व्हिएतनाममध्ये 32 भारतीय पर्यटक असलेली बोट उलटली, 15 जणांचा मृत्यू

फोटो स्रोत, AFP via Getty Images
व्हिएतनाममधील 'फु क्वोक' बेटाजवळ भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी स्पीडबोट उलटून झालेल्या अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने या घटनेला दुजोरा दिला आहे.
अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 11 जुलै रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही स्पीडबोट 32 भारतीय पर्यटक, काही चालक दलाचे कर्मचारी आणि फ्लाइट अटेंडंट यांना घेऊन जात असताना ही घटना घडली.
तुओई ट्रे वृत्तपत्रानुसार, 23 जणांना किनाऱ्यावर आणण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एजी 26751 या नोंदणी क्रमांकाची ही स्पीडबोट मिन्ह हुई फु क्वोक ट्रेडिंग अँड टुरिझम कंपनी लिमिटेडच्या मालकीची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केलं आहे.
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
व्हिएतनाममधील दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत.
त्यांनी एक्सवर एक पोस्ट करत म्हटलं , "व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ भारतीय नागरिकांचा समावेश असलेल्या बोटीच्या अपघाताची बातमी ऐकून अत्यंत दु:ख झाले आहे."
"ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावलं, त्यांच्याप्रती माझ्या मनःपूर्वक संवेदना आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होण्यासाठी मी प्रार्थना करतो."
"आमचा दूतावास आणि वाणिज्य दूतावास सर्वतोपरी मदत करत आहेत. आमचे अधिकारी व्हिएतनामच्या अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात आहेत," असंही त्यांनी नमूद केलं.
अपघात कसा घडला?
होन मे रुट न्गोई बेटापासून सुमारे 400 मीटर अंतर पार केल्यानंतर स्पीडबोटमध्ये अचानक बिघाड झाला आणि ती उलटली. यावेळी बोटीतील सर्व प्रवासी आणि चालक दलातील सदस्य समुद्रात पडले.
घटनास्थळावरील एका व्हीडिओमध्ये सोसाट्याचा वारा आणि उंच लाटा दिसत आहेत. बचाव पथकं समुद्रात अडकलेल्या लोकांकडे लाइफगार्ड जॅकेट फेकत आहे, तर जेट स्कींच्या सहाय्याने बचावलेल्या लोकांना किनाऱ्यावर आणले जात आहे.

फोटो स्रोत, Video Grab
सीमा सुरक्षा दलाने बचावकार्यासाठी 2 बोटी आणि 35 जवान तैनात केले.
या मोहिमेत नौदल, तटरक्षक दल आणि इतर संबंधित यंत्रणांनी संयुक्तपणे काम केलं.
हा अपघात होन मे रुट बेटाजवळ घडला. हे बेट आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असून फु क्वोकमधील सर्वोत्तम कोरल रीफ डायव्हिंग स्थळांपैकी एक मानले जाते.
या ठिकाणी पोहोचण्यासाठी पर्यटक सहसा बोटीचा वापर करतात आणि या प्रवासाला सुमारे 20 ते 40 मिनिटे लागतात.
भारतीय दूतावासाने काय म्हटले?
व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, "अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही तासांपूर्वी व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ उलटलेल्या बोटीत 32 भारतीय पर्यटक प्रवास करत होते."
"मृत आणि जखमींबाबतची अधिक माहिती आम्ही गोळा करत आहोत. माहितीची अधिकृत पुष्टी होताच पुढील तपशील जाहीर करण्यात येईल."
दूतावासाने या 32 भारतीय पर्यटकांची यादीही प्रसिद्ध केली आहे.

फोटो स्रोत, @AmbHanoi
+84 36 281 7930
+84 91 552 37 14
+84 33 452 0414
या क्रमांकांवर संपर्क साधून कुटुंबीय आपल्या नातेवाईकांबाबत माहिती मिळवू शकतात.
याशिवाय, हनोई येथेही एक नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन करण्यात आला असून, त्यासाठी +84 91 308 9165 या क्रमांकावर संपर्क साधता येईल, अशी माहितीही देण्यात आली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)

























