You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं इंदू मिल येथील स्मारक कधी पूर्ण होईल? सद्यस्थिती काय आहे? - ग्राऊंड रिपोर्ट
- Author, अल्पेश करकरे
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 6 मिनिटे
"स्मारकाचं स्ट्रक्चरल काम बहुतांश झालेलं आहे. मात्र, पुतळा आणि पूर्ण फिनिशिंगचं काम होईपर्यंत अडीच ते तीन वर्षे जातील असं दिसतंय. म्हणजे 2028-29 च्या निवडणुकीच्या आसपास स्मारक लोकांना खुलं होईल असं दिसतंय."
ही माहिती दिली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी.
2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमिपूजन झाले आणि कामाला सुरुवात झाली. मात्र, 2026 उजाडलं तरीही हे काम पूर्ण झालेलं नाही.
11 वर्षांत सरकारकडून अनेकदा स्मारक पूर्ण होण्याच्या 'अंतिम तारखा' दिल्या गेल्या. मात्र, प्रत्यक्षात स्मारक पूर्ण होण्याची प्रतीक्षा आजही करावी लागते आहे.
महाराष्ट्र सरकारकडून यावेळी सांगण्यात येतंय की, 2026 डिसेंबर ते 2027 च्या सुरुवातीपर्यंत बाबासाहेबांच्या स्मारकाचे काम पूर्ण करू.
मात्र, कामाची प्रत्यक्ष सद्यस्थिती वेगळी असून आणखी दोन ते तीन वर्षे स्मारकास लागण्याचा अंदाज शिल्पकार आणि जाणकार व्यक्त करत आहेत.
स्मारकाची सद्यस्थिती काय आहे?
बीबीसी मराठीने इंदू मिल येथे जाऊन स्मारकाची आणि गाझियाबादमध्ये जाऊन बाबासाहेबांच्या पुतळ्याची सद्यस्थिती जाणून घेतली आहे.
8 एप्रिल 2026 रोजी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत दादर इंदू मिल येथे पाहणी केली.
दरम्यान स्मारकातील विविध वास्तूंचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळालं. अनेक कामगार प्रवेशद्वार, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, वाहनतळ, ध्यानधारणा केंद्र, परीक्रमा पथ, स्मरणिका विक्री केंद्र, प्रतीक्षालय, उपहारगृह, प्रशासकीय कार्यालय, स्वच्छतागृह, बागा यावर काम करताना दिसत होते.
स्मारकाची मुख्य इमारत, पदपथ आणि इतर स्ट्रक्चरचं काम काही ठिकाणी संथ गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळालं, तर पुतळ्याच्या बुटांचे पार्ट्स एका बाजूला ठेवले असल्याचंही पाहायला मिळालं.
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या गॅस तुटवड्यासह इतर गोष्टींमुळे वेल्डिंगसाठी आणि इतर कामांसाठी लागणारा गॅस, तसंच साहित्य उपलब्ध नसल्याने काही काम ठप्प असल्याचे देखील पाहायला मिळालं.
प्रकल्पातील सहाय्यभूत इमारतींचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे.
350 फूट पुतळा ज्यावर ठेवला जाईल, त्या 100 फूट पादपीठाच्या (पेडस्टल) आरसीसीचे काम चालू आहे. त्या पादपीठावर पुतळ्याचा सांगाडा उभा केला जाईल. सांगाड्याचे काम दमण, भिलाई आणि नवी मुंबईत सुरु आहे अशी माहिती पाहणीच्या वेळी मिळाली.
विविध कामांसाठी दादर आणि इतर ठिकाणी 500 पेक्षा अधिक कामगार व कर्मचारी काम करत आहेत. 55 विविध कंत्राटदार हे काम करत आहेत, अशी माहिती एमएमआरडीए प्रशासनाने दिली.
ही बातमीही वाचा :बॅरिस्टर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची वकिली कशी होती?
एमएमआरडीएच्या म्हणण्यानुसार, एकूण स्मारकाचं 56% तर पुतळ्याचं 25% काम पूर्ण झालं असून डिसेंबर 2026 पर्यंत स्मारक व पुतळ्याचे काम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
या कामासंदर्भात पाहणी व एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यानंतर रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, "स्मारकाचं स्ट्रक्चरल काम बहुतांश झालेलं आहे. मात्र पुतळा आणि पूर्ण फिनिशिंगचं काम होईपर्यंत अडीच ते तीन वर्षे जातील असं दिसतंय. म्हणजे पुढच्या 2028-29 च्या निवडणुकीच्या आसपास होईल असं दिसतंय."
