प्रियकराच्या मदतीने नवऱ्याची हत्या केल्याचा आरोप; इंजेक्शनमधून टॉयलेट क्लीनर देण्याचे प्रकरण काय?

फोटो स्रोत, Nizamabad Police
- Author, प्रवीण शुभम
- Role, बीबीसीसाठी
- Published
- वाचन वेळ: 5 मिनिटे
(टीप: या बातमीत अस्वस्थ करणारे तपशील आहेत.)
आखाती देशातून घरी परतलेल्या तरुणाचा अवघ्या 4 दिवसांत संशयास्पद मृत्यू झाला. तपासात पत्नीने प्रियकर आणि बालमित्राच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपात पोलिसांनी तरुणीला आणि तिच्या साथीदारांना अटक केली आहे. पुढील प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
"पतीला आधी भरपूर दारू पाजली. त्यानंतर त्याला गच्चीवरून खाली ढकलून देण्यात आले. इतक्यावरच न थांबता, त्याच्या हाताच्या शिरांमध्ये टॉयलेट क्लिनरचे द्रव इंजेक्शनद्वारे टोचून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पत्नीसह तिला मदत करणाऱ्या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे," अशी माहिती निजामाबाद पोलिसांनी दिली.

फोटो स्रोत, Nizamabad police
"आखाती देशातून नुकताच परतलेल्या पतीमुळे आपल्या विवाहबाह्य संबंधात अडथळा येईल, या भीतीने पत्नीने प्रियकरासोबत त्याच्या हत्येचा कट रचला. या कटात त्यांना आणखी एका व्यक्तीनेही त्यांना मदत केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे," अशी माहिती निजामाबाद दक्षिण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार यांनी दिली.
अवघ्या 24 तासांत नियोजन करून पतीला दोनदा मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. अखेर 30 जून रोजी प्रशांतचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नेमकं काय घडलं?
पोलीस आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, निझामाबाद जिल्ह्यातील मोपाल मंडलातील न्यालकल येथील दायिनी प्रशांत (36) याचा नंदीपेट मंडळातील वेलमल येथील संध्याशी 12 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक 9 वर्षांचा मुलगा आणि 7 वर्षांची मुलगी अशी दोन मुले आहेत.
प्रशांतने काही काळ निझामाबादमधील यल्लम्मागुट्टा चौकात फास्ट फूड सेंटर चालवले होते. तर त्याची पत्नी संध्या हिने लग्नापूर्वी नर्सिंगचे शिक्षण घेतले होते आणि सध्या ती निझामाबाद येथील एका खासगी रुग्णालयात नर्स म्हणून काम करते.

फोटो स्रोत, Nizamabad police
नोकरीसाठी प्रशांत 5 वर्षांपूर्वी सौदी अरेबियाला गेला होता. या काळात तो सुमारे अडीच वर्षांपूर्वी एकदा गावी येऊन पुन्हा सौदीला परतला होता.
प्रशांतने काही महिन्यांपूर्वी संध्याला फोन करून जून महिन्यात आपण गावी येणार असून पुन्हा सौदीला जाणार नसल्याचे सांगितले. त्याप्रमाणे प्रशांत 27 जून रोजी आपल्या गावी आला.
मृत प्रशांतचा भाचा राहुल याने बीबीसीला सांगितलं की, हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून संध्याने प्रशांतला आपल्या न्यालकल या मूळ गावी आणलं. यासाठी ती कारने हैदराबादला गेली होती.
परंतु, 1 जुलै रोजी प्रशांतचा संशयास्पद मृत्यू झाल्याची तक्रार त्याची आई दायिनी श्यामला यांनी मोपाल पोलिसांत दाखल केली. या प्रकरणात आपली सून संध्यावर संशय असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले.

