'मुंबईकर' कॅप्टन स्मित मच्छर, ज्यांनी दुबई-इस्रायल फ्लाईटमधील 174 जणांचे जीव वाचवले

फोटो स्रोत, X/@IsraelMFA
दुबई-इस्रायल फ्लाइटमधील थरारनाट्याचे धाडसी 'हिरो' म्हणून आता पायलट स्मित मच्छर यांचं जगभरातून कौतुक होत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासहित भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्मित मच्छर यांची पाठ थोपटली आहे.
'फ्लायदुबई'च्या FZ1073 विमानात भारतीय नागरिक असलेल्या कॅप्टन स्मित मच्छर यांच्यावर चाकूनं हल्ला झाला. त्यांनी बेशुद्ध होण्यापूर्वी कॉकपिटचा दरवाजा उघडला होता.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत प्रसंगावधान राखत त्यांनी केलेल्या या कृतीमुळे हा विमान अपघात टळला, असं वृत्त आहे.
या विमानातून प्रवास करणारे इस्रायली प्रवासी यानिव हायून यांनी बुधवारी (30 सप्टेंबर) बेन गुरियन विमानतळावर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान ही माहिती दिली.
हायूननं नेतान्याहूंना सांगितलं की, कॉकपिटचा दरवाजा उघडा होता, पण पायलट स्मित मच्छर दरवाजाच्या इतका जवळ होता की तो उघडणं कठीण होतं.

फोटो स्रोत, Getty Images
"माझा निष्कर्ष असा आहे की, त्यानं प्रसंगावधान राखून आमच्यासाठी दरवाजा उघडला आणि नंतर तो बेशुद्ध झाला," असं हायून यांनी म्हटलं.
नंतर नेतान्याहू यांनी 'एक्स'वरील एका निवेदनात या घटनेचा उल्लेख करत स्मितच्या शौर्याचं कौतुक केलं आहे.
"चाकूनं हल्ला झाल्यानंतर गंभीर जखमी होऊनही, त्यानं प्रत्युत्तर दिलं, हल्लेखोराचा प्रतिकार केला, कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांना हल्लेखोरावर मात करण्यासाठी सावध केलं. यामुळे, एक मोठी हवाई दुर्घटना टळली," असं इस्रायलच्या पंतप्रधानांनी लिहिलं आहे.
नेतान्याहू म्हणाले की, स्मितनं इस्रायली नागरिक आणि इतर देशांच्या नागरिकांसह 174 लोकांचे प्राण वाचवले आहेत.
संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) भारताचे राजदूत दीपक मित्तल यांनी आज (1 ऑक्टोबर) दुबईमध्ये कॅप्टन स्मित मच्छर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
भारतीय राजदूतांनी कुटुंबीयांची घेतली भेट; सर्वतोपरी मदतीचे आश्वासन
भारतीय वृत्तवाहिनी डीडी न्यूज ला दिलेल्या मुलाखतीत युएईमधील भारतीय राजदूत दीपक मित्तल यांनी कॅप्टन मच्छर यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्याची माहिती दिली.
ते म्हणाले, "आज दुबईमध्ये मी कॅप्टन स्मित यांच्या पत्नी, भावाची आणि कुटुंबातील इतर सदस्यांची भेट घेतली. कॅप्टन स्मित यांच्या प्रकृतीत होत असलेल्या सुधारणेबाबत त्यांना माहिती दिली. भारत सरकार संयुक्त अरब अमिरातीतील अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून, कॅप्टन मच्छर यांच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे." असे त्यांनी सांगितले.
तसेच, शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवताना कॅप्टन मच्छर यांनी दाखवलेल्या धाडसाचे आणि शौर्याचे राजदूत डॉ. मित्तल यांनी कौतुक केले.
चाकू हल्ल्यादरम्यान स्मितनं काय केलं?
स्मित मच्छर यांचं सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. एका इराणी महिलेनं तिच्या इन्स्टाग्रामवर लिहिलंय की, "माझे पती पायलट आहेत. त्यांनी मला सांगितलं की पायलटच्या कॉकपिटमध्ये एक स्विच असतो, जो आतून कॉकपिटचा दरवाजा 'अनलॉक' करतो. त्यामुळे, कॅप्टन स्मित मच्छर यांनी केवळ मदतीसाठी कॉल दिला नसेल, तर बेशुद्ध होण्यापूर्वी तो स्विच देखील दाबला असेल, ज्यामुळे फ्लाइट अटेंडंट आणि प्रवाशांना कॉकपिटमध्ये प्रवेश करता आला. असं घडलं असण्याची शक्यता अधिक आहे."
जर कॉकपिटचा दरवाजा बंद राहिला असता, तर कुणीही आत जाऊन विमान वाचवायला मदत करू शकलं नसतं. त्यांना सलाम. त्यांच्या त्या एका निर्णयानं विमानात असलेल्या प्रत्येकाचे प्राण वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

फोटो स्रोत, Getty Images
'जेरुसलेम पोस्ट' या इस्रायली वृत्त संकेतस्थळानुसार, अनेक प्रवाशांनी जखमी झालेल्या स्मित मच्छर यांना प्रथमोपचार दिले.
