पॅरासिटामॉलच्या ओव्हरडोसमुळे अवयव निकामी होण्याच्या मार्गावर, तरुणाचा अनुभव; डॉक्टरांनी दिला 'हा' सल्ला

रायली
फोटो कॅप्शन, काही तासांतच रायलीची प्रकृती अत्यंत गंभीर झाली.
    • Author, अँटोनिया मॅथ्यूज आणि ऑस्कर एडवर्ड्स
    • Role, बीबीसी वेल्स
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

चुकून घेतलेल्या पॅरासिटामॉलच्या अतिरिक्त डोसमुळे आपल्या मुलाचा जीव कसा टांगणीला लागला होता, काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या थरारक अनुभवाबद्दल एका ब्रिटिश विद्यार्थ्याच्या आई-वडिलांनी सांगितले आहे.

त्या मुलाचे एकामागून एक अवयव निकामी होत गेले आणि शेवटी त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्याची वेळ आली.

ही घटना मार्च 2025 ची आहे. त्यावेळी 20 वर्षांचा रायली लुबास युनिव्हर्सिटीच्या पहिल्या वर्षात शिकत होता. त्याच काळात त्याला भयंकर सर्दी-खोकला झाला.

आराम पडावा म्हणून त्याने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मेडिकलमधून आणलेली 2 वेगवेगळी औषधे घेतली. त्या दोन्ही औषधांमध्ये पॅरासिटामॉल होते. यानंतर त्याला थेट व्हेंटिलेटर आणि लाईफ सपोर्टवर ठेवावं लागलं.

कित्येक आठवडे तो हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होता. अखेर त्याची तब्येत चमत्कार व्हावा तशी सुधारली आणि तो पुन्हा स्वतःच्या पायांवर उभा राहून बोलू लागला.

दरम्यान 'रॉयल कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स किम्रु वेल्स'ने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोणतेही औषध घेण्यापूर्वी पाकिटावरील माहिती नीट वाचणे आणि स्वतःच्या मनाने औषध न घेता डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.

रायली युनिव्हर्सिटीमधील दिवसांचा मनसोक्त आनंद घेत होते. तेवढ्यात वसंत ऋतूमध्ये त्याला सर्दी-खोकला झाला. सुरुवातीला खुद्द रायलीलाही ही नेहमीसारखीच सामान्य सर्दी वाटली होती.

रायली सांगतो, "कॉलेजच्या पहिल्या वर्षात नवीन वातावरणात येणाऱ्या अनेक मुलामुलींना 'फ्रेशर्स फ्लू' किंवा नेहमीची सर्दी होतेच. त्यामुळे मीही जास्त विचार न करता ती 2 औषधे घेतली."

या दोन्ही औषधांमध्ये पॅरासिटामॉल आहे, याची मला त्यावेळी अजिबात कल्पना नव्हती," असे त्याने सांगितले.

एनएचएसनुसार (ब्रिटनची राष्ट्रीय आरोग्य सेवा), पॅरासिटामॉलचा प्रमाणापेक्षा जास्त डोस घेतल्यास लिव्हर आणि किडनी कायमस्वरूपी निकामी होण्याचा मोठा धोका असतो.

मळमळ होणे, उलट्या होणे आणि पोटात तीव्र वेदना होणे ही या ओव्हरडोसची सुरुवातीची प्रमुख लक्षणे मानली जातात.

पोटदुखीपासून थेट व्हेंटिलेटरपर्यंत

पोटात असह्य वेदना सुरू झाल्यावर रायलीने स्वतःच फोन करून वैद्यकीय मदत मागितली.

इंग्लंडच्या बाथ शहरातील रॉयल युनायटेड हॉस्पिटलमध्ये तपासणी केल्यावर त्याचे लिव्हर निकामी होत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.

मुलाची प्रकृती बिघडल्याचे कळताच त्याचे पालक क्रिस आणि केट लुबास यांनी तातडीने धाव घेत हॉस्पिटल गाठले. ते दक्षिण-पूर्व वेल्सच्या न्यूपोर्ट शहरात राहतात.

एका कंपनीत डायरेक्टर असणाऱ्या क्रिस यांनी त्या वेळचा प्रसंग सांगताना नमूद केले की, आधी डॉक्टरांना हे हिपॅटायटिसचे लक्षण वाटले होते.

"पण काही तासांतच परिस्थिती बिघडली. रात्री साधारण 1:30 च्या सुमारास मला हॉस्पिटलच्या आयसीयूमधून फोन आला आणि त्यांनी आम्हाला ताबडतोब यायला सांगितले," क्रिस यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, "त्या गंभीर क्षणी, 'आम्ही मुलाचा जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहोत,' यापलीकडे ते आम्हाला काहीच सांगू शकत नव्हते."

