दिवसाचे 14 तास मोबाईलवर; शेवटी थेरपीची वेळ आली, फोनच्या सवयीचं रुपांतर 'व्यसना'त कधी होतं? वाचा

फोटो स्रोत, BBC/Emma Lynch
- Author, रुथ क्लेग
- Role, बीबीसी हेल्थ अँड वेलबिइंग रिपोर्टर
- Published
- वाचन वेळ: 7 मिनिटे
मी पाठवलेला व्हॉट्सॲप मेसेज आल्याने मारिओसचा फोन वाजतो आणि स्क्रीन उजळते. या स्टोरीबद्दल सुरुवातीची चर्चा करण्यासाठी मी त्याला मेसेज पाठवला आहे.
त्याला लगेच उत्तर द्यायची तीव्र इच्छा होते. नंतर तो मला सांगतो, ही उत्तर द्यायची ओढ जवळजवळ अनावर असते.
पण त्या वेळी तो त्याच्या फोनच्या व्यसनावरील थेरपी सत्रात असतो. त्यामुळे तो लगेच उत्तर देऊ शकत नाही.
तो स्वतःला आवरतो. मात्र बैठक संपताच तो पुन्हा फोन हातात घेतो आणि सुमारे तासाभराने आम्ही व्हीडिओ कॉलवर बोलतो.
"माफ करा," मी म्हणते. "तुमच्या थेरपीच्या सत्रात व्यत्यय आणण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता."
"काळजी करू नका," मारिओस उसासा टाकत म्हणतो. "अनेक वर्षांपासून मला हीच भावना मनात दाटलेली आहे, ती म्हणजे फोनवर राहण्याची एक अनियंत्रित गरज.
तो पुढं सांगतो हा फोन वापरणं म्हणजे स्वतःचा असा एक ड्रग डिलर जवळ बाळगल्यासारखं आहे.
"माझं ड्रग नेहमी माझ्या खिशात असतं. सतत लुकलुकतं, बीप वाजवतं आणि मला पुन्हा एक डोस घ्यायची आठवण करून देतं."
उत्तर लंडनमध्ये राहणारा आणि पर्सनल ट्रेनर म्हणून काम करणारा मारिओस एखाद्या दिवशी अगदी 14 तासांहून अधिक वेळ स्क्रीनकडे पाहत बसू शकतो. त्याच्या म्हणण्यानुसार, इन्स्टाग्राम त्याच्यासाठी सर्वात मोठा अडथळा आहे. मात्र आता तो या सवयीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 12 सत्रांच्या खासगी थेरपी कोर्सला जात आहे. त्याच्या मते, या व्यसनामागे एकाकीपणा हे प्रमुख कारण आहे.
माझ्या स्क्रीन-टाइमच्या आकडेवारीवर एक नजर टाकली तरी काल मी माझा फोन 116 वेळा तपासल्याचं दिसतं. तसेच मी तीन तासांपेक्षा जास्त वेळ त्यावर घालवलेला दिसतो.
मग मारिओसला त्याचं व्यसन लागलं आहे का? मलाही याचं व्यसन लागलेलं आहे का?
याचं उत्तर निश्चितपणे सांगणं कठीण आहे.
फोनचं व्यसन अद्याप अधिकृत वैद्यकीय निदान म्हणून मान्य झालेलं नाही. मात्र डेलॉईटने 1,000 प्रौढांमध्ये केलेल्या अलीकडील सर्वेक्षणात 70 टक्के लोकांनी आपण फोनवर खूप जास्त वेळ घालवतो असं मान्य केलं.
स्मार्टफोन आपल्या मेंदूमधल्या रसायनांमध्ये बदल घडवत असल्याचा इशारा वाढत्या संख्येने संशोधक देत आहेत. तर तिकडे व्यसनतज्ज्ञ सांगतायत की त्यांच्याकडे या मोबाईलसारख्या उपकरणांवर पूर्णपणे अवलंबून असलेल्या लोकांची संख्या वाढत असल्याचं दिसतंय.
