कोविड-19 चा नवीन व्हेरियंट किती वेगाने पसरतोय? लहान मुलांसाठी किती धोकादायक?

    • Author, केट बोवी
    • Role, ग्लोबल हेल्थ, बीबीसी वर्ल्ड सर्विस
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

सिकाडा हा कोविड-19 चा एक अत्यंत 'म्यूटेटेड' म्हणजे वेगाने बदलणारा व्हेरियंट असून तो आतापर्यंत 23 देशांमध्ये पसरला आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) या नवीन व्हेरियंटवर सतत लक्ष ठेवून आहे.

'सिकाडा'ला अधिकृतपणे व्हेरियंट BA 3.2 असे म्हटले जाते. तो अमेरिका, हाँगकाँग, मोझांबिक आणि ब्रिटनमध्ये आढळून आला आहे.

हा नवा व्हेरियंट आधीच्या व्हेरियंटपेक्षा खूप जास्त घातक आहे, असं अजून तरी सिद्ध झालेलं नाही. मात्र, तज्ज्ञांच्या मते मोठ्या माणसांच्या तुलनेत लहान मुलांना याचा संसर्ग होण्याचा धोका थोडा जास्त असू शकतो.

अशा परिस्थितीत आपल्याला नक्की किती काळजीची बाब आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे.

या व्हेरियंटचं नाव चक्क 'सिकाडा' नावाच्या कीटकावरून ठेवण्यात आलं आहे. शास्त्रज्ञांनी BA 3.2 व्हेरियंटला हे नाव दिलं. कारण त्याचा स्वभाव या कीड्यासारखाच आहे.

सिकाडा कीडा जसा खूप जास्त काळ जमिनीखाली शांत पडून राहतो अगदी तसाच हा व्हेरियंट पहिल्यांदा आढळल्यानंतर जगाच्या काही भागांमध्ये सुप्त अवस्थेत होता. यामुळेच या नवीन प्रकाराला सिकाडा नाव देण्यात आलंय.

हा व्हेरियंट पहिल्यांदा नोव्हेंबर 2024 मध्ये साऊथ आफ्रिकेत सापडला होता, पण विशेष म्हणजे सप्टेंबर 2025 पर्यंत याच्या रुग्णांमध्ये फारशी वाढ नव्हती.

मात्र, गेल्याच महिन्यात अमेरिकेच्या 'सेंट्रल फोर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन'ने (आजार नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्र) तिथल्या 25 राज्यांमध्ये हा व्हेरियंट पसरल्याची माहिती दिली आहे.

BA 3.2 या नवीन व्हेरियंटच्या प्रसाराबाबत आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते हा व्हेरियंट 4 प्रवाशांच्या नाकातील नमुन्यांमध्ये, 5 रुग्णांच्या वैद्यकीय नमुन्यांमध्ये आणि तब्बल 132 सांडपाण्याच्या नमुन्यांमध्ये आढळून आला आहे.

जागतिक आरोग्य संघटना (WHO) या व्हेरियंटचा सखोल अभ्यास करत असून त्याला सध्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

याचाच अर्थ असा की, या व्हेरियंटवर आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून जागतिक स्तरावर लोकांच्या आरोग्यासाठी हा किती मोठा धोका ठरू शकतो याची तपासणी सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

हा व्हेरियंट मुलांमध्ये सापडण्याची शक्यता जास्त आहे का?

कोविड व्हेरियंट संशोधक रयान हिस्नर यांनी न्यूयॉर्कमधील डेटा तपासून म्हटले आहे की, मोठ्यांपेक्षा लहान मुलांच्या टेस्टमध्ये BA 3.2 पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण अधिक असू शकते.

केंब्रिज इन्स्टिट्यूट ऑफ थेरप्यूटिक इम्युनोलॉजी अँड इन्फेक्शिअस डिसीजचे प्रोफेसर रवींद्र गुप्ता म्हणतात, "या माहितीचे अद्याप कोणत्याही तज्ज्ञांकडून परीक्षण किंवा प्रकाशन झालेले नाही तरीही हे खरे असल्याचे वाटते."

हे कशामुळे असू शकते याबद्दल वेगवेगळी मते आहेत. एक म्हणजे कोणत्याही शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीला सिकाडा व्हेरियंटला ओळखणे कठीण जात आहे. कारण हा अशा प्रकारचा व्हेरियंट आहे जो यापूर्वी कधीही पाहण्यात आलेला नाही.

प्रोफेसर गुप्ता म्हणतात, "सामान्यतः मोठ्या माणसांच्या तुलनेत मुलांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते कारण त्यांचे शरीर अजून अनेक प्रकारचे व्हायरस आणि कोविड संसर्गाच्या संपर्कात आलेले नाही. म्हणूनच या नवीन व्हायरसशी लढण्याची क्षमता त्यांच्यात आणखी कमी असू शकते."

मोठ्या माणसांमध्ये, व्हायरसपासून आपले संरक्षण करणाऱ्या अँटीबॉडीज तयार करणाऱ्या ग्रंथी अनेक वर्षात परिपक्व होतात. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढते.

दुसरीकडे लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार करणाऱ्या ग्रंथी तेवढ्या परिपक्व नसल्याने व्हायरसचा मुलांवर लवकर परिणाम होतो."

काही संशोधकांच्या मते, सिकाडा व्हेरियंटच्या प्रोटीनमध्ये झालेले मोठे बदल मुलांमधील संसर्गासाठी कारणीभूत असू शकतात.

