मुलाला एकट्याने बाहेर जाऊ दिलं, आईवर बालछळाचा ठपका; अमेरिकेतील प्रकरण चर्चेमध्ये

फोटो स्रोत, Getty Images
- Author, रेदाक्सियोन
- Role, बीबीसी न्यूज मुंडो
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
अमेरिकेतील व्हर्जिनिया राज्यामध्ये एका आईने आपल्या 5 वर्षांच्या मुलाला ते राहत असलेल्या निवासी संकुलातील रस्त्यांवर एकट्याने फिरू दिलं. याप्रकरणी तिला बाल शोषणाच्या (छळ) आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं आहे.
36 वर्षीय कॅरियन पार्किन्सन यांनी आपला मुलगा सॅम्युअल याला जवळच्या तलावापर्यंत एकट्याने जाण्याची परवानगी दिली होती. तलाव त्यांच्या घरापासून साधारण 800 मीटर अंतरावर होता. तिथे जाऊन त्यांनी सॅम्युअलला हंसाची पिसं गोळा करण्यास सांगितलं होतं.
"मी त्याला तिथे जाण्याची परवानगी दिली होती," असं पार्किन्सन यांनी अमेरिकेतील बीबीसीची सहकारी वृत्तसंस्था सीबीएस न्यूजला सांगितलं. "मी त्याला सांगितलं, 'तिथे जाऊन लगेच परत ये.'"
पार्किन्सन या आपल्या पती आणि 5 मुलांसह विल्यम्सबर्ग शहरातील फोर्ड्स कॉलनी या निवासी संकुलात राहतात. हे संकुल बंदिस्त असून, तिथे खासगी सुरक्षा व्यवस्था तैनात आहे.
तलावाकडे जात असताना एका सुरक्षा रक्षकाला सॅम्युअल दिसला. त्यानंतर त्या रक्षकाने त्याला घरी परत आणून सोडलं.
पार्किन्सन यांनी सांगितलं, "सुरक्षा रक्षक मला म्हणाला, 'आम्ही मुलांना परिसरात एकट्याने फिरू देत नाही.' त्यावर मी त्याला विचारलं, 'घरमालकांच्या संघटनेच्या (होम ओनर्स असोसिएशन) नियमांमध्ये असं कुठे लिहिलं आहे का? कारण मला तरी हे नियमांच्या विरोधात आहे असं वाटत नाही.'"
"त्यावर तो म्हणाला, 'ठीक आहे, हे नियमांच्या विरोधात नसेल, तर कायद्याच्या विरोधात आहे. मी पोलिसांना बोलावतो,'" असं पार्किन्सन यांनी सांगितलं.
कुटुंबाची राहण्याची परिस्थिती तपासण्यासाठी पोलीस आणि बालसंरक्षण विभागाचे अधिकारी त्यांच्या घरी आले.
पार्किन्सन यांनी सीबीएस न्यूजला म्हटलं, "आम्हाला वाटलं होतं की, सरकारी वकील आणि न्यायाधीशांसमोर हे प्रकरण गेल्यावर सर्व काही ठीक होईल."
परंतु, 21 ऑगस्टला सुनावणी झालेल्या खटल्यात आईला अल्पवयीन मुलाला चुकीच्या मार्गाला लावल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यात आलं.
या प्रकरणात आईला 6 महिन्यांच्या शिक्षेचा आदेश देण्यात आला. परंतु, ही शिक्षा स्थगित करण्यात आल्याने तिला तुरुंगात जावं लागणार नाही. मात्र व्हर्जिनियातील बाल अत्याचार आणि मुलांकडे दुर्लक्ष केल्याच्या प्रकरणांच्या नोंदवहीत तिचं नाव 7 वर्षे राहणार आहे.
या दोषसिद्धीमुळे सॅम्युअल सहावीत जाईपर्यंत त्याच्या शाळेत स्वयंसेवक म्हणून काम करण्याची संधीही आईला मिळणार नाही.
मुलांचं स्वातंत्र्य
कॅरियन पार्किन्सन आणि त्यांच्या मुलाच्या प्रकरणामुळे स्वातंत्र्याबद्दल चर्चा सुरू झाली.
अमेरिकेतील 13 राज्यांपैकी व्हर्जिनिया हे एक राज्य आहे, जिथे मुलांना वयानुसार स्वातंत्र्य देण्याबाबत कायदा आहे.
या कायद्यामुळे पालकांनी मुलांसाठी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर सरकारी यंत्रणांना प्रश्न उपस्थित करता येत नाही किंवा ते प्रश्न विचारू शकत नाहीत.
पार्किन्सन म्हणाल्या, "मुलांशी संवाद साधावा, तो आत्मविश्वासाने आणि व्यवस्थित सगळं करू शकतोय याची खात्री करावी आणि मग त्याला त्याच्या पद्धतीने करू द्यावं, असं मला वाटतं. सर्व काही ठीक सुरू असेल, तर आपण मुलांच्या प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करू नये."

अमेरिकेची सार्वजनिक रेडिओ वाहिनी एनपीआरला दिलेल्या मुलाखतीत पार्किन्सन म्हणाल्या, "मुलांना स्वतंत्रपणे वाढू देणं, स्वातंत्र्यपूर्ण बालपण म्हणजे नेमकं काय, याबद्दल लोकांना स्पष्ट कल्पना नाही, असं मला वाटतं."
"जेव्हा लोकांना असं काही दिसून येतं, तेव्हा त्यांना धक्का बसतो. कारण आपल्याला याची सवय नाही."
त्या पुढे म्हणाल्या, "गेल्या 30 वर्षांत आपण मुलांना घर आणि बंदिस्त जागांपुरतंच मर्यादित केलं आहे."
"मुलं आपण समजतो त्यापेक्षा खूप काही करू शकतात, हे लक्षात घेण्यासाठी आपल्या समाजाला अशा गोष्टींची सवय करून घ्यायला हवी," असं त्या म्हणाल्या.
पार्किन्सन यांनी या शिक्षेविरोधात अपील करणार असल्याचं सांगितलं आहे. यावर जानेवारी महिन्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.
त्या म्हणाल्या, "अनेक मातांनी त्यांच्यासोबतही असेच प्रकार घडल्याचे संदेश पाठवले. हे पाहून मला खरंच आश्चर्य वाटलं."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)



























