आपली वास घेण्याची क्षमता आणि मृत्यूचा काय असतो संबंध? दुर्गंधी किती धोकादायक ठरू शकते?

प्रातिनिधिक फोटो.

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, क्रिस मार्शल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

तुमच्या दिशेनं येणाऱ्या दुर्गंधाचा परिणाम तुम्हाला फक्त मळमळ होण्यापुरताच मर्यादित नसतो. तर तुमचं शरीर आणि मनावरही त्याचा परिणाम होऊ शकतो.

एलेन कॉर्नर या एक निवृत्त शिक्षिका आहेत. त्यांना उन्हाळ्यातील एखाद्या दिवशी त्यांच्या बागेत पाय ठेवणं ही असह्य ठरणारी बाब वाटत होती. याची तुलना त्या "एखाद्या कचरा वाहून नेणाऱ्या उघड्या ट्रकच्या मागे चालण्याशी" करतात.

त्यांचं घर इंग्लंडमधील वेस्टबरी या बाजारपेठेच्या शहरात आहे. एलेन कॉर्नर म्हणतात की तिथल्या त्यांच्या घराच्या सर्व खिडक्या बंद केल्यानंतरही तिथून जवळच असलेल्या कचरा प्रक्रिया केंद्रातून येणाऱ्या मळमळायला लावणाऱ्या दुर्गंधीपासून त्यांची अनेकदा सुटका होत नाही.

"आम्ही आमच्या बागेत जाऊ शकत नाही, तिथं फेरफटका मारू शकत नाही. तिथे गेल्यावर आता आपल्याला उलट्या होतील, असं वाटत राहतं", असं कॉर्नर म्हणतात.

कधी ना कधी, आपण सर्वांनीच कचऱ्याच्या दुर्गंधी, अतिशय घाणेरड्या वासाचा अनुभव घेतलेला असतोच.

मग तो कचरा बाहेर टाकताना असो की कचरा डेपोच्या बाजूनं गाडी चालवत असताना किंवा एखाद्या कारखान्यातील येणाऱ्या दुर्गंधीचा असो. अशा प्रकारच्या दुर्गंधीच्या सान्निध्यात सतत जगण्याबद्दल जरा कल्पना करून पाहा.

तरीदेखील अशा दुर्गंधीच्या प्रदूषणामुळे आरोग्यावर आणि जीवनमानावर होणाऱ्या परिणामांकडे आपण फारसं लक्ष देत नाही. दुर्गंधी किंवा घाणेरड्या वासाकडे एखाद्या व्यक्तीशी संबंधित किंवा क्षुल्लक गोष्ट म्हणून अनेकदा दुर्लक्ष केलं जातं.

संशोधनातून दिसून आलं आहे की, सर्वसाधारणपणे लोक, त्यांची दृष्टी, ऐकणं, स्पर्श आणि चव यापेक्षा वास घेण्याच्या इंद्रियाला कमी महत्त्व देतात. अमेरिकेतील काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तर हेदेखील मान्य केलं आहे की फोन गमावण्यापेक्षा ते त्यांची वास घेण्याची क्षमता गमावणं पसंत करतील.

आपली वास घेण्याची क्षमता आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते आणि ज्या लोकांची ही क्षमता कमकुवत असते, त्यांना मृत्यूचा धोका अधिक असतो

फोटो स्रोत, Serenity Strull/ BBC/ Getty Images

फोटो कॅप्शन, आपली वास घेण्याची क्षमता आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते आणि ज्या लोकांची ही क्षमता कमकुवत असते, त्यांना मृत्यूचा धोका अधिक असतो

दुर्गंधी, भयंकर घाणेरड्या वासात राहिल्यामुळे लोकांना फक्त अस्वस्थता जाणवते असं नाही. अभ्यासातून शहरी भागातील दुर्गंधीचा संबंध, आरोग्याच्या विविध तक्रारींशी असल्याचं लक्षात आलं आहे. यात डोकेदुखी, मळमळ होणं ते श्वास घेण्यास अडचण येणं आणि झोपेमध्ये व्यत्यय येणं यासारख्या समस्यांचा समावेश आहे.

