किगल व्यायाम सर्वांसाठी खरंच फायदेशीर आहेत का? डॉक्टर काय सांगतात?

किगल व्यायाम करताना काय चुका होतात?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

पुरुषांमध्ये लघवी गळणे, इरेक्शनची समस्या किंवा अकाली वीर्यस्खलन यामागे अनेकदा पेल्व्हिक फ्लोअर स्नायू कारणीभूत असतात. यासाठी किगल व्यायाम (Kegel exercises for men) करण्याचा सल्ला दिला जातो.

मात्र, किगल्स सर्व पुरुषांसाठीच फायदेशीर असतात का, की चुकीच्या पद्धतीनं केल्यास उलट त्रास वाढू शकतो? तज्ज्ञ नेमकं काय सांगतात, ते जाणून घ्या.

लघवी झाल्यावरही काही थेंब गळणं, खोकताना किंवा शिंकताना पोटाखालचा ताण जाणवणं, पाठदुखी, लैंगिक समस्या किंवा प्रसूतीनंतर होणारे त्रास यामागे एक महत्त्वाचा पण अनेकदा दुर्लक्षित भाग असतो, तो म्हणजे पेल्व्हिक फ्लोअर मसल्स (pelvic floor muscles).

किगल्स व्यायाम सर्वांसाठी खरंच फायदेशीर आहेत का? डॉक्टर काय सांगतात? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

सोशल मीडियावर आणि आरोग्यविषयक सल्ल्यांमध्ये 'किगल व्यायाम' (Kegel exercises) करा, असा सल्ला सहज दिला जातो. मात्र पेल्व्हिक फ्लोअर म्हणजे नेमकं काय, हे स्नायू कशासाठी असतात आणि किगल्स सर्वांसाठीच योग्य असतात का, याची माहिती अनेकांना नसते. (या व्यायामांना किगल किंवा किगल्स अशा नावांनी संबोधलं जातं)

खरं तर काही लोकांसाठी किगल्सचे व्यायाम फायदेशीर ठरतात, पण चुकीच्या पद्धतीने किंवा अति प्रमाणात केल्यास काहींच्या समस्या वाढू शकतात. महिलांमध्ये प्रसूतीनंतर, पुरुषांमध्ये प्रोस्टेट सर्जरीनंतर आणि मध्यम वयोगटात युरीन इनकॉंटिनन्सच्या बाबतीत या विषयाविषयी मोठ्या प्रमाणावर गैरसमज दिसून येतात.

या लेखामध्ये तज्ज्ञांच्या मदतीने आम्ही तीन मुद्दे स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे. त्या म्हणजे पेल्व्हिक फ्लोअर म्हणजे काय? किगल व्यायाम म्हणजे काय? आणि हे व्यायाम करताना कोणती काळजी घ्यायला हवी?

पेल्व्हिक फ्लोअर म्हणजे काय?

पेल्व्हिक फ्लोअर म्हणजे श्रोणीत खालच्या बाजूला असलेल्या स्नायू आणि लिगामेंट्सचा समूह. श्रोणी म्हणजे कंबरेखालचा, पोटाच्या खालच्या भागात असलेला हाडांचा आणि स्नायूंचा भाग. हा भाग पाठीच्या कण्याचं खालचं टोक आणि दोन्ही मांड्यांची हाडे यांना जोडतो. हा भाग शरीराचं वजन सांभाळतो आणि पोटाखालचे महत्त्वाचे अवयव जागच्या जागी धरून ठेवतो.

हे स्नायू मूत्राशय, गर्भाशय, आतडी आणि पुरुषांमध्ये प्रोस्टेटला सांभाळून ठेवण्याचं काम करतात

प्रातिनिधिक छायाचित्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

सोप्या भाषेत सांगायचं तर हे स्नायू शरीराच्या खालच्या अवयवांना आधार देतात. लघवी आणि शौच नियंत्रित ठेवणं, पोटात दाब वाढला की अवयवांना आधार मिळणं आणि लैंगिक कार्य सुरळीत राहणं या सगळ्यात पेल्व्हिक फ्लोअरची भूमिका महत्त्वाची असते.

