चार अंतराळवीर, ओरायन आणि इतिहास घडवण्याची तयारी; फ्लोरिडाच्या स्पेस कोस्टवर थरारक वातावरण

रॉकेट उड्डाण (लाँच) पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येण्याची अपेक्षा आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रॉकेट उड्डाण (लाँच) पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक येण्याची अपेक्षा आहे
    • Author, पल्लब घोष
    • Role, विज्ञान प्रतिनिधी, केनेडी स्पेस सेंटर
    • Author, ॲलिसन फ्रान्सिस
    • Role, ज्येष्ठ विज्ञान पत्रकार
    • Author, केविन चर्च आणि एमिली सेल्वादुराई
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

"लोक चंद्रावर जाणार आहेत, हे खूप मस्त आहे," असं आठ वर्षांचा आयसेह आनंदाने सांगतोय.

आज रात्री आर्टेमिस II रॉकेट उड्डाण पाहण्यासाठी फ्लोरिडाच्या स्पेस कोस्टवर सुमारे 4 लाख लोक येणार आहेत. आयसेह हा त्यापैकीच एक आहे. हे लोक कॉजवे, समुद्रकिनारे आणि हॉटेलच्या बाल्कनीत मोठ्या संख्येने जमणार आहेत

ते चार अंतराळवीर रॉकेटने अवकाशात झेपावताना पाहणार आहेत. हे अंतराळवीर चंद्राभोवती फेरी मारण्याचा प्रयत्न करणार आहेत. कदाचित पृथ्वीपासून फार दूर म्हणजे आतापर्यंत कोणीही गेलं नसेल इतक्या दूर जाण्याचा प्रयत्न करणार आहेत.

नासाचा हा 10 दिवसांचा टेस्ट फ्लाइट (चाचणी उड्डाण) चंद्रावर उतरणार नाही. पण या प्रवासात अंतराळवीरांना चंद्राचं असं दृश्य (लँडस्केप) पाहायला मिळू शकतं, जे आजपर्यंत कोणत्याही माणसाने पाहिलेलं नसेल.

अमांडा गार्सिया हे उड्डाण पाहण्यासाठी न्यू मेक्सिकोहून 1 हजार मैलांपेक्षा जास्त प्रवास करून आली आहे. ती म्हणते, "यासाठी मी खूप उत्सुक आहे."

ती पुढे म्हणते की, "हे पाहण्यासाठी मी इथे आले आहे. हा एक चांगला शो असेल असं मी ऐकलंय. आणि इथे मोठ्या संख्येने लोक येणार आहेत."

ऐतिहासिक गर्दी होणार...

अमांडा गार्सिया

फोटो स्रोत, Kevin Church/BBC News

फोटो कॅप्शन, अमांडा गार्सिया हे लाँच पाहण्यासाठी 1 हजार मैलांपेक्षा जास्त प्रवास करून आली आहे. तर 8 वर्षीय आयसेहने याचं वर्णन 'खूप मस्त' असं केलं आहे.

केनेडी स्पेस सेंटरच्या लाँच परिसरात, तसेच टायटसव्हिले आणि कोको बीचच्या समुद्रकिनाऱ्यांवर अनोखं वातावरण दिसत आहे. बारमध्ये 'मूनशॉट्स'ची जाहिरात केली जात आहे. तर हॉटेल्स पाहुण्यांना लाँच पाहायला जाताना आणि येताना उशीर होऊ शकतो, हे आधीच सांगत आहेत.

यावेळी पर्यटकांची 'ऐतिहासिक गर्दी' होणार आहे आणि सुमारे 160 दशलक्ष डॉलरचा (सुमारे 14 अब्ज 91 कोटी रुपये) आर्थिक फायदा होईल, असं स्थानिक अधिकारी सांगत आहेत.

त्यामुळे एका रात्रीसाठी खास ट्रॅफिक व्यवस्था केली जात आहे. त्या वेळी रस्त्यांवरील लाईट्स, लाँच टॉवर्सची तेजस्वी रोषणाई (फ्लडलाइट) आणि कॅम्पर व्हॅनमधील बार्बेक्यूमुळे सगळीकडे उजेड आणि गजबजलेलं वातावरण असेल

जिथून आर्टेमिस II रॉकेट लाँच होणार आहे, त्या ठिकाणापासून साधारण एक मैल अंतरावर ब्रेंडा मलबेरी राहतात. त्या 'स्पेस शर्ट्स' या दुकानाच्या मालकीण असून गेल्या 40 वर्षांपासून नासाचे टी-शर्ट आणि स्मृतीचिन्हे (सॉव्हरिन्स) विकत आहेत

मेरिट आयलंडवरील त्यांच्या छोट्याशा दुकानात केशरी, निळ्या आणि काळ्या रंगाचे टी-शर्ट ठेवलेले आहेत. त्यावर हाताने काढलेले रॉकेट्स, मिशन पॅचेस आणि चंद्राचे दृश्य (मूनस्केप्स) काढलेले आहेत. लाँचच्या दिवशी येणाऱ्या लोकांसाठी हे सगळं तयार आहे.