या दुर्गंधीचे दीर्घकाळ राहणारे शारीरिक आणि मानसिक परिणामही होऊ शकतात. गंध किंवा वासाची आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी असणारी आश्चर्यकारकरित्या महत्त्वाची भूमिका समजून घेण्यात वाढत्या संशोधनामुळे मदत होते आहे.

धोक्याबद्दल सांगणारा गंध

गंधाचा विकास, आजारी पडणं किंवा संसर्ग टाळण्यासाठीचा एक पूर्व-इशारा म्हणून झाला आहे. एखाद्या गोष्टीला कुबट किंवा उग्र वास येत असेल तर त्यात जिवाणू असू शकतात. जे आपल्याला हानिकारक ठरू शकतात.

जोहान लुंडस्ट्रॉम स्वीडनमधील स्टॉकहोममधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये गंध विज्ञानाचे (सायन्स ऑफ स्मेल) प्राध्यापक आहेत. त्यांच्या मते, गंध हा आपल्या तथाकथित वर्तनात्मक रोगप्रतिकार व्यवस्थेचा (बिहेविरल इम्यून सिस्टम) भाग आहे.

"गंध ओळखणारी व्यवस्था(ओलफॅक्टरी सिस्टम) प्रामुख्यानं पर्यावरणातील धोक्याबद्दल आपल्याला सावध करण्यासाठी, एक टाळणारी व्यवस्था म्हणून काम करते," असं लुंडस्ट्रॉम म्हणतात.

त्यांच्या अभ्यासातून तर असंही दिसून आलं आहे की नाकातून वास घेतल्यानंतर जवळपास 300 मिलिसेंकदांमध्येच आपल्या मेंदूमध्ये गंधांच्या संदेशांवर प्रक्रिया होते.

या अभ्यासात भाग झालेल्या लोकांना दुर्गंधीच्या संपर्कात ठेवण्यात आलं. दुर्गंधी आल्यानंतर त्यांनी जलद शारीरिक प्रतिसाद दाखवला. ते त्या वासाच्या स्त्रोतापासून स्वाभाविकपणे दूर झाले.

एखाद्या गोष्टीला कुबट किंवा उग्र वास येत असेल तर त्यात जिवाणू असू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एखाद्या गोष्टीला कुबट किंवा उग्र वास येत असेल तर त्यात जिवाणू असू शकतात.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

वासाची उपजतच बचावात्मक प्रवृत्ती (डिफेन्सिव्ह डिफॉल्ट) असते. त्यामुळे एखादा गंध किंवा वास जरी सामान्यपणे सुखद किंवा चांगला मानला जात असला तरीदेखील एखाद्या व्यक्तीला तो वास घाणेरडा आहे, असं पटवून देणं आश्चर्यकारकरित्या सोपं ठरतं.

"जर एखादा वास किंवा गंध आपल्या लक्षात आला आणि तो नेमका कशाचा आहे, हे जर आपल्याला माहिती नसेल, तर तो वास सहसा आपल्याला चांगला वाटत नाही किंवा तो घेतल्यावर आपल्याला फारसं आवडत नाही," असं लुंडस्ट्रॉम म्हणतात.

एखादा वास जेव्हा एखाद्या धोक्याशी जोडलेला असतो, तेव्हा त्या वासाच्या बाबतीत आपली संवेदनशीलता देखील मोठ्या प्रमाणात वाढू शकते. लुंडस्ट्रॉम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एका अभ्यासातून दाखवून दिलं की, विजेच्या धक्क्याशी जर एखादा वास जोडला किंवा त्याची सांगड घातली, तर त्या वासाची तीव्रता खूप कमी असतानाही लोक तो वास ओळखू शकतात.