गरोदरपण, प्रसूती, वाढतं वय, लठ्ठपणा, सतत होणारं बद्धकोष्ठ किंवा काही शस्त्रक्रियांमुळे पेल्व्हिक फ्लोअरचे स्नायू कमकुवत होऊ शकतात. मात्र सगळ्यांच्या समस्या स्नायू कमजोर झाल्यामुळेच होतात असं नाही.

काही लोकांमध्ये पेल्व्हिक फ्लोअर स्नायू खूप कडक किंवा अतिसक्रिय म्हणजे ओव्हरअॅक्टिव्ह असतात. अशा स्थितीत पेल्व्हिक वेदना, लघवी करताना त्रास किंवा लैंगिक वेदना जाणवू शकतात. त्यामुळे प्रत्येक समस्येवर या स्नायूंना बळकटी आणणारे म्हणजेच स्ट्रेंग्दनिंगचे व्यायामच योग्य ठरतात असं नाही.

किगल व्यायाम म्हणजे म्हणजे काय?

किगल व्यायाम हे पेल्व्हिक फ्लोअर स्नायू आकुंचन आणि शिथिल करण्यावर आधारित व्यायाम आहेत. 1940च्या दशकात डॉ. अरनॉल्ड किगल यांनी स्त्रियांमध्ये युरीन इनकॉंटिनन्सच्या उपचारासाठी हे व्यायाम प्रथम सुचवले होते.

आज महिलांप्रमाणेच पुरुषांनाही, विशेषतः प्रोस्टेट सर्जरीनंतर, किगल्स व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. योग्य पद्धतीने केल्यास लघवीवर नियंत्रण सुधारू शकतं, प्रसूतीनंतर रिकव्हरीला मदत होऊ शकते आणि काही प्रकरणांत लैंगिक आरोग्याशी संबंधित तक्रारी कमी होऊ शकतात.

मात्र अनेकदा लोक चुकीचे स्नायू आवळतात. पोट, नितंब किंवा मांड्या दाबून किगल्सचे व्यायाम होत आहेत असा गैरसमज होतो. याशिवाय काही जण सतत आणि अति प्रमाणात हे व्यायाम करतात.

किगल व्यायाम म्हणजे म्हणजे काय?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

किगल व्यायाम हे पेल्व्हिक फ्लोअर स्नायू आकुंचन आणि शिथिल करण्यावर आधारित व्यायाम आहेत. 1940च्या दशकात डॉ. अरनॉल्ड किगल यांनी स्त्रियांमध्ये युरीन इनकॉंटिनन्सच्या उपचारासाठी हे व्यायाम प्रथम सुचवले होते.

आज महिलांप्रमाणेच पुरुषांनाही, विशेषतः प्रोस्टेट सर्जरीनंतर, किगल्स व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. योग्य पद्धतीने केल्यास लघवीवर नियंत्रण सुधारू शकतं, प्रसूतीनंतर रिकव्हरीला मदत होऊ शकते आणि काही प्रकरणांत लैंगिक आरोग्याशी संबंधित तक्रारी कमी होऊ शकतात.

मात्र अनेकदा लोक चुकीचे स्नायू आवळतात. पोट, नितंब किंवा मांड्या दाबून किगल्सचे व्यायाम होत आहेत असा गैरसमज होतो. याशिवाय काही जण सतत आणि अति प्रमाणात हे व्यायाम करतात.

पेल्व्हिक फ्लोअर आधीच कडक असलेल्या लोकांनी फक्त स्नायू घट्ट करण्याचे म्हणजे टाईटनिंगचे व्यायाम केल्यास वेदना, अस्वस्थ वाटणं किंवा लघवीशी संबंधित अडचणी वाढू शकतात. म्हणूनच किगल्स व्यायाम सुरू करण्याआधी नेमकी समस्या काय आहे हे सगळं तपासणं आणि गरज असल्यास पेल्व्हिक फ्लोअर फिजिओथेरपिस्टकडून मार्गदर्शन घेणं महत्त्वाचं आहे.

