करूणाष्टके : 'चालायला लागल्यावर वाट उमटतेच!', स्त्रीदास्याचा उंबरठा ओलांडण्याची हिंमत देणारं नाटक

  • वाचन वेळ: 7 मिनिटे

'करूणाष्टके' नाटकातल्या सगळ्या विधवा ब्राह्मण आहेत. उच्चवर्णीय आहेत. संपूर्ण नाटकात या विधवा लाल आलवणातच वावरताना दिसतात.

सौभाग्य हिरावल्यानंतर वांझोंट्या ठरलेल्या संसारातील 'अनुदिनाचा अनुताप' शांत करण्यासाठी त्या सतत रामदास स्वामींची करूणाष्टकं आळवताना दिसतात.

ही कथा साधारण: एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बेतलेली आहे. 1889 च्या सुमारासची.

विधवांच्या केशवपनाची अमानुष प्रथा बंद करण्यासाठी म्हणून पुण्यात नाभिकांचा संप घडवून आणण्यात आलाय.

कुणी? का? कशासाठी हा संप घडवून आणलाय? याची पुरेशी कल्पनाही या गोदातटच्या नाशिकमध्ये धर्मप्रथांच्या तटबंदीत अडकलेल्या विधवांना नाहीये.

पण या संपाचा परिणाम मात्र त्यांच्यावर झालाय.

एकीकडे, त्यांची डोकी भादरायला आता कुणी नाभिक सापडत नाहीये तर दुसऱ्या बाजूला, या विधवा धर्मप्रथेनं त्यांच्या पदरात टाकलेल्या स्त्रीदास्याची कोंडी फोडण्याचा मानसिक प्रवास करताहेत.

या प्रवासाची गोष्ट म्हणजेच हे नाटक आहे.

या नाटकातील विधवांची आर्त 'करूणाष्टके' ऐकताना प्रेक्षक म्हणून पदोपदी आपल्यातलीही 'करुणा' दाटून येते. किंबहुना, मला तरी तसं झालं.

ती हादरवते, हलवून सोडते आणि सुप्तपणे 'उंबरठ्यापलीकडची गोष्ट' ठरत करूणेकडून कृतीकडे जाण्याची हिंमतही पेरते.

हे नाटक पाहिल्यावर त्याचा प्रत्येकाच्या मनावर होणारा परिणाम कदाचित वेगवेगळा असू शकेल. पण, हे नाटक निर्विवादपणे धर्मचिकित्सेची बाजू उचलून धरतं.

अर्थात, स्त्रीप्रश्नावर भाष्य करणारी अनेक नाटकं याआधीही आलेली आहेत.

पण, विशेषत: आताच्या अशा काळात जिथं धर्मचिकित्सा करणंच दुरापास्त होऊन बसलंय, अशा काळात धर्मचिकित्सा करणाऱ्या एका ऐतिहासिक आणि निर्णायक घटनेवर आधारलेलं नाटक अधिकच महत्त्वाचं ठरतं.

'धर्म निखारेच थोडी निपजतो? धर्मांचं फूल का नाही होत?'

या नाटकातले तीन प्रसंग मला चांगलेच लक्षात राहिले. पहिला प्रसंग शिकाकाईचा वास घेण्याचा.

अभिनेत्री पर्ण पेठेनं साकारलेली आणि नुकतीच विधवा झालेली पण केशवपन अद्यापही व्हायचे असल्याने संपूर्ण केशसंभारात वावरणारी दुर्गा नुकतीच या विधवांच्या 'अनुतापा'त आता सामील झालीये.

आपला नवरा मेलाय, ही गोष्ट आता या विधवांच्या उर्वरित जगण्याचा 'अनुताप' ठरलाय.

ती टोचणी आहे. ती खंत आहे. तो आयुष्यभर व्यापून राहिलेला विलाप आहे. शिवाय, तोच धर्म असल्याने ती 'जपून' ठेवावीच लागेल, अशी दु:खाची भावना आहे.

त्यातून बाहेर पडणं तर लांबची गोष्ट, तसा विचारही मनात आणायचा नाही, असा त्या काळचा दंडक.

अगदी शिकाकाईचा मनमुरादपणे वास घेण्यासारखी छोटी गोष्टही या अनुतापात पापच.

या पापाचं कायमचं ओझं या विधवांनी उरावर घेतलंय.

पण, या नाटकातल्या प्रसंग आणि संवादातून ते ओझं पदोपदी प्रेक्षक म्हणून आपल्या उरावरही येत राहतं. तसे अनेक प्रसंग या नाटकात आहेत. ते आपल्याला अशीच टोचणी लावतात. सवाल करतात. विचारप्रवृत्त करतात. करूणामयी व्हायला लावतात.

त्यातलाच हा शिकाकाईचा प्रसंग.

या बोडक्या विधवांचं दुर्गानं आणलेल्या शिकाकाईच्या वास घेत भूतकाळातल्या बहरदार आठवणी जागवणं, आपल्याला कमालीचं करूणामयी करतं.

