औरंगजेब, त्याची मुलगी ते तृतीयपंथीयांचा प्रभाव; मोठा उलगडा करणारी मुघल दरबरातील 'अखबारात' बातमीपत्रं काय होती?

या 1775 सालच्या चित्रामध्ये पालखीतून जाणारा औरंगजेब दिसतो, तो असा मुघल बादशाह होता ज्याची राजवट भारताच्या इतिहासातील सर्वात चर्चिल्या जाणाऱ्या आणि वादग्रस्त राजवटींपैकी एक आहे

फोटो स्रोत, Heritage Images via Getty Images

फोटो कॅप्शन, या 1775 सालच्या चित्रामध्ये पालखीतून जाणारा औरंगजेब दिसतो, तो असा मुघल बादशाह होता ज्याची राजवट भारताच्या इतिहासातील सर्वात चर्चिल्या जाणाऱ्या आणि वादग्रस्त राजवटींपैकी एक आहे
    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, इंडिया करस्पॉँडंट
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

जेव्हा युरोपात वृत्तपत्रांचा शोध लागत होता, तेव्हा मुघलकालीन भारताचं बातम्यांचं स्वत:चं जाळं होतं.

मुघल साम्राज्यात 16 व्या शतकाच्या उत्तरार्धापासून लेखक किंवा लिपिक, एजंट आणि सचिवांच्या फौजा 'अखबारात' संकलित करत असत. अखबारात म्हणजे दरबारातील गुप्त मसलत किंवा कारस्थान, लष्करी मोहिमा, नेमणुका, आर्थिक बाबी आणि गप्पागोष्टी यावरचा संक्षिप्त वृत्त अहवाल किंवा बातमीपत्र.

हे अखबारात म्हणजे पर्शियन किंवा फारसी भाषेत एका ठिसूळ कागदावर पटापट लिहिलेला मजकूर किंवा माहिती असायची. हे अखबारात मुघल साम्राज्यातील माहितीचे जाळे बनले होते. त्यात काही प्रमाणात गुप्त माहिती होती, काही प्रमाणात अधिकृत परिपत्रक होतं आणि काही प्रमाणात बातमीपत्र होतं.

असे शेकडो, कदाचित हजारो अखबारात दररोज शाही आणि प्रांतीय दरबारांमध्ये वितरित होत असत. त्यातून एका अशा साम्राज्याची वीण बांधण्यास मदत झाली, जे शिखरावर असताना भारतीय उपखंडाच्या मोठ्या भूभागावर आणि जगाच्या जवळपास एक चतुर्थांश लोकसंख्येवर राज्य करत होते.

यातील अनेक अखबारातांचं जमलेल्या अधिकाऱ्यांसमोर मोठ्यानं वाचन केलं जात असे. त्यामुळे शाही दरबारातील बातम्या साम्राज्याच्या दूरवरच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असत.

अखबारातवरील संशोधन आणि दस्तावेजांचा संग्रह कुठे आहे?

अनेक दशकं या अहवाल, आदेश आणि प्रशासकीय दस्तावेजांची हजारो पानं भारत आणि ब्रिटनमधील ग्रंथालयं आणि अभिलेखागारांमध्ये पडून होती.

अशी कागदपत्रं असल्याचं इतिहासकारांना माहीत होतं. मात्र फार कमी जणांनी त्याचा सखोल अभ्यास केला.

मुनीस डी फारुकी, बर्कलेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील इतिहासकार आहेत. त्यांनी जवळपास 2 दशकं फक्त यावरच काम केलं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते 2007 पासून अखबारात-ए दरबार-ए-मुअल्ला (उच्चपदस्थ दरबारातील बातमीपत्र) या दस्तावेजाचा अभ्यास करण्यात गढून गेले.

भारत आणि ब्रिटनमधील विविध अभिलेखागारांमध्ये या दस्तावेजांचा प्रचंड मोठा संग्रह जतन करून ठेवला आहे.

