इराणमधून भारतात स्थलांतर करण्यापूर्वी पारशी कोठे राहिले होते? होर्मुझशी काय आहे संबंध?

पारसी

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, जय शुक्ला
    • Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 6 मिनिटे

गेले काही दिवस जगाचं लक्ष आहे अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये घडणाऱ्या घडामोडींवर. या देशांमधल्या संघर्षाने अनेक उद्योगांना फटका बसला, काही गोष्टी महागल्या. त्यापैकी एक म्हणजे तेल आणि गॅसच्या किमती.

या वाढलेल्या किमतीमुळे अजून एका गोष्टीची चर्चा झाली - 'मॅरिटाईम चोकपॉइंट्स'. म्हणजेच जगाचा व्यापार हा काही मोजक्या अरुंद सागरी मार्गातून होतो असे मार्ग. याला कारण ठरली होमुर्झची सामुद्रधुनी.

इराणने या सामुद्रधुनीत तेलवाहू जहाजांची नाकाबंदी केली. जगातील 20 टक्के तेल आणि गॅसचा पुरवठा याच मार्गातून होतो. होर्मुझची सामुद्रधुनी पर्शियन आखाताला ओमानचं आखात आणि आग्नेयेला अरबी समुद्राशी जोडते.

होर्मुझचं भौगोलिक महत्त्व आहेच, पण त्याचबरोबर होर्मुझला प्राचीन इतिहासही आहे आणि त्याचा थोडाफार संबंध भारताशीही आहे. काय आहे हा इतिहास? इराणमधून भारतात येण्यापूर्वी पारशी लोक काही काळी होर्मुझमध्येही राहिले होते.

पारसी इतिहासाचा प्रमुख स्रोत मानल्या जाणाऱ्या 'किस्सा-ए-संजान' या ग्रंथाचं लिखाण इसवी सन 1600 मध्ये नवसारीतील पारशी धर्मगुरू बाहमन कैकोबाद यांनी केलं होतं. या ग्रंथाच्या आधारेच अनेक पारशी इतिहासकारांनी या समुदायाच्या स्थलांतराचा इतिहास लिहिला आहे.

मात्र, या ग्रंथातील घटनांचे तपशील आणि तारखांबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे काही विद्वान त्यातील सर्व माहिती पूर्णपणे ऐतिहासिक सत्य मानण्यास तयार नाहीत. तरीही भारत आणि गुजरातमध्ये पारश्यांच्या आगमनाबाबतचा हा सर्वात महत्त्वाचा आणि जवळपास एकमेव पारंपरिक स्रोत मानला जातो.

इराणमधल्या पर्शियन साम्राज्याचा ऱ्हास हा इसवीसन 651पासून सुरू झाल्याचं मानलं जातं. पर्शियन साम्राज्याचा शेवटचा सम्राट यझदेजार्द शहरियारचा पराभव झाला. पारशी इतिहासकारांच्या मते अरबांनी पर्शियन सम्राटाचा पराभव केल्यानंतर इथे हत्या केल्या, पारशी धर्मियांवर इस्लाम स्वीकारण्यासाठी दबाव आणला.

पारशी लोकांचा पवित्र अग्नी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पारशी लोकांचा पवित्र अग्नी

पालोनजी बरजोरजी देसाई यांनी त्यांच्या पुस्तकातून इराणचा इतिहास आणि पारशी लोक भारतात कसे आले हे मांडलं आहे.

पालोनजी बरजोरजी देसाई लिहितात, "यझदेगर्दच्या राज्याचं पतन झाल्यानंतर शतकभरात बहुतेक पारशी धर्मीय विजेत्यांना शरण गेले. त्यांच्यापैकी काहीजण वरकरणी सत्ताधीशांच्या बाजूने असल्याचं दाखवत असले, तरी गुप्तपणे त्यांनी आपल्या धर्माचं पालन करणं सुरूच ठेवलं.

काही जणांनी मात्र आपला धर्म जपत, आपल्या देशातून पलायन केलं आणि आजूबाजूच्या प्रदेशात विखुरले. त्यांपैकीच काही जण हे भारतातही आले."

पारशी समाज मूळ कुठला?

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पारशी समाज भारतात कुठून आला?