ही एकप्रकारची प्रतिक्रियात्मक क्रिया असते. जी मानवाला संभाव्य धोक्यांच्या बाबतीत, अगदी तो वास फारच मंद किंवा कमी तीव्रतेचा असतानाही, लगेचच प्रतिक्रिया देण्यासाठी विकसित झालेली असावी.

त्याचप्रमाणे, हायड्रोजन सल्फाईड या वायूला सडलेल्या किंवा कुजलेल्या अंड्यांसारखा वास येतो. हा वास एक अब्जाचा 0.5 वा भाग (पार्ट्स पर बिलियन) इतक्या अत्यंत कमी तीव्रतेचा असतानाही जाणवू शकतो.

जास्त तीव्रतेत असल्यास हा गॅस प्राणघातक असतो. अशा गॅससाठी ही धोक्याची घंटा असते.

आरोग्यावर होणारे खरे परिणाम

वासाचा संबंध फक्त एखादा धोका ओळखण्यापुरताच नसतो. वासाचे लोकांच्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर खूपच खरे, वास्तविक परिणाम होऊ शकतात.

वैज्ञानिकांनी दाखवून दिलं आहे की जंगलातील सुगंधासारखे चांगले वास आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यामागचं एक कारण म्हणजे ते आपल्या मेंदूतील भावना आणि स्मृतीशी संबंधित भागांना उत्तेजित करतात.

याच्या उलट गोष्टही खरी असू शकते. म्हणजे दुर्गंधीमुळे आपल्या आरोग्याची हानी होऊ शकते. अर्थात वैज्ञानिक अजूनही वासामुळे होणारं प्रदूषण आणि त्याचे शरीरावर होणारे कोणतेही थेट परिणाम यांच्यातील नेमका संबंध उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत.

2021 मध्ये अभ्यासांचा एक आढावा घेण्यात आला. त्यात दुर्गंधीमुळे डोकेदुखी किंवा उलटी होण्यासारख्या लक्षणांमागे काही 'जैविक तर्कसंगतता किंवा संभाव्यता' असल्याचं आढळून आलं.

वासाचा संबंध फक्त एखादा धोका ओळखण्यापुरताच नसतो. वासाचे लोकांच्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर खूपच खरे, वास्तविक परिणाम होऊ शकतात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वासाचा संबंध फक्त एखादा धोका ओळखण्यापुरताच नसतो. वासाचे लोकांच्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर खूपच खरे, वास्तविक परिणाम होऊ शकतात.

उदाहरणार्थ, तीव्र दुर्गंधीमुळे व्हेगस नर्व्ह उत्तेजित होऊ शकते. हा मेंदू आणि आतड्यांना जोडणाऱ्या मज्जासंस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं एखाद्या व्यक्तीला आजारी असल्यासारखं किंवा मळमळल्यासारखं वाटू शकतं.

मात्र हा आढावा घेणाऱ्या वैज्ञानिकांनी शेवटी निष्कर्ष काढला की वासाच्या शरीरावर होणाऱ्या परिणामांबाबत स्पष्ट निष्कर्ष काढण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.

त्या दुर्गंधीचा आपल्या आरोग्यावर किती प्रमाणात परिणाम होतो हे आपण त्या दुर्गंधीबाबत किती चिंताग्रस्त आहोत, यावरूनही अवलंबून असतं.

"आरोग्यावर होणारा परिणाम हा त्या व्यक्तीच्या वासाबद्दलची नापसंती किंवा भीती यावर अवलंबून असतं," असं पामेला डाल्टन म्हणतात.

त्या अमेरिकेतील फिलाडेल्फियामधील मॉनेल केमिकल सेन्सेस सेंटरमध्ये कॉग्निटिव्ह सायकोलॉजिस्ट म्हणजे आकलनाशी संबंधित मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी वासाच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांवर 32 वर्षे अभ्यास केला आहे.