कोलकात्याच्या नॅशनल लायब्ररीत असणाऱ्या 6 हजार 500 हून अधिक पानांचा अभ्यास करताना त्यांनी हजारो नोंदींमधून राजकुमार, सेनापती, दरबारी, शाही कुटुंबातील महिला, शाही खोजे किंवा तृतीयपंथीय आणि इतर अनेकांचा आढावा घेतला.

त्याचा परिणाम म्हणजे औरंगजेब (जो आलमगीर या नावानंदेखील ओळखला जातो) आणि 17 व्या शतकाच्या उत्तरार्धातील मुघल साम्राज्याच्या इतिहासावरील आगामी पुस्तक.

या पुस्तकात फक्त भारताच्या सर्वात वादग्रस्त मुघल बादशाहाचं नवीन चित्र सादर झालेलं नाही, तर त्यातून जगातील महान प्रारंभिक आधुनिक साम्राज्यांपैकी एक असलेलं साम्राज्य प्रत्यक्षात कसं चालत होतं, याची एक दुर्मिळ झलकदेखील मिळते.

मुघल बातम्यांचे हे अहवाल किमान 4 ज्ञात संग्रहांमध्ये जतन केलेले आहेत. ते म्हणजे लंडन, बिकानेर, सितामऊ आणि कोलकाता इथले संग्रह. तर इतर संग्रह खासगी स्वरुपात असू शकतात, अशी शंका इतिहासकारांना आहे.

मुघल 'अखबारात'मधील (बातमीपत्र) फारसी भाषेत हातानं लिहिलेली पानं

फोटो स्रोत, Royal Asiatic Society of Great Britain and Ireland

फोटो कॅप्शन, मुघल 'अखबारात'मधील (बातमीपत्र) फारसी भाषेत हातानं लिहिलेली पानं

दस्तावेजांचा एक साठा जयपूरच्या किल्ल्यात थंड, कोरड्या तळघरात गठ्ठ्यांमध्ये जतन करण्यात आला आहे.

19 व्या शतकाच्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी आणि पुरातन वस्तूंचा अभ्यासक जेम्स टॉड यानं यातील अनेक अहवाल किंवा बातमीपत्र अभ्यासासाठी नेले होते.

तो 1823 मध्ये हे दस्तावेज परत न करताच ब्रिटनला परत गेला. पुढे त्यानं हा संग्रह 'रॉयल एशियाटिक सोसायटी'च्या ग्रंथालयाला भेट दिला.

यातील सर्वात समृद्ध संग्रह कोलकात्याच्या नॅशनल लायब्ररीत आहे. त्यात 21 खंड असून ते औरंगजेबाच्या राजवटीवरचे आहेत.

औरंगजेबानं 1658 ते 1707 या कालावधीत मुघल साम्राज्यावर राज्य केलं. तो या साम्राज्याचा शेवटचा महान विस्तारवादी बादशाह होता.

हे खंड एकेकाळी सर यदुनाथ सरकार यांच्या वैयक्तिक ग्रंथालयाचा भाग होते. सर यदुनाथ सरकार हे भारतातील आद्य इतिहासकार तसंच औरंगजेबाचे सर्वात प्रभावशाली चरित्रकार होते.

नीरस वाटणाऱ्या दस्तावेजांमधून मुघल साम्राज्याची अद्भूत नोंद

पहिल्या दृष्टीक्षेपात, यातील बहुतांश मजकूर अत्यंत कंटाळवाणा, नीरस वाटू शकतो. त्यात नियुक्त्या, वाद, लष्करी मोहिमा, भेटवस्तू, आजारपणं आणि प्रशासकीय बारीक-सारीक कामांचे असंख्य तपशील अशा नोंदी आहेत.

मात्र तरीदेखील या सर्व बातमीपत्र, अहवालांचा एकत्रितपणे विचार करता त्यातून एक दुर्मिळ बाब समोर येते. ती म्हणजे एका साम्राज्यानं स्वत:च्या कामकाजाची ठेवलेली जवळपास एक अखंड स्वरुपातील नोंद, असं फारुकी म्हणतात.

