हार्ट अटॅकची लक्षणं अनेकदा छातीत दिसतच नाहीत; मग ती कुठे दिसतात?

फोटो स्रोत, Getty Images
छातीत तीव्र वेदना हे हृदयविकाराच्या झटक्याचं सर्वात परिचित लक्षण मानलं जातं. पण प्रत्यक्षात अनेकदा हृदयविकाराचा झटका यापेक्षा खूपच सूक्ष्म आणि दुर्लक्षित राहणाऱ्या संकेतांपासून सुरू होऊ शकतो.
अचानक धाप लागणं, नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणं, मळमळ किंवा उलटीची भावना होणं, थंड वाटणारा घाम येणं, चक्कर येणं किंवा जबडा, मान, पाठ, खांदा आणि हातामध्ये अस्वस्थता जाणवणं हे सुद्धा हृदयाशी संबंधित गंभीर इशारे असू शकतात.
मात्र अनेकदा अॅसिडिटी, गॅस, स्नायूंचा ताण, कामाचा तणाव किंवा साधा थकवा समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं.
तज्ज्ञांच्या मते, प्रत्येकवेळी हृदयविकाराचा धक्का नाट्यमय पद्धतीनं सुरू होत नाही. काही वेळा लक्षणं सौम्य असतात, येतात आणि जातात, त्यामुळे धोका ओळखणं आणखी कठीण होतं. विशेषत: महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराची लक्षणं पारंपरिक पद्धतीने दिसतीलच असं नाही.
दरवर्षी जागतिक स्तरावर लाखो लोकांचा मृत्यू हृदयविकारांमुळे होतो. अशा परिस्थितीत शरीर देत असलेले हे सुरुवातीचे संकेत ओळखणं आणि वेळेवर वैद्यकीय मदत घेणं जीव वाचवू शकतं.
जागतिक हृदय दिनानिमित्त(29 सप्टेंबर), हृदयविकाराच्या झटक्याची कमी परिचित पण महत्त्वाची लक्षणं कोणती आणि ती दिसल्यास नेमकं काय करावं, याचा आढावा घेऊया.
हार्ट अटॅकची अनेक लक्षणं पुरुष आणि महिलांमध्ये सारखीच असतात. छातीत वेदना किंवा अस्वस्थता हे दोघांमध्येही सर्वात सामान्य लक्षण आहे. मात्र, महिलांमध्ये श्वास लागणं, असामान्य किंवा कारण नसलेला थकवा, मळमळ किंवा उलट्या होणं, चक्कर येणं, अपचनासारखी समस्या, तसेच पाठ, खांदा, हात किंवा जबड्यात वेदना किंवा अस्वस्थता जाणवण्याची शक्यता काहीशी अधिक असते.
ही लक्षणं पुरुषांमध्येही दिसू शकतात. मात्र महिलांमध्ये ती हृदयाशी संबंधित असू शकतात, हे लगेच लक्षात येत नाही. अनेकदा ती अॅसिडिटी, ताणतणाव, झोपेची कमतरता किंवा सर्वसाधारण थकवा यामुळे होत असावीत असं मानलं जातं.
विशेषतः छातीत वेदना नसतील किंवा सौम्य असतील तर श्वास लागणं, थकवा, मळमळ, अपचन किंवा पाठ व जबड्यातील अस्वस्थता याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकतं. त्यामुळे वैद्यकीय मदत घेण्यास उशीर होण्याचा धोका वाढतो.

फोटो स्रोत, Getty Images
अनेकदा तरुण वयातील लोक, 'एवढ्या कमी वयात हार्ट अटॅक कसा येईल?' असा विचार करतात. हृदयविकाराचा धोका वयानुसार वाढत असला तरी तरुण वय म्हणजे हार्ट अटॅकची शक्यता नसते असे नाही.
धूम्रपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्ट्रॉल यांसारखे पारंपरिक असलेले हृदयविकाराची जोखीम वाढवणारे घटक तरुणांनाही लागू होतात.
याशिवाय अनुवंशिक कारणे, हृदय किंवा रक्तवाहिन्यांमधील काही संरचनात्मक दोष, तसेच हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांचे दुर्मिळ विकारही हार्ट अटॅकचे कारण ठरू शकतात.
काही तरुण महिलांमध्ये कोरोनरी धमनीमध्ये अचानक फट (tear) पडण्याची दुर्मिळ समस्या उद्भवू शकते, यामुळे नेहमीचे जोखीम वाढवणारे घटक नसतानाही हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यामुळे एखाद्याचं वय पाहून नव्हे, तर लक्षणांचं स्वरूप आणि तीव्रता पाहून त्यांचे मूल्यांकन करणं गरजेचं आहे.
अशी कोणतीही लक्षणं दिसत असली किंवा शंका वाटत असेल वेळ न दवडता डॉक्टरांची मदत घेतली पाहिजे.