एखाद्या वासाबद्दल तुम्ही जितके संवदेनशील किंवा चिंताग्रस्त असाल, तितकाच तुमच्या आरोग्यावर आणि स्वास्थ्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

जीवनशैलीत होणारे बदल

सतत येणाऱ्या दुर्गंधीचा आयुष्याच्या अनेक पैलूंवर परिणाम होऊ शकतो. यामुळे एखाद्या व्यक्तीला जीवनशैलीत बदल करण्यास भाग पाडलं जाऊ शकतं.

तो बदल पुढे त्याच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. या बदलांना 'अयोग्य किंवा दुष्परिणामकारक कृती' (माल ॲडाप्टिव्ह ॲक्शन्स) असं म्हणतात.

उदाहरणार्थ, एखाद्याचा उष्णता असलेल्या दिवशी खिडक्या बंद ठेवण्यास नाईलाज होऊ शकतो किंवा बाहेर व्यायाम करणं किंवा मित्रांबरोबर वेळ घालवणं टाळणं सक्तीचं केल्यासारखं वाटू शकतं.

कॉर्नर म्हणतात, वेस्टबरीमध्ये दुर्गंधीसोबत राहण्याचा "तुमच्या समाजातील मिसळण्यावर परिणाम होतो. जर तुम्ही उन्हाळ्यात बार्बेक्यूचं नियोजन करत असाल, तर तुम्हाला दुर्गंधीमुळे त्रास होणार नाही, अशी आशा असते."

सतत येणाऱ्या दुर्गंधीचा आयुष्याच्या अनेक पैलूंवर परिणाम होऊ शकतो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सतत येणाऱ्या दुर्गंधीचा आयुष्याच्या अनेक पैलूंवर परिणाम होऊ शकतो.

तरीदेखील, दुर्गंधीचा किंचितदेखील वास काहीजणांना असह्य वाटू शकतं. तर इतरांना तो क्वचितच जाणवू शकतो. "वासाच्या बाबतीत लोकांच्या प्रतिक्रियांची व्याप्ती खूपच मोठी असेल. काहीजण म्हणतील की त्यांना अधूनमधून वास येतो. किंवा त्याचा त्यांना अजिबात त्रास होत नाही," असं डाल्टन म्हणतात.

त्या वासासंदर्भातील तक्रारींचा नियमितपणे तपास करतात. वय, लिंग, ॲलर्जी आणि धूम्रपानासारख्या जीवनशैलीशी संबंधित सवयी हे सर्व घटक लोक वासांचं आकलन कसं करतात किंवा त्यांना तो कसा जाणवतो हे ठरवतात.

तुम्हाला कदाचित वाटेल की एखाद्या घाणेरड्या वासाची लोकांना कालांतरानं सवय होईल. मात्र कचरा डेपोसारख्या ठिकाणांहून येणाऱ्या दुर्गंधीला वारंवार तोंड द्यावं लागल्यास, तो वास सहन करणं त्यांना अधिक सोपं होईलच असं नाही.

याउलट, एखादा सुगंध किंवा सुगंध किंवा दुर्गंध नसलेला वास यांची सवय होणं ही एक नैसर्गिक गोष्ट आहे.

"एकदा का तुम्ही वास घेतला आणि त्या वासापासून तुमच्या जिवाला धोका नाही हे तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला तो वास येणंच बंद होतं," असं लुंडस्ट्रॉम म्हणतात.

मानवी नाक एक ट्रिलियन विविध वास ओळखण्यास सक्षम असतं. मात्र तरीदेखील लोकांना, जे वास धोकादायक नसतात असा वासांची ओळख पटवणं सामान्यपणे अधिक कठीण जातं.

'स्निफ टेस्ट्स' म्हणजे 'वास घेण्याच्या चाचणी'तून असं दिसून येतं की आपल्यापैकी निम्म्याहून कमी लोकांना कॉफी किंवा व्हॅनिलासारख्या दैनंदिन आयुष्यातील वासांची अचूकपणे ओळख पटवणं शक्य होतं.

