बाहेर वापरलेले शूज घरातसुद्धा वापरता? याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

घरात शूज, चपला घालताय? याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? जाणून घ्या
    • Author, केट बोवी
    • Role, वर्ल्ड सर्व्हिस ग्लोबल हेल्थ
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

सर्बियातील पेद्जा त्रिफुनोविच पहिल्यांदा त्याची अमेरिकन मैत्रिणीकडे म्हणजे सोफियाच्या घरी गेला होता. घरात जाण्यापूर्वी त्यानं आपले शूज काढायला सुरुवात केली.

परंतु, सोफियाने त्याला शूज काढण्याची गरज नसून तो तसाच घरात येऊ शकतो असं सांगितलं. सोफियाने असं म्हटल्यावर पेद्जाला आश्चर्य वाटलं.

त्यावेळी पेद्जाने सोफियाला म्हटलं की, "तुम्ही लोक घरातही शूज घालून वावरता का? मला तर हे खूप असभ्य वाटतं."

यावर पेद्जा एकटाच आश्चर्यचकित झाला नव्हता. त्याची मैत्रिण (आणि आताची पत्नी) सोफियालाही आश्चर्य वाटलं होतं. पण, तिला आश्चर्य याचं वाटलं होतं की पेद्जा शूज काढून घरात आला होता.

घरात शूज घालून फिरणं खरंच आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं का?

त्यानंतर सोफियाने पेद्जाला उत्तर दिलं, "तुला तुझ्या पायांची दुर्गंधी संपूर्ण घरभर पसरवायची आहे का?"

जेव्हा दोघांनी आपापली मतं ऑनलाइन मांडली, त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या. यावरून हे स्पष्ट झालं की, घरात शूज किंवा बूट घालायचे की नाही यावरून सोफिया आणि पेद्जामध्ये झालेली चर्चा किंवा वाद हा फक्त त्यांच्यापुरता मर्यादित नसून, जगभरात अनेक ठिकाणी अशाप्रकारची चर्चा होत असते.

दोघांनी एक टिकटॉक व्हीडिओ पोस्ट केला. त्यात पेद्जा घरात चप्पल घातलेला दिसत होता, तर सोफिया अपार्टमेंटमध्ये ट्रेनर्समध्ये (स्पोर्ट्स शूज) फिरताना दिसत होती. या व्हीडिओवर शेकडो प्रतिक्रिया आल्या आणि लोकांमध्ये कोण जास्त स्वच्छ आणि आरोग्यदायी (हायजिनिक) आहे, यावर चर्चा रंगली.

तर मग यात नेमकं कोणाचं बरोबर आहे? घरात शूज घालून फिरणं खरंच आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं का? याचं उत्तर शोधण्यासाठी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसने एका मायक्रोबायोलॉजी (सूक्ष्मजीवशास्त्र) प्रयोगशाळेची मदत घेतली.

जगभरात मतभेद आणि चर्चा

घरात शूज घालून वावरायचं की ते बाहेर काढून ठेवायचे, याबाबत वेगवेगळ्या देशांतील लोकांच्या सवयी आणि त्यांची मतंही वेगवेगळी आहेत.

मध्य पूर्व, आशिया आणि बाल्कन देशांमधील बहुतांश घरांमध्ये शूज घालून फिरणं अशिष्टपणाचे किंवा असभ्य मानलं जातं. तर युरोप आणि अमेरिकेतील काही भागांमध्ये पाहुण्यांना शूज काढायला सांगणं उद्धटपणाचं मानलं जातं.

सोफिया आणि पेद्जा त्रिफुनोविच यांच्यामध्ये घरात शूज किंवा चप्पल घालण्यावरून अनेकदा वाद व्हायचे.
फोटो कॅप्शन, सोफिया आणि पेद्जा त्रिफुनोविच यांच्यामध्ये घरात शूज किंवा चप्पल घालण्यावरून अनेकदा वाद व्हायचे.

जपानमध्ये शूज वापरण्याबाबत खूपच कडक नियम आहेत. तिथल्या बहुतांश घरांमध्ये 'गेन्कान' नावाचा एक विशेष भाग असतो. त्या ठिकाणी शूज काढावे लागतात. त्यापुढे शूज घालून जाण्यास परवानगी नसते.