फोटो स्रोत, Nizamabad police
प्रशांत गच्चीवरुन पडला असा बनाव रचण्यात आला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला घरी परत आणले असता त्याच्या शरीरात गुंगीचे औषध आणि टॉयलेट क्लिनर सोडून त्याची हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रशांत हा दारूच्या नशेत असावा आणि गच्चीवरुन पडून त्याचा अपघाती मृत्यू झाला असावा असा पोलिसांचा अंदाजात होता. पण तपास केल्यानंतर प्रशांतची पूर्वनियोजित कटानुसार हत्या झाल्याचे समोर आले आहे असे निझामाबाद पोलिसांनी बीबीसीला सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, "संध्याचे निझामाबादमधील अनिल नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. प्रशांत त्यांच्या संबंधात अडथळा ठरत असल्याने संध्या आणि अनिल यांनी त्याच्या हत्येचा कट रचला."
"29 जून रोजी दारूच्या नशेत असलेल्या प्रशांतला बंटी नावाच्या आणखी एका तरुणाच्या मदतीने गच्चीवरून खाली ढकलून दिले. जखमी झाल्यानंतर त्याच्यावर निझामाबादमधील रुग्णालयात उपचार करून त्याला घरी आणले."
"त्यानंतर त्यांच्या हाताला लावलेल्या कॅन्युलामधून ( आयव्ही ड्रिप -सलाईन देण्यासाठी हाताच्या शिरेत नळी खोचली जाते) भूल देणारे औषध आणि टॉयलेट क्लिनरचे द्रव शरीरात सोडण्यात आले. त्यामुळे उलट्या आणि जुलाब होऊन त्यातच प्रशांतचा मृत्यू झाला. त्यानंतर पतीचा मृत्यू फिट्स आल्यामुळे झाला, असे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला," अशी माहिती पोलीस निरीक्षक सुरेश कुमार यांनी दिली.
पतीच्या बालमित्राचीही साथ
29 जून रोजी पतीला (प्रशांत) दारू पाजण्याबाबत संध्या आणि वेंकटसाई उर्फ बंटी यांच्यात संभाषण झाल्याचा दावा करणारा एक कॉल रेकॉर्ड समोर आला आहे.
याचवेळी वेंकटसाई (बंटी) बोलत असल्याचा दावा करण्यात आलेल्या एका व्हीडिओत, पूर्वनियोजित कटाचा भाग म्हणून प्रशांतला अतिमद्यपान करायला लावलं होतं. त्यानंतर त्याच्याशी वाद घालून गच्चीवरून खाली ढकलून दिल्याचे तो सांगताना दिसत आहे.
बीबीसीने या ऑडिओ आणि व्हीडिओची सत्यता पडताळून पाहिलेली नाही.

फोटो स्रोत, Nizamabad police
आरोपींपैकी वेकंटसाई (बंटी) आणि प्रशांत हे लहानपणापासूनचे मित्र होते, अशी माहिती मृताचा पुतण्या गोल्लापल्ली राहुलने बीबीसीला दिली.
"बंटी आणि प्रशांत एकाच परिसरात राहत होते. लहानपणापासून ते दोघे नेहमी एकत्र असायचे. तर दुसरा आरोपी अनिल हा संध्या ज्या रुग्णालयात काम करत होती, तिथेच तिचा सहकारी होता."
"प्रशांत कायमचा घरी परतणार असल्याचे समजताच संध्याने नोकरी सोडली आणि अनिलसोबत त्याच्या हत्येचा कट रचला. त्याच योजनेचा भाग म्हणून ती दोघांनाही सोबत घेऊन विमानतळावर गेली होती," असा आरोप राहुलने केला.
27 जूनपासूनच माझ्या मामाला सतत दारू पाजून नशेत ठेवण्यात आलं होतं, असा आरोप राहुलने केला.
'मुलाचा मृतदेह दाखवा म्हणून आईची आर्त हाक'
"प्रशांत लहान असतानाच त्याचे वडील आम्हाला सोडून गेले. त्यानंतर मी हॉटेलमध्ये काम करून मुलाचा सांभाळ केला. अनेक लग्नाची स्थळं आली होती, पण त्याने संध्यालाच पसंती दिली म्हणून त्यांचं लग्न तिच्याशी लावून दिलं. शेवटी तिनेच माझ्या मुलाचा जीव घेतला," असे प्रशांतच्या आई दायिनी श्यामला यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.
श्यामला या सध्या निझामाबादमध्ये वेगळ्या राहतात.
"माझा मुलगा सौदीहून परत आला, याची माहितीही मला कुणी दिली नाही. त्याचा मृतदेह रुग्णालयात अक्षरशः बेवारससारखा सोडून देण्यात आला होता. मी शवगृहातील कर्मचाऱ्यांना मुलाचा चेहरा दाखवण्याची विनंती केली. ती संपूर्ण रात्र मी पावसात त्या शवगृहाच्या पायऱ्यांवरच काढली. माझा एकुलता एक मुलगा गेला आहे. मला न्याय मिळावा," अशी मागणी श्यामला यांनी केली.
या घटनेवर संध्याच्या कुटुंबीयांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
"याबाबत आम्हाला काहीही बोलायचं नाही. कृपया आम्हाला त्रास देऊ नका. दोन्ही मुले सध्या आमच्याकडेच आहेत," असे संध्याचा भाऊ सागरने बीबीसीला सांगितले.
या प्रकरणातील इतर दोन आरोपी वेंकटसाई आणि अनिल यांच्या नातेवाईकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.

























