पुरुषांसाठी रात्री किती वेळा लघवी 'नॉर्मल'? 2-3 वेळा उठणं धोकादायक लक्षण?

पुरुषांसाठी रात्री किती वेळा लघवी 'नॉर्मल'? 2-3 वेळा उठणं धोकादायक संकेत?

रात्री लघवीसाठी एकदा उठावं लागणं हे बऱ्याच जणांना सामान्य गोष्ट वाटत असते. त्यातही रात्री झोपताना जास्त पाणी प्यायलो म्हणून असं होतंय असं वाटत असतं. पण हे नियमित व्हायला लागलं आणि त्यातही प्रत्येक रात्री दोन-तीनवेळा उठावं लागत असेल तर मात्र याकडं दुर्लक्ष करू नये. वैद्यकीय भाषेत याला नोक्टुरिया असं म्हणतात. हा आपल्या शरीरात काहीतरी बिनसलंय हे सांगणारा इशारा असतो.

बहुतांश पुरुषांना आपलं वय वाढलंय म्हणून हा त्रास होतोय असं वाटत असतं. मग ते यावर उपचार घ्यायलाही टाळाटाळ करतात. पण रात्री वारंवार उठावं लागल्यामुळे झोप नीट होत नाही. गाढ झोप लागत नसेल तर मग सकाळी झोप झाली नसल्यासारखं वाटतं. थकवा वाढतो, चिडचिड होते आणि मग दिनक्रमावरच परिणाम होतो. तसंच झोपेच्या गुणवत्तेचा, झोपेच्या कालावधीचा आरोग्याच्या अनेक बाबींशी संबंध असतो. झोपेचं गणित विस्कटलं की त्यांच्यावरही परिणाम होतोच.

काही वेळा यामागे साधी कारणं असू शकतात, जसं की रात्री जास्त पाणी पिणं, कॅफिन किंवा मद्यपान. पण अनेकदा हे प्रोस्टेटची समस्या, मूत्रमार्गातील इन्फेक्शन, ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर किंवा डायबेटिस सारख्या आजारांशीही संबंधित असू शकतं.

म्हणूनच, रात्रीची ही वारंवार लघवी शरीराचा इशारा म्हणून पाहणं महत्त्वाचं आहे. वेळेवर तपासण्या केल्यास कारण समजून घेता येतं आणि गंभीर गुंतागुंत टाळता येऊ शकते.

काही पुरुषांना रात्री वारंवार लघवी का लागते?

रात्री वारंवार लघवी लागणं हे फक्त ब्लॅडर म्हणजे मूत्राशयाचं साधं प्रकरण नसतं. यामध्ये किडनी, ब्लॅडर, हार्मोन्स आणि झोपेचा पॅटर्न या सगळ्यांचा सहभाग असतो. या प्रणालींमध्ये असमतोल निर्माण झाला की लघवीसाठी वारंवार उठावं लागतं.

पुरुषांमध्ये यामागचं एक मोठं कारण म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीचं वाढणं. प्रोस्टेट मोठं झालं की ते मूत्रमार्गावर दाब टाकतं आणि लघवी पूर्णपणे बाहेर पडत नाही. त्यामुळे ब्लॅडर लवकर भरतं आणि वारंवार लघवीची इच्छा निर्माण होते, विशेषतः रात्री हे वाटतं.

याशिवाय, काही वेळा शरीर रात्री जास्त प्रमाणात मूत्र तयार करतं. हे पाण्याचं प्रमाण, औषधं किंवा डायबेटिस या आजारांमुळे होऊ शकतं. काही पुरुषांमध्ये ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरमुळेही वारंवार लघवीची भावना निर्माण होते. मूत्राशय पूर्णपणे भरलेलं नसलं तरीही ही भावना तयार होते.

पुरुषांसाठी रात्री किती वेळा लघवी 'नॉर्मल'? 2-3 वेळा उठणं धोकादायक संकेत?

तसंच, स्लीप ॲप्नियासारख्या झोपेशी संबंधित समस्यांमुळेही हे लक्षण दिसू शकतं. अनेकदा एकाच वेळी अनेक कारणं काम करत असतात.

म्हणूनच या समस्येकडे 'सामान्य' म्हणून न पाहता, नेमकं कारण शोधणं आवश्यक आहे. योग्य कारण समजलं की उपचारही प्रभावी होतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

जागंं असताना लघवीला जाणं आणि झोपल्यावर जाण्याची इच्छा होणं यात फरक

फक्त जागं असताना लघवी करायची ठरवणं आणि नोक्टुरिया यात फरक आहे. खऱ्या नोक्टुरियामध्ये लघवीची तीव्र गरजच माणसाला झोपेतून उठवते.

