फ्लाय दुबईच्या घटनेनंतर कॅप्टन स्मितसह होतेय नीरजा भानोत यांची आठवण; गोष्ट त्यांच्या धाडसाची

Caption- भारतीय विमान कर्मचाऱ्यांच्या धाडसाची अशीच एक घटना याआधीही इतिहासात नोंदली गेली आहे.
फोटो कॅप्शन, भारतीय विमान कर्मचाऱ्यांच्या धाडसाची अशीच एक घटना याआधीही इतिहासात नोंदली गेली आहे.
Published
वाचन वेळ: 9 मिनिटे

फ्लायदुबईच्या एफझेड1073 विमानातील घटनेत जखमी झालेले भारतीय नागरिक कॅप्टन स्मित मच्छर यांच्या धाडसाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

इस्रायली प्रवासी यानिव्ह हयून यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना सांगितलं की, कॅप्टन मच्छर यांनी बेशुद्ध होण्यापूर्वी प्रसंगावधान राखत कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यामुळे इतर प्रवाशांना कॉकपिटमध्ये जाता आलं आणि विमान वाचवण्यास मदत झाली.

नेतन्याहू यांनी नंतर 'एक्स'वर कॅप्टन मच्छर यांच्या धाडसाचं कौतुक केलं. कॉकपिटचा दरवाजा बंद राहिला असता, तर कदाचित कोणीही आत जाऊन विमान वाचवण्यास मदत करू शकलं नसतं, असं त्यांनी म्हटलं.

त्यांच्या मते, मच्छर यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळं विमानातील सर्व प्रवाशांचे प्राण वाचवण्यात मोठी आणि महत्त्वाची मदत झाली.

भारतीय विमान कर्मचाऱ्यांच्या धाडसाची अशीच एक घटना याआधीही इतिहासात नोंदवली गेली आहे.

ही गोष्ट नीरजा भानोत यांची आहे. त्या पॅन ॲमच्या विमानात सीनियर फ्लाइट पर्सर होत्या. 1986 मध्ये या विमानाचे अपहरण (हायजॅक) करण्यात आले होते.

नीरजा यांनी प्रसंगावधान आणि धाडस दाखवत 300 हून अधिक प्रवाशांचे प्राण वाचवले. परंतु, अपहरणकर्त्यांच्या गोळ्यांपासून त्या स्वतःला वाचवू शकल्या नाहीत.

कराचीत विमान हायजॅक

नीरजा भानोत 5 सप्टेंबर 1986 रोजी 'पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेज फ्लाइट 73'मध्ये होत्या. हे विमान मुंबईहून कराची आणि फ्रँकफर्टमार्गे न्यूयॉर्कला जात होतं. कराचीमध्ये या विमानाचे अपहरण करण्यात आले.

विमानात 360 प्रवासी आणि 19 क्रू सदस्य होते. अपहरण करणाऱ्या 4 जणांनी स्वतःला आणि विमानालाही उडवून देण्याचा कट रचला होता.

विमानाचे अपहरण झाल्याचे लक्षात येताच नीरजा यांनी सर्वात आधी पायलटांना याची माहिती दिली. त्यानंतर पायलट, को-पायलट आणि फ्लाइट इंजिनिअर हे आपत्कालीन (इमर्जन्सी) मार्गाने विमानातून बाहेर पडले.

Caption- फोटोमध्ये सर्वात उजवीकडे नीरजा भानोत आपल्या सहकाऱ्यांसोबत. (फाइल फोटो)
फोटो कॅप्शन, फोटोमध्ये सर्वात उजवीकडे नीरजा भानोत आपल्या सहकाऱ्यांसोबत. (फाइल फोटो)

अपहरणकर्त्यांशी 16 तास संघर्ष केल्यानंतर अंधार पडताच नीरजा यांनी विमानाचा आपत्कालीन दरवाजा उघडला. त्यानंतर प्रवासी विमानातून बाहेर पडू लागले.

जवळपास सर्व प्रवासी विमानातून बाहेर पडले होते. पण, 3 लहान मुलं अजूनही विमानात अडकलेली होती.

नीरजा या मुलांना विमानातून बाहेर काढत असताना अपहरणकर्त्यांची नजर त्यांच्यावर गेली. मुलं वाचली, परंतु अपहरणकर्त्यांच्या गोळ्यांपासून त्या स्वतः वाचू शकल्या नाहीत.

या घटनेत 22 जणांचा मृत्यू झाला तर 150 हून अधिक लोक जखमी झाले होते.