दुसरा प्रसंग आपला केशसंभार आठवून भूतकाळात रमण्याचा. हा प्रसंगही प्रभावी ठरतो.

'धर्म निखारेच थोडी निपजतो? धर्मांचं फूल का नाही होत?' हा दुर्गाच्या तोंडचा संवाद आपल्यालाही निरूत्तरित करतो.

तसाच प्रसंग शांतेच्या उगी-उगीच्या डोहाळेजेवणाचा. विधवा असूनही तिचं डोहाळेजेवण या कसं आनंदानं घालतात नि भितीच्या सावटाखाली असूनही कसं साजरं करतात, ते पाहणं पापण्यांच्या कडा ओलावणारं ठरतं.

नऊवारीत नथीसह नखशिखांत नटलेल्या अवतारात या विधवांना सादर करणारं दृश्य मनाला चुटपूट लावतं.

साऱ्या जेव्हा आपल्या सुख:दुखाची गाणी एकसाथ म्हणू लागतात तेव्हाही मन भरून येतं.

'चालायला लागल्यावर वाट उमटतेच!'

या सात विधवांच्या आयुष्याच्या सात कथा नि या विधवाही सात तऱ्हेच्या आहेत.

एकीकडे, सर्वांत ज्येष्ठ आणि खलनायिकेचं आलवण ल्यायलेली 'बाईबाई' साकारलीये ती अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी यांनी तर दुसरीकडे, पहिल्या प्रवेशापासूनच 'सत्यशोधकी' बंडखोरी आळवणाऱ्या नवविधवा दुर्गाचं पात्र साकारलंय ते पर्ण पेठेनं.

या दोघींच्या मध्ये आहेत वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळ्या करूणकहाण्या असणाऱ्या विधवा.

देवकीच्या भूमिकेतल्या कल्याणी मुळे, सिंधुंच्या भूमिकेतील किरण खोजे, शांताच्या भूमिकेत माधुरी भारती, गोदाच्या भूमिकेत केतकी सराफ तर यमीच्या भूमिकेत प्रतिक्षा खाकनीस.

आणि या सर्व अभिनेत्रींच्या समवेत विविध पात्रांसहित प्रामुख्यानं माधव या घरगड्याचं पात्र साकारणारा एकमेव पुरूष अभिनेता विनायक चव्हाण आहे.

'कसा गं गेला तुझा नवरा?' हा प्रश्न दुर्गा एकेक विधवेला विचारत जाते नि मग सगळ्यांच्या आयुष्याचा करुणामयी पट प्रेक्षकांसमोर उलगडत जातो.

सातही पात्रांच्या छटा वेगवेगळ्या आहेत. 'बाईबाईं'नी पारंपरिकतेचं जोखड टिकवण्याचं जणू व्रत घेतलंय त्यामुळे त्यांच्या पात्राला खलनायकी छटा आहे.

एकीचा मयत नवरा समलिंगी, तर एकीनं स्वत:चं नवऱ्याचा खून केलाय. एकीचा नवरा आजारपणात अकाली गेलाय तर एक इतक्या कोवळ्या वयात विधवा झालीये की तिला नवऱ्याचा संगच अनुभवता आला नाही.

या सगळ्या विधवांच्या आयुष्याच्या छटा वेगवेगळ्या असल्या तरी या साऱ्यांच्या डोक्याला मात्र विधवेपणातून आलेल्या केशवपनासारख्या सनातनी प्रथेचा ताप आहे.

जेव्हा घरगडी असलेला माधव म्हणतो की, "आमच्यातबी विधवा होतात की बायका. पण त्यांचा बाट होत नाही. त्यांचे दुसरे पाट बी लागतात लगेच. कधी कधी वाटतं तुमच्यापरीस आम्ही बरे..."

नाटकातले असे संवाद विचार करायला भाग पाडतात.

खरं तर सध्याच्या काळात केशवपनाची ही प्रथा कालबाह्य ठरलेली. नव्हे प्रयत्नपूर्वक कालबाह्य केलेली. पण प्रथा कालबाह्य झाली असली तरी स्त्रियांना दुय्यमत्त्व देणारी मानसिकता पूर्णपणे कालबाह्य झालीये, असं म्हणणं धाडसाचं ठरेल.

कारण आजही बाई ही कुणाची तरी आई असते, पत्नी असते, विधवा असते. तिचं असणं पुरूषकेंद्रीतच असतं.

म्हणूनच, 'चालायला लागल्यावर वाट उमटतेच!' असं म्हणत या केशवपनाविरोधात या विधवांनी उभं रहायची हिंमत करण्यापर्यंतचा प्रवास दर्शवणारं हे नाटक महत्त्वाचं आहे.

नाटकात नसूनही जाणवत राहते 'जोतिबांची साऊ'

खरं तर या नाटकाच्या आधाराला एक ऐतिहासिक घटना आहे. ती म्हणजे, महात्मा फुलेंनी विधवा केशवपनाविरोधात घडवून आणलेला नाभिकांचा संप.