औरंगजेब बादशाह झाल्यानंतर पहिल्या 2 दशकांबद्दलची अभिलेखागारातील माहिती विस्कळीत स्वरुपाची आहे. मात्र 1680 च्या दशकाच्या सुरुवातीपासूनची उपलब्ध कागदपत्रं प्रचंड संख्येनं आहेत.

या दस्तावेजांमधून अनेक वर्षे अविरतपणे चालणारा जवळपास दररोजच्या अहवालांचा प्रवाह उपलब्ध होतो. एकंदरित या अहवालांमधून बादशाहाच्या जवळपास अर्ध्या शतक चाललेल्या राजवटीतील साधारणपणे एक तृतियांश भागावर प्रकाश पडतो.

फारुकी यांनी त्यांच्या शैक्षणिक जीवनातील बराचसा काळ 17 व्या शतकाच्या उत्तरार्धातील मुघल साम्राज्यावर चिंतन करण्यात घालवला आहे. त्या वेळेस मुघल साम्राज्य शिखरावर होतं. मात्र त्याच वेळी ते ऱ्हासाच्या उंबरठ्यावर होतं.

त्यातूनच पुढे भारतातील ब्रिटिश राजवटीसाठीचा मार्ग मोकळा झाला. 'अखबारात'मुळे फारुकी यांना या साम्राज्याकडे, त्या काळाकडे पाहण्याचा एक नवीन दृष्टीकोन मिळाला.

"अखबारातवर काम करण्याचा माझा संपूर्ण अनुभव म्हणजे एकामागून एक मोठे युरेकाचे क्षण ठरले! त्या काळातील माहितीच्या जाळ्याची व्यवस्था किती परिपूर्ण स्वरुपाची होती, हे पाहून मला नेहमी आश्चर्य वाटतं," असं फारुकी मला म्हणाले.

'दस्तावेज आणि त्याच्या व्यवस्थेबद्दल मी विचार करतो तेव्हा थक्क होतो'

फारुकी यांनी ज्या बातमीपत्र किंवा अहवालांचा अभ्यास केला ते जयपूरच्या राजासाठी लिहिले गेले होते. मुघल साम्राज्यातील हेर, दूत यांच्याकडून इतर शेकडो सरदार, राजकुमार आणि अधिकाऱ्यांनाही अशाच प्रकारचे बातमीपत्र मिळत असावेत.

त्यातून आधुनिक जगाच्या सुरुवातीच्या काळातील सर्वात अत्याधुनिक माहितीच्या जाळ्यांपैकी एक तयार झालं होतं.

इतिहासकार मुनीस डी फारुकी यांनी दोन दशकं मुघल बातमीपत्रांचा अभ्यास केला आहे
फोटो कॅप्शन, इतिहासकार मुनीस डी फारुकी यांनी दोन दशकं मुघल बातमीपत्रांचा अभ्यास केला आहे

"इतकं समृद्ध ज्ञानाचं संकलन आणि हस्तांतरण जन्माला घालणाऱ्या या व्यवस्थेबद्दल मी जेव्हा विचार करतो तेव्हा थक्क होतो," असं फारुकी म्हणतात.

यातील माहितीचा साठा इतका प्रचंड आहे की, त्यातून दिसून येतं की आधुनिक काळापूर्वीच्या मानकांनुसार मुघल राजवटीला त्यांच्या विशाल साम्राज्याची अतिशय सखोल, अचूक जाण होती.

फारुकींना वाटतं की, या माहितीच्या आधारे कृती करण्याची मुघल साम्राज्याची क्षमता वेगवेगळी होती. मात्र "कधी चांगल्यासाठी, तर कधी वाईटासाठी" याचा लाखो लोकांच्या आयुष्यावर प्रभाव पडला.

औरंगजेब आणि त्याच्या मुलीविषयी अनेक गोष्टींचा आश्चर्यकारक उलगडा

या बातमीपत्र, अहवालांनी पुन्हा पुन्हा फारुकींच्या गृहितकांना उलथवून टाकलं.