विविध वृत्तांनुसार, अपहरण करणारे चारही जण पॅलेस्टिनी होते. त्यांच्यात झायद हसन अब्द अल-लतीफ मसूद अल-सफारिनी हा त्यांचा प्रमुख होता.

पाकिस्तानने 2001 मध्ये त्याला अमेरिकेच्या फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनकडे (एफबीआय) सोपवलं. त्याला अमेरिकेत नेण्यात आलं, जिथे न्यायालयाने त्याला 160 वर्षांची शिक्षा सुनावली.

30 वर्षांनी क्रू सदस्यांनी काय सांगितलं?

या घटनेबद्दल क्रू सदस्यांनी आपला अनुभव सविस्तर सांगितला होता.

2016 मध्ये पॅन ॲम 73 विमानाचे अपहरण झाल्यानंतर 30 वर्षांनी पहिल्यांदाच विमानाच्या क्रूमधील 6 सदस्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता.

फ्लाइट अटेंडंट नुपूर अबरोल यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं होतं, "सुरुवातीला मला वाटलं की, विंगवरील आपत्कालीन दरवाजा (विंग एक्झिट) उघडून काही प्रवाशांसोबत विमानातून बाहेर पडावं. पण असं केल्यास इतर प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो, हे माझ्या लक्षात आलं."

त्या म्हणाल्या होत्या, "माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी हे अपहरण अजूनही संपलेलं नाही. काही क्रू सदस्य आणि प्रवासी आजही त्या भूतकाळातील दुःस्वप्नातून बाहेर पडण्याचा आणि नेमकं काय घडलं, हे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत."

सशस्त्र व्यक्ती विमानात कसे शिरले?

मुंबईहून उड्डाण केल्यानंतर विमान सकाळी सुमारे 6 वाजता कराची विमानतळावर पोहोचलं. त्याचवेळी 4 सशस्त्र लोक विमानतळाची सुरक्षा भेदून गोळीबार करत विमानात घुसले.

नुपूर यांनी पाहिलं की एक गोळी त्यांच्या एका सहकाऱ्याच्या पायाजवळ येऊन लागली. त्यांनी ओरडून सहकाऱ्याला विमानाचा दरवाजा बंद करण्यास सांगितलं.

फ्लाइट अटेंडंट शिरीन पवन यांच्याकडे सशस्त्र लोकांचं लक्ष गेलं नव्हतं. गोळीबाराचा आवाज ऐकताच त्या इंटरकॉमजवळ गेल्या आणि त्यांनी कॉकपिटचा इमर्जन्सी नंबर डायल केला.

Caption- नीरजा भानोत या 1986 मध्येच 'पॅन ॲम' एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस म्हणून जॉईन झाल्या होत्या.
फोटो कॅप्शन, नीरजा भानोत या 1986 मध्येच 'पॅन ॲम' एअरलाइन्समध्ये एअर होस्टेस म्हणून जॉईन झाल्या होत्या.

दुसऱ्या प्रयत्नात पायलटने फोन उचलला. शिरीन यांनी अपहरण झाल्याची माहिती देणारा कोड सांगितला.

आणखी एक फ्लाइट अटेंडंट सनशाइन वेसुवाला यांनी पाहिलं की, अपहरणकर्त्यांनी नीरजा भानोत यांना पकडलं होतं आणि त्यांच्या डोक्यावर बंदूक रोखली होती.

एके-47 आणि ग्रेनेड घेऊन आलेल्या एका कट्टरपंथीने सनशाइन यांना त्याला कॅप्टनकडे घेऊन जाण्यास सांगितलं.

परंतु, कॉकपिटमध्ये कोणीही नव्हतं. सनशाइन यांनी पाहिलं की, विमानातून बाहेर पडण्यासाठीची उपकरणं कॉकपिटमध्ये उघडी पडली होती. कॉकपिटच्या छतामधून बाहेर जाण्याचा मार्गही उघडा होता.

पण त्यांनी काहीच पाहिलं नाही, अशा पद्धतीने त्या वागल्या.

त्यांच्या मते, अपहरणकर्त्यांना विमानाबद्दल फारशी माहिती नसावी, असं वाटत होतं. त्यामुळे त्यांचं लक्ष उघड्या मार्गाकडे आणि बाहेर पडण्यासाठीच्या उपकरणांकडे गेलं नाही.

पायलट निघून गेल्याने अनेकांचे प्राण वाचले?