पुरुष आणि महिलांमध्ये पेल्विक फ्लोअर स्नायूंची मूलभूत रचना सारखी असली तरी महिलांमध्ये हे स्नायू गर्भधारणा व प्रसूतीसाठी अधिक लवचिक असतात. पुरुषांमध्ये मात्र किगल स्नायू मूत्रनियंत्रण, शिश्नोत्थान (erection) आणि लैंगिक कार्याशी अधिक जोडलेले असतात

किगल व्यायामामुळे शुक्राणूंची संख्या वाढते का?

किगल्स व्यायाम पुरुषांसाठीही तो फायदेशीर ठरू शकतो. हा व्यायाम पेल्विक फ्लोअरचे स्नायू मजबूत करतो. त्यामुळे पेल्विक भागातील रक्तप्रवाह सुधारतो, लैंगिक कार्यक्षमता वाढण्यास मदत होते आणि इरेक्शन व वीर्यस्खलनावर चांगले नियंत्रण मिळते.

किगल्स व्यायामामुळे थेट शुक्राणूंची संख्या वाढते असे ठोस पुरावे नसले, तरी अप्रत्यक्षपणे शुक्राणूंच्या गुणवत्तेला आणि आरोग्याला आधार मिळतो. मात्र, कमी शुक्राणू संख्या किंवा वंध्यत्वाच्या समस्यांमध्ये केवळ व्यायाम पुरेसा नसतो.

योग्य तपासणी, जीवनशैलीतील बदल आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. याबाबत आम्ही दिल्लीमधील डॉ. संदीप तलवार यांच्याकडून अधिक माहिती घेतली. ते दिल्लीमधील इस्ट ऑफ कैलाश येथील नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी येथे फर्टिलिटी स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

किगल व्यायामामुळे शुक्राणूंची संख्या वाढते का?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

ते म्हणाले, "किगल्स व्यायामाबाबत सध्या बरीच चर्चा सुरू आहे. किगल्स व्यायाम प्रामुख्याने महिलांच्या आरोग्याशी संबंधित मानला जातो. मात्र, पुरुषांनाही याचा फायदा होऊ शकतो. पेल्विक स्नायू मजबूत होणे, लैंगिक कार्यक्षमता सुधारणे आणि प्रजनन आरोग्याला मदत करणे हे त्याचे संभाव्य फायदे आहेत. त्यामुळे पुरुषांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन किगल्स व्यायाम दैनंदिन फिटनेस रुटीनमध्ये समाविष्ट करावा."

"धूम्रपान, मद्यपान, लठ्ठपणा, पर्यावरणीय घटक, हार्मोन्समधील असंतुलन, संसर्ग किंवा आनुवंशिक समस्या यांसारख्या कारणांमुळे अनेक पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी असते. किगल्स व्यायामामुळे शुक्राणूंच्या आरोग्याला मदत होऊ शकते, हे अनेकांना माहीतही नसते."

"किगल्स व्यायाम हा पेल्विक फ्लोअर स्नायू मजबूत करणारा सोपा व्यायाम आहे. बाळंतपणानंतर महिलांमध्ये याचा वापर केला जातो, पण पुरुषांसाठीही तो तितकाच उपयुक्त आहे. पुरुषांमधील पेल्विक फ्लोअर स्नायू मूत्राशय, आतडी आणि लैंगिक अवयवांना आधार देतात. हे स्नायू मजबूत राहिल्यास अनेक आरोग्यविषयक फायदे मिळतात."

