मोदींना प्रश्न विचारणाऱ्या नॉर्वेच्या पत्रकाराची BBC ला मुलाखत

नॉर्वेच्या पत्रकार हेला लेंग

फोटो स्रोत, X/@HelleLyngSvends

फोटो कॅप्शन, नॉर्वेच्या पत्रकार हेला लेंग
    • Author, नितिन श्रीवास्तव
    • Role, संपादक, बीबीसी हिंदी
  • Published
  • वाचन वेळ: 8 मिनिटे

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नॉर्वेचा दौरा तिथल्या एका महिला पत्रकारानं विचारलेल्या प्रश्नामुळे सध्या खूप चर्चेत आहे.

नॉर्वेचे पंतप्रधान योनास स्टोरे यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त संबोधन केल्यानंतर पत्रकार हेला लेंग या मोदींना प्रश्न विचारू इच्छित होत्या. मात्र, पंतप्रधान मोदी तिथून निघून जाताना दिसले.

बीबीसीसोबत झालेल्या संवादात हेला लेंग यांनी सांगितलं की, "पत्रकार असल्यामुळे प्रश्न विचारणं हे माझं काम आहे. जेव्हा एखाद्या शक्तिशाली देशातून कोणी त्यांच्या छोट्याशा देशात येतो आणि त्यांच्याबरोबरचे संबंध दृढ करू पाहतो, तेव्हा प्रश्न विचारणं ही त्यांची जबाबदारी आहे."

सोमवारी (18 मे) नॉर्वेची राजधानी असलेल्या ओस्लोमध्ये हेला लेंग या व्हीडिओ पत्रकार असं म्हणताना दिसल्या की "पंतप्रधान मोदी, तुम्ही जगातील सर्वात मुक्त प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तर का देत नाही?"

हेला लेंग यांनी सोशल मीडियावर देखील यासंदर्भात त्यांचं मत मांडलं. त्यानंतर नॉर्वेतील भारताच्या दूतावासानं निवेदन जारी केलं आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत येऊन प्रश्न विचारण्यास सांगितलं.

या पत्रकार परिषेदत हेला लेंग आणि भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये झालेली जोरदार वादावादीदेखील खूप चर्चेत आहे. हेला लेंग या सर्व मुद्द्यांवर बीबीसीशी सविस्तर बोलल्या.

मोदींना प्रश्न विचारण्याच्या वेळेस काय घडलं होतं?

सर्वात आधी हेला यांना त्यांची पूर्ण ओळख देण्यास सांगण्यात आलं. यावर त्या म्हणाल्या, "थोडक्यात सांगायचं तर मी गेल्या 5 वर्षांहून अधिक काळापासून पत्रकार म्हणून करते आहे. मी नॉर्वेतील राष्ट्रीय वृत्तपत्रांबरोबर काम केलं आहे. माझ्या गेल्या वृत्तपत्रासाठी काम करताना मला अमेरिकेतील निवडणुकीचं वृत्तांकन करण्यासाठी देखील पाठवण्यात आलं होतं."

"आता मी पुन्हा नॉर्वेत आले आहे. इथे मी राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांचं वृत्तांकन करते. मात्र आता मी एका कॉमेंटेटरच्या भूमिकेत आहे."

ज्या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नॉर्वेच्या पंतप्रधानांबरोबर उपस्थित होते आणि त्या दोघांनी संयुक्त वक्तव्यं केलं होतं, त्या कार्यक्रमात हेला लेंग उपस्थित होत्या.

तिथं नेमकं काय घडलं, याबाबत जेव्हा बीबीसीनं त्यांना विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या, "जेव्हा कोणताही राष्ट्रप्रमुख नॉर्वेमध्ये येतो, तेव्हा रस्त्यांवर बराच पोलीस बंदोबस्त असतो. काही रस्ते बंद केले जातात. संपूर्ण व्यवस्था अतिशय काटेकोर असते. मान्यतेसाठी (ॲक्रिडिटेशन) अर्ज कसा करायचा आणि तिथे प्रवेश कसा मिळेल, हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहित असायला हवं."