बहुतेक निरोगी प्रौढ व्यक्ती कधीकधी रात्री एकदा उठू शकतात, विशेषतः झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात पाणी घेतलं असल्यास तसं होतं. मात्र, नियमितपणे दररोज दोन किंवा त्याहून अधिक वेळा उठावं लागत असेल, तर ते सामान्य मानलं जात नाही. जर यामुळे झोपेची गुणवत्ता, दैनंदिन कामं किंवा एकूण आरोग्यावर परिणाम व्हायला लागला, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

जागंं असताना लघवीला जाणं आणि झोपल्यावर जाण्याची इच्छा होणं यात फरक

नोक्टुरिया हा स्वतंत्र एक आजार नाही, तर एक लक्षण आहे. हे लक्षण मूत्रसंस्था, मेटाबॉलिझम, किडनी, हृदय किंवा झोपेशी संबंधित काही अंतर्गत समस्यांचा संकेत देऊ शकतं.

वयाची चाळीशी किंवा पन्नाशी झाली पुरुषांना रात्री वारंवार लघवीला का जावं लागतं असा प्रश्न आम्ही मुंबईतल्या जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे युरोलॉजी विभागात कन्सल्टंट म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. संतोष गवळी यांना विचारला.

ते म्हणाले, "वय वाढत गेलं की रात्री लघवी लागण्याची समस्या अधिक सामान्य होते. वयाच्या 40-50 वर्षांनंतर शरीरात अनेक बदल होतात, त्यामुळे नोक्टुरिया होण्याची शक्यता वाढते."

जागंं असताना लघवीला जाणं आणि झोपल्यावर जाण्याची इच्छा होणं यात फरक

डॉ. गवळी सांगतात, "यामागचं एक मुख्य कारण म्हणजे प्रोस्टेट ग्रंथीचं वाढणं, ज्याला Benign Prostatic Hyperplasia (BPH) म्हणतात. प्रोस्टेट मोठं झाल्यावर ते मूत्रमार्गावर काही प्रमाणात दाब टाकतं आणि त्यामुळे लघवीच्या प्रवाहात अडथळा राहू शकतो. परिणामी, ब्लॅडर पूर्णपणे रिकामं होत नाही.

याव्यतिरिक्त, वयानुसार ब्लॅडरच्या स्नायूंमध्येही बदल होतात. ब्लॅडर अधिक संवेदनशील होतं आणि अगदी कमी प्रमाणात लघवी असतानाही लघवीची भावना निर्माण होऊ शकते. तसेच, वयामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बदलते, ज्यामुळे रात्रीच्या वेळी लघवीचे प्रमाण अधिक तयार होऊ शकते."

तसेच, डायबिटीज, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार, लठ्ठपणा, हृदयाचे आजार आणि झोपेचे विकार हे सगळे आजार वयानुसार अधिक दिसू लागतात आणि हेही नोक्टुरियाला कारणीभूत ठरू शकतात.

म्हणूनच, ही समस्या फक्त "वय वाढल्याचा भाग" समजून दुर्लक्षित न करता, तिच्यामागची कारणं तपासणं महत्त्वाचं आहे."

जागंं असताना लघवीला जाणं आणि झोपल्यावर जाण्याची इच्छा होणं यात फरक

पण नोक्टुरियाचं लक्षण दिसलं म्हणजे प्रोस्टेटचा आजार असतोच असं आहे का? असा प्रश्न विचारल्यावर डॉ. संतोष गवळी म्हणाले, "अनेकांना असं वाटतं की रात्री वारंवार लघवी लागणं म्हणजे आपोआप प्रोस्टेटची समस्या असते. पण हे नेहमीच खरं नसतं.

जरी वयोमानानुसार प्रोस्टेट ग्रंथीचं वाढणं (BPH) हे एक प्रमुख कारण असलं, तरी अशाच प्रकारची लक्षणं अनेक इतर आजारांमुळेही दिसू शकतात.

यामध्ये खालील स्थितींचा समावेश होतो:

  • डायबेटिस
  • मूत्रमार्गातील इन्फेक्शन (UTI)
  • ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर
  • किडनीचे आजार
  • हृदयाची समस्या (हार्ट फेल्युअर)
  • स्लीप ॲपनिया (झोपेशी संबंधित विकार)
  • न्यूरोलॉजिकल आजार जसे पार्किन्सन किंवा स्ट्रोक
  • काही औषधं, विशेषतः डाययुरेटिक्स (पाणी कमी करण्याच्या गोळ्या)
  • झोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणं

काही पुरुषांमध्ये प्रोस्टेटचा आकार सामान्य असूनही ब्लॅडर जास्त सक्रिय असू शकतो. त्यामुळे लक्षणं सारखी असली तरी कारण वेगळं असू शकतं.