Skip podcast promotion and continue reading
BBC News मराठी आत्ताच फॉलो करा WhatsApp कर
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

नंतर अनेकांनी पायलट विमानातून बाहेर पडल्याबद्दल आणि प्रवाशांना तसंच सोडून आल्याबद्दल टीका केली. परंतु, क्रू सदस्य दिलीप बी. चंदानी यांच्या मते, पायलट बाहेर पडल्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव वाचले.

ते म्हणाले होते, "पायलट विमानातून बाहेर पडल्यामुळे आम्ही पूर्णपणे कट्टरपंथीयांच्या ताब्यात राहिलो नाही. पायलट विमानात असते, तर कट्टरपंथी त्यांना विमान उडवून एखाद्या इमारतीवर आदळण्यास सांगू शकले असते किंवा विमान हवेतच उडवून देऊ शकले असते."

पायलटला जबरदस्ती करून विमान सायप्रस आणि इस्रायलच्या दिशेने नेण्याची कट्टरपंथीयांची योजना होती.

सायप्रस आणि इस्रायलमध्ये त्यांच्या संघटनेचे काही सदस्य कैदेत होते. पॅन अमेरिकन सर्व्हिसचे कराचीचे संचालक विराफ दरोगा यांनी मेगाफोनवरून कट्टरपंथीयांशी बोलायला सुरुवात केली.

त्यांनी चारही सशस्त्र व्यक्तींना सांगितलं की, त्यांना जिथे जायचं आहे, तिथे पायलट विमान घेऊन जातील. विमानतळाचे अधिकारी विमानात पायलट पाठवण्याचा विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितलं.

याचदरम्यान कट्टरपंथीयांनी विमानात असलेल्या 29 वर्षीय अमेरिकन नागरिक राजेश कुमार यांना त्यांच्या सीटवरून ओढून बाहेर काढलं.

त्यांना विमानाच्या दरवाजाजवळ नेऊन गुडघ्यावर बसवलं आणि त्यांच्यावर बंदूक रोखली. एक तास उलटूनही पायलट आला नाही. त्यामुळे हल्लेखोरांनी राजेश कुमार यांना गोळी मारून विमानातून बाहेर फेकून दिलं.

सनशाइन यांनी सांगितलं होतं, "या घटनेनंतर विमानातील वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. ते किती निर्दयी आहेत, हे यावरून स्पष्ट झालं."

अमेरिकन प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न

विमानाचं अपहरण झाल्यानंतर साधारण 4 तासांनी कट्टरपंथींनी अमेरिकन नागरिकांचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांची संघटना 'अबू निदाल ऑर्गनायझेशन' मध्य-पूर्वेतील अमेरिका आणि इस्रायलच्या धोरणांना विरोध करत होती.

सनशाइन, माधवी बहुगुणा आणि इतर फ्लाइट अटेंडंट्सनी प्रवाशांचे पासपोर्ट जमा करायला सुरुवात केली. पण त्यांनी एक योजना आखली. त्यांनी अमेरिकन प्रवाशांचे पासपोर्ट जमा केले नाहीत, जेणेकरून अपहरणकर्त्यांना त्यांची ओळख पटू नये.

क्रू सदस्य शिरीन आणि सनशाइन यांनी मुख्य अपहरणकर्ता झायद हसन अब्द अल लतीफ सफारिनी याच्यासोबत सर्वाधिक वेळ घालवला.

Caption- अखेरच्या क्षणी मुलांना वाचवताना नीरजा यांना अपहरणकर्त्यांनी गोळ्या घातल्या होत्या.
फोटो कॅप्शन, अखेरच्या क्षणी मुलांना वाचवताना नीरजा यांना अपहरणकर्त्यांनी गोळ्या घातल्या होत्या.

सफारिनी विमानाबाहेरची परिस्थिती पाहण्यासाठी शिरीन आणि सनशाइन यांना बंदुकीच्या धाकावर आपल्या पुढे मानवी ढाल म्हणून उभं करत असत.

शिरीन यांनी सांगितलं, "अशा वेळी तो माझे केस पकडून माझा चेहरा खिडकीजवळ नेत असत आणि बाहेर काय दिसतंय, असं विचारायचा. तो म्हणायचा की, तो अमेरिकन लढाऊ विमानांची वाट पाहत आहे."

विमानात मेकॅनिक म्हणून काम करणाऱ्या 28 वर्षांच्या मेहरजी खारस यांना कट्टरपंथीयांनी रेडिओवरून अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यास भाग पाडलं.

