चोरीला गेलेली कुत्री आठ वर्षांनंतर सापडते तेव्हा, रेबेका यांना कशी भेटली त्यांची लाडकी 'फ्लोरा'

फोटो स्रोत, Contributed
- Author, ॲलिस कनिंगहॅम
- Role, सफोल्क
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
मला आठ वर्षांनंतर जेव्हा फ्लोरा दिसली तेव्हा मी नि:शब्द झाले होते. रेबेका यांची हरवलेल्या कुत्रीशी पुन्हा भेट झाली, त्यावेळच्या भावना त्या सांगत होत्या.
रेबेका हार्वे यांच्या 'क्लोव्हर' आणि 'फ्लोरा' या दोन स्पॅनियल कुत्री 30 ऑक्टोबर 2017 रोजी एसेक्समधील लिटल मॅपलस्टेडमधील घराच्या बागेतून बेपत्ता झाल्या होत्या.
पण अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर यातील एक त्यांना सुखरूप परत मिळाली आहे.
सफोल्कमधील सुडबरी येथे गेल्या अनेक वर्षांपासून राहणाऱ्या 30 वर्षीय रेबेका म्हणाल्या की, दोघींचा त्यांना कोणताही सुगावा लागला नव्हता. मात्र शनिवारी त्यांना अचानक फोन आला आणि फ्लोरा सापडल्याचं समजलं.
त्यानंतर रविवारी त्यांची पुन्हा भेट झाली. रेबेकासाठी हा क्षण खूप भावूक होता. कारण या दोघी त्यांच्या वडिलांनी पाळलेल्या होत्या. दोघी कुत्री हरवल्यानंतर त्यांच्या वडिलांचंही निधन झालं होतं.

फोटो स्रोत, Contributed
रेबेका 2017 मध्ये त्यांच्या वडिलांकडे राहत होत्या. हॅलस्टेड जवळील एका गावात त्यांच्या बागेतील केनेल्समध्ये (कुत्र्यांचे घर) या दोन तरुण कुत्री इतर पाच कुत्र्यांबरोबर राहत होत्या.
एकदा कामावरून घरी परतल्यावर तिनं कुत्र्यांना बाहेर काढण्यासाठी पाहिले तेव्हा तिला दोन कुत्री गायब असल्याचं आढळळं.
वडील आणि भावानेही त्यांना सोबत नेलं नसल्याचं सांगितल्यावर रेबेकाच्या लक्षात आलं की त्यांची चोरी झाली आहे.
हा तिच्यासाठी एक मोठा धक्का होता, असं ती म्हणाली. तिनं तातडीने पोलिसांना फोन केला आणि त्यानंतर कुत्र्यांचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू केली. दुर्दैवाने इतकी वर्षे याबाबतीत कोणताही सुगावा लागला नसल्याचे तिने सांगितले.
याच काळात साडेचार वर्षांपूर्वी तिनं वडिलांना गमावलं असं रेबेकानं सांगितलं.
"हा काळ खूप कठीण होता आणि शनिवारी जेव्हा फ्लोरा सापडल्याचा फोन आला तेव्हा मला त्याची अजिबात अपेक्षा नव्हती. आम्हाला खूप मोठा धक्का बसला. मी पूर्णपणे नि:शब्द झाले होते," असं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Contributed
शनिवारी रेबेका घरी असताना त्यांच्या फोनवर एका अनोळखी नंबरवरून फोन आला. सुरुवातीला त्यांनी त्याकडं दुर्लक्ष केलं. पण त्याच नंबरवरून पुन्हा फोन आल्यावर तिने तो उचलला.
एका माणसाने काही वर्षांपूर्वी फ्लोराला विकत घेतलं होते. पण ती चोरीची कुत्री असावी असा त्याला संशय आला आणि त्याने आम्हाला कळवलं, असं 'ब्युटीज लेगसी ॲनिमल सर्च टीम' या संस्थेच्या एका महिलेनं त्यांना सांगितलं.
फ्लोराला पुन्हा भेटण्यासाठी त्या आणि त्यांचे पती कारने केंटला गेले. कुत्रीला पुन्हा भेटण्याचा तो क्षण त्यांच्यासाठी खूपच भावूक होता, असं रेबेकाने सांगितलं.

फोटो स्रोत, Contributed
फ्लोरा धावत तिच्याकडे आली आणि आनंदाने शेपटी हलवू लागली. फ्लोरा आता खूप जाड झाली आहे. त्यामुळे तिला डॉक्टरांकडे नेणार आहे. तिची दवाखान्यात पूर्ण तपासणी केली जाईल, असं रेबेकाने सांगितले.
रेबेकाला अजूनही आशा आहे की तिची दुसरी कुत्री 'क्लोव्हर' देखील एक दिवस नक्की सापडेल. ती म्हणते की, "ज्यांची कुत्री हरवली असतील त्यांनी आशा सोडू नका. कारण 9 वर्षे हा खूप मोठा काळ असतो."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.



