लंडनमधील एसओएएस विद्यापीठाचे मानवशास्त्राचे (ह्यूमिनिटी) वरिष्ठ प्राध्यापक डॉ. फॅबिओ ग्यीगी सांगतात की, जर एखादा पर्यटक घराबाहेर शूज काढायचं विसरला तर लोकांच्या खूप तीव्र प्रतिक्रिया येऊ शकतात. लोक लगेच त्याला थांबवतात, नाही... थांबा... आधी शूज काढा... असं सांगतात.

त्यांच्या मते, यामागे केवळ स्वच्छताच नाही, तर जपानी समाजाची विचारसरणी आणि संस्कृतीही तेवढीच महत्त्वाची आहे.

ते म्हणतात, "लोकांच्या समजुतीनुसार किंवा प्रतीकात्मकदृष्ट्या घराबाहेरचं जग हे घाण, धोके आणि प्रदूषणाशी जोडले जाते."

ते पुढे म्हणतात, "घर ही अशी जागा आहे जी स्वच्छ, शुद्ध आणि पवित्र ठेवायची असते."

आपल्या शूजवर कोणते जीवाणू असतात?

शूजवर नेमकं काय असतं, हे जाणून घेण्यासाठी आम्ही ब्रिटनमधील ब्रायटन शहरातील एका प्रयोगशाळेत एका शूजच्या जोडीची तपासणी केली.

ब्रायटन विद्यापीठातील मायक्रोबायोलॉजिस्ट डॉ. सारा पिट यांनी शूजच्या वरच्या भागाचे आणि तळव्याच्या भागातून नमुने घेतले. हे नमुने रात्रभर प्रयोगशाळेत ठेवण्यात आले.

दुसऱ्या दिवशी सूक्ष्मदर्शकाखाली (मायक्रोस्कोप) तपासणी केली असता, शूजवर अनेक प्रकारचे जीवाणू (बॅक्टेरिया) आढळून आले.

या जीवाणूंमध्ये स्टॅफिलोकोकस ऑरियस हाही जीवाणू होता. हा जीवाणू स्टॅफ इन्फेक्शनला (संसर्ग) कारणीभूत ठरतो. डॉ. पिट यांच्या मते, हा जीवाणू निरोगी लोकांसाठीही धोकादायक ठरू शकतो.

त्यांनी म्हटलं की, "शरीरावर एखादा ओरखडा किंवा खरचटलेलं जरी असेल आणि तिथे हा बॅक्टेरिया गेला, तर तेथे पू भरलेली मोठी गाठ किंवा फोड येऊ शकतो."

शूज

त्या पुढे सांगतात की, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, अशा लोकांमध्ये हा जीवाणू न्यूमोनिया किंवा रक्तातील गंभीर संसर्गालाही कारणीभूत ठरू शकतो.

शूजवर स्टॅफिलोकोकस एपिडर्मिडिस हा जीवाणूही आढळून आला. हा जीवाणू सामान्यतः माणसाच्या त्वचेवर असतो. परंतु, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, त्यांच्यामध्ये तो गंभीर संसर्ग निर्माण करू शकतो. हा जीवाणू रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अनेक रुग्णांमध्येही आढळून येतो.

इतर संशोधनांमधूनही असं दिसून आले आहे की, शूजवर संसर्ग पसरवणारे अनेक प्रकारचे जीवाणू असू शकतात. यात ई. कोलायसारख्या, मलातून पसरणाऱ्या जीवाणूंचाही समावेश असू शकतो.

डॉ. पिट म्हणतात की, जगातील विविध भागांमध्ये शूजवर वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणू, बुरशी आणि परजीवी देखील आढळून येऊ शकतात.

शूजमधून घरात आलेले जीवाणू जिवंत राहू शकतात का?

अभ्यासातून असे दिसून आलं आहे की, शूजमुळे बाहेरचे जीवाणू सहजपणे घरात येऊ शकतात.

डॉ. सारा पिट सांगतात की, "जीवाणू घरातही जिवंत राहू शकतात, याचे ठोस पुरावे आहेत. त्यामुळे कुटुंबातील इतर सदस्यांपर्यंत संसर्ग पसरण्याचा धोका कायम राहतो."

त्यांनी सांगितलं की, बॅक्टेरिया अनेक दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतात. घरातील गालिचा किंवा कार्पेट उबदार असेल, तर ते अधिक काळ जिवंत राहू शकतात.

