NEET पेपरफुटी प्रकरणी पी.व्ही. कुलकर्णीला पुण्यातून अटक, सीबीआयने म्हटले मुख्य सूत्रधार; NTA शी काय होता संबंध?

फोटो स्रोत, UGC
NEET-UG 2026 च्या प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणात सीबीआयनं मूळच्या लातूरच्या असलेल्या पी.व्ही. कुलकर्णी यांना पुण्यातून अटक केली आहे.
सीबीआयनं कुलकर्णी यांचा उल्लेख या पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सुत्रधार असा केला आहे.
पी. व्ही. कुलकर्णी यांना सखोल चौकशीनंतर पुण्यात अटक करण्यात आल्याचं, सीबीआयनं स्पष्ट केलं आहे.
याबाबत पी. व्ही. कुलकर्णी, त्यांचे वकील किंवा नातेवाईक यांची बाजू अद्याप मिळालेली नाही. ती मिळाल्यावर ती माहितीही येथे समाविष्ट करण्यात येईल.
पेपर फुटीचे आरोप होत असतानाच एनटीएने 3 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेली NEET (UG) 2026 परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.
तसेच, ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ही परीक्षा 21 जून रोजी घेण्याचा निर्णय झाला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
कुलकर्णींचा NEET परीक्षेशी काय संबंध?
सीबीआयनं पी.व्ही. कुलकर्णी यांना अटक केल्यानंतर काही महत्त्वाची माहिती दिली आहे.
"पी. व्ही कुलकर्णी हे केमिस्ट्रीचे लेक्चरर असून एनटीएनं आयोजित केलेल्या परीक्षा प्रक्रियेत त्यांचा सहभाग होता. त्यामुळं त्यांना परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांपर्यंत पोहोचणं शक्य होतं," असं सीबीआयनं म्हटलं आहे.
"एप्रिल 2026 च्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी या प्रकरणातील आणखी एक आरोपी मनीषा वाघमारे (त्यांना सीबीआयने 14 मे रोजी अटक केली) यांच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी विशेष कोचिंग वर्ग घेतले.
या वर्गांदरम्यान त्यांनी प्रश्न, पर्याय आणि त्यांची योग्य उत्तरे विद्यार्थ्यांना सांगितली. विद्यार्थ्यांनी हे प्रश्न त्यांच्या वहीत लिहून घेतले होते आणि ते प्रश्न NEET-UG 2026 च्या 03.05.2026 रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी पूर्णपणे जुळत असल्याचे आढळले," असं सीबीआयनं सांगितलं आहे.
पुण्यात विशेष वर्ग घेऊन प्रश्न सांगितल्याचा आरोप असून त्यात कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार उघड झाला आहे, असं सीबीआयनं म्हटलं आहे.
सीबीआयनं आणखी काय माहिती दिली आहे?
मागील 24 तासांत सीबीआयने देशभरातील विविध ठिकाणी झडती घेतली असून अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत.
जप्त केलेल्या वस्तूंचे सखोल फॉरेन्सिक आणि तांत्रिक विश्लेषण सुरू आहे, असंही सीबीआयनं सांगितलं आहे.
हे प्रकरण 12 मे रोजी उच्च शिक्षण विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी दिलेल्या लेखी तक्रारीच्या आधारे नोंदवण्यात आले होते. ही तक्रार NEET-UG 2026 परीक्षेच्या संभाव्य प्रश्नपत्रिका गळतीबाबत होती.
प्रकरण नोंदवल्यानंतर लगेच विशेष पथकं तयार करण्यात आली आणि देशभरात विविध ठिकाणी झडती घेण्यात आली. अनेक संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली.
आतापर्यंत जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथून एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
यापैकी 5 आरोपींना न्यायालयात हजर करून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. उर्वरित 2 आरोपींना काल अटक करण्यात आली असून त्यांना पुण्यातील न्यायालयात सादर करून ट्रान्झिट रिमांड घेऊन दिल्ली न्यायालयात हलवण्यात येत आहे.
