रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना, आळंदीतील 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर समुद्रकिनाऱ्यावर मोठी दुर्घटना घडली असून, 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला असल्याचे दिवेआगार पोलिसांनी सांगितले.
पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयाच्या माहितीनुसार, पुण्यातील आळंदी येथील विनर्स अकादमीचे 48 विद्यार्थी आणि शिक्षक पिकनिक तसेच शैक्षणिक सहलीसाठी दिवेआगर समुद्रकिनारी आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गटात 25 मुलं, 17 मुली असे 42 विद्यार्थी आणि 6 शिक्षक यांचा समावेश होता.
SP कार्यालयाने दिलेल्या प्रेस नोटनुसार, हे सर्वजण दिघी आणि दिवेआगर समुद्रकिनारा परिसरात फिरण्यासाठी आले होते. त्यातील 8 विद्यार्थ्यांचा पोहत असताना मृत्यू झाला.
विद्यार्थ्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला असे पोलीस उप-अधीक्षक राजू सोनवणे यांनी सांगितले.
घटनास्थळावर बचाव आणि मदतकार्य राबवण्यात आले असून, इतर विद्यार्थ्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे.
सर्व मृतदेह सापडले असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. मृतांची नावे खालील प्रमाणे आहेत. -
1. यश किरण वानखेडे
2. सोहम तुकाराम भांडवलकर
3. तन्मय दत्तात्रय वाहिले
4. कौस्तुभ संदीप दौंड
5. कैवल्य वासनकर
6. राजवीर वहिले
7. प्रणव बनसोडे
8. सुमित अहिरे
प्रशासनाने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. दुर्घटना नेमकी कशी आणि कोणत्या परिस्थितीत घडली, याचा तपास करण्यात येत आहे.
घटनास्थळी पोलीस, महसूल, आरोग्य विभागाचे अधिकारी/कर्मचारी उपस्थित असून पुढील पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. "रायगड जिल्ह्यातील दिघी सागरी, दिवेआगार येथे समुद्रकिनारी पर्यटनासाठी आलेल्या विनर्स अॅकडमी, आळंदीच्या 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद आणि पीडादायक आहे.
"मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.वया सर्व कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.वहे सर्व विद्यार्थी आळंदी येथील असून, त्यांचे पार्थिव आळंदी येथे नेण्यासाठी स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहेत," असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



