यूके ॲडिक्शन ट्रीटमेंट सेंटर्स (UKAT) दरवर्षी सुमारे 3,500 लोकांना सहाय्य पुरवतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वर्षी मादक पदार्थांच्या व्यसनासाठी उपचार घेतलेल्या प्रत्येक तीनपैकी एका व्यक्तीला फोनवरील दुय्यम अवलंबित्वही होतं. 2019 मध्ये हे प्रमाण फक्त 10 पैकी एक होतं.
काही रुग्ण तर उपचार सुरू करण्याआधीच माघार घेतात कारण रुग्णालयात दाखल होताना त्यांना फोन जमा करावा लागतो आणि तसं करण्यास ते तयार नसतात, असं UKAT सांगतं.
मग एखादी व्यक्ती फक्त 'उत्साही मेसेज करणारी व्यक्ती' न राहता 'व्यावसायिक मदतीची गरज' असलेल्या टप्प्यावर नेमकी कधी पोहोचते?

फोटो स्रोत, BBC/Emma Lynch
सेंट हेलन्स, मर्सीसाइड येथील रेनफर्ड हॉलकडे जाणाऱ्या झाडांनी वेढलेल्या रस्त्यावरून मी जात असताना समोर जॅकोबियन काळातील भव्य रंगीत काचांच्या खिडक्या आणि नीटनेटके बगीचे दिसतात.
डिजिटल व्यसनावर उपचार करण्यासाठी हे स्थळ जरा अनपेक्षितच वाटतं.
'स्टेप्स टुगेदर' या पुनर्वसन केंद्रात अंमली पदार्थ, मद्य आणि जुगार यांसारख्या इतर व्यसनांवरही उपचार केले जातात. मात्र येथे काम करणाऱ्या थेरपिस्टना, अशा उपकरणांपासून दूर राहू न शकणाऱ्या लोकांची संख्या वाढताना दिसत आहे.
इथले मुख्य थेरपिस्ट केली वॉटसन सांगतात, "हे कोणालाही होऊ शकतं. प्रत्येकजण फोन वापरतो, आपल्या मेंदूची मूलभूत रचना साधारण सारखीच असते आणि त्यामुळे आपल्यापैकी अनेकांना व्यसन लागू शकतं."
त्या सांगतात की आपल्या मेंदूचा काही भाग बक्षीस-प्रणालीवर म्हणजे रिवॉर्ड सिस्टिमवर काम करतो. एखादा मेसेज येतो, सोशल मीडियावर लाईक मिळतो किंवा एखाद्या संकेतस्थळावर नवी माहिती वाचायला मिळते आणि मेंदूत डोपामाइन (आनंद व प्रेरणा नियंत्रित करणारा रासायनिक संदेशवाहक) स्रवतो.
काही लोकांमध्ये या आनंददायी अनुभूतीची गरज इतकी वाढते. की ती नियंत्रणाबाहेरच जाते. मग त्या ऑनलाइन जगात तासन् तास, कधी कधी दिवसन् दिवस हरवून जातात.

लेस्टरमधील 'स्टेप्स टुगेदर'च्या दुसऱ्या केंद्रात उपचार घेणारा जेम्स ही भावना चांगली ओळखतो.
48 वर्षांच्या जेम्सने सुरुवातीला मद्याच्या व्यसनासाठी मदत घेतली होती. मात्र लवकरच त्याचं डिजिटल अवलंबित्वही नियंत्रणाबाहेर गेल्याचं स्पष्ट झालं.
नोकरी गेल्यानंतर त्याचा दिवस सोशल मीडियावर स्क्रोल करण्यात, बातम्यांच्या संकेतस्थळांवर वाचन करण्यात आणि जगभरात काय घडत आहे याची सतत माहिती घेण्यात जाऊ लागला.
त्याने सोशल मीडियावर काही पोस्ट केलं तर लाईक्स आणि कमेंट्स पाहण्यासाठी तो मध्यरात्रीही जागा राहत असे.
तो सांगतो, "जणू डिजिटल जगाने मला ओलीस ठेवलं होतं."
मात्र फोन वापरण्यातला आनंद पूर्णपणे गेला होता.
"मला त्याची भीती वाटू लागली होती," असं जेम्स सांगतो.