'चंद्रावर पहिलं टी-शर्टचं दुकान सुरु करायचंय'

पण हे लाँच किंवा प्रक्षेपण वेगळंच आहे, असं त्या सांगतात. "आम्हाला 70 च्या दशकापासून पुन्हा चंद्रावर जायचं होतं. त्यामुळे लोक उत्साहित आहेत, खूपच जास्त उत्साहित," असं त्या म्हणाल्या.

मी आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात स्टॉक आधीच तयार ठेवला आहे, असं ब्रेंडा म्हणतात.

"मला चंद्रावर पहिलं टी-शर्टचं दुकान उघडायचं आहे. कारण जर तू तिकडे गेलास, तर तुला टी-शर्ट मिळेल ना?" असंही त्यांनी हसत हसत म्हटलं.

ब्रेंडा मलबेरी

फोटो स्रोत, Pallab Ghosh/BBC News

फोटो कॅप्शन, ब्रेंडा मलबेरी (डावीकडे) गेल्या 40 वर्षांपासून नासाचे स्मृतीचिन्हे विकत आहेत. चंद्रावर पहिलं टी-शर्टचं दुकान सुरू करण्याची त्यांची इच्छा आहे.

भविष्यातील आर्टेमिस मिशन्सचा उद्देश 1972 नंतर पहिल्यांदा माणसांना चंद्रावर उतरणं आहे. पण यावेळी चंद्रावर कायमस्वरूपी बेस तयार करणं, त्याची नैसर्गिक साधनसंपत्ती वापरणं आणि नंतर मंगळावर जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी सुरुवात करणं, हे ध्येय आहे.

चंद्रावर परत जाण्याचा हा प्रयत्न नवीन पिढीला प्रेरणा देणारा ठरेल, अशी आशा आर्टेमिस II चे मिशन कमांडर रीड विझमन म्हणाले.

"आयुष्यभर आपण चंद्राकडे पाहायचो आणि आपल्याला माहीत होतं की लोक तिथे गेले होते. पण आता आर्टेमिस पिढीत, मुलं बाहेर पडून चंद्राकडे पाहतील आणि म्हणतील, आपण तिथे आहोत. आपण आता चंद्रावर आहोत आणि आपल्या सौरमंडळात अजून पुढे जात आहोत," त्यांनी सांगितले.

जिथून अपोलो गेलं, तिथूनच आर्टेमिस II जाणार

आज रात्री सर्व लक्ष लाँच पॅड 39B कडे असेल- हेच ऐतिहासिक ठिकाण आहे जिथून 1969 मध्ये अमेरिकेच्या अपोलो प्रोग्रामने मानवाला पहिल्यांदा चंद्रावर पाठवलं होतं. या पॅडवर नासाचे स्पेस लाँच सिस्टम (एसएलएस) रॉकेट उभे आहे.

98 मीटर (321 फूट) उंच, पांढऱ्या आणि केशरी रंगाचा हा रॉकेट नासाने आतापर्यंत लाँच केलेला सर्वात वजनदार रॉकेट आहे.

याच्या टोकाला ओरायन नावाची कॅप्सूल आहे, जी एका लहान व्हॅनसारखी आहे. यात चार अंतराळवीर पुढील 10 दिवस घालवणार आहेत. मानवी क्रूसह कॅप्सूल त्याच्या वेगात जाण्याची ही पहिलीच वेळ असेल.

सर्व वेळापत्रकाप्रमाणे झाल्यास, रॉकेट बुधवारी स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6:24 ते 8:24 (बीएसटीनुसार 11:24 ते 1:24) दरम्यान उड्डाण करेल.

लोकांची गर्दी

फोटो स्रोत, Joe Raedle/Getty Images

फोटो कॅप्शन, अंतराळवीरांना त्यांचं मिशन पाहून नवीन पिढीही त्यांच्यासारखं अंतराळात जाण्याचा विचार करेल, असं वाटतं.

रॉकेट उड्डाणापूर्वी सुमारे चार तास आधी ओरायन कॅप्सूलमध्ये बसणारे अंतराळवीर अनेक वर्षांपासून एकत्र प्रशिक्षण घेत आहेत.

समोर, डाव्या बाजूला आर्टेमिस II चे कमांडर विझमन बसतील, आणि त्यांच्या शेजारी पायलट व्हिक्टर ग्लोवर बसतील. त्यांच्या मागे क्रिस्टिना कोच आणि जेरेमी हॅन्सेन बसतील, जे कॅनडाचे फायटर पायलट आहेत, आणि आता अंतराळवीर झाले आहेत. हा त्यांचा पहिला अंतराळ प्रवास असेल.

कक्षेत पोहोचल्यावर, ओरायन त्याचा पहिला दिवस पृथ्वीच्या उच्च कक्षेत घालवेल. तेथील अंतराळवीर हाताने रॉकेट उडवण्याचा (मॅन्युअल फ्लाइंगचा) सराव करतील आणि जीवन आधार प्रणालीची चाचणी करतील, त्यानंतर चंद्राकडे जाण्याचा मार्ग ठरवतील.