हा व्हेरियंट मुलांवर जास्त परिणाम का करतोय? हे शोधण्यासाठी गुप्ता आणि त्यांची टीम सध्या बाल उपचारांशी संबंधित वैद्यकीय नमुने गोळा करत आहे.

याचे लक्षणे काय आहेत?

सिकाडा इतर व्हेरियंटपेक्षा जास्त आजारी पाडतो याविषयी सध्या कोणतेही पुरावे नाहीत.

ब्रिटनमधील प्रोफेसर पॉल हंटर म्हणतात, "या व्हेरियंटमध्ये असे कोणतेही वेगळे किंवा विशेष लक्षण नाही ज्यावरून तो लगेच ओळखता येईल."

कोविड-19 प्रमाणेच यात ताप, खोकला, घसा खवखवणे, नाक बंद होणे, थकवा, डोकेदुखी, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास आणि जुलाब यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

वायरोलॉजिस्ट इयान जोन्स सांगतात, "व्हेरियंट कोणताही असो व्हायरस शरीरातील त्याच पेशींना लक्ष्य करतो. त्यामुळे दिसणारी लक्षणे कमी-अधिक प्रमाणात सारखीच असतात."

हा व्हेरियंट इतका बदललेला का आहे? वेळोवेळी प्रत्येक व्हायरसमध्ये बदल होत असतात. विशेषतः कोविड-19 सारख्या आरएनए व्हायरसमध्ये हे बदल खूप जलद होतात.

यूएस सीडीसीनुसार, BA 3.2 हा ओमीक्रॉनच्या मूळ प्रकारापेक्षा खूपच वेगळा आहे.

जोन्स म्हणतात की, या म्यूटेशन्समुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती व्हायरसला ओळखू शकत नाही.

इतकंच नाही तर शरीरात आधीपासून असलेल्या इम्युनिटीपासून वाचण्यासाठी हे म्यूटेशन्स व्हायरसला काही प्रमाणात वाट करून देतात.

त्यांनी पुढे सांगितले, "अँटीबॉडीजला गुंगारा देऊन हा व्हायरस लोकांमध्ये हळूहळू आपला प्रसार करत आहे हे आता स्पष्ट दिसत आहे."

मग एखादी लस यावर काम करेल का?

व्हायरसमध्ये झालेल्या या बदलांमुळे कोविडच्या लसी सिकाडा व्हेरियंटवर कदाचित थोड्या कमी परिणामकारक ठरू शकतात.

पण तज्ज्ञांच्या मते जुन्या लसी अजूनही या नवीन व्हेरियंटपासून आपलं काही प्रमाणात रक्षण करू शकतात.

जोन्स म्हणतात, "तुम्हाला संसर्ग होऊ शकतो, पण तो सौम्य स्वरूपाचा असेल."

WHO नुसार, आतापर्यंत जगातील 67 टक्के लोकांनी कोविडची लस घेतली आहे. सध्या नवीन व्हेरियंटपासून वाचण्यासाठी 'बूस्टर' डोसमध्ये काही बदल केले गेले आहेत, पण ते जगभरात सगळीकडे सारखे नाहीत.

जोन्स यांच्या मते, जर या व्हेरियंटचे रुग्ण आणि गांभीर्य वेगाने वाढले, तरच कंपन्या सिकाडाला लक्षात घेऊन नवीन लस तयार करतील.

मग आपण काळजी करायला हवी का?

रोगांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ (Epidemiologist) हंटर यांच्या मते, कोविड-19 चे नवीन व्हेरियंट समोर येत राहणे यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.

ते म्हणतात, "जोपर्यंत या ग्रहावर माणूस आहे तोपर्यंत आपल्याला व्हायरसचे नवीन प्रकार पाहायला मिळतीलच. SARS-CoV-2 कधी पूर्णपणे संपेल असं वाटत नाही."

सिकाडा व्हेरियंटचे रुग्ण वाढले असले तरी याचा अर्थ असा नाही की एकूण कोरोनाचे रुग्ण किंवा मृत्यूंची संख्याही वाढेल.

हंटर पुढे म्हणतात, "नवीन व्हेरियंट नियमितपणे येत राहतील, पण मृत्यू आणि गंभीर आजारांचे प्रमाण कमी होत जाईल अशीच शक्यता जास्त आहे."

डिसेंबरमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सांगितले की, सिकाडा व्हेरियंटमुळे मृत्यू किंवा रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण वाढल्याचा कोणताही डेटा समोर आलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक आरोग्यासाठी याचा धोका सध्या तरी कमी आहे.

जोन्स म्हणतात, "कोविड-19 आता आपल्या रोजच्या सर्दी-खोकल्यासारख्या संसर्गांपैकी एक झाला आहे. लोकांनी याबद्दल फक्त जागरूक राहणं गरजेचं आहे. जर कोणाला लस घेतल्याने फायदा होईल असं वाटत असेल, तर त्यांनी ती नक्कीच घ्यायला हवी."

पण ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, जसे की 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक किंवा जे दीर्घकाळापासून एखाद्या आजाराने त्रस्त आहेत त्यांना मात्र कोविड-19 मुळे गंभीर त्रास होऊ शकतो.

गुप्ता म्हणतात, "जर तुमच्या मुलाला आधीच फुफ्फुसांचा आजार, हृदयाचा त्रास किंवा रोगप्रतिकारशक्तीची कमतरता असेल, तर लगेच डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे."

"बहुतेक निरोगी मुलांच्या बाबतीत मात्र हा व्हायरस शरीराचं काहीही नुकसान करू शकणार नाही," असंही ते पुढे स्पष्ट करतात.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)