त्यामध्ये इस्रायली डेंटीस्ट शोटा मुसायेव यांचाही समावेश होता. तबूक विमानतळावर विमानाचं आपत्कालीन लँडिंग झाल्यानंतर स्मित मच्छर यांना सौदी अरेबियातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मुसायेव यांनी इस्रायली माध्यमांना सांगितलं की, स्मित मच्छर गंभीर जखमी झाले होते आणि त्यांच्या डोक्यातून व हातांमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. त्यांनी रक्तस्त्राव थांबवण्यास मदत केली. त्यांनी सांगितलं की, त्यानंतर स्मित मच्छर यांची प्रकृती स्थिर झाली. परंतु, विमान उतरताना त्यांची प्रकृती पुन्हा खालावली.
मुसायेव यांनी असंही सांगितलं की, दुसऱ्या पायलटनं आपल्यावर चाकूनं हल्ला केला आहे, हे सांगण्याइतपत मच्छर बोलण्याच्या स्थितीमध्ये होते.
स्मित मच्छर हे एक अनुभवी पायलट असून त्यांनी नवीन पायलट्सना प्रशिक्षणही दिलं आहे.
स्मित मच्छर कोण आहेत?
त्यांचं पूर्ण नाव स्मित उपेंद्र मच्छर असं आहे. त्यांच्याकडे 3 मार्च 2010 रोजी जारी करण्यात आलेले कमर्शियल पायलट लायसन्स (CPL क्र. 9384) आहे.
स्मित मच्छर यांनी 2006 – 2007 मध्ये 'प्रिन्सिपल एल. एन. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट'मधून 'ए+' (A+) ग्रेडसह 'बिझनेस मॅनेजमेंट'मधील डिप्लोमा पूर्ण केला आहे.
त्यापूर्वी, 2003 ते 2006 या काळात त्यांनी 'सासमिरा इन्स्टिट्यूट ऑफ मॅन-मेड टेक्सटाइल्स'मधून 'मॅन-मेड टेक्सटाइल केमिस्ट्री'मधील डिप्लोमा 'ए' (A) ग्रेडसह प्राप्त केला.
त्यांनी 1993 ते 2003 या काळात मुंबईतील 'गुरुकुल हायस्कूल'मधून शालेय शिक्षण पूर्ण केलं असून त्यातही 'ए' (A) ग्रेड मिळवली आहे.
त्यांचे बालपणीचे मित्र प्रतीक गांधी यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलंय की, "माझा जन्म आणि पालनपोषण इथंच झालं आहे. आम्ही लहानपणापासून ते 2008 पर्यंत एकत्र होतो. जेव्हा ती बातमी आली आणि तो स्मितच होता हे आम्हाला समजलं, तेव्हा आम्हाला मोठा धक्का बसला. आम्हाला त्वरित काळजी वाटू लागली आणि नक्की काय घडलं असेल व त्याची प्रकृती कशी असेल, याचा आम्ही विचार करू लागलो. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, तो ठीक आहे आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे."
प्रकृती स्थिर असून आवश्यक उपचार सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, कॅप्टन स्मित मच्छर हे 13 वर्षांहून अधिक व्यावसायिक उड्डाणाचा अनुभव असलेले एक अनुभवी एअरलाइन पायलट आहेत.
त्यांनी सुमारे 9750 तास उड्डाण केलं असून, त्यांना बोईंग 737-800 आणि बोईंग 737 मॅक्स 8/9 (Boeing 737 MAX 8/9) ही विमानं उडवण्याचा अनुभव आहे.
ते सध्या दुबईतील 'फ्लायदुबई' (flydubai) मध्ये 'डायरेक्ट एन्ट्री कॅप्टन' म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जून 2022 मध्ये तिथं रुजू होऊन काम सुरू केलं.
'फ्लायदुबई'मध्ये येण्यापूर्वी, त्यांनी जून 2011 ते जून 2022 या काळात 'स्पाइसजेट लिमिटेड' मध्ये 'सिनियर कमांडर' आणि 'लाइन ट्रेनिंग कॅप्टन' म्हणून काम केलंय. या कालावधीत त्यांनी 9,500 तासांहून अधिक उड्डाण केलं आहे. त्यामध्ये 6,400 तासांहून अधिक काळ 'पायलट-इन-कमांड' म्हणून उड्डाण करण्याचा समावेश आहे.
नोव्हेंबर 2020 ते जून 2022 या काळात त्यांनी 'लाइन ट्रेनिंग कॅप्टन' म्हणून काम पाहिलंय. या भूमिकेत त्यांनी इतर पायलट्सना प्रशिक्षण देणं, त्यांचं मूल्यांकन करणं आणि त्यांना मार्गदर्शन करणं, ही जबाबदारी पार पाडली आहे. तसेच, त्यांनी 'लाइन ट्रेनिंग' आणि 'पायलट चेक'चं कामकाज सांभाळलं आणि पायलट्स कंपनीच्या कार्यपद्धती व सुरक्षा मानकांचं पालन करत असल्याची खात्री करण्याचंही काम केलं.