किगल व्यायामामुळे शुक्राणूंची संख्या वाढते का?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

पण या व्यायामामुळे शुक्राणू वाढतात का याबद्दल ते डॉ. संदीप तलवार म्हणाले, "पेल्विक फ्लोअर व्यायामामुळे प्रजनन अवयवांपर्यंतचा रक्तप्रवाह सुधारतो आणि स्नायूंवर चांगले नियंत्रण मिळते. पुरुषांमध्ये यामुळे इरेक्शन सुधारण्यास आणि वीर्यस्खलनास पाठबळ मिळते. पेल्विक भागातील रक्ताभिसरण सुधारल्याने शुक्राणूंची निर्मिती आणि गुणवत्ता अप्रत्यक्षपणे सुधारू शकते, मात्र किगल्स व्यायामामुळे थेट शुक्राणूंची संख्या वाढते असे म्हणता येत नाही."

डॉ. तलवार म्हणतात, "अकाली वीर्यस्खलन, कमकुवत इरेक्शन किंवा मूत्रधार नियंत्रणाची समस्या असलेल्या पुरुषांसाठी किगल्स व्यायाम उपयुक्त ठरतो. मात्र फक्त किगल्स व्यायामामुळे सर्व वंध्यत्वाच्या समस्या सुटत नाहीत. हा व्यायाम एकूणच लैंगिक आणि प्रजनन आरोग्याला पूरक आहे."

किगल व्यायामामुळे शुक्राणूंची संख्या वाढते का?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

हा व्यायाम करताना पुरुषांनी काळजी घेतली पाहिजे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतलाच पाहिजे असं ते सांगतात.

ते म्हणाले, "शुक्राणूंशी संबंधित तक्रारी असलेल्या पुरुषांनी फर्टिलिटी स्पेशालिस्टचा सल्ला घेणे गरजेचे आहे. नियमित फर्टिलिटी तपासण्या करून डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. कमी शुक्राणू संख्येच्या प्रकरणात ICSI (Intracytoplasmic Sperm Injection) सारख्या सहाय्यक प्रजनन तंत्रज्ञानाचा वापर करता येतो, यात एका निरोगी शुक्राणूला थेट स्त्रीबीजात इंजेक्ट केले जाते. किगल्स व्यायामासोबत संतुलित आहार, नियमित व्यायाम, धूम्रपान व मद्यपान टाळणे आणि नियमित वैद्यकीय तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे."

प्रसूतीनंतर किगल व्यायाम करताना काय काळजी घ्यायची?

महिलांच्या आरोग्याबद्दल आम्ही डॉ. अदिती सिंघी यांच्याकडून माहिती घेतली. त्या मुंबईतल्या अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.

त्या सांगतात, "गरोदरपण आणि प्रसूतीदरम्यान महिलांच्या पेल्व्हिक फ्लोअर स्नायूंवर मोठा ताण येतो. यामुळे प्रसूतीनंतर लघवी गळणे, पेल्व्हिक वजन वाटणे, पाठीखालच्या वेदना किंवा लैंगिक अस्वस्थता अशा समस्या काही महिलांमध्ये दिसून येतात. अशा परिस्थितीत किगल किंवा पेल्व्हिक फ्लोअर व्यायाम महत्त्वाची भूमिका बजावू शकतात."

प्रसूतीनंतर किगल व्यायाम करताना काय काळजी घ्यायची?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

"किगल व्यायामामुळे मूत्राशय, गर्भाशय आणि आतड्यांना आधार देणारे स्नायू हळूहळू मजबूत होतात आणि शरीराची नैसर्गिक स्थिरता सुधारते. मात्र बाळंतपणानंतर लगेचच प्रत्येक महिलेला किगल व्यायाम करणे आवश्यकच असते असे नाही. काही महिलांमध्ये पेल्व्हिक फ्लोअरचे स्नायू कमकुवत असतात, तर काहींमध्ये ते आधीच कडक किंवा तिथं थोड्या वेदना आधीपासूनच असू शकतात."

पण प्रसुतीनंतर किगल व्यायाम सुरू करताना काही सूचनाही डॉ. सिंघी देतात.