'History of Parsis' या पुस्तकात पारशी इतिहासकार दोसाभाई फरमजी काकरा लिहितात, "कुराणचा स्वीकार करण्याऐवजी हे लोक खोरासनच्या डोंगराळ प्रदेशाच्या आश्रयाला गेले. तिथे ते जवळपास शतकभर वास्तव्याला होते. पण तिथेही शत्रूचा धोका होता. त्यामुळे ते तिथूनही बाहेर पडले. त्यापैकीच काहीजण एका छोट्या बेटावर आले. ओर्मुस (आताचे होर्मुझ) हे बेट पर्शियन आखाताचं प्रवेशद्वार होतं."

'पारसी प्रजा' या पुस्तकाचे लेखक पिलू नानावटी यांनी म्हटलं की, झरतुष्ट्राच्या अनुयायांनी कोहिस्तान इथं आश्रय घेतला.

त्यांनी लिहिल्याप्रमाणे 100 वर्षांहून अधिक काळ ते कठीण परिस्थितीत राहिले. काहीजणांनी इस्लाम स्वीकारला.

होर्मुझमध्ये पारशांनी घालवलेली 15 वर्षं

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पिलू नानावटी यांच्या 'पारसी प्रजा' या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे ते होर्मुझमधे थांबले.

त्यांनी लिहिलं आहे, "7 गट बनवून होर्मुझमधून हे पारसी दीवला येण्यासाठी निघाले."

दोसाभाई फरमजी काकरा लिहितात, "ते होर्मुझमधल्या निर्जन प्रदेशात फार कमी काळासाठी राहिले. कारण तिथेही ते त्यांच्यावर आक्रमण करणाऱ्यांच्या टप्प्यातच होते. त्यामुळेच त्यांच्या हाती लागण्यापेक्षा त्यांनी आपल्या पूर्वजांची भूमी कायमची सोडून दुसऱ्या भूभागात जाण्याचा निर्णय घेतला."

"होर्मुझमध्येच त्यांनी प्रवासासाठी जहाजं घेतली असणार आणि आपल्या मुलाबाळांसह भारताच्या किनारपट्टीच्या दिशेने निघाले असावेत," असं काकरा यांनी म्हटलं.

'Parsis in India and the Diaspora' या पुस्तकाचे लेखक आणि मँचेस्टर विद्यापीठातील प्राध्यापक-संशोधक जॉन आर. हिनल्स आणि अॅलन विल्यम्स यांनीही 'किस्सा-ए-संजान' या पुस्तकाचा दाखला देत गुजरातला येण्यापूर्वी पारसी होर्मुझला थांबले असल्याचं म्हटलं आहे. मात्र, या पुस्तकातील अनेक तपशीलात त्रुटी असल्याचंही त्यांनी म्हटलं.

होर्मुझ इथून पारसी सौराष्ट्रच्या दक्षिणेकडे असलेल्या दीव इथे आले. तिथे ते जवळपास 19 वर्षं वास्तव्याला होते. दीवनंतर ते संजान इथे पोहोचले. संजान हे गुजरातमधल्या वलसाड जिल्ह्यातलं ठिकाण आहे.

पारसी समुदाय

फोटो स्रोत, Getty Images

अर्थात, इतिहासकारांच्या मते हे स्थलांतर काही एकाचवेळी झालं नाही. पारसी लोक टप्प्याटप्प्याने येत गेले. होर्मुझमधून दीवमध्ये आलेल्या पारशांनी तिथे राहून तिथली भाषा, रितीरिवाज, भौगोलिक रचना समजून घेतली आणि मग ते संजानमध्ये आले असावेत, असं इतिहासकारांचं मत आहे.

'किस्सा-ए-संजान' मध्ये म्हटलं आहे की, ते गुजरातमध्ये इसवी सन 775 मध्ये आले. पण काही इतिहासतज्ज्ञांच्या मते त्यांचे भारतात येण्याचे वर्ष होते इसवी सन 716. त्यावेळी तिथल्या शासनकर्त्याकडून त्यांनी तिथे राहण्याची परवानगी मागितली.