"काल आम्ही पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित एक कार्यालयात गेलो. मात्र जिथे पत्रकार परिषद सुरू होती, त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. मग दोन्ही नेते खोलीत आले आणि त्यांनी बोलण्यास सुरुवात केली."

"सर्वात आधी नॉर्वेचे पंतप्रधान भारत आणि नॉर्वेमधील संबंध आणि दोन्ही देशांमधील संबंध दृढ करण्याच्या अजेंड्यावर बोलले. त्यानंतर पंतप्रधान मोदी त्यांचा दृष्टीकोन आणि या राजकीय दौऱ्यामागच्या उद्देशाबद्दल बोलले."

हेला लेंग
फोटो कॅप्शन, हेला लेंग यांच्याशी बीबीसी न्यूज हिंदीचे संपादक नितिन श्रीवास्तव यांनी संवाद साधला

"नॉर्वेमध्ये सर्वसामान्यपणे अशा पत्रकार परिषदांमध्येच असंच होतं. नेते पत्रकारांशी बोलतात आणि मग काही प्रश्नांची उत्तरंदेखील देतात. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी जेव्हा मॅक्रॉन (फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष) इथे आले होते. तेव्हा त्यांनी नॉर्वेच्या पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली होती."

हेला म्हणाल्या, "मला वाटतं की पत्रकार म्हणून प्रश्न विचारणं हे आमचं काम आहे. जेव्हा एखाद्या शक्तिशाली देशातून कोणी आमच्या छोट्याशा देशात येतं आणि आमच्याबरोबरचे संबंध दृढ करू पाहतं, तेव्हा प्रश्न विचारणं ही आमची जबाबदारी आहे. तुमच्या पंतप्रधानांना प्रश्नांची उत्तर द्यायला आवडत नाही, हे मला माहित आहे. मात्र प्रश्न विचारणं हे माझं कर्तव्य होतं."

'जर प्रश्न विचारण्यास वाव नसेल, तर मग लोकशाहीचं काय होईल?'

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा परदेश दौऱ्यावर जातात, तेव्हा फार थोड्या प्रसंगी ते प्रश्नांची उत्तर देताना दिसले आहेत. परदेशात आतापर्यंत त्यांनी फक्त दोनच प्रसंगी (अमेरिकेचा दौरा - जून 2023 आणि फेब्रुवारी 2025) प्रश्नांची उत्तरं दिली आहे. असं नेहमी होत नाही.

आम्ही हेला यांना विचारलं की, दोन्ही पंतप्रधान प्रश्नांची उत्तरं देतील, असं तिथे आधीपासूनच सांगण्यात आलं होतं का?

यावर हेला म्हणाल्या, "नाही. प्रश्नांची उत्तरं दिली जाणार नाही, हे आम्हाला आधीच माहित होतं."

"हीच बाब माझ्या कामाला आणखी महत्त्वाचं बनवते. कारण आम्ही एखाद्या परदेशी नेत्याला इथे येऊन लोकशाहीची व्याख्या ठरवण्याची सूट देऊ शकत नाही."

"लोकशाही काय असते? तुमचे पंतप्रधान जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याबद्दल बोलतात. मात्र, जर तुमच्या देशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीला प्रश्न विचारण्यास वाव नसेल तर लोकशाही काय होईल?"

"भारतातील प्रसारमाध्यमांचं स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांचं उल्लंघन याची स्थिती लक्षात घेता, मी इतक्या मोठ्या देशाच्या सर्वात शक्तिशाली व्यक्तीला प्रश्न विचारणं, हे माझं कर्तव्य होतं."

कोट कार्ड

प्रेस फ्रीडम इंडेक्स म्हणजे प्रसारमाध्यमांना असलेल्या स्वातंत्र्याबाबत नॉर्वे सर्वात वरच्या क्रमांकावर असतो, तर अलीकडच्या वर्षांमध्ये भारताच्या स्थानात घसरण होत तो 157 व्या स्थानावर पोहोचला आहे.