त्या सांगतात, "चुकीच्या पद्धतीने किंवा घाईगडबडीत किगल व्यायाम केल्यास पेल्व्हिक वेदना वाढणे, लघवी‑शौचासंबंधी अडचणी किंवा अस्वस्थता निर्माण होऊ शकते. त्यामुळे प्रसूतीनंतर किगल व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य तंत्र शिकणे गरजेचे आहे. योग्य मार्गदर्शनाखाली केलेले किगल व्यायाम रिकव्हरीला मदत करतात, पण 'सगळ्यांसाठी एकच उपाय' अशी त्यांची मांडणी करणे योग्य ठरत नाही."

किगल व्यायाम करताना काय चुका होतात?

किगल किंवा श्रोणी तळाचे व्यायाम फायदेशीर ठरू शकतात, पण ते योग्य पद्धतीने केले गेले तरच. अनेक जण योग्य स्नायू ओळखण्यात चूक करतात किंवा व्यायाम करताना श्वास रोखून धरतात. काही वेळा अतिप्रमाणात किंवा घाईघाईने केलेला व्यायाम उलट त्रासदायक ठरू शकतो. स्नायूंना विश्रांती न दिल्यास श्रोणी भागात वेदना, लघवी‑शौचासंबंधी अडचणी किंवा अस्वस्थता वाढू शकते. त्यामुळे किगल व्यायाम करताना केवळ सातत्य नव्हे, तर योग्य तंत्र, संतुलित आकुंचन‑शिथिलता आणि तज्ज्ञांचा सल्ला तितकाच महत्त्वाचा आहे.

किगल्स व्यायाम सर्वांसाठी खरंच फायदेशीर आहेत का? डॉक्टर काय सांगतात? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

हा व्यायाम नियमितपणे करूनही वेदना, अस्वस्थता किंवा लक्षणांमध्ये सुधारणा न झाल्यास व्यायाम थांबवून तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

आधीपासून काही वैद्यकीय समस्या असलेल्या व्यक्तींनी, शस्त्रक्रियेनंतर पुनर्वसन सुरू असलेल्या रुग्णांनी किंवा दीर्घकालीन मूत्रविषयक तक्रारी असलेल्या व्यक्तींनी हा व्यायाम तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकणे अधिक योग्य ठरते.

प्रशिक्षित तज्ज्ञ योग्य मूल्यांकन करून हा व्यायाम आवश्यक आहे का आणि तो योग्य पद्धतीने केला जात आहे का हे निश्चित करू शकतात.

डॉ. संदेश परब ठाण्यातील किम्स रुग्णालयात सल्लागार मूत्रतज्ज्ञ, पुरुषवंध्यत्व तज्ज्ञ आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी या व्यायामांमध्ये कोणत्या चुका होतात आणि त्याचे काय परिणाम होतात याची माहिती दिली.

किगल व्यायाम करताना काय चुका होतात?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

किगल व्यायाम करताना लोक सर्वात जास्त कोणत्या चुका करतात? असं विचारल्यावर डॉ. संदेश परब म्हणाले, "यातली सर्वात मोठी चूक म्हणजे योग्य स्नायू ओळखण्यात अपयश येणे. अनेकजण पेल्व्हिक फ्लोअर स्नायूंऐवजी पोट, मांड्या किंवा नितंबांचे स्नायू ताणतात. आणखी एक सामान्य समस्या म्हणजे स्नायू आकुंचन करताना श्वास रोखून धरणे; प्रत्यक्षात श्वासोच्छ्वास नैसर्गिक राहायला हवा. काहीजण हा व्यायाम हळूहळू आणि नियंत्रणासह करण्याऐवजी घाईघाईने पुनरावृत्ती करतात. सातत्य महत्त्वाचे असले तरी योग्य पद्धत अधिक महत्त्वाची आहे; चुकीच्या पद्धतीने केल्यास अपेक्षित लाभ कमी होऊ शकतात."