प्रशासकीय दिरंगाई आणि देखरेख समितीचा अभाव यामुळे कामाचा वेग मंदावलाय, असा मुद्दा आनंदराज आंबेडकर यांनी उपस्थित केला.
या संदर्भात आनंदराज आंबेडकर म्हणाले की, "या स्मारकासंदर्भात एक समिती नेमून तिच्याकडे काम सुपूर्द करायला हवं होतं. कामाबाबत कंट्रोल नसल्यामुळे काम धीम्या गतीनं होतंय. पुतळा बनायला आता दीड ते दोन वर्षे जातील त्यामुळे हे काम 2028-29 मध्ये होईल असं वाटतंय.
"या कामासंदर्भात एक समिती हवी. पुढे देखील हे काम झाल्यानंतर देखभाल करण्यासाठी एक समिती असायला हवी. सरकारने हे आतापासूनच सगळं प्लॅनिंग करायला हवं. मात्र, दुर्दैवाने काही दिसत नाही. सरकारने गांभीर्याने याचा विचार करून हे करायला हवं."
स्मारकाचे काम एकूण 56 टक्के पूर्ण - प्रशासनाची माहिती
एमएमआरडीएच्या माहितीनुसार शापूरजी पालनजी व इतर कंत्राटदारांमार्फत स्मारकाचे काम सुरू आहे. तर पुतळ्याचे काम गाझियाबादमध्ये शिल्पकार अनिल सुतार करत आहेत.
एमएमआरडीएच्या अधिकृत माहितीनुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंदू मिल येथील स्मारकाचं एकूण काम 56% पूर्ण झालं आहे. त्यानुसार -
- प्रवेशद्वार – 95%
- व्याख्यान वर्ग – 98%
- ग्रंथालय – 99%
- प्रेक्षागृह – 92%
- वाहनतळ – 98%
- पदपथ – 55%
- मुख्य स्मारक बांधकाम – 55%
- पुतळा – 25%
- तलाव – 90%
अशी कामाची सद्यस्थिती आहे.
स्मारक प्रकल्पाला आतापर्यंत सुमारे 555.49 कोटी रुपये खर्च झालाय. पण पूर्ण होईपर्यंत खर्च 1089.95 कोटींवर जाण्याचा अंदाज आहे आणि तोही वाढू शकतो, अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
पुतळ्याची सद्यस्थिती काय?
स्मारकातील महत्त्वाचा पुतळा हा उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये तयार होतोय. प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या वर्कशॉपमध्ये पुतळ्याचं निर्माण होत आहे. राम सुतार यांच्या निधनानंतर आता त्यांचे सुपुत्र अनिल सुतार हे काम पाहत आहेत.
बीबीसीला सद्यस्थितीत कशाप्रकारे बाबासाहेबांच्या पुतळ्याचे काम सुरू आहे याची माहिती सुतार यांनी दिली.
350 फूट उंचीचा हा पुतळा 100 फूटांच्या चबुतऱ्यावर उभा केला जाणार आहे. एकूण 450 फूट उंचीचा हा पुतळा दिमाखात उभा राहणार आहे. थोडक्यात 50 मजली इमारतीएवढी उंची या पुतळ्याची आहे.
ही बातमीही वाचा : डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे 'बाबासाहेब' कसे बनले?
या पुतळ्याचे बूट पूर्ण होऊन स्मारक स्थळी पोहोचले आहेत, तर वरील 10 फूटांचे काम पूर्ण झालं असून येत्या काही दिवसांत तेही मुंबईत दाखल होतील. उपलब्ध असलेल्या ब्राँझनुसार 50 फूटांपर्यंतच्या पुतळ्याचे कास्टिंगचे काम पूर्ण झालं असून वेल्डिंगचं काम सुरू आहे. साधारण पुतळ्याचं 11% काम पूर्ण झालं असल्याचं अनिल सुतार यांनी बीबीसीला सांगितलं.
मात्र, या पुतळ्यासाठी लागणारे धातू सध्या उपलब्ध नसल्यामुळे 25 टन धातू बाहेरील देशातून मागवण्यात आले आहे. त्यानंतर पुन्हा कास्टिंगचं काम सुरू होईल, अशी माहिती वर्कशॉपमध्ये बीबीसीला मिळाली.