पायलट प्रशिक्षण आणि मार्गदर्शन, 'क्रू रिसोर्स मॅनेजमेंट' (CRM), विमान उड्डाण सुरक्षा, विमान वाहतूक नियम व त्यांचं पालन, तणावपूर्ण परिस्थितीत नेतृत्व करणं आणि बोईंग 737 NG व MAX विमानांचं संचालन या त्यांच्या क्षमता आहेत.
लिंक्डइन प्रोफाइलवरून असंही दिसून येतं की, स्मित मच्छर विवाहित असून त्यांना मुलंही आहेत.
सौदी अरेबियातील भारतीय दूतावासानं सांगितलं की, स्मित मच्छर यांना सौदी अरेबियाच्या वायव्येकडील तबुक शहरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू आहेत.
पायलट स्मित मच्छर यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप संपूर्ण माहिती मिळालेली नाही. परंतु, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं दूतावासानं कळवलं आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी असंही सांगितलं की ते स्मित मच्छर यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आहेत.
पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक
या सगळ्या घटनाक्रमावर व्यक्त होताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलंय की, "कॅप्टन स्मित मच्छर हे एक 'हिरो' आहेत. अत्यंत गंभीर धोक्याचा सामना करताना आणि स्वतः गंभीर जखमी असूनही, त्यांनी असीम धैर्य आणि इतरांचे प्राण वाचवण्याचा अटळ निर्धार दाखवून दिला."
"त्यांच्या या शौर्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले आणि एक मोठी दुर्घटना टळली. भारताला कॅप्टन मच्छर यांचा अभिमान आहे. ते लवकर बरे व्हावेत, त्यांना नव्याने बळ मिळावे आणि त्यांचे आरोग्य उत्तम राहावे, यासाठी मी प्रार्थना करत आहे," असंही त्यांनी म्हटलंय.
ट्रम्प यांनीही केलं स्मित यांचं कौतुक
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'फ्लायदुबई'चे पायलट स्मित मच्छर यांना 'हिरो' म्हटलं आहे. ते म्हणाले की, त्या पायलटनं सह-पायलटचा चाकू हल्ला परतवून लावला. कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि मदतीसाठी हाक मारली. त्यामुळे विमान जाणूनबुजून पाडण्याचा कथित प्रयत्न हाणून पाडण्यास मदत झाली.
ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी चर्चा केली आहे.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, नेतान्याहू यांनी त्यांना सांगितलं की, ज्यानं कधीही विमान उडवलं नव्हतं, अशा एका प्लंबरनं दुबईहून तेल अवीवला जाणाऱ्या या विमानाला हाताळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे विमान अखेर सौदी अरेबियामध्ये उतरलं.
"पायलटची प्रकृती खूपच गंभीर होती. मला वाटतं, त्याची प्रकृती अजूनही तशीच आहे. पण त्यानं प्रसंगावधान राखून जे केलं, ते खरोखरच आश्चर्यकारक होतं, तो एका अर्थानं हिरोचं होता," असंही ट्रम्प म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रम्प म्हणाले की, पायलट कॉकपिटचा दरवाजा उघडू शकला आणि मदतीसाठी ओरडू शकला.
"असं दिसतं की को-पायलट कदाचित दहशतवादी होता किंवा मानसिकदृष्ट्या विकृत व्यक्ती होता आणि त्यानं वैमानिकावर चाकूनं हल्ला केला," असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले.
त्यानंतर ट्रम्प यांनी त्या इस्रायली प्रवाशाच्या "असामान्य" भूमिकेचा उल्लेख केला, ज्यानं स्वत:ची ओळख एक प्लंबर म्हणून करून दिली.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, विमान कधीही न चालवलेल्या एका प्रवाशानं कॉकपिटमध्ये प्रवेश केला, को-पायलटला त्याच्या जागेवरून खेचलं आणि मागे ढकललं. त्यानंतर इतर प्रवाशांनी त्याला पकडून रोखलं.
ट्रम्प म्हणाले की, त्या प्रवाशानं नंतर सांगितलं की, त्यानं 'एअर डिझास्टर्स' हा टीव्ही कार्यक्रम पाहून विमान उड्डाणाची काही मूलभूत तत्त्वं शिकलेली आहेत.
"तो म्हणाला की, तो हा शो खूप बघतो आणि त्यातूनच काही प्रमाणात तो विमान उडवायला शिकला आहे," असंही ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, विमानाच्या मागील भागात उपस्थित असलेले अतिरिक्त पायलट आणि सुरक्षा कर्मचारी नंतर कॉकपिटमध्ये पोहोचले आणि त्यांनी विमानाचा ताबा घेतला.
"मला वाटतं की, ही एक प्रचंड अविश्वसनीय अशी कथा आहे," असंही ते म्हणाले.
मात्र, ट्रम्प यांनी हे देखील स्पष्ट केलं की, त्यांनी केवळ त्यांना मिळालेली माहितीच सांगतली असून या तथ्यांची त्यांनी स्वतंत्रपणे पडताळणी केलेली नाहीये.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)



























