पाकिस्तानने अमेरिका आणि इराणमध्ये शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठी कसे प्रयत्न केले?

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (उजवीकडे) यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (उजवीकडे) यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली.
    • Author, कॅरोलिन डेव्हिस
    • Role, पाकिस्तान प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

अनेक दिवसांच्या संघर्षानंतर अमेरिका आणि इराणने दोन आठवड्यांची शस्त्रसंधी केली आहे.

ही शस्त्रसंधी झाल्यानंतर अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांनी पाकिस्तानचे आभार मानले. ही शस्त्रसंधी होण्याआधी पाकिस्तानकडूनच थोडीफार आशा दिसू लागली होती.

नाव न सांगण्याच्या अटीवर पाकिस्तानातील एका सूत्राने बीबीसीला सांगितले की, इराण आणि अमेरिकेतील वाटाघाटी या 'जलद गती'ने सुरू होत्या, ज्यात पाकिस्तानने मध्यस्थाची भूमिका बजावली.

ज्या उच्चपदस्थांनी वाटाघाटीची प्रक्रिया पार पाडली त्यांचं अतिशय छोटं वर्तुळ आहे. वाटाघाटीच्या वेळी अतिशय धीर गंभीर वातावरण होते.

परंतु, दोन्ही देशात शस्त्रसंधी होईल अशी आशा वाटत होती. मुदत संपण्यास काही तासांचा अवधी बाकी होता, असे या सूत्राने सांगितले. संबंधित सूत्र वाटाघाटी करणाऱ्या त्या छोट्या वर्तुळाचा भाग नव्हता.

पाकिस्तानने गेल्या काही आठवड्यांपासून दोन्ही देशात मध्यस्थाची भूमिका बजावली. त्यामध्ये दोन्ही देशांचे संदेश एकमेकांना पाकिस्तानमार्फतच दिले जात होते.

पाकिस्तानचे इराणशी ऐतिहासिक संबंध आहेत आणि पाकिस्तानची सीमा इराणला लागून आहे. पाकिस्तानने इराणसोबत नेहमी बंधुत्वाचे संबंध असल्याचा उल्लेख केला आहे.

जर पाकिस्तान आणि अमेरिकेचे सबंध कसे आहेत, हे समजून घ्यायचे असेल तर डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांबद्दल काय म्हणतात, हे आपण पाहू शकतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांचा उल्लेख करताना म्हणतात की, मुनीर हे त्यांचे 'आवडते' फील्ड मार्शल आहेत. आणि त्यांना इराण हा इतर अनेकांपेक्षा चांगला कळतो.

ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध वाढले आहेत (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिका आणि पाकिस्तानचे संबंध वाढले आहेत (फाइल फोटो)

दोन्ही देशात शस्त्रसंधी होईल याची निश्चितता धूसर होती. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशक दार मंगळवारी रात्री संसदेत म्हणाले होते की, अगदी कालपर्यंत आम्ही दोन्ही देशातील स्थितीबाबत आशावादी होतो. पण इस्रायलने सोमवारी इराणवर हल्ला केला आणि इराणने सौदी अरेबियावर.

ते पुढे म्हणाले की, तरीही पाकिस्तानने जे काही शक्य आहे ते करण्याचे प्रयत्न केले.

फील्ड मार्शल मुनीर यांचा सूर टीकेचा होता. मंगळवारी ते जेव्हा लष्कराशी बोलत होते, तेव्हा ते म्हणाले, सौदी अरेबियावरील हल्ल्यामुळे आम्ही जे शांततापूर्ण संधीचे प्रयत्न करतो होतो, ते धुळीस मिळाले, असे वाटले.

जेव्हापासून हा संघर्ष सुरू झाला तेव्हापासून पाकिस्तानने इराणबाबत वापरलेली ही सर्वांत कठोर भाषा होती.

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यासोबत (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यासोबत (फाइल फोटो)

काही विश्लेषकांना असेही वाटते की, या गोष्टीमुळे इराणवर दबाव निर्माण होईल. पाकिस्तानचा सौदी अरेबियाशी शांततेचा करार आहे. सौदी अरेबियावर अनेक वेळा हल्ला होऊन देखील या करारातील अटी सध्या लागू करण्यात आलेल्या नाहीत.

मध्यरात्रीनंतर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी 'एक्स'वर (पूर्वीचं ट्विटर) म्हटले की, नजीकच्या काळात चांगले परिणाम दिसून येतील, यासाठी सातत्यपूर्ण, कसोशीने आणि समर्थपणे मुत्सद्देगिरी सुरू आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली जावी यासाठी इराणला देण्यात आलेली मुदत दोन आठवड्यांनी वाढवण्यात यावी, अशी बोलणी पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी ट्रम्प यांच्यासोबत केली.

इराणचे पाकिस्तानातील राजदूत रेझा अमिरी मोघादम यांनी ट्विटरवर तीन वाजण्याच्या सुमारास म्हटले होते की, गंभीर आणि संवेदनशील परिस्थितीच्या पुढे पाऊल पडले आहे.

संबंधित सूत्राने म्हटले की, आम्ही अजूनही सावधगिरीचा पवित्रा बाळगला आहे. स्थिती अतिशय नाजूक आहे. दोन्ही देशात अद्याप विश्वासाचे नाते नाहीये. दोन्ही बाजू ठामपणे पाय रोवून उभ्या आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)