NEET पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून आणखी एका प्राध्यापिकेला अटक; मनिषा मांढरे कोण आहेत?

NEET परीक्षा

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

NEET पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने अर्थात CBI ने पुण्यातून आणखी एका आरोपीला अटक केलीय. मनिषा मांढरे असं आरोपीचं नाव आहे.

आरोपी मनिषा मांढरे या NEET-UG 2026 परीक्षेच्या प्रक्रियेशी संबंधित होत्या. राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात NTA कडून मांढरेंची तज्ज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आली होती.

त्यांना वनस्पतिशास्त्र (Botany) आणि प्राणिशास्त्र (Zoology) विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा पूर्ण अ‍ॅक्सेस म्हणजे प्रश्नपत्रिकांपर्यंत पोहोचण्याची परवानगी होती असं समोर आलं आहे.

पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत.

यापूर्वी पुण्यातूनच मूळच्या लातूरच्या असलेल्या पी.व्ही. कुलकर्णी यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयनं कुलकर्णी यांचा उल्लेख या पेपरफुटी प्रकरणातील 'मुख्य सूत्रधार' असा केला आहे.

पी. व्ही. कुलकर्णी यांना सखोल चौकशीनंतर पुण्यात अटक करण्यात आल्याचं, सीबीआयनं स्पष्ट केलं आहे.

पी. व्ही. कुलकर्णींच्या अटकेसंदर्भातील सविस्तर बातमी तुम्ही इथे वाचू शकता.

मनिषा मांढरे कोण आहेत?

मनीषा मांढरे या पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. वनस्पतिशास्त्र विषयाच्या वरिष्ठ प्राध्यापिका म्हणून त्या कार्यरत आहेत.

या प्रकरणात नाव आढळल्यानं सीबीआयनं त्यांची सखोल चौकशी केली आणि त्यानंतर दिल्लीमध्ये त्यांना अटक करण्यात आली.

मनीषा मांढरे या NEET UG 2026 परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होत्या.

NTA कडून त्यांना तज्ज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्या वनस्पतिशास्त्र (Botany) आणि प्राणिशास्त्र (Zoology) विषयांच्या प्रश्नपत्रिक पूर्णपणे हाताळू शकत होत्या.

परीक्षा नेमकी का रद्द करण्यात आली?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे संग्रहित छायाचित्र
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एप्रिल 2026 दरम्यान मनीषा मांढरेंनी पुण्यातील मनिषा वाघमारे यांच्या माध्यमातून संभाव्य NEET परीक्षार्थींना गोळा केलं आणि पुण्यातील स्वतःच्या निवासस्थानी कोचिंगचे विशेष वर्ग घेतले.

मनिषा वाघमारेंना 14 मे 2026 रोजी अटक करण्यात आलीय.

या वर्गांमध्ये मनीषा मांढरे यांनी वनस्पतिशास्त्र आणि प्राणिशास्त्र विषयांतील विविध प्रश्न समजावून सांगितले आणि त्याबाबत माहिती दिली.

विद्यार्थ्यांना हे प्रश्न वहीत लिहून घेण्यास तसेच पाठ्यपुस्तकांमध्ये चिन्हांकित करण्यास सांगण्यात आलं. यापैकी बहुतेक प्रश्न 3 मे 2026 रोजी झालेल्या NEET UG 2026 च्या प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचं आढळलं आहे.

गेल्या 24 तासांत CBI ने देशभरातील सहा ठिकाणी छापे टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, बँक स्टेटमेंट्स आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. जप्त साहित्याचे सविस्तर विश्लेषण सुरू आहे.

या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण 9 आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी 5 आरोपींना न्यायालयात हजर करून सविस्तर चौकशीसाठी 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काल अटक करण्यात आलेल्या इतर दोन आरोपींना पुणे न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीला हलवण्यात आलं असून, त्यांना दिल्ली न्यायालयात हजर करण्यात येत आहे.

मनिषा मांढरे कार्यरत असलेल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या काय म्हणाल्या

मनिषा मांढरे ज्या महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत, त्या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे यांनी ANI या वृत्तसेवा संस्थेशी बोलताना याबाबतची माहिती त्यांना माध्यमांमधूनच मिळाली, असं सांगितलं.

"वरिष्ठ प्राध्यापिका मनिषा मांढरे यांना CBI ने अटक केल्याचे समजले. त्या गेली 24 वर्षे येथे कार्यरत आहेत आणि गोपनीयतेच्या अटींनुसार त्या NTA सोबत काम करत होत्या.

मांढरेंच्या सर्व्हिस बूकनुसार त्या येत्या सात महिन्यात निवृत्त होणार होत्या. त्या इथल्या चांगल्या प्राध्यापिका होत्या. मात्र NTA, NEET परीक्षा आणि प्रश्नपत्रिका तयार करण्याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नाही.

कायद्यानुसार संबंधित प्राधिकरणाकडून त्यांच्याबाबत अधिकृत माहिती मिळाल्यानंतर आम्ही नियमानुसार कायदेशीर कारवाई करू," असंही डॉ. निवेदिता एकबोटे म्हणाल्या.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

आता परीक्षा 21 जून रोजी

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने भारत सरकारच्या मंजुरीनंतर NEET (UG) 2026 ची पुनर्परीक्षा रविवार, 21 जून 2026 रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

एनटीएने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताना म्हटलं होतं, "हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आणि ज्या विश्वासावर आपली राष्ट्रीय परीक्षा प्रणाली आधारलेली आहे, त्या विश्वासाचा मान राखून घेण्यात आला आहे."

"पुन्हा परीक्षा आयोजित केल्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना निश्चितच मोठा आणि प्रत्यक्ष त्रास सहन करावा लागेल, याची संस्थेला पूर्ण जाणीव आहे. एनटीए या त्रासाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे", असंही एनटीएनं नमूद केलं होतं.

तपास संस्थांनी एनटीएला तपासातील निष्कर्ष सांगितल्यानंतर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

यानंतर एनटीएनं या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी यासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.

तपासातील निष्कर्षावरून ही सध्याची परीक्षा प्रक्रिया कायम ठेवणे योग्य ठरणार नाही, हे सिद्ध झाले आहे, असंही एनटीएनं नमूद केलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)