दुसऱ्या दिवशी, रॉकेटचा मोठा इंधन बुस्ट (ट्रान्स-लूनर इंजेक्शन बर्न) ओरायनला चंद्राभोवती फिरून परत पृथ्वीवर येण्याच्या मार्गावर नेईल. मार्ग सुधारण्यासाठी काही लहान बर्न करून दिशा ठरवली जाईल.

अंतराळवीरांसाठी प्रत्येक दिवस आव्हानांचा

अंतराळवीर जेरमी हॅन्सन, क्रिस्टिना कोच, कमांडर रीड विझमन आणि पायलट व्हिक्टर ग्लोव्हर

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, अंतराळवीर जेरमी हॅन्सन, क्रिस्टिना कोच, कमांडर रीड विझमन आणि पायलट व्हिक्टर ग्लोव्हर नासाच्या जेटवर केनेडी स्पेस सेंटरवर पोहोचले.

मिशनचा प्रत्येक दिवस अंतराळवीरांसाठी वेगवेगळ्या चाचण्या आणि आव्हानांनी भरलेला असतो.

सहावा दिवस विशेष आहे, कारण ओरायन चंद्राच्या दुसऱ्या बाजूभोवती उड्डाण करणार आहे. सुमारे 40 मिनिटे रेडिओ संपर्क तुटेल, म्हणजे फ्लाइट कंट्रोलर्सना कॅप्सूलमध्ये काय घडत आहे ते काहीही समजणार नाही.

ओरायन चंद्राच्या पृष्ठभागावरून सुमारे 4 हजार ते 6 हजार मैल (6,400 ते 9,600 किमी) उंचीवर उड्डाण करेल आणि मार्गानुसार पृथ्वीपासून सुमारे 2 लाख 50 हजार मैल (4 लाख किमी) असलेल्या अपोलो 13 च्या विक्रमी अंतरापेक्षा किंचित जास्त असेल.

पुढील दिवसांत ओरायन पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे आपोआप परत येईल. काही लहान बर्न करून मार्ग थोडा बदलला जाईल, जेणेकरून कॅप्सूल योग्य कोनात पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल.

अखेरीच्या दिवशी, अंतराळवीर सर्वात धोकादायक टप्प्यासाठी कॅप्सूलमध्ये बसतील: पृथ्वीच्या वातावरणात परत येताना सुमारे 25 हजार मैल प्रति तास (40 हजार किमी) वेगाने येतील. या वेळी ओरायनची हीट शील्ड इतक्या उष्णतेला तोंड देईल की दगडसुद्धा जळू शकतो.

दोन टप्प्यात परत येणार

पहिल्या मानव नसलेल्या चाचणी प्रवासानंतर, आर्टेमिस I मध्ये अभियंत्यांनी पाहिलं की, हीट शील्डच्या बाहेरील कव्हरचे तुकडे फुटून पडले होते. त्यावेळी कॅप्सूलने दोन टप्प्यात 'स्किप' परत येण्याचं परीक्षण केलं, तेव्हा हे घडले.

आधी ते वरच्या वातावरणात उतरलं, थोड्या वेळाने पुन्हा वर गेलं, आणि नंतर पुन्हा खाली आले, ज्यामुळे उष्णता, जी‑फोर्स आणि पाण्यात उतरायची (स्प्लॅशडाउन) अचूकता योग्य राहिली.

आर्टेमिस II मध्ये ओरायनचे दोन टप्प्यांचे परत येणे ठेवले आहे, पण कोन आणि वेळ थोडी बदलली आहे, जेणेकरून पहिल्या सौम्य उतरण्याच्या टप्प्यात जास्त वेळ घालवावा लागणार नाही.

राइज

फोटो स्रोत, NASA

फोटो कॅप्शन, राइज हे एक मऊ खेळणं आर्टेमिस II मिशनसाठी तयार आहे. अंतराळवीर ते ओरायनमध्ये सोडतील. ते वजनशून्य होईल म्हणजे हवा किंवा वजनाशिवाय तरंगायला लागेल.

जर आर्टेमिस II यशस्वी ठरले, तर पुढच्या वेळी स्पेस कोस्टवर इतकी गर्दी होईल ती दुसऱ्या चाचणी उड्डाणासाठी असेल. यामुळे माणसं अर्ध्या शतकानंतर पुन्हा चंद्रावर चालत जाण्याच्या जवळ येतील.

आणि मार्श ग्रास (दलदलीच्या भागात) आणि लाँच पॅडच्या मध्ये कुठेतरी नक्कीच एखादी व्यक्ती ब्रेंडा मलबेरींचा टी-शर्ट घातलेला असेल, आणि एक दिवस त्यांचा लोगो फक्त फ्लोरिडामध्येच नव्हे, तर चंद्रावर घेतलेल्या फोटोमध्येही दिसेल असं स्वप्न त्या पाहत असतील.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.