त्यांना विमान उडवण्यासाठी एखादा पायलट मिळेल, अशी अजूनही आशा होती.

सनशाइन यांनी सांगितलं की, सफारिनी अनेकदा त्यांच्याशी जवळीक साधण्याचा (फ्लर्ट) प्रयत्न करायचा आणि त्यांना आपल्यासोबत सायप्रसला येण्याचा प्रस्तावही दिला होता.

बराच वेळ वाट पाहिल्यानंतर कट्टरपंथीयांनी धमकी दिली की, जर पायलट आला नाही तर ते दर 15 मिनिटांनी एका प्रवाशाला गोळी मारतील.

शिरीन यांनी पाहिलं की, मेहरजी यांना गोळी मारण्यात आली होती.

गोंधळात नुपूर आणि माधवी यांनी विमानाच्या विंगवरून खाली उडी मारून बाहेर पडल्या. सुमारे 20 फूट उंचीवरून उडी मारल्यामुळे त्यांची हाडं मोडली.

सनशाइन आणि दिलीपही विमानाच्या विंगवर पोहोचले होते. परंतु, अंधार असल्यामुळे त्यांना कुठे उडी मारायची हे समजत नव्हतं. त्यानंतर क्रू सदस्यांनी इमर्जन्सी स्लाइडच्या मदतीने प्रवाशांना विमानाबाहेर काढायला सुरुवात केली.

सर्व प्रवासी विमानाच्या विंगवरून बाहेर पडल्यानंतर क्रू सदस्य पुन्हा विमानात गेले. त्यावेळी गोळीबाराचा आवाज बंद झाला होता आणि कट्टरपंथी कुठे आहेत, याची माहिती त्यांना नव्हती.

नीरजा कोणत्या अवस्थेत आढळल्या?

सनशाइन यांनी विमानात नीरजा यांना पाहिलं. त्यांच्या कंबरेला गोळी लागली होती आणि बरंच रक्त वाहत होतं, पण त्या शुद्धीत होत्या. सनशाइन यांनी दिलीप यांना मदतीसाठी बोलावलं. दोघांनी मिळून नीरजा यांना इमर्जन्सी स्लाइडजवळ आणलं.

त्यांनी आधी नीरजा यांना स्लाइडवरून खाली उतरवलं आणि त्यानंतर स्वतःही बाहेर आले. शिरीन आणि त्यांच्या सहकारी राणी वासवानी या विमानातून बाहेर पडलेल्या शेवटच्या दोन ओलीस होत्या.

Caption- नीरजा यांना रुग्णालयात नेण्यात आलं, तेव्हा तिथे गोंधळाचं वातावरण होतं.
फोटो कॅप्शन, नीरजा यांना रुग्णालयात नेण्यात आलं, तेव्हा तिथे गोंधळाचं वातावरण होतं.

पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना विमानतळाच्या सुरक्षा दलाने 3 अपहरणकर्त्यांना पकडलं.

पाकिस्तानचे सुरक्षा दल विमानात पोहोचेपर्यंत सफारिनी विमानातच होता. नीरजा यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं की, कराचीच्या जिन्ना रुग्णालयात नेईपर्यंत त्या जिवंत होत्या.

"नीरजा यांना वेळेत योग्य उपचार मिळाले असते, तर त्या आजही जिवंत असत्या," असं सनशाइन यांनी सांगितलं होतं.

दिलीप म्हणाले होते, "विमानतळावर केवळ प्राथमिक वैद्यकीय सुविधा होत्या. रुग्णालय विमानतळापासून अनेक किलोमीटर दूर होतं. नीरजा यांना स्ट्रेचरशिवाय अॅम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलं."

नीरजा वैयक्तिक आयुष्यात कशा होत्या?

नीरजा भानोत यांच्याबद्दलचे अनेक किस्से त्यांचे भाऊ अखिल भानोत यांनी सांगितले होते.

नीरजा यांचा जन्म 7 सप्टेंबर 1963 रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला. त्यांना सर्वजण प्रेमाने 'लाडो' म्हणत असत. त्यांचं कुटुंब चंदीगडमध्ये राहत होतं. त्यांचे वडील हरीश भानोत, आई रमा भानोत आणि दोन मोठे भाऊ अनीश आणि अखिल भानोत होते.

हरीश भानोत हे 'हिंदुस्तान टाइम्स'चे पत्रकार होते.