नॉर्वेमध्ये काम करणाऱ्या एका पत्रकारासाठी प्रेस फ्रीडम इंडेक्स किती महत्त्वाचं आहे, तेदेखील जेव्हा तुमच्या देशात आलेल्या एखाद्या परदेशी राष्ट्रप्रमुखाला प्रश्न विचारला जातो तेव्हा?

या प्रश्नाला उत्तर देताना हेला म्हणाल्या, "नॉर्वेमध्ये आमच्या समाजाच्या कार्यपद्धतीबद्दल आम्हाला अभिमान वाटतो. जिथे फक्त काही हजार लोक राहतात, अशा नॉर्वेतील छोट्याशा भागात जेव्हा आमचे पंतप्रधान जातात, तेव्हादेखील ते स्थानिक वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्यांशी बोलतात."

"आमची प्रसारमाध्यमं मुक्त आणि निपक्षपाती आहेत याचा आम्हाला अभिमान आहेत. आम्ही तेच प्रश्न विचारतो जे आम्हाला विचारायचे असतात आणि सत्तेकडे प्रश्नांची उत्तरं मागतो. हेच आमचं काम आहे. जेव्हा असे परदेशी नेते भेटतात, जे पत्रकारितेला कदाचित आमच्याइतकं महत्त्व देत नाहीत, तेव्हादेखील हे काम होतं."

या घटनेनंतर नॉर्वेचे पंतप्रधान पुन्हा तिथे आले आणि प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली, असं म्हटलं गेलं आहे. तुम्ही तिथे उपस्थित होता का?

या प्रश्नाला उत्तर देताना हेला लेंग म्हणाल्या, "माझे पंतप्रधान, जे काल खूप व्यग्र होते, त्यांनी पंतप्रधान मोदी गेल्यानंतर नॉर्वेतील मोठ्या मीडिया हाऊसेसच्या प्रश्नांना उत्तरं दिली. मी त्या रांगेत नव्हते. मी विचारलं की त्यांच्याकडे वेळ आहे का, मात्र त्यांच्याकडे वेळ नव्हता. मात्र मला त्याबाबत अडचण नाही. कारण मला माहित आहे की जर मला हवं असेल, तर या आठवड्यात कोणत्याही वेळी मी त्यांच्याशी बोलू शकते."

नॉर्वेच्या पंतप्रधानांनी उत्तरं दिली

हेला यांना हे पाहून विचित्र वाटलं का की भारतातील मीडिया नॉर्वेच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारत होता, मात्र तो भारताच्या पंतप्रधानांना प्रश्न विचारत नव्हता?

यावर त्या म्हणाल्या, "मला आश्चर्य वाटलं नाही. कारण यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. उलट ते चिंताजनक आहे. भारतात जर तुम्ही तुमच्या नेत्याला आणि त्यांच्या धोरणांबाबत थेट प्रश्न विचारू शकत नसाल, तर तुम्ही कोणत्या प्रकारची चर्चा पुढे नेत आहात, मला या गोष्टीची चिंता वाटते."

"ही माझ्यासाठी चिंतेची बाब आहे. मला वाटतं की आज नॉर्वेच्या नेत्यांनी देखील या गोष्टीचा विचार केला पाहिजे की जर आम्ही भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ केले, तर नकळत आम्ही मानवाधिकारांचं उल्लंघन आणि प्रेस फ्रीडम इंडेक्समधील घसरण सुरू ठेवू देत आहोत का? आमच्या पंतप्रधानांसाठी ही एक गुंतागुंतीची भू-राजकीय परिस्थिती आहे."

नॉर्वे, स्वीडन, डेन्मार्क आणि फिनलंडसारखे नॉर्डिक देश अनेक देशांपासून मानव विकास निर्देशांकात अग्रस्थानी राहिले आहेत. प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर तिथे सातत्यानं चर्चा होत आली आहे.

