आशा भोसले यांच्यावर कार्डिॲक अरेस्टनंतर रुग्णालयात उपचार सुरू

वाचन वेळ: 2 मिनिटे

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना कार्डिॲक अरेस्टनंतर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टर प्रतीत समदानी यांनी ही माहिती बीबीसी मराठीला दिली आहे.

92 वर्षीय आशा भोसले यांच्यावर सध्या आपत्कालीन वैद्यकीय सेवा (इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस) युनिटमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, त्यांच्या भगिनी उषा मंगेशकर यांनीही बीबीसी न्यूज हिंदीचे सहकारी रवी जैन यांच्याशी बोलताना आशा भोसले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगितले आहे.

ही बातमी कळली तेव्हा उषा मंगेशकर पुण्यात होत्या. माहिती मिळताच त्या तातडीने मुंबईकडे रवाना झाल्या.

तसेच, एका कौटुंबिक सूत्रांनी बीबीसी न्यूज हिंदीला सांगितले की आशा भोसले या फुफ्फुसाचा आजार आणि वयोमानानुसार येणाऱ्या इतर आजारांशीही झुंज देत होत्या.

भजन ते कॅबरे, सर्व प्रकारच्या गाण्यांना साजेसा आवाज

8 सप्टेंबर 1933 रोजी जन्मलेल्या आशा भोसले यांनी 1943 मध्ये वयाच्या 10 व्या वर्षी गायनाला सुरुवात केली.

वयाच्या 90 व्या वर्षापर्यंतही त्यांचं गायन सुरू आहे. हंसराज बहल, ओ. पी. नय्यर, मदन मोहन, आर. डी. बर्मन, इलैयाराजा, अनु मलिक ते ए. आर. रहमान यांसारख्या कलाकारांसोबत त्यांनी काम केलं आहे.

रफी, मुकेश आणि किशोर यांच्यापासून ते बॉय जॉर्ज आणि आदित्य नारायण यांच्यापर्यंतच्या कलाकारांसोबत त्यांनी गाणी गायली आहेत. 1995 मध्ये उस्ताद अली अकबर खान यांच्यासोबतच्या एका अल्बमसाठी त्यांना ग्रॅमीसाठी नामांकन मिळालं होतं.

आशा भोसले यांनी 10,000 हून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत.

संगीत तज्ज्ञ राजीव विजयकर यांच्या मते, "आशा भोसले यांचं वैशिष्ट्य म्हणजे, त्या काळाबरोबर चालतात. फक्त जुन्याच गोष्टी चांगल्या असतात असा हट्ट त्यांनी कधीही धरला नाही. त्यांच्या आवाजात भजनं जेवढी सुरेल वाटतात तेवढाच त्यांचा आवाज कॅबरे सारख्या गाण्यांनाही शोभतो."

"गायनातीव वैविध्य ही त्यांची ताकद आहे आणि त्यामुळेच त्या इथपर्यंत पोहोचल्या आहेत. उदाहरणार्थ, 'आगे भी जाने ना तू...' हे गाणं पाहिलं तर, त्यात एक प्रकारचं तत्त्वज्ञान आहे शिवाय ते एक नाईट क्लब साँगसुद्धा आहे. आशा भोसलेंच्या या गाण्यात विलक्षण वेदना आहे. नाईट बारमध्ये चित्रित केलेल्या गाण्यात अशा भावना ओतणं हे अवघड काम आहे, जे आशा भोसले यांनी करून दाखवलं आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.