नीरजा सहावीत शिकत असताना त्यांच्या वडिलांची बदली मुंबईला झाली. त्यांनी मुंबईतील बॉम्बे स्कॉटिश स्कूलमध्ये शिक्षण घेतलं आणि त्यानंतर झेवियर्स कॉलेजमधून पदवीचं मिळवली.

अखिल यांच्या म्हणण्यानुसार, नीरजा कोणालाही घाबरत नव्हत्या आणि आपल्या मतावर ठाम राहत असत. त्या वडिलांप्रमाणेच निडर होत्या आणि त्यांच्याकडूनच त्यांनी प्रेरणा घेतली होती.

एके दिवशी नीरजा अखिल यांच्यासोबत स्कूटरवरून कॉलेजला जात होत्या. वाटेत एक व्यक्ती आपल्या पत्नीला मारहाण करत होता.

नीरजा यांनी स्कूटर थांबवायला लावली आणि त्या व्यक्तीजवळ जाऊन त्याचा हात धरला.

त्या महिलेने नीरजा यांना तिथून बाजूला होण्यास सांगितलं आणि हे आमचं वैयक्तिक प्रकरण असल्याचं सांगितलं. तरीही नीरजा तिथून हटल्या नाहीत. अखिल यांनी मोठ्या कष्टाने त्यांची समजूत घातली आणि त्यांना घरी आणलं.

अखिल यांच्या म्हणण्यानुसार, नीरजा त्यावेळी म्हणाल्या होत्या, "आयुष्य कधी निघून जाईल, हे कळणारही नाही. पण मी माझ्या तत्त्वांशी कधीही तडजोड करणार नाही. तिथे जे घडत होतं, ते मला सहन झालं नाही."

नीरजा मॉडेलिंगच्या क्षेत्रात कशा आल्या?

नीरजा यांनी शिक्षणासोबतच मॉडेलिंगही सुरू केलं होतं. अखिल यांच्या म्हणण्यानुसार, वयाच्या अवघ्या 19व्या वर्षी त्यांनी मॉडेलिंगच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं.

एकदा नीरजा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कॉलेजच्या बाहेर उभ्या होत्या. त्यावेळी 'बॉम्बे' नावाचं एक मासिक 'गर्ल्स नेक्स्ट डोअर' नावाचा लेख तयार करत होतं.

त्या मासिकासाठी नीरजा यांचा फोटो काढण्यात आला. हा फोटो प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना अनेक मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातींसाठी ऑफर येऊ लागल्या.

Caption- एका जाहिरातीत नीरजा भानोत
फोटो कॅप्शन, एका जाहिरातीत नीरजा भानोत

1980च्या दशकात त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांसाठी सुमारे 70 ते 80 जाहिरातींमध्ये काम केलं.

अखिल सांगतात, नीरजा खूप आनंदी आणि उत्साही स्वभावाच्या होत्या. त्यांना संगीताची खूप आवड होती आणि त्या नेहमी इतरांना हसवत असत.

त्या एकदा हसायला लागल्या की त्यांना हसू आवरत नसत. हसता हसता त्यांच्या डोळ्यांत पाणी यायचं, तरीही त्यांचं हसणं सुरूच राहायचं.

कुटुंबातील कोणी रडत असेल किंवा उदास असेल, तर नीरजा म्हणायच्या, "पुष्पा, आय हेट टियर्स."

त्या राजेश खन्ना यांच्या मोठ्या चाहत्या होत्या. त्या अनेकदा त्यांचा हा संवाद म्हणायच्या, "बाबूमोशाय, जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं..."

अखिल यांच्या म्हणण्यानुसार, नीरजा वडिलांचा खूप आदर करत असत आणि त्यांचं म्हणणं कधीही टाळत नव्हत्या. 1985 मध्ये त्यांच्या वडिलांनी नीरजांसाठी लग्नाचं स्थळ आणलं होतं.

नीरजा यांना लग्न करायचं नव्हतं. तरीही वडिलांच्या इच्छेसाठी त्यांनी लग्न केलं. लग्नानंतर त्यांचे पती त्यांना सोबत घेऊन शारजाहला गेले.

अखिल यांच्या म्हणण्यानुसार, नीरजा तिथे केवळ दोन महिने राहिल्या. त्यांच्या पतीकडून हुंड्यासाठी त्यांना त्रास दिला जात होता. त्यामुळे त्रासलेल्या नीरजा काहीतरी कारण सांगून मुंबईला परतल्या आणि पुन्हा कधीही शारजाहला गेल्या नाहीत. मुंबईला परतल्यानंतर त्यांनी पुन्हा मॉडेलिंग सुरू केलं.