आखाती युद्धामुळे तांबे व 'एलपीजी'चे दर वाढले आहेत. उद्योगांमध्ये रोजगाराच्या अडचणी आल्याने ओतकाम करणारे कारागीर गावी गेले आहेत त्यामुळे देखील पुतळा बनवताना अडचणी येत असल्याबाबत वर्कशॉप मध्ये माहिती मिळाली.
"या डिसेंबरपर्यंत हे काम होणं शक्य नाही. या परिस्थितीत आम्ही इथे काम करतोय, त्यात ही डेडलाईन शक्य नाही. आम्ही सरकारला सांगितलं आहे, मुबलक पैसे द्या. त्यानुसार दिवस-रात्र काम करून लवकर याचं काम पूर्ण करू शकू. डिसेंबरपर्यंत होणं शक्य नाही. 27 डिसेंबरपर्यंत आम्हाला पैसे आणि साहित्य मुबलक मिळालं तर प्रयत्न करू शकू," असं अनिल सुतार यांनी सांगितलं.
स्मारकाला उशीर होण्याचं नेमकं कारण काय?
एमएमआरडीएमधील काही अधिकाऱ्यांनी गोपनीयतेच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार हे काम वेळेतच सुरू होतं. पण गेल्या काही वर्षांत अनेक कारणांनी याला उशीर झाला.
त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची 100 फूटांनी वाढवण्याचा नवा प्रस्ताव समोर आला. पुतळ्याची उंची वाढल्याने त्या अनुषंगाने पायाची रचना बदलावी लागली. त्याचे तीन आराखडे सरकारकडे सादर करण्यात आले. त्यानंतर मंजुरी मिळाली आणि काही काळ प्रक्रिया रखडली.
तसेच, सुरुवातीला CRZ आणि जागेच्या मंजुऱ्या यावरून उशीर झाला. कोविड महामारीमुळे निधी व साहित्य यांना फटका बसला. युक्रेन आणि सध्या आखाती देशातील तणावाच्या परिस्थितीमुळे साहित्याचा तुटवडा निर्माण झाला. तसेच आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम झाला.
अतिवृष्टी आणि निधीची कमतरता यामुळेही प्रकल्पाला उशीर झाला अशा विविध कारणाने या प्रकल्पावर गेल्या काही वर्षात परिणाम झाला आहे असे प्रशासन, शिल्पकार, कंत्राटदार कंपनीच्या वतीने सांगण्यात आलं.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री काय म्हणाले?
गेल्या काही वर्षांत बाबासाहेबांच्या या स्मारकाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल, अशी अनेकदा आश्वासनं देण्यात आली.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की, 26 डिसेंबरपर्यंत हे स्मारक पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे ही डेडलाईनही हुकण्याची शक्यता आहे.
ही बातमीही वाचा : 'जय भीम' हा नारा कुणी दिला?
यासंदर्भात ते म्हणाले की, "स्मारकाचे काम अत्यंत प्रगतीपथावर आहे. पैशांची कमतरता आम्ही पडू दिलेली नाही. आमचे अनेक नेते प्रत्यक्ष पाहणी करत आहेत. मी स्वतःही पुन्हा एकदा जाणार आहे. कोणाला काही गैरसमज असतील तर ते असू नयेत. सर्वांनाच बाबासाहेबांचे स्मारक पाहण्याची उत्कंठा आहे. त्यामुळे योग्य आणि चांगलं स्मारक 26 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत."
पुढे संजय शिरसाट म्हणाले की, "युद्धाचा फटका सगळ्यांनाच बसला आहे. त्यामुळे पुतळ्याच्या कामात अडथळा निर्माण होईल आणि जे काही म्हणणे शिल्पकार व स्मारक निर्माण कंपनीचा असेल त्यानुसार आम्ही योग्य निर्णय घेऊ आणि हा प्रकल्प योग्यरीत्या पूर्ण करू."
बाबासाहेबांच्या स्मारकासंदर्भात सरकार प्रशासन 2026 किंवा 2027 च्या सुरुवातीपर्यंत काम पूर्ण करण्याचा उद्दिष्ट असल्याबाबत सांगत असलं, तरी प्रत्यक्ष प्रगती आणि अभ्यासकांच्या मते हे काम 2028-29 च्या दरम्यान पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
2028 किंवा 29 वर्ष स्मारकासाठी उजाडले तर त्या काळात लोकसभा निवडणुकीच वातावरण असेल. त्यामुळे हा मुद्दा त्या काळात आणखी चर्चेला जाऊ शकतो. त्यामुळे सर्वसामान्यांना स्मारक कधी पाहायला मिळतं हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)