छातीत स्पष्ट वेदना नसतानाही असामान्य थकवा, श्वास लागणं, मळमळ, पाठ किंवा जबड्यातील वेदना हृदयविकाराचे संकेत कसे असू शकतात? असा प्रश्न आम्ही डॉ. प्रशांत पवार यांना विचारला.
डॉ. पवार वाशी येथील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल येथे कन्सल्टंट इंटरव्हेशनल कार्डिओलॉजी म्हणून कार्यरत आहेत.
ते सांगतात, "हृदयाच्या स्नायूपर्यंत पोहोचणारा रक्तपुरवठा अचानक कमी झाला किंवा पूर्णपणे बंद झाला तर हार्ट अटॅक येतो. मात्र त्याची लक्षणं नेहमीच स्पष्ट छातीत दुखण्याच्या स्वरूपात दिसतील असं नाही.
थकवा, श्वास लागणं किंवा मळमळ यांसारख्या लक्षणांकडे पाहताना त्यांचा नेहमीचा अनुभव बदलला आहे का, हे महत्त्वाचं असते. उदाहरणार्थ, पूर्वी सहज करता येणाऱ्या कामात अचानक खूप थकवा येणं किंवा श्वास लागणं हे चिंतेचे कारण ठरू शकतं."

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. प्रशांत पवार सांगतात, "मळमळ किंवा अपचनासारखी समस्या अचानक सुरू झाली असेल, कारण स्पष्ट नसेल, ती सतत जाणवत असेल किंवा त्यासोबत घाम येणं, श्वास लागणं, अशक्तपणा किंवा छाती व शरीराच्या वरच्या भागात अस्वस्थता जाणवत असेल, तर त्याकडे गांभीर्याने पाहणं आवश्यक आहे.
त्याचप्रमाणे, पाठ किंवा जबड्यातील वेदना अचानक सुरू झाल्या असतील, कारण समजत नसेल, श्रम करताना वाढत असतील किंवा इतर लक्षणांसोबत दिसत असतील, तर त्या हृदयाशी संबंधित असू शकतात. केवळ छातीत वेदना नाहीत म्हणून अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये."