औरंगजेबाच्या दरबाराशी संबंध जोडला जाणाऱ्या मोठ्या प्रमाणातील धर्मांतराबाबत फारसे पुरावे सापडले नसल्याचं ते म्हणतात.

शाही हरम आणि तृतीयपंथीयांचा गट "कोणाच्याही कल्पनेपेक्षा राजकीयदृष्ट्या कितीतरी अधिक प्रभावशाली" होते.

बादशाहाची प्रतिमा अपेक्षेपेक्षा कमी अलिप्त आणि शिस्तप्रिय, कठोर वाटली. या बातमीपत्र किंवा अहवालांमध्ये शीख समुदायांसारख्या गटांबद्दल फार कमी प्रतिकूल उल्लेख आढळले.

फारुकींनी अपेक्षा केली होती त्यापेक्षा ते खूपच कमी होते. ही गोष्ट दीर्घकाळापासूनच्या शीख परंपरेच्या अगदी उलट होती, त्यात विरोधाभास होता.

या परंपरेनुसार 1711 सालापर्यंत औरंगजेबाला त्यांच्या आध्यात्मिक गुरूंचा आणि समुदायाचा छळ केल्याबद्दल आधीच जबाबदार धरलं जाऊ लागलं होतं.

यातील काही गोष्टींचा शोध तर एखाद्या नाट्यमय खुलाशातून नाही, तर वारंवार समोर येणाऱ्या माहितीतून लागला.

मुघल बातमीपत्रांचा सर्वात मोठा, समृद्ध आणि सुरक्षित राहिलेला संग्रह कोलकात्यातील नॅशनल लायब्ररीमध्ये जतन करण्यात आला आहे

फोटो स्रोत, AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, मुघल बातमीपत्रांचा सर्वात मोठा, समृद्ध आणि सुरक्षित राहिलेला संग्रह कोलकात्यातील नॅशनल लायब्ररीमध्ये जतन करण्यात आला आहे

फारुकी यांना आढळलं की, या बातमीपत्रांमध्ये एका नावाचा उल्लेख वांरवार येत होता. ते नाव म्हणजे औरंगजेबाची मुलगी झीनत-उन-निसा. इतिहासकारांना तिच्याबद्दल माहीत होतं.

मात्र दरबारातील तिच्या भूमिकेबद्दल फार थोडं लिहिलं गेलं आहे. तरीदेखील या नोंदींमध्ये पानोपानी तिचा उल्लेख येत होता.

काही आठवड्यांमध्येच फारुकी यांच्या लक्षात आलं की, ही कोणी दुय्यम महत्त्व असलेली शाही व्यक्ती नव्हती.

झीनत-उन-निसा ही एक प्रभावशाली राजकीय व्यक्ती होती. तिच्या वृद्ध आणि राजकीयदृष्ट्या असुरक्षित पित्यासाठी म्हणजे बादशाह औरंगजेबासाठी ती त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात एक "अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वाचा राजकीय आधारस्तंभ" ठरली होती.

मग फारुकींनी तिच्या नावाच्या प्रत्येक उल्लेखाची नोंद करण्यास सुरुवात केली. ती पुढे जाऊन मुघल हरमविषयीच्या त्यांच्या वर्णनात महत्त्वाच्या भूमिकेत दिसली.

प्रत्येक शोधानं त्यांना पुनर्विचार करण्यास भाग पाडलं.

"मी 1990 च्या दशकापासून (जेव्हा मी पहिल्यांदा अखबारातबद्दल ऐकलं) स्वत:ला सांगत असलेल्या अनेक कथा, माहितींवर पुनर्विचार करण्याची आवश्यकता होती," असं फारुकी म्हणाले.

ते म्हणतात की, अखबारातमुळे फक्त औरंगजेबच नाही, तर मुघल साम्राज्याचंच पुनर्मूल्यांकन करण्याची संधी मिळाली.

अतिशय संयमानं आणि चिकाटीनं संशोधन करण्याची आवश्यकता

इतिहासकारांनी अखबारातकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष का केलं आहे?

