'मुलगा पोलीस बनेल म्हणून जीवाचं रान केलं, पण...', एकुलत्या एक मुलाचा मैदानात मृत्यू; नेमकं काय घडलं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, भाग्यश्री राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
- वाचन वेळ: 5 मिनिटे
"पोरगा पोलीसमध्ये नोकरीला लागेल म्हणून गडचिरोलीला शिकायला ठेवलं. परिस्थिती नसतानाही भाड्याची खोली करून दिली. माझा मुलगा दिवसरात्र मेहनत करत होता. पण शेवटी हाती काहीच लागलं नाही. आमचा आधार हरपला."
राज्य राखीव पोलीस बल (SRPF) भरतीच्या शारीरिक चाचणीदरम्यान मृत्यू झालेल्या आशिष या तरुणाचे वडील भास्कर म्हशाखेत्री बीबीसी मराठीसोबत बोलत होते.
बोलताना त्यांना रडू कोसळलं आणि या भरती प्रक्रियेबद्दल त्यांनी संतापही व्यक्त केला.
भास्कर म्हशाखेत्री हे गडचिरोलीतील आरमोरी तालुक्यातील देलोडा गावात राहतात. त्यांच्याकडे दोन एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांचं शिक्षणही जेमतेम झालं आहे. पण आपला मुलगा शिकावा यासाठी ते कष्ट करत होते.
आशिष हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. तो नोकरीला लागेल आणि आपला आधार बनेल, असा त्यांना विश्वास होता. पण शेवटी त्याचा मृतदेहच त्यांच्या हाती लागला.
आशिषच्या आईची अवस्था फारच गंभीर असून त्यांनी जेवण सोडलं आहे. एकुलता एक मुलगा गेल्यानं त्यांना मोठा धक्का बसला आहे.
धावण्याच्या शेवटच्या टप्प्यात मृत्यू
देसाईगंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूरच्या राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक 17 मधील सशस्त्र पोलिस शिपायांच्या 244 रिक्त पदांसाठी देसाईगंज इथं कवायत मैदानावर भरती सुरू होती.
31 मार्चपासून ही भरती सुरू झाली असून 10 एप्रिलपर्यंत ती चालणार आहे. यासाठी विद्यार्थी पहाटे 2–3 वाजतापासूनच मैदानावर दाखल होत होते.
आशिषने सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास धावायला सुरुवात केली. तो शेवटच्या टप्प्यात असताना धावपट्टीची सीमारेषा ओलांडणार इतक्यात तो अचानक खाली कोसळला.
त्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठवलं. मात्र, तिथंही उपचारांना प्रतिसाद न मिळाल्यानं डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

फोटो स्रोत, Getty Images
देसाईगंजचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी अशी माहिती दिली की, आशिषच्या हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे.
एसआरपीएफ (SRPF) च्या तक्रारीनंतर देसाईगंज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, यावर आशिषच्या वडिलांनी आक्षेप घेतला आहे.
SRPF ने काय म्हटलं?
देसाईगंज एसआरपीएफच्या गट क्रमांक 17 चे समुपदेशक पीयूष जगताप बीबीसी मराठीसोबत बोलताना म्हणाले, "ही घटना दुर्दैवी असून आम्ही कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहोत. आमच्याकडे 2 रुग्णवाहिका आणि डॉक्टर उपलब्ध असल्याशिवाय आम्ही चाचणीला सुरुवात करत नाही. संबंधित तरुण फिनिशिंग लाईनजवळ कोसळल्यानंतर डॉक्टरांनी लगेच त्याला तपासलं. पण तो प्रतिसाद देत नव्हता. त्यामुळे 7 मिनिटांत त्याला देसाईगंज सरकारी रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार त्याला गंभीर कार्डियाक अरेस्ट आला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आमच्याकडे संपूर्ण प्रक्रिया इन कॅमेरा होत असते. त्याचा अहवाल आम्ही पोलिस आणि आमच्या वरिष्ठांना दिला आहे."