यावर आम्ही डॉक्टरांना हे व्यायाम चुकीच्या पद्धतीनं केले तर काय अपाय होतो असं विचारलं.

त्यावर डॉ परब म्हणाले, "अतिप्रमाणात किंवा चुकीच्या तंत्राने व्यायाम केल्यास उलट परिणाम होऊ शकतो. स्नायू ताणल्यानंतर योग्य विश्रांती न दिल्यास स्नायूंना थकवा येऊ शकतो आणि मूत्राशय किंवा श्रोणीसंबंधित तक्रारी वाढू शकतात.

ते पुढं म्हणाले, "काही वेळा पेल्व्हिक फ्लोअर वेदना निर्माण होणे किंवा लघवी अथवा शौच करताना अडचण येणे अशी समस्या उद्भवू शकते. शरीरातील इतर स्नायूंप्रमाणेच पेल्व्हिक फ्लोअरचे स्नायूही आकुंचन आणि शिथिलता यामधील संतुलनावर योग्यरीत्या कार्य करतात."

किगल्स व्यायाम सर्वांसाठी खरंच फायदेशीर आहेत का? डॉक्टर काय सांगतात? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

जर हे व्यायाम चुकीच्या पद्धतीनं केले जात असतील तर त्याची काय लक्षणं दिसतात असं विचारल्यावर डॉ. परब म्हणाले, "जर पेल्व्हिक फ्लोअर भागात अस्वस्थता वाढणे, खालच्या पोटात वेदना, लघवी करताना अडचण येणे किंवा मूत्राशय पूर्ण रिकामा न झाल्याची भावना निर्माण होणे अशी लक्षणे दिसली तर व्यायाम चुकीच्या पद्धतीने केला जात असल्याची शक्यता असते. काही व्यक्तींमध्ये लघवीवर नियंत्रण सुधारण्याऐवजी गळती वाढल्याचेही दिसू शकते. याचा अर्थ स्नायूंवर अतिताण येत आहे किंवा योग्य स्नायू सक्रिय होत नाहीत."

पेल्व्हिक फ्लोअरचे स्नायू सतत ताणून ठेवणं आरोग्याच्या दृष्टीनं हानीकारक आहे का असा प्रश्न आम्ही डॉ. संदेश परब यांना विचारला.

त्यावर ते म्हणाले, "होय. हे स्नायू सतत आकुंचित अवस्थेत ठेवणे योग्य नाही. पेल्व्हिक फ्लोअरला आकुंचनाइतकीच शिथिलता देखील आवश्यक असते. सतत ताण राहिल्यास स्नायू कडक होऊ शकतात, लवचिकता कमी होऊ शकते आणि दीर्घकालीन पेल्व्हिक फ्लोअर वेदना निर्माण होऊ शकतात. कालांतराने यामुळे मूत्राशय व आतड्यांच्या नैसर्गिक कार्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो."

फिजिओथेरपिस्ट काय सांगतात?

किगल व्यायाम योग्य स्नायू वापरून, आकुंचनासोबत पूर्ण शिथिलता ठेवूनच केला तर उपयुक्त ठरतो. चुकीच्या पद्धतीने किंवा अतिप्रमाणात किगल व्यायाम केल्यास वेदना, लघवी‑शौचासंबंधी तक्रारी, बद्धकोष्ठता किंवा इतर समस्या वाढू शकतात.

हे स्नायू बळकट करण्याची गरज प्रत्येकालाच असते असे नाही. काही लोकांमध्ये पेल्व्हिक फ्लोअरचे स्नायू आधीच कडक किंवा अतिसक्रिय असतात. अशा वेळी किगल व्यायाम करण्यापेक्षा आधी स्नायू सैल करणे आणि योग्य समन्वय साधणे आवश्यक असते.