कोट कार्ड

भारत नेहमी म्हणतो की, तो मानवाधिकारांचं सन्मान करतो. देशात कायद्याचं राज्य आहे. लोकशाही संस्थांचा सन्मान आहे. मग ती न्यायव्यवस्था असो की विधिमंडळ असो की प्रशासन असो.

ज्या देशांमध्ये प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं आहे, अशा देशात काम करणारे पत्रकार या संपूर्ण चर्चेकडे आणि सरकारच्या कार्यपद्धतीकडे कशाप्रकारे पाहतात?

यावर हेला म्हणाल्या, "हा खूप चांगला प्रश्न आहे. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित नसता, तेव्हा गोष्टी समजणं कठीण असतं. मात्र ॲमनेस्टी आणि ह्यूमन राइट्स वॉच सारख्या आंतरराष्ट्रीय अहवालांवर माझा विश्वास आहे. कालपासून मला भारताच्या वेगवेगळ्या भागांतून अनेक संदेश आले. लोक ज्या गोष्टींचा उल्लेख करत आहेत, ते खूपच चिंताजनक आहे."

"अर्थात मला हे माहित आहे की भारतातील विद्यमान सरकारचे समर्थक आणि विरोधकांमध्ये मोठा मतभेद आहे. त्यामुळेच मी त्याच स्त्रोतांवर विश्वास ठेवते, ज्यावर मी आजही विश्वास ठेवते."

"काहीजणांसाठी ॲमनेस्टी वादग्रस्त असू शकते. मात्र माझ्यासाठी नाही. आमचे पंतप्रधान परराष्ट्र धोरणातील खूप अनुभवी नेते आहेत. त्यांनी त्यांची कारकीर्द यावर उभी केली आहे. ते देखील म्हणाले आहेत की त्यांना सॉफ्ट पॉवरची खूप चांगली समज आहे."

"मात्र, आमची मूल्यं आणि भारताची मूल्यं यामधील फरकाबाबत ते माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक मोकळेपणानं बोलले."

कोट कार्ड

परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत झालेल्या वादावादीवर काय म्हणाल्या?

पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला गेल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं हेला यांना एक्स या सोशल मीडियावर टॅग करत एका औपचारिक पत्रकार परिषदेत येण्यास सांगितलं होतं. तिथे त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला.

प्रश्नोत्तराबाबत हेला यांची परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सी बी जॉर्ज यांच्याबरोबर जोरदार वाददेखील झाला होता.

तो अनुभव कसा होता आणि उत्तराबाबत त्या समाधानी होत्या का?

या प्रश्नाला उत्तर देताना हेला म्हणाल्या, "सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्या कार्यक्रमाचं आमंत्रण मला आधीपासूनच देण्यात आलं होतं. भारतीय दूतावासानं नंतर आमंत्रण दिलं. ती चांगली गोष्ट होती. मात्र मी माझ्या प्रश्नांसह तिथे गेले होते."

"मात्र त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मला जे चुकीचं वाटत होतं आणि मी विचारतदेखील होती की तुम्ही लगेच उत्तर देऊ शकता का?"

"त्यांनी कदाचित तीन-चार प्रश्न घेतले आणि नंतर उत्तरं दिली, ही एक समस्या होती. एक पत्रकार म्हणून जर माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही, तर मला उत्तर देणाऱ्याला थांबवून पुन्हा त्या मुद्द्यावर आणावं लागतं. मात्र काल तसं झालं नाही."