पुढे तो म्हणतो, "माझ्या आत्म्याचा एक भाग जणू शोषून घेतला गेला होता, पण तरीही मी थांबू शकत नव्हतो."
वॉटसन सांगतात की रेनफर्ड हॉलमध्ये प्रथम येणारे रुग्ण गोंधळलेले आणि चिंताग्रस्त असतात. त्यांना फोनपासून दूर व्हायचं नसतं.
"ते रुग्ण सांगत असतात, 'त्यांना कामासाठी फोन हवा आहे, कुटुंबाशी संपर्कात राहण्यासाठी हवा आहे.'
"त्यांच्या आवाजात भीती स्पष्ट ऐकू येते. तोच त्यांचा सुरक्षित आधार असतो."
अनेक जण या निवासी केंद्रात किमान 28 दिवस राहतात. या काळात त्यांना सामूहिक आणि वैयक्तिक थेरपी दिली जाते. त्यांच्या व्यसनामागील कारणांवर काम केलं जातं आणि फोनवरील अवलंबित्व हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न केला जातो.
वॉटसन त्यांना स्क्रीन टाइम कमी करण्यास आणि फोनपासून दूर राहिल्यावर नेमक्या कोणत्या भावना आणि विचार मनात येतात हे समजून घेण्यास मदत करतात.
"बहुतेक वेळा हीच खरी समस्या असते. आयुष्य खूप कठीण वाटतं आणि फोनवर स्क्रोल करून लोक वास्तवापासून स्वतःला दूर ठेवतात."
रेनफर्ड हॉलच्या सुविधांपासून दूर असूनही जगभरातील अनेक लोक डिजिटल व्यसनाशी लढण्यासाठी एकमेकांना मदत करत आहेत.

फोटो स्रोत, @personaltrainermarios
2017 मध्ये तंत्रज्ञान आणि इंटरनेट वापराबद्दल चिंता असलेल्या काही लोकांनी एकत्र येऊन इंटरनेट अँड टेक्नॉलॉजी ॲडिक्ट्स ॲनॉनिमस (ITAA) ही जागतिक चळवळ सुरू केली. ती अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस (AA)च्या धर्तीवर उभी करण्यात आली.
जेनी त्याची सदस्य आहे.
फोनच्या व्यसनाच्या सर्वाधिक तीव्र काळात ती अनेक दिवस झोपत नसे. तिचं अवलंबित्व इतकं तीव्र होतं की ती नीट खात किंवा पितही नसे.
"माझ्या आयुष्यातले मोठे मोठे तुकडेच जणू गमावत होते," असं 30 वर्षीय जेनी सांगते. बीबीसीने तिचं खरं नाव जाहीर करू नये अशी तिची इच्छा आहे.
स्क्रीनवर काय दिसतं याने तिला काही फरक पडत नव्हता... चित्रपट, मालिका किंवा छोटा व्हीडिओ... काहीही असो, फक्त काहीतरी पाहत राहणं महत्त्वाचं होतं.
"मी किती व्यसनी झाले आहे हे मला तेव्हा कळलं, जेव्हा मला फोन आणि उपकरणं कुटुंबीयांकडून कुलूपबंद करून ठेवण्याची विनंती करावी लागली," ती सांगते.
"ती स्थिती इतकी वाईट झाली होती की मला वाटत होतं, काहीतरी पाहिलं नाही तर मी मरेन."
जर ती पुन्हा जुन्या सवयीकडे वळली तर कुटुंबीयांचा लॅपटॉप किंवा स्मार्टफोन ती परवानगीशिवाय घेई.
मग अपराधीपणा आणि लाज वाटू लागे. त्या भावना टाळण्यासाठी ती पुन्हा आणखी सामग्री पाहू लागे.
अनेक वर्षं मदतीच्या शोधात भटकत राहिल्यानंतर तिला ITAA मिळालं आणि तिने त्यांच्या 12 टप्प्यांच्या कार्यक्रमाचं पालन केलं. आता ती पुनर्प्राप्तीच्या प्रक्रियेत आहे आणि पाच वर्षांपासून तिने कोणतीही मालिका किंवा स्ट्रीमिंग सामग्री पाहिलेली नाही.
"आता माझी परिस्थिती नियंत्रणात आहे," ती सांगते.