एका कथेनुसार, इथल्या राजाने त्यांना वाटीभर दूध पाठवले. पारशांनी त्यात साखर घालून ते पुन्हा पाठवले. याचा अर्थ होता, आम्ही दुधात साखर मिसळावी त्याप्रमाणे तुमच्यामध्ये मिसळून राहू. पारशांना इथे राहण्याची परवानगी मिळाली.

पारशी जेव्हा गुजरातमध्ये आले, तेव्हा संजानमध्ये नेमकं कोणाचं शासन होतं, याबद्दलही इतिहासाकारांमध्ये मतभेद होते.

काही इतिहासकारांच्या मते पारशी दीववरून खंबात तसंच सुरत जवळच्या वैराव इथेही गेले. त्यानंतर अखेरीस ते गुजरातमधल्या नवसारी, वलसाड आणि उडवारा या भागात स्थिरावले. पण त्यांचं मुख्य धार्मिक केंद्र त्यांनी संजान इथेच ठेवलं. त्यांनी त्यांच्या पवित्र अग्नीची स्थापनाही तिथेच केली.

होर्मुझबद्दल बोलताना दोसाभाई काकरा यांनी लिहिलं, "इसवीसन 741 मध्ये पारशी जेव्हा होर्मुझमध्ये थांबले होते, तेव्हा होर्मुझ आता जसं आहे तसं मुख्य भूमीपासून तुटलेलं नव्हतं. त्यानंतर इसवी सन 950च्या दरम्यान हे शहर व्यापाराचं केंद्र बनलं. इसवीसन 1003 मध्ये होर्मुझपासून काही मैल अंतरावर असलेल्या एका बेटाला अरबांनी 'न्यू होर्मुझ' असं नाव दिलं."

होर्मुझ या नावाचा उगम काय? पारसी नेमक्या कोणत्या होर्मुझवरून आले?

काही इतिहासकारांचे असेही मत आहे की, गुजरातमध्ये येण्यापूर्वी पारसी लोक ज्या ठिकाणी राहिले होते त्या ठिकाणाचे नाव होर्मुझ नव्हते.

जुनागढमधल्या बहाउद्दीन महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या शापूरशाह होरमसजी होडीवाला यांनी त्यांच्या 'Studies in Parsi History' या पुस्तकात लिहिले आहे, "ते सध्याचे होर्मुझ नसून त्या काळातील एक प्राचीन शहर असावे. ते पर्शियन आखाताच्या उत्तरेकडील किनाऱ्यावर वसलेले होते. तसंच ते अब्बास बंदरापासून जवळपास 30 मैल अंतरावर असावे. या प्राचीन शहराचे उत्खनन सर लुईस पॅले यांनी केले होते."

सर लुईस पेले हे ब्रिटिश भूगर्भशास्त्रज्ञ होते.

शाहपूरशाह होरमसजी होडीवाला यांनी लिहिलं आहे की, सर लुईस पॅले यांनी या प्राचीन शहराचे अवशेष शोधून काढले होते. हे अवशेष सध्याच्या मीना जिल्ह्याजवळच्या एका किल्ल्याजवळ आढळले होते.

अबु अल्-फिदा यांच्या मते, होर्मुझ हे एक बंदर आणि अतिशय उष्ण हवामान असलेले शहर होते. तिथे खजुरांची झाडं होती. हेच प्राचीन काळातलं होर्मुझ मानलं जात होतं आणि आक्रमणात त्याचा नाश झाला.

होर्मुझ बंदर

फोटो स्रोत, Getty Images

गुजरात विश्वकोष ट्रस्टच्या माहितीनुसार, होर्मुझ म्हणजेच ओर्मुज. होर्मुझचं बेट हे इराणमधलं होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या इथे असलेलं एक बेट आहे. ते मिनाब शहराच्या जवळ आहे.

या 8 किलोमीटर लांबीच्या बेटाच्या उत्तरेकडील टोकाला होर्मुझ बंदराचे अवशेष आहेत. 14व्या ते 16व्या शतकादरम्यान होर्मुझ किंवा ओर्मुझ हे पर्शियन आखातामधील एक प्रमुख व्यापारी केंद्र होतं.