नॉर्वेचे पंतप्रधान योनास स्टोरे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, X/@Narendramodi

फोटो कॅप्शन, नॉर्वेचे पंतप्रधान योनास स्टोरे यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी

हेला म्हणाल्या, "मी मानवाधिकारांच्या उल्लंघनांबद्दल प्रश्न विचारला होता. मात्र त्यांनी प्रश्नाच्या या भागाचं उत्तर दिलं नाही. जवळपास एक मिनिटानंतर मी त्यांना मध्ये थांबवून संभाषण पुन्हा त्याच मुद्द्याकडे आणण्याचा प्रयत्न केला. मात्र मला त्यात यश आलं नाही. हे आव्हानात्मक आहे."

"नॉर्वेमध्ये जर मला उत्तर आवडलं नाही, तर मी पुन्हा प्रश्न विचारू शकते, या गोष्टीची मला सवय आहे. किमान असं वाटलं पाहिजे की माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं. मी प्रश्न विचारणं आणि मग मी जे विचारत होते त्यावर राजकारण्यांनी उत्तर देणं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सर्वसामान्यपणे अशी उत्तरं जास्त रंजक असतात. इतरांचा दृष्टीकोन समजून घेण्याचा हा उत्तम मार्ग आहे."

"मात्र कालचं संभाषण भारताकडून 2020 मध्ये लसीचा पुरवठा केला जाण्यावर आणि योग पर्यंत पोहोचलं. मला योग आवडतो आणि भारतीय संस्कृतीच्या अनेक गोष्टीदेखील आवडतात. भारत खूप चांगलंदेखील करतो. मात्र पत्रकार परिषदेत मी सर्वसामान्यपणे एखाद्या देशाची स्तुती ऐकण्यासाठी जात नाही."

'भारतात पत्रकारिता करणं जोखमीचं काम'

पंतप्रधान किंवा परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतंही स्पष्ट उत्तर देण्यात आलं नाही, याचं हेला यांना आश्चर्य वाटलं का? तसंच नेदरलँड्सच्या पंतप्रधानांनी देखील अलीकडेच भारतातील अल्पसंख्यांकांचं स्वांतत्र्य आणि कायद्याच्या राज्याबद्दल चिंता व्यक्त केली होती.

यावर त्या म्हणाल्या, "मला खूप जास्त आश्चर्य वाटलं नाही. पत्रकारानं नेहमी पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत, असं मला वाटतं. काहीजणांना वाटलं असेल की दुसऱ्या पत्रकार परिषेदत मी थोडीशी रुक्ष होते. मात्र संघर्ष करणाऱ्या पत्रकारितेची हीच पद्धत असते. तुम्हाला मध्येच बोलावं लागतं आणि उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करावा लागतो. अर्थात, काल मला उत्तर मिळालं नाही."

हेला यांच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीबाबत पंतप्रधान आणि सरकारच्या समर्थकांचं म्हणणं आहे की ती प्रेस इंटरॅक्शन नव्हती. त्यामुळे पंतप्रधानांनी उत्तर दिलं नाही. या युक्तिवादाकडे त्या कसं पाहतात?

यावर हेला म्हणाल्या, "ते कधी थेट प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांची उत्तरं देतात का? मी असं पाहिलेलं नाही. अर्थात जोपर्यंत सर्वकाही आधीपासूनच ठरलेलं नसतं, तोपर्यंत उत्तर दिली जात नाहीत."

अर्थात, पंतप्रधान मोदींनी परदेशात दोन वेळा पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिली आहेत. या प्रश्नावर हेला म्हणाल्या, "त्यांनी त्यांच्या देशातील प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं दिली पाहिजेत आणि टीका करणाऱ्या प्रसारमाध्यमांना स्थान दिलं पाहिजे. भारतात पत्रकारिता करणं जोखमीचं काम आहे. तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहित आहे की तिथे पत्रकारांना अतिशय सांभाळून काम करावं लागतं."

"त्यामुळे, जोपर्यंत मी पत्रकारितेत आहे, तोपर्यंत नॉर्वेला भेट देणाऱ्या कोणत्याही पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षांकडून प्रश्नांचं उत्तर न देण्याच्या भूमिकेला मी विरोध करत राहीन. मी नेहमीच प्रयत्न करत राहीन."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)