"साधा फोन वापरणं आणि कामासाठी इंटरनेट वापरणं मला पूर्णपणे जमतं." असं ती म्हणते.

फोटो स्रोत, Getty Images
ITAAचा आणखी एक सदस्य टॉम सांगतो की त्याचं व्यसन त्याला आयुष्यातील खूप अंधाःकारमय टप्प्यावर घेऊन गेलं.
तो म्हणतो, "मी सलग 10 तास स्क्रीनसमोर बसू शकत होतो, संगीत ऐकणं, यूट्यूब पाहणं, सोशल मीडिया स्क्रोल करणं आणि व्हीडिओ गेम खेळणं... हे सगळं एकाच वेळी.
"त्यानंतर दोन तास चालायला जाऊन मी पुन्हा तेच करायचो. हे महिनोनमहिने सुरू राहायचं."
या व्यसनामुळे त्याचा व्यवसाय गेला आणि आयुष्यातील उद्देशच हरवल्यासारखं झालं.
"मी आत्महत्येचा विचार करू लागलो होतो," तो सांगतो.
"आता मात्र मला पुन्हा आयुष्यात खरा आनंद मिळायला लागला आहे. मी भरपूर पिकलबॉल खेळतो, बाहेर फिरतो आणि जिममध्ये जातो."
ब्रिटिश असोसिएशन ऑफ कौन्सेलिंग अँड सायकोथेरपी (BACP) मान्यताप्राप्त मानसोपचारतज्ज्ञ हिल्डा बर्क यांनी अलीकडेच द फोन ॲडिक्शन वर्कबुक हे पुस्तक लिहिलं आहे. फोनवरील अवलंबित्वामुळे त्रस्त असलेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसल्याने त्यांनी हे पुस्तक लिहिलं.
जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही स्क्रीनवर खूप जास्त वेळ घालवत आहात, तर त्या स्वतःच्या वागणुकीचं परीक्षण करण्याचा सल्ला देतात.
"स्वतःला विचारा... त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? मी कोणाच्या उत्तराची वाट पाहत होतो का?"
बर्क यांच्या मते, अनेकदा एखाद्या मेसेजच्या उत्तराची वाट पाहताना अस्वस्थता निर्माण होते. मग आपण त्या अस्वस्थतेपासून दूर जाण्यासाठी फोन वापरायला लागतो.
"ऑनलाइन जाण्याऐवजी काहीतरी वेगळं करा. मित्राला फोन करा, धावायला जा, पुस्तक वाचा.
"आणि स्वतःला दोष देऊ नका किंवा लाज बाळगू नका. त्याऐवजी पुढच्या वेळी हे अधिक चांगल्या प्रकारे कसं हाताळता येईल याचा विचार करा."
लोकांना स्वतःच्या वापरावर नियंत्रण ठेवता यावं यासाठी मोबाइल कंपन्यांनीही स्क्रीन टाइम मोजण्याची आणि काही ॲप्सवर निर्बंध घालण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

फोटो स्रोत, BBC/Emma Lynch
उत्तर लंडनमध्ये परतल्यावर थेरपी कोर्स आपल्याला फोनवरील अवलंबित्वावर मात करण्यास मदत करेल, अशी मारिओसला आशा आहे. त्याचवेळी तो फोनवरील विविध ॲप्सच्या मदतीने स्पॅनिश भाषाही शिकत आहे.
तो म्हणतो, "सगळंच काही वाईट नाहीये"
पण पुढच्याच क्षणी तो सहजपणे फोनकडे हात वाढवतो. फोनला स्पर्श होताच जणू त्याला स्वतःचा निर्धार आठवतो. तो फोनकडे ठामपणे बोट दाखवत म्हणतो:
"दररोज मी स्वतःशी एक करार करतो, फोनवर कमी वेळ घालवायचा. आणि त्याचा फरक पडतो आहे.
"दररोज मी हळूहळू आयुष्यातल्या इतर गोष्टींचा आनंद पुन्हा घेऊ लागलो आहे.
"हे शक्य आहे, मला खात्री आहे."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)


