फोटो स्रोत, Getty Images
छातीत नवीन प्रकारचा दाब, जडपणा, आवळल्यासारखे वाटणे किंवा अस्वस्थता जाणवत असेल आणि ती काही मिनिटे टिकत असेल, वारंवार परत येत असेल किंवा शारीरिक हालचालींवेळी होत असेल, तर तातडीची वैद्यकीय मदत घ्यावी.
तथापि, छातीत वेदना नसल्या तरी परिस्थिती सुरक्षित आहे असं मानणं चुकीचे ठरेल. अचानक आणि कोणतेही स्पष्ट कारण नसताना श्वास लागणं, विशेषतः विश्रांती घेत असतानाही किंवा अगदी कमी हालचालीत; कारण नसताना घाम येणे किंवा मळमळ; चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडणं; तसेच हात, खांदा, पाठ, मान किंवा जबड्याकडे पसरणारी नवीन वेदना किंवा अस्वस्थता ही देखील चिंता करायला लावणारी लक्षणं आहेत.
विशेषतः अशी अनेक लक्षणं एकाच वेळी दिसत असतील, ती अचानक सुरू झाली असतील किंवा व्यक्तीसाठी अनोखी वाटत असतील, तर त्यांची तातडीने तपासणी करणं आवश्यक आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अॅसिडिटी, स्नायूंच्या वेदना किंवा ताणतणाव यांसारख्या सामान्य समस्यांपासून हृदयाशी संबंधित गंभीर लक्षणं कशी वेगळी ओळखता येतात? असा प्रश्न आम्ही डॉ. प्रशांत पवार यांना विचारला.
ते म्हणाले, "घरी बसून ही लक्षणं निश्चितपणे वेगळी ओळखण्याचा कोणताही विश्वासार्ह मार्ग नाही. मात्र काही विशिष्ट प्रकार चिंतेचे कारण ठरू शकतात. हृदयाशी संबंधित लक्षणं ती नवीन असतात, ती अचानक सुरू झालेली असतात, त्यामागे स्पष्ट कारण नसतं किंवा परिस्थितीच्या तुलनेत खूप जास्त तीव्र वाटतात; तेव्हा ती गंभीर मानली जातात.
उदाहरणार्थ, अपचनासारखी अस्वस्थता अचानक सुरू झाली असेल, कोणतेही स्पष्ट कारण नसेल आणि त्यासोबत घाम येणं, श्वास लागणं, अशक्तपणा किंवा छाती व शरीराच्या वरच्या भागात अस्वस्थता जाणवत असेल तर ती चिंतेची ठरू शकते."
ते सांगतात,"पाठ, खांदा किंवा जबड्यातील वेदना शरीराच्या हालचाली, बसण्याची स्थिती किंवा स्नायूंच्या ज्ञात समस्येशी स्पष्टपणे संबंधित नसतील तर त्यांच्याकडे गांभीर्याने पाहायला हवं.
तसेच, पूर्वी सहज करता येणाऱ्या कामादरम्यान अचानक श्वास लागणे किंवा थकवा जाणवणे हे केवळ ताणतणाव किंवा झोपेच्या कमतरतेला कारणीभूत मानू नये."
डॉ. पवार याबाबतीत एक महत्त्वाचा सल्लाही देतात. ते म्हणाले, "सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादं लक्षण अॅसिडिटी, स्नायूंची वेदना किंवा ताणतणावासारखे वाटत असलं तरी, ते नवीन असेल किंवा इतर धोक्याच्या लक्षणांसोबत दिसत असेल तर त्याकडे लक्ष दिलं पाहिजे."
हार्ट अटॅकची स्पष्ट लक्षणं दिसल्यावर तत्काळ हॉस्पिटलमध्ये जाणं का आवश्यक?
हार्ट अटॅकमध्ये हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. हा अडथळा जितका जास्त काळ राहील तितकं हृदयाच्या स्नायूंचं अधिक नुकसान होऊ शकतं.
म्हणूनच लक्षणं आपोआप कमी होतात का हे पाहण्यासाठी थांबणं धोकादायक ठरू शकतं. सुरुवातीला किरकोळ वाटणारी अस्वस्थता काही वेळातच गंभीर स्वरूप धारण करू शकते.
डॉ. निलेश गौतम, सल्लागार इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट, पी. डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड एमआरसी, खर, मुंबई
"जर लक्षणं हृदयविकाराच्या झटक्याकडे निर्देश करत असतील, तर तातडीनं या स्थितीचं मूल्यमापन होऊन उपचार होतील अशा रुग्णालयात पोहोचणं आवश्यक आहे. हार्ट अटॅकमध्ये वेळ अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण उपचार जितक्या लवकर सुरू केले जातात तितके त्यांचे परिणाम चांगले असतात.", असं डॉ. निलेश गौतम सांगतात. ते मुंबईत खारमध्ये असलेल्या पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड एमआरसी येथे सल्लागार इंटरव्हेनशनल कार्डिओलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
डॉ. नीलेश गौतम यांना आम्ही या संदर्भात काही प्रश्न विचारले
रुग्णामध्ये याची लक्षणं असूनही तो रुग्णालयात जाण्यास तयार नसल्यास कुटुंबीयांनी काय करावं? असं विचारल्यावर ते म्हणाले, "कुटुंबीयांनी प्रथम ही लक्षणे समजून घ्यावीत आणि रुग्णाशी वाद न घालता किंवा त्याला घाबरवून न टाकता त्याची समजूत काढावी."
"तपासणीत अॅसिडिटी किंवा अंगदुखी निघाली तरी चालेल, पण हार्ट अटॅककडे दुर्लक्ष होऊ नये," हे त्याला शांतपणे सांगणं आवश्यक आहे.
रुग्णाला शांत बसवावं, अनावश्यक हालचाली टाळाव्यात आणि त्याला एकट्यानं रुग्णालयात जाण्याऐवजी वैद्यकीय मदतीसाठी संपर्क साधावा.
लक्षणं वाढू लागली, रुग्णाला भोवळ आल्यासारखं वाटू लागलं, जोरात श्वास घ्यावा लागत असेल किंवा तो बेशुद्ध झाला तर ती वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती आहे हे लक्षात घ्यावं असं डॉ. निलेश गौतम सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
अशा स्थितीत फक्त वेदनाशामक गोळी, अँटासिड घेणे किंवा घरी विश्रांती घेऊन लक्षणं कमी होण्याची वाट पाहणे धोकादायक का असू शकते? असं आम्ही त्यांना विचारलं.
त्यावर डॉ. नीलेश गौतम म्हणाले, "अँटासिड घेतल्यानंतर काही काळ आराम मिळाला तरी याचा अर्थ हृदयाशी संबंधित समस्या नाहीत, असा होत नाही. हार्ट अटॅकची लक्षणं वेगवेगळ्या प्रकारे दिसू शकतात आणि काही वेळा रुग्णाला थोड्या वेळासाठी बरं वाटू शकतं. त्याचप्रमाणे, वेदनाशामक औषधामुळे अस्वस्थता कमी झाली तरी हृदयाकडे जाणाऱ्या रक्तपुरवठ्यातील अडथळा दूर होत नाही."

डॉक्टरांकडे न जाता घरी विश्रांती घेतल्यानं या लक्षणांचं खरं कारण काय आहे हे समजू शकत नाही. तात्पुरता आराम मिळाल्यामुळे खोटी खात्री निर्माण होऊ शकते आणि रुग्णालयात जाण्यास उशीर होऊ शकतो.
छातीत नवीन किंवा कारण नसलेली अस्वस्थता, विशेषतः त्यासोबत घाम येणं, श्वास लागणं, मळमळ किंवा अशक्तपणा जाणवत असल्यास तातडीने वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे.
जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्यायची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.
आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)


