रायली
फोटो कॅप्शन, या औषधाचा चुकून ओव्हरडोस घेतलेला रायली आता निरोगी आहे.

रायलीचे लिव्हर पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर असल्याचे डॉक्टरांनी त्याच्या पालकांना सांगितले.

आपल्या लाडक्या लेकाची प्रकृती क्षणाक्षणाला बिघडताना पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली.

रायलीची स्थिती इतकी नाजूक झाली होती की, त्याची शुद्ध हरपली होती. तो तीव्र संभ्रमात गेला होता आणि प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या गोष्टीही त्याला दिसू लागल्या होत्या. म्हणजेच त्याला विचित्र भास होऊ लागले होते.

वडील क्रिस यांनी सांगितले, "त्याच दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्याला पूर्णपणे गुंगीत ठेवण्यात आले होते. तो व्हेंटिलेटर आणि डायलिसिसवर होता. त्याचे एकापाठोपाठ एक अवयव निकामी होत चालले होते."

ते म्हणाले, "तेव्हा हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला पहिल्यांदाच सविस्तर सांगितलं की, त्याची प्रकृती किती गंभीर बनली होती."

रायली त्याच्या पालकांसोबत
फोटो कॅप्शन, रायली त्याच्या पालकांसोबत
Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

रायलीच्या मेंदूभोवती द्रव साठल्यामुळे हॉस्पिटलचे डॉक्टर अत्यंत काळजीत पडले होते. त्यातच त्याची फुफ्फुसे आणि दोन्ही किडन्यांनीही पूर्णपणे काम करणे थांबवले होते.

क्रिस म्हणाले, "आम्ही प्रचंड अस्वस्थ आणि हताश झालो होतो. हे सर्व इतक्या वेगाने कसे घडले, हेच आम्हाला समजत नव्हते."

या वेळी रायलीची तब्येत अक्षरशः हाताबाहेर गेली होती. त्यामुळे त्याला तातडीने लंडनच्या 'किंग्ज कॉलेज हॉस्पिटल'मध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. तिथे अत्यंत गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र आणि विशेष आयसीयू विभाग उपलब्ध आहे.

तिथे पोहोचताच डॉक्टरांनी पालकांकडे विचारणा केली की, त्याने पॅरासिटामॉल किती प्रमाणात घेतले होते?

पालकांनी शोधाशोध करून अखेर रायलीने घेतलेली ती दोन्ही औषधे शोधून काढली. ती पाकीटं हाती येताच त्याच्यासोबत नेमकं काय घडलं होतं घडले, हे त्यांच्या लक्षात आलं.

क्रिस यांनी सांगितलं, "औषध कळल्याने उपचारात एकदम काही जादू झाली नाही किंवा तात्काळ तोडगा मिळाला नाही हे खरे, पण निदान मुलाचा जीव कशामुळे धोक्यात आला होता त्याचे मूळ कारण तरी आमच्या समोर आलं."

पुन्हा ठणठणीत बरे झाल्यानंतर रायलीने काय सांगितलं?

उपचारानंतर रायली आता पूर्णपणे ठणठणीत बरा झाला असून एका पबमध्ये बारटेंडर म्हणून नोकरी करत आहे.

आपल्या मुलाच्या बाबतीत घडलेल्या या भयानक प्रसंगानंतर इतर कोणावरही अशी वेळ येऊ नये म्हणून रायलीच्या पालकांनी पॅरासिटामॉलच्या धोक्यांविषयी जनजागृती करण्यासाठी एक पदयात्रा काढली.

गोवर पेनिनसुलामध्ये पार पडलेल्या या 50 किलोमीटरच्या पदयात्रेमधून त्यांनी लंडनच्या किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमधील आयसीयू वॉर्डसाठी भरीव निधीही गोळा केला.

रायली म्हणाला, "परिस्थिती इतक्या वेगाने बिघडली, ही अत्यंत थक्क करणारी गोष्ट आहे."

तो म्हणाला, "मला आधीपासूनच सर्दी-तापाचा त्रास होता. त्यामुळे पोटात दुखायला लागल्यावर मला वाटले की साधे पोटाचे इन्फेक्शन झाले असावे."

"पण माझ्या पोटातल्या त्या कळा प्रत्यक्षात लिव्हर निकामी झाल्यामुळे येत होत्या, याची मला पुसटशीही कल्पना नव्हती."

"मी या भयानक संकटातून सुखरूप वाचलो आणि पुन्हा नवीन आयुष्य जगू शकलो यासाठी मी इश्वराचा आणि सर्वांचा शतशः ऋणी आहे," असंही त्यानं सांगितलं.