दुर्गंधीशी लढताना

दुर्गंधी काहीवेळा येते आणि जाते. अनेकदा वाहत्या वाऱ्याबरोबर किंवा ती एखाद्या विशिष्ट परिसराच्या फक्त काही भागांमध्येच जाणवू शकते.

"ती हायपरलोकल म्हणजे अगदी थोड्या भागापुरती मर्यादित असू शकते," असं अमांडा जियांग म्हणतात.

त्या कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठात पर्यावरणीय प्रारूप आणि धोरण (एन्व्हायर्नमेंटल मॉडेलिंग अँड पॉलिसी) च्या सहयोगी प्राध्यापिका आहेत.

त्यांनी व्हँक्युव्हरमधील रहिवाशांवर दुर्गंधीमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या परिणामांचा अभ्यास केला आहे.

"मी एक ब्लॉक अंतरावर राहत असेल आणि मला कधीच कळणार नाही की, माझ्या पलीकडच्या ब्लॉकमध्ये सडलेल्या माशांसारखा वास येतो," असं त्या म्हणतात.

दुर्गंधी काहीवेळा येते आणि जाते - अनेकदा वाहत्या वाऱ्याबरोबर - किंवा ती एखाद्या विशिष्ट परिसराच्या फक्त काही भागांमध्येच जाणवू शकते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दुर्गंधी काहीवेळा येते आणि जाते - अनेकदा वाहत्या वाऱ्याबरोबर - किंवा ती एखाद्या विशिष्ट परिसराच्या फक्त काही भागांमध्येच जाणवू शकते.

मात्र सर्वच दुर्गंधीचा अनुभव समानच नसतो. स्वस्त घरं असलेला दुर्लक्षित परिसर अनेकदा दुर्गंधी येणारा कचरा डेपो किंवा अवजड उद्योगांच्या जवळ असतात.

युरोप आणि युकेमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासातून दिसून येतं की, काही देशांमध्ये, उच्च उत्पन्न असलेल्या लोकांच्या तुलनेत, अल्प उत्पन्न गटातील लोक कचरा जाळण्याच्या भट्ट्या किंवा मशीन, कचरा डेपो आणि धोकादायक कचरा असणाऱ्या ठिकाणांच्या 1.25 मैल (2 किमी) त्रिज्येच्या आत राहत असण्याची शक्यता अधिक असते.

दुर्गंधी किंवा भयानक वासाबाबतच्या तक्रारी, बदलाला चालना देऊ शकतात. रहिवाशांनी आंदोलन केल्यानंतर, सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या केंद्रांपासून ते माशांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांपर्यंतच्या विविध ठिकाणांना त्यांच्या कामाचं प्रमाण कमी किंवा मर्यादित करण्यास किंवा पूर्णपणे थांबवण्यास भाग पडलं आहे.

वासाच्या प्रदूषणावर अधिक प्रभावीपणे नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न जगभरात वाढत आहेत. मात्र विविध देशांमधील त्यासाठीचे प्रयत्न एकसारखे नाहीत.

यामध्ये चिलीमधील माशांचं खाद्य तयार करणाऱ्या कारखान्यातून येणाऱ्या वासासंदर्भातील नवीन नियमावलीपासून ते लिथुआनियामधील रहिवाशी भागांमधील कंपन्यांना किती प्रमाणात दुर्गंधी निर्माण करण्याची मुभा आहे, यासाठीच्या कडक नियमांचा समावेश आहे.

वास येण्याचे फायदे

दुर्गंधीचा त्रास असलेल्या परिसरात जे लोक राहतात, त्यांच्यासाठी आयुष्य कठीण असू शकतं. मात्र त्यातही किमान एक छोटीशी दिलाशाची बाब नक्कीच आहे. वास घेण्याची क्षमता सुस्थितीत असणं किंवा कार्यक्षम असणं हा उत्तम आरोग्यासाठीचा एक महत्त्वाचा भाग आहे.