नीरजा एअरहोस्टेस कशा बनल्या?

नीरजा यांच्या एका मैत्रिणीने 'पॅन ॲम'मध्ये एअरहोस्टेसच्या नोकरीसाठी अर्ज केला होता. तिने मुलाखतीला सोबत यावं आणि मेकअपमध्ये मदत करावी, अशी विनंती नीरजा यांना केली.

तिथे एअरलाइन्सशी संबंधित एका व्यक्तीची नजर नीरजा यांच्यावर पडली. त्यांनी नीरजा यांनाही 'पॅन ॲम'मध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याचा सल्ला दिला.

Caption- नीरजा आपल्या वडिलांचा खूप आदर करत असत आणि त्यांचं म्हणणं कधीही टाळत नव्हत्या.
फोटो कॅप्शन, नीरजा आपल्या वडिलांचा खूप आदर करत असत आणि त्यांचं म्हणणं कधीही टाळत नव्हत्या.

नीरजा यांची निवड झाली आणि त्यांना ट्रेनिंगसाठी मियामीला पाठवण्यात आलं. मियामीमध्ये ट्रेनिंग सुरू असतानाच त्यांना पर्सर पदावर बढती देण्यात आली.

नीरजा 1986 मध्येच 'पॅन ॲम'मध्ये रुजू झाल्या होत्या. ज्या दिवशी विमानाचं अपहरण झालं, ती त्यांची सातवी फ्लाइट होती. त्या दिवशी नीरजांची सुट्टी होती. मात्र, ड्युटीवर असलेल्या दुसऱ्या क्रू सदस्याची प्रकृती बिघडल्यामुळे नीरजा ड्युटीवर आल्या होत्या.

यानंतर नीरजा यांना ड्युटीवर जाण्याची विनंती करण्यात आली आणि त्यांनी त्याला होकार दिला.

अपहरणाच्या साधारण आठवडाभर आधी नीरजा लंडनहून अशा अपहरणाच्या परिस्थितीचा सामना कसा करायाचा याचं प्रशिक्षण घेऊन परतल्या होत्या.

वाढदिवसाच्या दिवशीच मृतदेह घरी पोहोचला

विमानाच्या अपहरणाच्या घटनेच्या आधी नीरजा यांनी एका जाहिरातीचं शूटिंग केलं होतं. त्या रात्री सुमारे 8 वाजता घरी आल्या आणि कुटुंबीयांना शूटिंगमधील काही गोष्टीही सांगितल्या होत्या.

याच वेळी त्यांच्या वाढदिवसाचीही चर्चा झाली. नीरजा म्हणाल्या होत्या की, यावेळी त्या वाढदिवस मित्रमैत्रिणींसोबत नाही, तर केवळ कुटुंबासोबत साजरा करतील.

Caption- नीरजा भानोत यांच्या आई रमा भानोत राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांच्याकडून सन्मान स्वीकारताना.
फोटो कॅप्शन, नीरजा भानोत यांच्या आई रमा भानोत राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांच्याकडून सन्मान स्वीकारताना.

अखिल यांनी बीबीसीला सांगितलं होतं, "पण त्यांच्या वाढदिवशीच त्यांचा मृतदेह घरी आला."

नीरजा यांच्या धाडसासाठी भारत सरकारने 1987 मध्ये त्यांना अशोक चक्र, पाकिस्तान सरकारने त्यांना तमगा-ए-पाकिस्तान, तर अमेरिकन सरकारने हिरोइझम अवॉर्ड प्रदान केला.

2016 मध्ये नीरजा यांच्या आयुष्यावर 'नीरजा' नावाचा चित्रपट बनवण्यात आला. या चित्रपटात सोनम कपूर यांनी नीरजा यांची भूमिका साकारली होती. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सोनम कपूर यांनी एका मुलाखतीत नीरजा यांच्या आईकडून ऐकलेला एक किस्सा सांगितला होता.

नीरजा यांच्या आई रमा भानोत अशोक चक्र स्वीकारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग यांनी त्यांना तुम्ही रडत का आहात? असा प्रश्न विचारला. 'तुम्हाला नीरजासारखी मुलगी मिळाली, याचा तुम्हाला अभिमान वाटायला हवा,' असं त्यांनी रमा भानोत यांना म्हटलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)