पॅरासिटामॉलबाबत तज्ज्ञांचे मत काय?

ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्सने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार एक धक्कादायक बाब समोर आली आहे. 2024 या एकाच वर्षात वेल्समध्ये 27 जणांचा मृत्यू झाला, ज्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रांवर पॅरासिटामॉलचा थेट संबंध नोंदवला गेला होता.

'रॉयल कॉलेज ऑफ जनरल प्रॅक्टिशनर्स' (RCGP) ही ब्रिटनमधील सर्व जनरल प्रॅक्टिशनर्स डॉक्टरांचे प्रतिनिधित्व करणारी प्रमुख संघटना आहे.

त्यांनी इशारा दिला, "एखाद्या व्यक्तीने नकळतपणे अशी 2 वेगवेगळी औषधे एकाच वेळी घेतली आणि त्या दोघांमध्येही पॅरासिटामॉल असेल तर आरोग्यासाठी गंभीर धोका होऊ शकतो."

डॉ. मॅकिन्टॉश यांच्या मते, कॉलेजचा अभ्यास आणि नोकरीच्या वाढत्या ताणामुळे तरुण मंडळी डॉक्टरांकडे न जाता मेडिकलमधून परस्पर औषधे घेण्याकडे वळतात.

ते म्हणाले, "कोणत्याही व्हायरल आजारात मग तो किरकोळ का असेना, शरीराला विश्रांती देणे हे सर्वात महत्त्वाचे औषध असते."

"पण झटपट बरे होऊन कामाला लागण्याच्या नादात आजकाल आरामाचे महत्त्व साफ विसरले जाते," अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

पॅरासिटामॉल
फोटो कॅप्शन, यूकेमध्ये दरवर्षी सुमारे 6300 टन पॅरासिटामॉलची विक्री होते.

डॉ. मॅकिन्टॉश सांगतात, "अशा आजारांमधून सावरण्यासाठी शरीराला पुरेसा वेळ देणे आणि विश्रांती मिळणे आवश्यक असते. त्यादरम्यान लक्षणांपासून दिलासा मिळवण्यासाठी तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मिळणारी साधी औषधे घेऊ शकता."

ते पुढे म्हणाले, "परिसरातील स्थानिक मेडिकल स्टोअर्स औषधे मोठ्या प्रमाणावर विकताना नेहमीच खूप सावधगिरी बाळगतात."

"म्हणूनच अनेकदा पॅरासिटामॉलच्या विक्रीवर कमाल मर्यादा घातली जाते," असे त्यांनी नमूद केले.

डॉ. मॅकिन्टॉश यांनी सांगितले की, पॅरासिटामॉलचा ओव्हरडोस ज्येष्ठ नागरिकांसाठी किती जीवघेणा ठरू शकतो, याबाबत आता जनरल प्रॅक्टिशनर्स म्हणजेच एखादे वैद्यकीय डॉक्टर आधीपेक्षा खूप जास्त सतर्क झाले आहेत.

विशेषतः ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वजन कमी आहे. त्यांच्यामध्ये हा धोका अधिक पटीने वाढतो, असा इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले, "जेव्हा अशी प्रकरणे घडतात, तेव्हा त्यांची लक्षणे अत्यंत गंभीर असू शकतात आणि त्यातील धोकाही बराच जास्त असतो."

"त्यामुळेच अशा घटना पूर्णपणे टाळल्या जाव्यात आणि त्यांची संख्या शून्यावर यावी, अशी आमची भूमिका आहे," असे ते म्हणाले.

शेवटी कोणतेही औषध घेण्यापूर्वी पाकिटावरील माहिती बारकाईने वाचण्याचा महत्त्वाचा सल्ला त्यांनी लोकांना दिला.

पॅरासिटामॉल घेताना या गोष्टींची घ्या काळजी

ब्रिटनची राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) सांगते-

  • कोणत्याही प्रौढ व्यक्तीने 24 तासांच्या कालावधीत 500 मिलीग्रामच्या जास्तीत जास्त 8 गोळ्याच घेतल्या पाहिजेत.
  • ब्रँडेड औषधांमध्येही पॅरासिटामॉल असू शकते, त्यामुळे औषधाचे लेबल नेहमी काळजीपूर्वक वाचा.
  • डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सलग 3 दिवसांपेक्षा जास्त काळ पॅरासिटामॉलचा वापर करू नका.
  • पॅरासिटामॉल घेताना आधीपासूनच पॅरासिटामॉल असलेली दुसरी औषधे सोबत घेऊ नका. यामध्ये सर्दीच्या अनेक औषधांचाही समावेश होतो.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)