फारुकी म्हणतात की, यातील संकोच त्यांना समजतो. त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला त्यांनी मुघल दस्तावेजांच्या एका भल्या मोठ्या संग्रहावर काम करत 7 निराशाजनक आठवडे घालवले होते.

अखेरीस त्यांनी तो बाजूला ठेवला होता. त्या अनुभवामुळे ते जवळपास एक दशकभर अस्ताव्यस्त पसरलेल्या आणि अनुक्रम नसलेल्या माहितीच्या संग्रहाबाबत सावध राहिले.

'अखबारात'मुळे देखील असंच आव्हान उभं राहिलं.

"या प्रचंड दस्तावेजांमधून काहीही शोधणं म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखं आहे," असं ते म्हणाले.

कोणतीही सूची किंवा अनुक्रमणिका नसताना आणि हजारो नोंदी असताना या संग्रहातून पॅटर्न आणि उपयुक्त माहिती शोधण्यासाठी संयम, तग धरण्याची क्षमता आणि पानांमागून पानं वाचवण्याची तयारीची आवश्यक असते.

'इतिहासकारांनी निर्भीडपणे इतिहास लेखन करावं'

औरंगजेबाबाबत सतत नवीन वाद निर्माण होत असतात यामागचं एक कारण म्हणजे त्यासंदर्भात उपलब्ध असलेली प्रचंड स्वरुपातील माहिती, असं फारुकी म्हणतात.

सुरुवातीच्या मुघल बादशाहांच्या काळातील पुराव्यांची नोंद तुलनेनं विरळ असली तरी देखील औरंगजेबाच्या राजवटीपर्यंत दस्तावेजांचा प्रचंड साठा उपलब्ध होतो. प्र

शासकीय कागदपत्रं, खासगी पत्रव्यवहार, प्रादेशिक इतिहास, चरित्रकोश, कविता, युरोपियन व्यापारी कंपन्यांची कागदपत्रं आणि प्रवाशांनी केलेलं लेखन किंवा वर्णने हे सर्व प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे.

या बातमीपत्रांमधून बादशाहाच्या जवळपास अर्ध्या शतकाच्या राजवटीतील जवळपास एक तृतियांश भागावर प्रकाश पडतो

फोटो स्रोत, Universal Images Group via Getty Images

फोटो कॅप्शन, या बातमीपत्रांमधून बादशाहाच्या जवळपास अर्ध्या शतकाच्या राजवटीतील जवळपास एक तृतियांश भागावर प्रकाश पडतो

फारुकींसाठी अखबारात ही अपरिहार्य गोष्ट होती. मात्र तो एका खूप मोठ्या संग्रहाचा फक्त एक भाग आहे. आश्चर्यकारकरित्या या संग्रहाचा फारच कमी वापर झाला आहे.

"निर्भीड इतिहासकारांनी पुढे येऊन वापर करावा म्हणून उपलब्ध असलेल्या माहिती, दस्तावेजांच्या आधारे डझनभर किंवा कदाचित त्याहून अधिक पुस्तकं लिहिली जाऊ शकतात," असं ते म्हणतात.

फारुकी यांनी जेव्हा कोलकात्यातील संग्रह पहिल्यांदा उघडला, तेव्हा त्यांच्यासमोर काय वाढून ठेवलं आहे याची त्यांना फारशी कल्पना नव्हती.

"पहिल्या खंडाचं अगदी पहिलंच पान उघडताच, हा संग्रह म्हणजे किती असामान्य स्त्रोत आहे याची मला जाणीव झाली. मला लगेचच अशा काही कथा जाणवल्या ज्यांच्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झालं होतं किंवा त्यांना फारसा स्पर्शदेखील झाला नव्हता," असं ते म्हणतात.

ते म्हणतात की, त्यांच्या पुस्तकात त्यापैकी फक्त एका छोट्या भागाचाच शोध घेण्यात आला आहे.

"मात्र अजून अशा इतर असंख्य गोष्टी आहेत, ज्यांचा शोध इतरांकडून घेतला जायचा बाकी आहे," असं त्यांनी नमूद केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)