मुलांना मैदानावर लवकर बोलवण्याच्या आरोपावर ते म्हणाले, "आमच्याकडे 10 हजारांहून अधिक अर्ज आले होते. 10 दिवस चाचणी घेत आहोत. सध्याचं तापमान लक्षात घेता आम्ही सकाळी 8 वाजण्याच्या आधी शारीरिक चाचणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. सकाळी 5.15 वाजता पहिली बॅच सोडतो. मुलांना व्यवस्थित पाणी आणि ग्लुकोज दिलं जातं."
"चंद्रपूर, गडचिरोली आणि गोंदिया या 3 जिल्ह्यांसाठी ही परीक्षा होती. त्यामुळे रहिवासी प्रमाणपत्रासह कागदपत्र तपासून उमेदवारांना सोडलं जात होतं. अनेक तरुण आदल्या दिवशी सायंकाळी 4 वाजल्यापासून येतात. रात्री शेजारच्या गावात सोय केलेली असते. काहीजण रात्री 1 वाजतापासून गेटसमोर रांगा लावतात. आम्ही दोन वाजतापासून त्यांना आत घेतो. अनेक तरुण तणावाखाली दिसतात. अशा वेळी आम्ही त्यांना धावू नका, असंही आवाहन करतो," असं जगताप यांनी सांगितलं.
भरतीचं फुटेज मागवून कारवाईची मागणी
आशिषचे वडील भास्कर म्हशाखेत्री म्हणाले, "त्याच्या सोबतच्या मुलांनी आम्हाला सांगितलं की तो कोसळला तेव्हा 15 मिनिटं डॉक्टर तिथं उपस्थित नव्हते. तो ऑक्सिजन मागत होता, पण त्याला ऑक्सिजन मिळालं नाही. माझ्या मुलाला वेळेवर ऑक्सिजन मिळालं असतं तर आज तो जिवंत असता. मी भरतीचं सगळं फुटेज मागवलं आहे. कर्तव्यावर असलेल्या एकाही व्यक्तीला सोडणार नाही. कारण माझा एकुलता एक मुलगा गेला. मी कारवाईची मागणी करणार आहे."
आशिषच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तो परीक्षेच्या आदल्या दिवशी सायंकाळी 5 वाजता देसाईगंजला निघाला होता. त्यानंतर तो पहाटे 2 वाजता मैदानावर पोहोचला. त्याचा नंबर सकाळी साडेआठ वाजता लागला.
'झोप न होता इतका वेळ मैदानावर घालवल्यामुळे ताण येतो. ही कसली भरती प्रक्रिया राबवतात?' असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आशिष पदवीधर होता. त्याने बीएचं शिक्षण घेतलं होतं. आणि तो गेल्या 11 वर्षांपासून पोलिस भरतीची तयारी करत होता. त्यानं अनेक भरती प्रक्रिया दिल्या होत्या. या वेळी तो नोकरीला लागेल, असा विश्वास कुटुंबाला होता. पण नोकरीचं स्वप्न घेऊन धावत असतानाच तो कायमचा कोसळला.
तो पोलिस भरतीचीच तयारी का करत होता? याबद्दल त्याचे वडील म्हणतात, "इतर ठिकाणी नोकरीसाठी पैसे लागतात. आमच्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे पोलिस भरतीत बिनपैशांनी नोकरी मिळेल, अशी आम्हाला आशा होती. म्हणून माझा मुलगा तयारी करत होता. याआधी गडचिरोलीमध्ये झालेल्या परीक्षेत तो 2 गुणांनी अपयशी ठरला होता."
पोलीस भरती दरम्यान याआधी झालेले मृत्यू
पोलीस भरतीला आलेल्या एका तरुणाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, "सध्या उन्हाळा असल्यामुळे पहाटेच शारीरिक चाचण्या घेतल्या जातात. काही ठिकाणी उमेदवारांची संख्या जास्त असल्यास चाचण्या उशिरापर्यंत चालतात. त्यामुळे तासन्तास रांगेत उभं राहावं लागतं आणि त्याचा ताण येतो."