म्हणूनच उपचार करताना फक्त प्रोस्टेटवर लक्ष केंद्रित न करता, नेमकं कारण काय आहे हे शोधणं गरजेचं आहे. योग्य कारण समजल्यावरच उपचार प्रभावी ठरतात.

ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर

ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर म्हणजे मूत्राशय अतिसक्रिय असेल तर त्यात साधारणपणे 'स्टोरेज सिम्प्टम्स' दिसतात. यामध्ये दिवसभर आणि रात्री वारंवार लघवी लागणं, अचानक आणि तीव्र लघवीची इच्छा होणं (urgency), आणि काही वेळा या तातडीमुळे लघवी अनियंत्रितपणे गळणं (urgency incontinence) यांचा समावेश होतो.

नोक्टुरिया हेही याचं एक सामान्य लक्षण आहे, त्यात रुग्णाला रात्री पुन्हा पुन्हा लघवीसाठी उठावं लागतं. जेव्हा ही सगळी लक्षणं एकत्र दिसतात, तेव्हा त्यामागे बहुतेक वेळा स्पष्ट शारीरिक (ऑर्गॅनिक) कारण असतं.

यामध्ये ब्लॅडर आउटलेट ऑब्स्ट्रक्शन (मूत्रमार्गात अडथळा) किंवा त्याच्याशी संबंधित ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर असू शकतो. काही दुर्मिळ प्रकरणांमध्ये, प्रोस्टेट किंवा इतर अडथळा नसतानाही 'प्रायमरी ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर' दिसतो, तो विशेषतः महिलांमध्ये जास्त आढळतो.

ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर

पण वय वाढलं की नोक्टुरियाचं लक्षण दिसतंच का असा प्रश्न आम्ही डॉ. सौम्यन डे यांना विचारला. ते नवी मुंबईच्या फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सर्जरी, युरो ऑन्कोलॉजी आणि युरोलॉजी विभागाचे संचालक आहेत.

ते म्हणाले, "वयोमानानुसार काही वेळा लघवीला जावं लागणं हे सामान्य मानलं जाऊ शकेल. रात्री एकदोनवेळा लघवीला जावं लागणं यामागे शारीरिक, वयोमानाचं कारण असेल तर ते सामान्य आहे. पण वारंवार जावं लागलं तर मात्र ते संध्याकाळी जास्त द्रव पदार्थ, पाणी घेतल्यामुळे तसेच इतर काही आरोग्याच्या समस्येचं लक्षण असू शकतं."

ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर

परंतु नॉर्मल पाणी पिण्यानं होणारी लघवी आणि काहीतरी वैद्यकीय त्रास आहे म्हणून होणारी लघवी यातला फरक कसा ओळखायचा हा प्रश्न उरतोच. म्हणून हा प्रश्न आम्ही डॉ. सौम्यन डे यांंना विचारला.

त्यावर डॉ. सौम्यन म्हणाले, "सामान्यतः पाणी पिणे किंवा अन्नाच्या सवयीमुळे होणारी रात्रीची लघवी आणि वैद्यकीय समस्येमुळे होणारी लघवी यामध्ये फरक करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे झोपण्याच्या दोन तास आधी द्रवपदार्थ घेणं बंद करून निरीक्षण करणं. यामुळे लघवीची वारंवारता कमी होते का किंवा थांबते का हे लक्षात येतं. हा उपाय ही एक प्रकारे साधी चाचणी (test) आबे आणि प्राथमिक उपचार दोन्हीही आहे."

जीवनशैलीचा आणि नोक्टुरियाचा संबंध कसा असतो?

डॉ. सौम्यन पुढे सांगतात, "त्याचबरोबर काही मूलभूत तपासण्या करणंही गरजेचं असतं. उदाहरणार्थ, मूत्र तपासणी (urine routine test) करून मूत्रमार्गातील इन्फेक्शन आहे का हे तपासलं जातं. तसेच, सोनोग्राफीद्वारे लघवी झाल्यानंतर ब्लॅडरमध्ये किती मूत्र शिल्लक राहतं (post-void residual urine) हे पाहता येतं. याशिवाय, PSA (Prostate Specific Antigen) चाचणी आणि युरोफ्लोमेट्री (uroflowmetry) देखील केली जाते. या तपासण्यांमुळे लघवीच्या प्रवाहासंबंधी माहिती मिळते आणि प्रोस्टेट किंवा इतर कोणतीही शारीरिक (organic) समस्या आहे का हे ओळखता येतं. या सर्व तपासण्यांच्या आधारे, नॉर्मल कारणं आणि वैद्यकीय समस्या यामधील स्पष्ट फरक करता येतो."

