'कुणालाही घाबरू नका, पंतप्रधान मोदींची कुंडली माझ्याकडे आहे' - राहुल गांधी

विरोधी पक्ष नेते राहुल गांधी
फोटो कॅप्शन, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी
थोडक्यात
  • राहुल गांधी आज सुप्रीम कोर्टात 'चलो दिल्ली' मार्च काढणार
  • विरोधकांचा गट सरन्यायाधीशांना ज्ञानेश कुमार, एसआयआर बाबत निवेदन देणार
  • सरन्यायाधीशांनी विरोधी पक्षाच्या खासदारांना भेट देण्यास दिला नकार
  • मुंबईत सायंकाळी शिवाजी पार्क परिसरात ठाकरेंच्या नेतृत्वात मूक निदर्शनं
  • कॉक्रोच जनता पार्टी आज पोलिसांना आंदोलनासाठी तारीख मागणार
  • 24 तासांत आंदोलनासाठी तारीख दिली नाही तर स्वतः आंदोलनाची घोषणा
Published
वाचन वेळ: 5 मिनिटे

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलनांची मालिका आज सोमवारी (12 ऑक्टोबर) सुरुच राहणार आहे. राहुल गांधी यांनी चलो दिल्ली म्हणत सुप्रीम कोर्टापर्यंत मार्च काढणार असल्याचं म्हटलंय.

तरुण, सर्व विरोधी पक्ष, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती यांनी या मार्चमध्ये सहभागी होण्याचं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे.

कुणालाही घाबरू नये असे आवाहन राहुल गांधी यांनी केले. माझ्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींची ब्लू प्रिंट आहे, त्यांची पूर्ण कुंडली माझ्याकडे आहे तेव्हा तुम्ही कुणालाही घाबरू नये. यांची सर्व व्यवस्था ढासळत आहे. आपल्याला फक्त धैर्याने विरोध करायची गरज आहे असं राहुल यांनी म्हटलं.

राहुल गांधींनी दुपारी पत्रकार परिषद घेऊनही सर्वांनी या मार्चमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. शक्य नसेल त्यानं अगदी घरातूनही विरोध करावा असं राहुल गांधी म्हणाले.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी मात्र माध्यमांशी बोलताना ही भेट नाकारल्याचं सांगितलं आहे.

तर दुसरीकडे महाराष्ट्रातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सायंकाळी तोंडावर काळी फीत बांधून मूक निदर्शन करण्यासाठी आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन पक्षाच्या वतीनं करण्यात आलं आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये आज होत असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवरही मेट्रो प्रशासनाच्या वतीनं काही ठराविक स्थानकं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सरन्यायाधीशांनी खासदारांना भेट देण्यास दिला नकार

भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांना भेटण्यास नकार दिला आहे.

सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारण्याची काही कारणं असल्याचं म्हटलं पण, गोपनीयतेचा हवाला देत त्यांनी ती कारणं सार्वजनिक करण्यास नकार दिला.

"मला काल त्यांचे (विरोधी पक्षाचे) पत्र मिळाले. मी रात्रीच त्याला उत्तर दिले. मी काही कारणं दिली आहेत, त्या कारणांमुळं मी भेटू शकत नाही असं कळवलं आहे," असं सरन्यायाधीश सूर्यकांत सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

सरन्यायाधीश सूर्यकांत

'वन नेशन-वन इलेक्शन'साठी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) सर्वोच्च न्यायालयाचा दौरा रद्द करण्यासंदर्भातगी सरन्यायाधीश सूर्यकांत यांना प्रश्न विचारण्यात आला.

"त्या प्रकरणात न्यायालयात हितसंबंधांचा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता होती. म्हणूनच आम्ही प्रशासकीय स्तरावर त्यावर चर्चा केली. माझे वरिष्ठ सहकारी आणि माझे असे मत होते की, आपण कोणताही हितसंबंधांचा संघर्ष टाळला पाहिजे," असं ते म्हणाले.

यापूर्वी, सरन्यायाधीश सूर्यकांत यांना भेटण्यासाठी वेळ मागितला आहे, असं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रविवारी सांगितले होते. मात्र, सरन्यायाधीशांनी आता विरोधी खासदारांना भेटण्यास असमर्थता व्यक्त केली आहे.

बॅरिकेड

कॉक्रोच जनता पार्टीचं अल्टीमेटम

पोलिसांनी 24 तासांच्या आत आंदोलनाची परवानगी दिली नाही, तर आणखी एका आंदोलनाची हाक देणार असल्याचा इशारा कॉक्रोच जनता पार्टीकडून देण्यात आला आहे.

आज म्हणजेच सोमवारी, पक्षाचे सह-संयोजक आशुतोष रांका, सौरभ दास आणि लीगल हेड रत्ना सिंह सकाळी 10 वाजता पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्यात जाणार असल्याचं सीजेपीच्या अधिकृत एक्स हँडलवरून सांगितलं आहे.

कॉक्रोच जनता पार्टी

"जंतर मंतरवर शांततापूर्ण आंदोलन करण्याच्या परवानगीसाठी आम्ही पोलीस ठाण्यात जाऊ. दिल्ली पोलिसांनी आम्हाला 24 तासांच्या आत तारीख द्यावी, नसता आम्ही स्वतःच आमच्या आंदोलनाची घोषणा करू," असं सीजेपीनं सांगितलं.

रविवारीच, सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके आणि त्यांच्या इतर दोन साथीदारांना पोलीस कोठडीतून सोडण्यात आलं होतं. त्यानंतर पुढचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असं सीजेपीनं सांगितलं होतं.