काही आठवड्यांत सुधारणा न झाल्यास, वेदना वाढल्यास किंवा व्यायामाबाबत संभ्रम असल्यास किगल व्यायाम स्वतःहून न करता प्रशिक्षित पेल्व्हिक फ्लोअर फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.

फिजिओथेरपिस्ट काय सांगतात?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

डॉ. प्रियंका धारगळकर (मलिक) या पनवेल येथे फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली.

किगल व्यायाम करताना पेल्व्हिक फ्लोअर स्नायू कसे ओळखायचे असं विचारल्यावर डॉ. प्रियंका म्हणाल्या,

जे स्नायू लघवीचा प्रवाह थांबवतात, पोटातून बाहेर जाणाऱ्या गॅसवर नियंत्रण ठेवतात. तसेच योनी, मूत्रमार्ग आणि गुदद्वाराच्याभोवती आकुंचन आणि हलकसं वर उचलल्यासारखं वाटेल असे स्नायू यात येतात.

डॉ. प्रियंका धारगळकर (मलिक) यांनी योग्य स्नायू ओळखण्याच्या तीन पद्धती सांगितल्या.

त्या म्हणाल्या, "लघवी करताना एकदाच प्रवाह थांबवून पाहा. प्रवाह मंदावला किंवा थांबला तर तेच पेल्व्हिक फ्लोअर स्नायू आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी पोटातला गॅस बाहेर येऊ नये म्हणून स्वतःला थांबवत आहात अशी कल्पना करा. अशावेळेस गुदद्वाराभोवती जो ताण जाणवतो, तो पेल्व्हिक फ्लोअर सक्रिय झाल्याचा संकेत असतो. महिलांनी आरामात झोपून योनीजवळ एक बोट ठेवावं आणि स्नायू आकुंचन करावं. किगल व्यायामात अशा स्थितीत आतल्या दिशेनं उचलल्यासारखं जाणवतं. त्यात बाहेर ढकलल्यासारखं जाणवत नाही." (या ओळखण्याच्या पद्धती एकदाच करायच्या आहेत. त्या वारंवार करू नयेत. पुन्हापुन्हा केल्यास त्याचा त्रास होऊ शकतो. तज्ज्ञांच्या मदतीशिवाय हे प्रयोग करू नयेत)

फिजिओथेरपिस्ट काय सांगतात?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

किगल व्यायाम करताना लोक कोणत्या सामान्य चुका करतात? असं विचारल्यावर डॉ. प्रियंका यांनी

पुढील चुका सांगितल्या

  • पोटाचे स्नायू जोरात आवळणे
  • नितंब (बट) घट्ट करणे
  • श्वास रोखून धरणे
  • मांड्या एकमेकींवर दाबणे
  • खालच्या दिशेने दाब जाणवणे (हे चुकीचे व धोकादायक आहे)

जर किगल व्यायाम करताना पोट, नितंब किंवा मांड्या जास्त काम करत असल्यास चुकीचे स्नायू वापरले जात आहेत, असं समजावे, असं त्या सांगतात.

डॉ. प्रियंका पुढे सांगतात, "किगल व्यायाम नीट न केल्यास, वारंवार लघवी लागणे, लघवी सुरू करण्यात अडचण, मूत्राशय पूर्ण रिकामा न झाल्यासारखे वाटणे, पेल्व्हिक फ्लोअर वेदना, संभोगावेळी वेदना, माकड हाडाजवळ त्रास जाणवतो. तसंच बद्धकोष्ठता, शौचेसाठी जोर लावावा लागणे असे त्रास होतात. अनेकदा स्नायू सैल न होणे, श्वास रोखण्याची सवय, पोट‑नितंबांवर जास्त ताण येणं या समस्या जाणवतात."

वेदना, संभ्रम असेल किंवा परिणाम दिसत नसतील तर 'अंदाजाने' किगल व्यायाम करू नये, असा सल्ला डॉ. प्रियंका धारगळकर देतात.

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल, औषधं घ्यायची असतील तर डॉक्टरांची आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)