इतकंच नव्हे तर नंतर एखादी व्यक्ती त्या जागेवरून चालली तर काही जीवाणू पुन्हा सक्रिय होऊ शकतात. त्यामुळे पुन्हा एकदा संसर्ग पसरवण्याची त्याची क्षमता वाढू शकते.

डॉ. सारा पिट यांना ट्रेनर्सच्या एक जोडी शूजवर अनेक प्रकारचे जीवाणू आढळून आले.
फोटो कॅप्शन, डॉ. सारा पिट यांना ट्रेनर्सच्या एक जोडी शूजवर अनेक प्रकारचे जीवाणू आढळून आले.

डॉ. पिट म्हणाल्या की, "जर तुम्ही लहान मुलांसोबत कार्पेटवर गुडघ्यांवर चाललात, तर त्यावर पडणाऱ्या दाबामुळे जीवाणू पुन्हा सक्रिय होऊ शकतात."

निरोगी प्रौढांच्या तुलनेत लहान मुलं, वृद्ध आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते, अशा लोकांना याचा धोका जास्त असतो.

परंतु, डॉ. पिट यांच्या मते, काही प्रमाणात जीवाणूंच्या संपर्कात आल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती बळकट होण्यास मदत होऊ शकते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण आधीच विविध प्रकारच्या जीवाणूंच्या संपर्कात येत असतो, असंही त्यांनी म्हटलं.

घरात शूज वापरणे योग्य की अयोग्य?

डॉ. पिट यांच्या मते, आपल्या प्रश्नाचं उत्तर पेट्री डिशच्या तपासणीच्या (प्रयोगशाळेतील तपासणी) निष्कर्षांमधूनच मिळाले.

त्या म्हणतात, "घरात शूज घालून फिरणं हा केवळ असभ्यपणाचा प्रश्न नाही, तर ते आरोग्यालाही धोकादायक ठरू शकतं."

"तुम्ही जगभरात कुठंही राहत असाल, घरात येताच तुम्ही शूज काढले पाहिजेत."

जर तुम्हाला घरात शूज घालूनच वावरायचं असेल, तर दरवाजाजवळ पायपुसणी ठेवा, घरात कार्पेट किंवा गालिच्यांचा वापर कमी करा. कारण त्यामुळे घरात येणाऱ्या जीवाणूंचे प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते.

तुम्ही जगात कुठेही असाल, घरात येताच शूज काढले पाहिजे, असं डॉ. पिट सांगतात.
फोटो कॅप्शन, तुम्ही जगात कुठेही असाल, घरात येताच शूज काढले पाहिजे, असं डॉ. पिट सांगतात.

डॉ. पिट म्हणतात, "सर्वात चांगली पद्धत म्हणजे आठवड्यातून किमान एकदा संपूर्ण घराची व्यवस्थित स्वच्छता करणे. त्यामुळे जीवाणू, धूळ आणि घाण यांचं प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी करता येऊ शकतं."

आता लग्नानंतर सोफिया आणि पेद्जा यांनी या विषयावर एक मार्ग काढला आहे.

सोफिया म्हणते, "मला घरातही स्नीकर्स घालायला आवडतं. पण जेव्हा मी सर्बियाला जाते, तेव्हा मला चप्पलच घालाव्या लागतात."

अमेरिकेतील आपल्या घरी सोफिया 'इनडोअर स्नीकर्स' घालते म्हणजे हे स्नीकर्स ती बाहेर वापरत नाही.

ती म्हणते, "लहानपणापासूनच मला घरात शूज घालण्याची सवय आहे. पायात त्यांचं वजन जाणवलं की मला बरं वाटतं."

तर दुसरीकडे पेद्जानेही सोफियाच्या काही सवयी स्वीकारल्या आहेत.

तो म्हणतो, "कधी कधी मी घाईत असेल तर शूज घालूनच घरात येतो."

यावर सोफिया म्हणते की, "मी पूर्णपणे सर्बियन व्हावं किंवा पेद्जा पूर्णपणे अमेरिकन व्हावा, असा आमचा प्रयत्न नाही. आमच्या दोघांची स्वतःची अशी वेगळी ओळख आहे आणि आम्ही ती फक्त ती पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)