गुजरात विश्वकोष ट्रस्टच्या माहितीनुसार, होर्मुझचा सर्वात जुना उल्लेख इ.स. पूर्व चौथ्या शतकातील नार्कस यांच्या सागरी प्रवास वृत्तांतामध्ये आढळतो.

अर्दशीर-पहिला या ससानी शासकाने होर्मोझिया किनाऱ्यावर अलेक्झांडर द ग्रेट याच्या नौदलाने नांगर टाकल्यानंतर हे शहर वसवले. मात्र, अरब आक्रमणानंतर या शहराचे महत्त्व अधिक वाढले.

अल-इद्रिसी, इस्तखारी आणि अल मक्सिदी यांसारख्या भूगोलाच्या अभ्यासकांनी होर्मुझचा व्यापारी केंद्र म्हणून उल्लेख केला आहे.

अरब भूगोलतज्ज्ञ याकुत अल हमावी (12वे-13वे शतक) यांच्या मते, होर्मुझ हे भारत आणि चीन यांच्यातील व्यापाराचे प्रमुख केंद्र होते.

मार्को पोलो यांनी 1272 ते 1293 दरम्यान या बंदराला दोनदा भेट दिली होती. त्या काळात होर्मुझ हे अत्यंत महत्त्वाचे व्यापारी केंद्र मानले जात होते.

1507 मध्ये पोर्तुगीजांनी या बंदरावर हल्ला केला. त्यानंतर 1514-15 मध्ये अल्फान्सो द अल्बुकर्कच्या नेतृत्वाखाली पोर्तुगीजांनी होर्मुझ बंदर ताब्यात घेतलं आणि तिथं एक किल्ला बांधला. पोर्तुगीजांचे या बंदरावर 1622 पर्यंत नियंत्रण होते.

याच काळात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने पर्शियासोबत व्यापारी संबंध प्रस्थापित केले.

ब्रिटिश आणि पोर्तुगीज यांच्यात वारंवार संघर्ष होत होते. पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेले होर्मुझ बंदर पर्शियाचे तत्कालिन शासनकर्ते अब्बास-पहिले यांनी ब्रिटीश नौदलाच्या मदतीने 1622 मध्ये जिंकून घेतले.

आजही होर्मुझच्या अवशेषांमध्ये पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला पाहायला मिळतो.

पारसी समुदाय

फोटो स्रोत, Getty Images

काही पुस्तकांनुसार होर्मुझ किंवा ओर्मुझ या नावाचा संबंध झोराष्ट्रीयन धर्मातील देवता अहुरा माज्दा यांच्याशी जोडला जातो. काही इतिहासकारांच्या मते, या नावाचा संबंध पर्शियन ससानी साम्राज्याशीही आहे.

पूर्वी या प्रदेशाचा उल्लेख 'हॉर्मिझ्द' किंवा पर्शियन शब्द 'हूर-मोग' असा केला जात असे. पर्शियन भाषेत 'हूर-मोग' याचा अर्थ 'खजुराच्या झाडांचा मार्ग' असा होतो. काही जण त्याला 'हॉर्मोज' असेही म्हणतात.

इस्लामच्या आगमनापूर्वी 7व्या शतकात इथं झोराष्ट्रीयन धर्म प्रचलित होता.

नंतर या प्रदेशाचे नाव ओर्मुज किंवा होर्मुझ असे झाले. युरोपीय नोंदींमध्ये या दोन्ही नावांचा उल्लेख आढळतो.

असे मानले जाते की, 16व्या शतकात पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी इथे नियंत्रण मिळवल्यानंतर याचं नावं 'होर्मुझ' असं लिहायला सुरू केलं.

होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या नावाचा उगम इफ्रा होर्मिझ्द या नावातून झाल्याचाही दावा केला जातो.

इफ्रा या पर्शियन राजा शापूर-दुसरा यांच्या आई. शापूर-दुसरा अल्पवयीन असताना इसवी सन 309 ते 325 दरम्यान इफ्रा यांनी आपल्या मुलाच्या वतीने राज्यकारभार सांभाळला होता.

शापूर दुसरे हे ससानी साम्राज्याचे 10वे सम्राट होते आणि ससानी साम्राज्यात सर्वाधिक काळ राज्य करणारे शासक मानले जातात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)