तपास अद्याप सुरू असून आतापर्यंतच्या तपासातून केमिस्ट्रीच्या प्रश्नपत्रिकेची गळती कुठून झाली आणि विद्यार्थ्यांना एकत्र करून लाखो रुपये घेऊन विशेष वर्गांमध्ये हे प्रश्न शिकवणाऱ्या मध्यस्थांची भूमिका स्पष्ट झाली आहे, असं सीबीआयनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
कोण आहे पी. व्ही. कुलकर्णी?
NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या पी. व्ही. कुलकर्णी यांच्या अटकेनंतर आता सगळीकडे त्यांची चर्चा होत आहे.
पी.व्ही कुलकर्णी हा दयानंद महाविद्यालयात केमिस्ट्री विषय शिकवत होते. 27 वर्षांच्या सेवेनंतर 2022 साली ते निवृत्त झाले. नंतर ते पुण्याला शिफ्ट झाले. निवृत्तीनंतर त्यांचा कॉलेजशी संपर्क नव्हता, असं दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य सिद्धेश्वर बेल्लाळे यांनी सांगितलं.
महाविद्यालयात अध्यापनानंतर त्यांनी लातूरमध्येच स्वतःचे क्लासेस सुरू केले. तिथून ते विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षांसाठी प्रशिक्षण देत होते.
कुलकर्णी यांचं नाव पुण्यातीलही एका संस्थेशी जोडलेलं आहे. ही संस्था NEET, JEE Main आणि MHT-CET सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मॉक टेस्ट, प्रश्नसंच आणि मार्गदर्शन आयोजित करते.
गेल्या दहा–अकरा वर्षांपासून कुलकर्णी हे या संस्थेच्या पेपर सेटिंग कॅम्पमध्ये सहभागी होते.

फोटो स्रोत, Getty Images
CBI च्या तपासानुसार, कुलकर्णी यांचा NTA च्या परीक्षासंबंधी प्रक्रियेशी संपर्क होता आणि त्यांनी प्रश्नपत्रिका मिळवली होती, असा आरोप आहे.
एप्रिल 2026 च्या शेवटच्या आठवड्यात पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी काही विद्यार्थ्यांसाठी विशेष कोचिंग सत्रं आयोजित करण्यात आली होती, असं सीबीआयनं म्हटलं आहे.
याशिवाय, कुलकर्णी यांनी काही विद्यार्थ्यांना पैसे घेऊन 'गेस पेपर' दिल्याच्या तक्रारीही स्थानिक पातळीवर समोर आल्या होत्या. त्यांच्या लातूरस्थित ट्यूशन क्लासेस आणि संबंधित शिक्षकांकडून CBI ने चौकशी केली आहे.
तपासाचा भाग म्हणून लातूरमधील एका केमिस्ट्री क्लासेसच्या संचालकांनाही चौकशीला सामोरे जावं लागलं आहे.
आता परीक्षा 21 जून रोजी
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने भारत सरकारच्या मंजुरीनंतर NEET (UG) 2026 ची पुनर्परीक्षा रविवार, 21 जून 2026 रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
एनटीएने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करताना म्हटलं होतं, "हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आणि ज्या विश्वासावर आपली राष्ट्रीय परीक्षा प्रणाली आधारलेली आहे, त्या विश्वासाचा मान राखून घेण्यात आला आहे."
"पुन्हा परीक्षा आयोजित केल्यामुळे उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबीयांना निश्चितच मोठा आणि प्रत्यक्ष त्रास सहन करावा लागेल, याची संस्थेला पूर्ण जाणीव आहे. एनटीए या त्रासाकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहे", असंही एनटीएनं नमूद केलं होतं.
तपास संस्थांनी एनटीएला तपासातील निष्कर्ष सांगितल्यानंतर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला. यानंतर एनटीएनं या संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता राखली जावी यासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं होतं.
तपासातील निष्कर्षावरून ही सध्याची परीक्षा प्रक्रिया कायम ठेवणे योग्य ठरणार नाही, हे सिद्ध झाले आहे, असंही एनटीएनं नमूद केलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