संशोधनातून असं दिसून आलं आहे की ज्या लोकांची वासाबद्दलची संवेदना अधिक तीव्र असते, ते लोक खाण्याचा आणि अगदी सेक्सचा देखील अधिक आनंद घेतात. यासंदर्भात 2018 मध्ये 70 प्रौढांवर एक अभ्यास करण्यात आला होता.

त्यात दिसून आलं की ज्या लोकांची वास येण्याची क्षमता उच्च पातळीची होती, त्यांनी लैंगिक संबंधांमधून अधिक सुख मिळत असल्याचं नमूद केलं. या लोकांमधील महिलांनी देखील लैंगिक संबंधांच्या वेळेस ऑर्गझमची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारितेचं प्रमाण अधिक असल्याचं सांगितलं.

दुर्गंधीचा त्रास असलेल्या परिसरात जे लोक राहतात, त्यांच्यासाठी आयुष्य कठीण असू शकतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दुर्गंधीचा त्रास असलेल्या परिसरात जे लोक राहतात, त्यांच्यासाठी आयुष्य कठीण असू शकतं.

याउलट, अंदाजे 5 टक्के लोकांमध्ये वास घेण्याची पुरेशी संवदेनशीलता किंवा क्षमता नसते. याला 'वास घेण्यातील असमर्थता' किंवा 'ॲनोस्मिया' असं म्हणतात.

अशा लोकांना अनेकदा आरोग्याशी संबंधित व्यापक परिणामांना सामोरं जावं लागतं. ॲनोस्मिया असलेल्या लोकांच्या मुलाखतींमधून असं दिसून येतं की, जेवणाचा आनंद घेण्यात येत असलेल्या अडचणींमुळे, त्यांची भूक मंदावण्याचा आणि आहाराचा दर्जा खालावण्याचा धोका त्यांना अधिक असतो, असं त्यांना वाटतं.

"जर तुम्ही वास घेण्याची क्षमता गमावली, तर तुमच्या लक्षात येईल की तुमची भूक नाहीशी झाली आहे," असं लुंडस्ट्रॉम म्हणतात.

याहूनही वाईट गोष्ट म्हणजे, संशोधनातून दिसून आलं की ज्या लोकांची वास घेण्याची क्षमता सामान्य आहे, त्यांच्या तुलनेत ज्या वृद्धांची वास घेण्याची क्षमता कमकुवत आहे, त्यांची पुढील 10 वर्षांमध्ये मृत्यू होण्याची शक्यता जवळपास 46 टक्के अधिक असते. म्हणजेच वास घेण्याची क्षमता कमी असणं हे वाईट आरोग्याचं लक्षण असतं.

हे असं का होतं, यामागचं कारण स्पष्ट करण्याचा प्रयत्न वैज्ञानिक अजूनही करत आहेत. अर्थात जरी त्यांना या मृत्यूंचा संबंध ह्रदयरोग आणि अल्झायमर्स आणि पार्किसन्ससारख्या मज्जासंस्थेत ऱ्हास किंवा झीज झाल्यामुळे होणाऱ्या आजारांशी आढळत असला तरी, वास घेण्याच्या क्षमतेचा काय परिणाम होतो, यासंदर्भात ते अभ्यास करत आहेत.

"अनेक वर्षे गंध, वासासंदर्भात संशोधन केल्यामुळे, मला दुर्गंधीचा वास घेण्यास काहीच हरकत नसते. कारण याचा अर्थ माझी वास घेण्याची क्षमता खरोखरंच व्यवस्थितपणे कार्यरत आहे!" असं डाल्टन म्हणतात.

अर्थात, वेस्टबरीत राहणाऱ्या कॉर्नर यांच्यासारख्यांना मात्र कदाचित तसं वाटणार नाही. 'हिल्स वेस्ट सोल्युशन्स' या कचरा व्यवस्थापन करणाऱ्या कंपनीनं सांगितलं आहे की, दुर्गंधीशी संबंधित समस्यांचं निराकरण करण्यासाठी ते 'एन्व्हायर्नमेंट एजन्सी'बरोबर काम करत आहेत.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)