राहुल गांधींनी काय म्हटलं?

राहुल गांधींनी सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासह, एसआयआर आणि मतचोरीबाबतच्या मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांना निवेदन देण्यासाठी एक मार्च काढणार असल्याचं म्हटलं होतं.

'चलो दिल्ली' म्हणत राहुल गांधींनी या मार्चमध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं.

राहुल गांधी

"काल, देशातील तरुण दिल्लीत शांततापूर्ण आंदोलनासाठी बाहेर पडले. ते मनात प्रेम घेऊन आले होते, द्वेष किंवा राग नाही. त्यांना पोलीस आणि भाजपच्या गुंडांकडून मारहाण झाली. आम्हाला असा भारत नको आहे. उद्या, आम्ही पक्ष, लिंग, जात, समुदाय आणि राज्याच्या पलीकडे जाऊन एकजूट होत भारतीय असल्याच्या नात्याने सर्वोच्च न्यायालया पर्यंत मार्च काढत आहोत.

तरुण, सर्व विरोधी पक्ष, लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आणि भारताच्या संविधानाच्या पाठीशी उभे राहणारे सर्वजण आमच्यासोबत चालतील. आम्ही देशाच्या वतीने सरन्यायाधीशांना एक निवेदन सादर करू, त्यात मतचोरी थांबवणं, एसआयआर (SIR) रद्द करणं आणि ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करणार आहोत," असं राहुल गांधींनी म्हटले.

नरेंद्र मोदी, अमित शाह, अजित डोभाल आणि मोहन भागवत भारताचा आवाज दाबू शकत नाही. हे भित्रे आम्हाला घाबरवू शकत नाहीत. त्यांना बाजूला व्हावंच लागेल. आम्ही प्रेम, बंधुभाव आणि देशभक्तीने एकत्र मोर्चा काढू, असं राहुल गांधी म्हणाले आहेत.

दिल्ली मेट्रोची ही स्थानके बंद

दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव, दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (डीएमआरसी) सोमवारीदेखील सहा मेट्रो स्थानकं सुमारे 10 तासांसाठी बंद ठेवणार असल्याचं सांगितलं आहे.

या स्थानकांवर सकाळी 6 ते सायंकाळी 4 या वेळेत प्रवाशांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध असतील, असं DMRC नं सांगितलं आहे.

पटेल चौक, जनपथ, राजीव चौक, मंडी हाऊस, सेंट्रल सेक्रेटरीएट आणि बाराखंबा रोड ही ती सहा मेट्रो स्थानकं असणार आहेत.

या मेट्रो स्थानकांवरील प्रवेश आणि बाहेर पडण्याचे मार्ग बंद राहणार आहेत. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा परिस्थितीचा आढावा घेतील आणि आवश्यकतेनुसार नवीन माहिती देतील. पण या सर्व स्थानकांवर मेट्रो एक्सचेंज सुविधा उपलब्ध असणार आहे.

मुंबईत ठाकरेंची मूक निदर्शने

आदित्य ठाकरे पोलिसांच्या वाहनावर चढून विरोध प्रदर्शन करताना

मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनंही सोमवारी सायंकाळी आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. समाज माध्यमांद्वारे या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे.

"दडपशाही चालू देणार नाही! लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊया!" असं आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलं आहे.

दुपारी 4 वाजेपासून छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ तोंडावर काळी फित बांधून मूक निदर्शनं करणार असल्याचं पक्षानं म्हटलं आहे. त्यासाठी हातात तिरंगा घेऊन आंदोलनात सामील होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

रविवारी काय घडलं?

दरम्यान रविवारी दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केलं होतं. त्यानंतर त्यांना हमीपत्र दिल्यानंतर सोडण्यात आलं. तर ध्रुव राठी याचीही पोलिसांनी सुटका केली होती.

त्यांनंतर अभिजीत दिपके त्यांच्या गावी आजीच्या अंत्यविधीसाठी गेले. तर सीजेपीच्या आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी पत्रकार परिषद घेत सरकारवर गंभीर आरोप केले.

तप दुसरीकडे डाव्या पक्षांची विद्यार्थी संघटना असलेल्या एआयएसएच्या सदस्यांनी अध्यक्ष नेहा बोराच्या नेतृत्वामध्ये पोलिसांना चकवा देत संसद मार्ग परिसरात काही बॅरिकेड्स ओलांडून पुढं जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

आंदोलन

दुसरीकडे मुंबईत रविवारी सीजेपी आंदोलकांसह, शिवसैनिकही रस्त्यावर उतरल्याने दादरमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळालं. आदित्य ठाकरेदेखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ज्या वाहनात कोंबलं होतं, ती गाडी आदित्य ठाकरेंनी अडवून ठेवली. आदित्य ठाकरेंनी या वाहनावर चढून आपला विरोध दर्शवला.

तर सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या विशेष सुनावणीत कायद्यानुसार थांबवणं अत्यंत गरजेचं असल्याशिवाय मेट्रो आणि रेल्वे सेवा सामान्यपणे सुरू राहिल्या पाहिजे असं सांगितलं.

न्याय मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात किंवा इतर कोणत्याही न्यायालयात वैयक्तिकरित्या जाण्यापासून कोणालाही रोखलं जाणार नाही, असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं.

तसंच आदेशांचे कथित उल्लंघन झाल्याप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाला नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती कायदेशीर घडामोडींवर वृत्तांकन करणाऱ्या 'लाइव्ह लॉ' या संकेतस्थळाने दिली आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.