्छित आहेत.
व्हॅटिकनचा अभ्यास करणारे इटलीचे प्रा. मॅसिमो फॅगिओली यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं की, "ते अमेरिकन असल्यामुळे व्हॅटिकनवर ट्रम्प यांच्या धोरणांबाबत मवाळ भूमिका घेतल्याचा आरोप होऊ नये, असं त्यांना वाटत असावं."
ट्रिनिटी कॉलेज डबलिनचे प्रा. फॅगिओली म्हणाले की, "पोप लिओ बोलताना नेहमीच काळजीपूर्वक बोलतात. हे जे घडलं तो योगायोग नव्हता."
शिकागो कार्डिनल ब्लेस क्युपिच यांनी रॉयटर्सला सांगितलं की, पोप लिओ हे पूर्वीच्या पोपची परंपरा पुढे नेत आहेत, जे जागतिक नेत्यांना युद्ध सोडून शांततेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करत आले आहेत.
"फरक एवढाच आहे की... संदेश देणाऱ्याचा आवाज बदलला आहे. आता अमेरिकन आणि संपूर्ण इंग्रजी भाषिक जगाला हा संदेश त्यांच्या परिचित भाषेत ऐकायला मिळत आहे," असे ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय कॅथलिक शांतता चळवळ पॅक्स क्रिस्टीच्या माजी नेत्या मेरी डेनिस यांनी सांगितलं की, पोप लिओ यांच्या अलीकडच्या वक्तव्यांमधून आणि ट्रम्प यांना केलेल्या थेट आवाहनातून सततच्या हिंसाचारामुळे ते खूप दुखी आणि व्यथित असल्याचे दिसते.
त्या म्हणाल्या की, "ते सततच्या हिंसाचारामुळे थकलेल्या आणि धाडसी नेतृत्वाची गरज असलेल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.