पोलीस भरतीदरम्यान याआधीही अशा घटना घडल्या आहेत :
1) बीड जिल्हा पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी दीपक वाव्हळ या तरुणाचा मैदानी चाचणीदरम्यान मृत्यू झाला. दीपक 26 वर्षांचा होता. कडक ऊन आणि उकाड्यामुळे हृदयविकाराचा झटका आल्याचा प्राथमिक अंदाज यावेळी वर्तवण्यात आला.
2) छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीची 1600 मीटरची फिजिकल टेस्ट सुरू होती. यादरम्यान सांगली जिल्ह्याचा संग्राम शिंदे हा 23 हा तरुण अचानक जमिनीवर कोसळला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.
3) बुलढाण्याचा अक्षय मुंबईत पोलिसात भरती व्हायचं स्वप्न उराशी बाळगून मुंबईला पोहचला. मैदानी चाचणीत त्याने 1600 मीटरचं अंतर पूर्ण केलं. पण त्यानंतर काही वेळातच अक्षयला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. यात त्याचा मृत्यू झाला.
4) पुण्यात सुद्धा पोलिस भरतीदरम्यान मैदानी चाचणीत धावताना 28 मार्चला पुरुषोत्तम बारकुल या बुलडाण्याच्या तरुणाचा मृत्यू झाला होता. तो सुद्धा अचानक खाली कोसळला. त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं असता मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं होतं.
तरुणांनी काय काळजी घ्यावी?
ग्रामीण भागात बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर बहुतांश तरुणांचा कल पोलीस भरतीकडे असतो. पोलीस भरतीच्या तयारीसाठी तालुका पातळीवर जागोजागी अकॅडमी सुरू झालेल्या दिसून येतात.
सकाळी वर्क आऊट, दिवसभर अभ्यास आणि संध्याकाळी पुन्हा मैदानावर सराव, असा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांचा दिनक्रम असतो. पोलीस भरतीसाठी हे तरुण जीवतोड तयारी करतात.
पण, भरती प्रक्रियेदरम्यान मृत्यूसारख्या दुर्दैवी घटना टाळण्यासाठी काय काळजी घ्यायला हवी?
डॉ. उमेश खेडकर हे हृदयरोगतज्ज्ञ आहेत. अतिपरिश्रमामुळे हृदयावर ताण पडून अशाप्रकारे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असं ते सांगतात.

फोटो स्रोत, Dr Umesh Khedkar
मैदानी चाचणीदरम्यान तरुणांनी काय काळजी घेतली पाहिजे, याविषयी डॉ. खेडकर सांगतात, "धावण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याआधी उमेदवारांनी काही प्राथमिक वैद्यकीय तपासण्या करणं गरजेचं आहे. जसं की हेमोग्लोबिन लेव्हल, ब्लड प्रेशर, हृदयाचे ठोके आणि ईसीजी इत्यादी.
"उन्हामध्ये बराच वेळ उभा राहिल्यामुळे किंवा धावल्यामुळे डिहायड्रेशनचा धोका असतो. त्याचप्रमाणे शरिरातील इलेक्ट्रॉईटची पातळी देखील खालावते. या सर्व गोष्टींचा हृदयावर विपरित परिणाम होऊन बीपी कमी होणे किंवा हृदयविकाराचा झटका येणे, याचा धोका वाढतो."
डॉ. खेडकर पुढे सांगतात, "ज्या दिवशी धावण्याची स्पर्धा असते, त्या दिवशी शरिरातील पाण्याची पातळी म्हणजेच हायड्रेशन नॉर्मल ठेवणे गरजेचे असते. स्पर्धेत सहभागी व्हायच्या दिवशी सकाळी तरुण हलकासा नाश्ता करू शकतात. सोबत एक ओआरएस किंवा ग्लुकोज ड्रिंक सोबत ठेवून आवश्यक तेव्हा त्याचे सेवन करू शकतात."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