जीवनशैलीचा आणि नोक्टुरियाचा संबंध कसा असतो?

जीवनशैलीशी संबंधित सवयी अनेक रुग्णांमध्ये रात्री वारंवार लघवी लागण्यात मोठी भूमिका बजावतात.

संध्याकाळच्या वेळेत जास्त प्रमाणात पाणी, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स किंवा मद्यपान केल्यास रात्री मूत्रनिर्मिती मोठ्या प्रमाणात वाढू शकते.

कॅफिन हे एक उत्तेजक (stimulant) आणि सौम्य डाययुरेटिक (मूत्रवर्धक) दोन्ही म्हणून काम करतं, त्यामुळे मूत्रनिर्मिती वाढते आणि ब्लॅडर अधिक सक्रिय होतं. तर मद्यपानामुळे antidiuretic hormone (ADH) या हार्मोनला दाबलं जातं. हे हार्मोन शरीरात पाणी साठवून ठेवण्यास मदत करत असतं.. त्यामुळे मद्यपान केल्यावर रात्री लघवीचं प्रमाण वाढतं.

जीवनशैलीचा आणि नोक्टुरियाचा संबंध कसा असतो?

याशिवाय, काही इतर घटकही नोक्टुरिया वाढवू शकतात:

  • रात्री उशिरा जड जेवण करणं
  • लठ्ठपणा
  • धूम्रपान
  • झोपेच्या चुकीच्या सवयी
  • शारीरिक हालचालींचा अभाव

काही लोकांमध्ये केवळ जीवनशैलीत साधे बदल केल्यानेही या समस्येत लक्षणीय सुधारणा होऊ शकते.

या तक्रारीसाठी कोणत्या तपासण्या सुचविल्या जातात? असं विचारल्यावर डॉ. सौम्यन डे म्हणाले, "रुग्णाने घरी 24 तासांची ब्लॅडर डायरी (लघवीची नोंद) ठेवावी. मूत्र तपासणी, सीरम क्रिएटिनिन आणि सीरम इलेक्ट्रोलाइट्स या तपासण्या कराव्यात. HbA1c तपासणीद्वारे रक्तातील साखरेचं दीर्घकालीन नियंत्रणही तपासलं जातं. तसंच, पोटाची सोनोग्राफी करून लघवी केल्यानंतर ब्लॅडरमध्ये किती मूत्र शिल्लक राहतं हे मोजलं जातं. याशिवाय, युरोफ्लोमेट्री आणि सीरम PSA या तपासण्या देखील प्राथमिक तपासणीचा भाग असतात.

यावर उपचार काय?

डॉ. संतोष गवळी सांगतात, नोक्टुरियावरचे उपचार ते कशामुळे झालंय यावर अवलंबून असतात.

ते सांगतात, "प्रोस्टेट वाढल्यास, प्रोस्टेटचे स्नायू सैल करणारी किंवा त्याचा आकार कमी करणारी औषधं दिली जाऊ शकतात. गंभीर प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेची आवश्यकता भासू शकते. ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडरसाठी ब्लॅडरच्या आकुंचनाला (contractions) कमी करणारी औषधं परिणामकारक ठरतात."

यावर उपचार काय?

ते पुढं सांगतात, "जर यामागे डायबेटिस कारणीभूत असेल, तर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवल्यास लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसू शकते. मूत्रमार्गातील इन्फेक्शनसाठी अँटीबायोटिक्सची गरज असते, तर स्लीप ॲपनियासारख्या समस्यांसाठी CPAP थेरपीसारखा विशेष उपचार लागू शकतो. जर रात्री जास्त प्रमाणात लघवी तयार होत असेल, तर डॉक्टरांच्या देखरेखीखाली काही विशिष्ट औषधं दिली जाऊ शकतात. चांगली बाब म्हणजे, नोक्टुरियामागील बहुतेक कारणं उपचारयोग्य असतात. योग्य निदान झाल्यानंतर अनेक रुग्णांमध्ये लक्षणांमध्ये मोठी सुधारणा दिसून येते."

यावर उपचार काय?

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्याची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)