या घटनेचा धागा पकडूनच दिग्दर्शक प्राजक्त देशमुखनं नाट्यविस्तार केलाय.

हे नाटक कसं सुचलं, या प्रश्नाचं उत्तर देताना प्राजक्त देशमुखनं बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, "हे नाटक सुचायला ज्या दोन-तीन घटना कारणीभूत ठरल्या, त्यातील एक गोष्ट म्हणजे माझ्या वाचनामध्ये महात्मा फुले यांनी घडवून आणलेल्या न्हाव्यांच्या संपाची गोष्ट. मग त्याचे त्या काळामध्ये काय काय पडसाद उमटले असतील?"

"जुन्या नाशकात अशा अनेक छोट्या छोट्या घटना आहेत, ज्या वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या संदर्भाने ऐकल्या होत्या. त्यातून हळूहळू हे कथानक रूप घेत गेलं. एखाद्या हिस्टॉरिकल गोष्टीला नाट्यमय पद्धतीनं गोष्टीमध्ये सांगायचं, असा हा प्रयत्न होता," असं तो सांगतो.

त्याकाळात विधवेचे केस भादरले नाहीत तर मृत पतीच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होत नाही, असा धर्मसंमत समज होता.

म्हणून विधवेचे हातपाय बांधून जबरदस्तीनं केस भादरले जात. ती विद्रुप व्हायची. तिची ही विद्रुपता टिकवून ठेवण्यासाठी पुन्हा दरमहा न्हावी यासाठी येत असे.

ही प्रथा अनिष्ट आहे. ती स्त्रियांचा अपमान करणारी आहे. विधवा असल्या तरी त्याही सन्मानास पात्र आहेत, या भूमिकेतून जोतिबा आणि सावित्रीबाईंनी या प्रश्नाला हात घातला होता.

या नाटकातली दुर्गाच्या म्हणजेच पर्ण पेठेच्या तोंडी फक्त एकदाच सावित्रीबाईंचा उल्लेख येतो. पण, तरीही तिच्या रूपाने सत्यशोधन करणारी जोतिबांची साऊ जाणवत राहते. किमान मला तरी जाणवली.

थोडक्यात, या नाटकाचा मानसिक प्रवास सावित्री-जोतिबांच्या विचाराकडेच होताना आपल्याला दिसतो.

आपल्या भूमिकेबद्दल 'बीबीसी मराठी'शी बोलताना पर्ण पेठे सांगते की, "अनेकवेळेला आयुष्यात आपण कठोर पावलं घ्यायला, प्रश्न विचारायला, आपल्या समाजाने बांधून दिलेली जी चौकट आहे, त्याच्या थोडा बाहेरचा विचार करायला घाबरत असतो. पण दुर्गा हे असं पात्र आहे जे तुम्हाला पुढं चालायला शिकवतं. प्रश्न विचारायला शिकवतं. आणि न घाबरता गोष्टी प्रेमाने, विचारांनी आणि एकमेकांशी केलेल्या संवादातून पुढे नेऊ शकतो, असा विश्वास देणारं हे पात्र आहे."

'आपण काय काय पार करून आलोय, हे बघणं आताच्या काळात महत्त्वाचं'

या नाटकात 'बाईबाई' हे खलनायकी पात्र साकारणाऱ्या गीतांजली कुलकर्णी यांच्याशीही बीबीसी मराठीनं संवाद साधला.

आपण काय पार करून आलोय, हे बघणं कधी कधी आताच्या काळात फार गरजेचं वाटतं. मग आपल्याला कळेल की आताच्या काळात आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, ते गृहित धरता कामा नये, असं त्या सांगतात.

त्या सांगतात की, "करूणाष्टके नाटक मला यासाठी महत्त्वाचं वाटतं कारण, आम्ही यामध्ये मागे जातोय आणि सांगतोय की, हे बघा, मागे असं होतं. आपल्याला परत असंच व्हावं असं वाटतंय का? नाही ना, मग आपण दक्षता घ्यायला पाहिजे."

देवकीच्या भूमिकेतील कल्याणी मुळे सांगतात की, "इतिहास यासाठी शिकायचा आणि बघायचा असतो की त्याच त्याच चुका परत करायच्या नाहीत. त्यातून काहीतरी घ्यायचं असतं. काहीतरी सोडायचं असतं आणि परंपरा ही अविरत आहे. परंपरा एक साठलेलं तळं नाही. ते नदीसारखं वाहतं राहिलं पाहिजे. म्हणून आज हे नाटक महत्त्वाचं आहे."

भद्रकाली प्रोडक्शननं या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकातील कलाकांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे स्त्रीप्रश्नावर अनेक कथा, कादंबऱ्या, नाटकं याआधीही आलेली आहेत.

पण, एक सहजसुंदर अनुभव देत हसवण्यात, रमवण्यात, रडवण्यात आणि विचार करायला प्रवृत्त करण्यात हे नाटक नक्कीच यशस्वी ठरतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)